अजूनकाही
हल्ली बऱ्याचदा समीक्षक-प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या नावाद्वारे त्याच्या चांगल्या वाईट असण्याकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या चित्रपटांवरील विनोद फिरत असतात. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’, ‘कलंक’ ही या परंपरेतील काही महत्त्वाची नावं आहेत. बेहझाद खंबाटा दिग्दर्शित ‘ब्लँक’देखील या यादीत समावेश होऊ शकेल अशी (अ)क्षमता बाळगतो. एका ढोबळ कथेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात रचलेल्या ‘ब्लँक’च्या पटकथेची पानं त्याच्या मूळ कथेलाच विशेष खोली नसल्यानं संकल्पनात्मकदृष्ट्या कोरी भासत राहतात. ज्यामुळे एकामागून एक दृश्यं घडत असली तरी कथानक रेंगाळत राहतं, आणि चित्रपटाला थरारक घडामोडी घडत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी अगदीच भडक पार्श्वसंगीतासारख्या तकलादू गिमिक्सची गरज भासते.
दहशतवादविरोधी पथकाचा प्रमुख दिवाण हे पात्र ही भूमिका साकारणाऱ्या सनी देओलच्या याआधीच्या भूमिकांचं मिश्रण भासतं. अर्थात असं वाटण्याचं कारण म्हणजे या पात्राच्या स्वभाववैशिष्ट्यांपेक्षा देओल ते ज्या प्रकारे साकारतो यात दडलेलं आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमधून त्यांच्या सूचना न पाळता त्वेषात बाहेर पडणं, कुठल्याही क्षणी अनपेक्षितपणे (आणि अनावश्यकरित्या) जोरात ओरडत बोलणं, या कृती या गोष्टीचं उदाहरण आहेत. हनीफ (करण कपाडिया) हा दहशतवादी अनपेक्षितपणेच पोलिसांच्या हाती लागतो. त्याच्या छातीवर असलेला बॉम्ब थेट त्याच्या हृदयाशी जोडलेला असल्यानं ‘उसकी दिल की धडकन बॉम्ब की बॅटरी हैं. ये मरा तो फटा, बॉम्ब अगर निकाला तो फटा’ यासारखे बॉलिवुडी संवाद तोंडावर फेकले जातात. त्यात या दहशतवाद्याचा अपघात झालेला असल्यानं त्याची स्मृतीदेखील गेलेली असते! अशा ऐकताक्षणीच विलक्षणरीत्या कृत्रिम भासणाऱ्या या गोष्टीत देओलचं नायक असणं, दाढी वाढवलेल्या मुस्लीम पात्रांनी ‘जिहाद’ची भाषा करणं आणि चित्रपटात ‘हर मुसलमान आतंकवादी नहीं होता’ आणि यासोबत येणाऱ्या इतर पालुपद-वजा-संदेशांचा समावेश असणं स्वाभाविक आहे.
हुस्ना (इशिता दत्ता) आणि रोहित (करणवीर शर्मा) हे दोघे दिवाणचे कनिष्ठ अधिकारी त्याच्यासोबत काम करतात. रोहितच्या निमित्तानं हिंदी चित्रपटांमध्ये पोलीस असलेल्या अमराठी पात्रांना ‘चला, चला’, ‘ए इकडं ये’सारखे संवाद अमराठी अभिनेत्यांकडून का म्हणवून घ्यावेसे वाटतात, हा प्रश्न पुन्हा एकदा पडतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram
.............................................................................................................................................
अर्थात बॉलिवुडच्या या लोकांच्या सरसकटीकरण करण्याच्या सवयीची एव्हाना सर्वांनाच सवय झालेली आहे. ‘ब्लँक’मध्ये सरसकट सर्वच अभिनेत्यांचं चित्रण हे नीरस अशा दृष्टिकोनातून करण्यात आलेलं आहे. परिणामी हे करताना चित्रपटकर्त्यांनी मुळातच अभिनय न येणारे अभिनेते निवडले की, कामचलाऊ अभिनय करणाऱ्या लोकांवरही अभिनय न करण्याची सक्ती करत चित्रपट बनवला हाही प्रश्न पडतो.
अगदी सनी देओल आणि जमील खानसारख्या लोकांकडूनही हे चक्र मोडणार नाही, याची पुरेपूर काळजी इथं घेतली गेली आहे. त्यामुळे देओलच्या निमित्तानं किमान सहन करता येईल असाही चित्रपटही इथं समोर येत नाही. शिवाय, ज्या करण कपाडियाच्या पदार्पणासाठी या चित्रपटाचा घाट घातला गेला आहे, तोही अभिनेता म्हणून अगदीच अपरिणामकारक ठरत असल्यानं चित्रपटाला स्वीकारार्ह ठरवतील, अशा मूलभूत गोष्टींचाही इथं अभाव जाणवतो.
चित्रपटाची कथा अगदीच ओल्ड-स्कूल आणि मूलभूत स्वरूपाची, बऱ्याच नव्या-जुन्या गोष्टींची सरमिसळ असलेली असली तरी ती विस्कळीत आणि अस्ताव्यस्त पसरलेली आहे. त्यात चित्रपटाला रंजक बनवण्याच्या दृष्टीनं जे तथाकथित ट्विस्ट्स यात पेरले आहेत, तेही अगदीच उथळ आणि भाकीत करता येणाऱ्या स्वरूपाचे आहेत. दिग्दर्शक खंबाटाच्या दिग्दर्शनाविषयीदेखील हेच लागू पडतं.
काही दृश्यं चांगलं रंगपटल आणि मांडणीच्या रूपात समोर येत असली तरी हे फारच क्वचित घडतं. इतर वेळी कथेत असलेला अस्ताव्यस्तपणा चित्रण आणि मांडणीतही दिसतो. हॉलिवुडमधील ‘जॉन विक’, ‘जेसन बॉर्न’सारख्या चित्रपट मालिकांमध्ये वापरलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा फाईट सीक्वेन्सच्या चित्रणाच्या शैलीचा प्रभाव इथं ठळकपणे दिसून येत असला तरी तो परिणामकारक ठरत नाही.
त्यात चित्रपटभर सोबतीला असलेलं राघव साचार, अर्को मुखर्जी आणि सोनल प्रधान यांचं भडक स्वरूपाचं पार्श्वसंगीत कथेच्या पातळीवर मुळातच अस्तित्वात नसलेल्या थराराचा आभास निर्माण करू पाहण्याची अप्रभावी गिमिक ठरतं. चित्रपटात पार्श्वभूमीवर सुरू असणारी गाणी चित्रपट साध्य करू पाहत असलेल्या थरारक अनुभवात सहाय्यक ठरण्याऐवजी मारक ठरतात.
‘ब्लँक’ हा अधिक चांगला होऊ शकला असता असा विचार करणंदेखील अति-आशावादी असण्याचं लक्षण आहे. कारण त्याच्या कथानकातील उणिवांकडे दुर्लक्ष करत चांगल्या मांडणीची आशा बाळगणं हे ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशा तऱ्हेचं आहे. सदर चित्रपट अनेक पातळ्यांवर अप्रभावी ठरणारा आहे, इतकंच काय ते खरं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment