ज्येष्ठ समीक्षक, महर्षि शिंदे यांचे व्यासंगी अभ्यासक आणि विनोद-वाङ्मयाचे मर्मग्राही अभ्यासक डॉ. गो. मा. पवार यांचं नुकतंच (१६ एप्रिल) निधन झालं. त्यांच्याविषयी त्यांचे दीर्घकाळचे मित्र व समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी लिहिलेल्या दीर्घलेखाचा हा संपादित अंश. हा लेख ‘सुहृद आणि संस्मरणे’ या गो. मा. पवार यांच्या पुस्तकातून घेतला असून हे पुस्तक सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे.
.............................................................................................................................................
प्रा. गो. मा. पवारांचा आणि माझा स्नेह गेल्या चव्वेचाळीस वर्षांचा. १९६० मध्ये माझी निवड मराठवाडा विद्यापीठात झाली. औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेजातून मी जून १९६०मध्ये विद्यापीठात रुजू झालो आणि अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून गो. मा. पवार औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेजात बदलून आले. औरंगाबादला आल्यावर ते गुलमंडीवरील दिवाण देवडीतील एका हॉटेलात उतरले. तेथून त्यांनी मला भेटीसाठी येण्याचा निरोप दिला. एका सायंकाळी या हॉटेलात त्यांची आणि माझी पहिली भेट झाली.
१९५९ साली विविध ठिकाणच्या सरकारी महाविद्यालयांत मराठी अधिव्याख्यात्यांच्या तीन जागा निघाल्या होत्या. त्या वेळी माझी आणि पवारांची एकाच वेळी निवड झाली होती. माझी नेमणूक औरंगाबादच्या आणि पवारांची नेमणूक अमरावतीच्या कॉलेजात झाली होती.
या जागांच्या निवडीसाठी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात आमचे इंटरव्ह्यू होते. त्यासाठी पंचवीसएक उमेदवार जमले होते. त्यांपैकी काहींच्या तिथं ओळखी झाल्या. कोट, टोपी, पांढरे स्वच्छ दुटांगी धोतर, सोनेरी फ्रेमचा चष्मा अशा मध्यम उंचीच्या एकानं मला स्वत:ची ‘पवार’ म्हणून ओळख करून दिली होती. पारंपरिक पोशाखातले हे पवार माझ्या चांगले स्मरणात राहिले होते. गो. मा. पवारांचं जेव्हा मला भेटीचं निमंत्रण आलं, तेव्हा हे म्हणजे कोट-टोपीवाले पवारच, अशी माझी समजूत झाली. अशा कोट-टोपीवाल्या पवारांच्या भेटीसाठी मी फारसा उत्सुक नव्हतो.
मी हॉटेलवर पोचलो. मध्यभागी भलामोठा चौक, त्यात टेबलखुर्च्या टाकून चहा-फराळाला येणाऱ्या गिऱ्हाइकांची सोय केलेली. चौकाच्या चारी बाजूंनी उतारूंसाठी खोल्या, असं ते हॉटेल होतं. स्वागतकक्षात मी पवारांची चौकशी केली. मॅनेजरनी एका पोऱ्याला पवारांना बोलावून आणण्यासाठी पाठवलं. मी मधल्या चौकातल्या एका टेबलाशी बसलो. काही क्षणांत खरेखुरे पवार समोर येऊन उभे राहिले. धरधरीत नाक, तेजस्वी डोळे, काहीसा लांबट देखणा चेहरा, उंच सडसडीत शरीरयष्टी, केसांचा मधोमध पाडलेला भांग, चेहऱ्यावर प्रसन्न हसू, अशी व्यक्ती समोर उभी राहताच माझ्या मनातलं कोट-टोपी-दुटांगी धोतरवाल्या पवारांचं चित्र पूर्णपणे पुसून गेलं. फडक्यांच्या कादंबरीत नायक म्हणून शोभणाऱ्या या पवारांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली. हे पवार आपले मित्र व्हायला हवे, असं उत्कटतेनं वाटून गेलं.
सुप्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते पन्नालाल सुराणा हे पवारांचे मित्र. ‘पवारांना औरंगाबादेत हवी असलेली मदत करा,’ अशी विनंती करणारं पन्नालाल सुराणांचं पत्र ‘मराठवाडा’ द्विसाप्ताहिकाचे संपादक अनंत भालेराव यांच्यासाठी पवारांनी आणलं होतं. ते द्यायला गेलेले पवार अनंतरावांचे मित्र होऊनच बाहेर आले. गव्हर्नमेंट कॉलेजात रुजू झाल्या झाल्या तेथील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. भगवंत देशमुखांशी त्यांची मैत्री झाली.
औरंगाबादच्या मिलकॉर्नर परिसरात पवारांना दोन खोल्यांचं घरही मिळालं आणि ते औरंगाबादी स्थिरावले. अनंत भालेरावांभोवती प्रा. भगवंत देशमुख, प्रा. तु. शं. कुळकर्णी, प्रा. म. द. पाध्ये, प्रा. चंद्रकांत भालेराव, बीडहून अधूनमधून येणारा नरेंद्र चपळगावकर आणि मी अशांचा एक मित्रपरिवार जमलेला होता. गो. मा. पवार त्यात केव्हा मिळून मिसळून गेले, हे आम्हा कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्यांचं औरंगाबादी आगमन होताच महिन्याभरात ते औरंगाबादकर होऊन गेले.
अनंत भालेरावांच्या परिवारातील आम्ही सर्व जण ‘मराठवाडा साहित्य परिषद’ ही संस्था चालवत होतो. पवारही या संस्थेत सामील झाले. साहित्य परिषदेत रोज सायंकाळी अनंत भालेरावांसह आम्हा सर्वांचा अड्डा जमे. वाङ्मयावर, राजकारणावर गप्पा रंगत. अनंत भालेराव हे या गप्पागोष्टींच्या मैफिलीत केंद्रस्थानी असत. अनंत भालेरावांच्या ठिकाणी सूक्ष्म विनोदबुद्धी होती. कुठल्याही घटनाप्रसंगावर अनपेक्षित मार्मिक आणि मिश्कील प्रतिक्रिया नोंदवण्याची एक हातोटी त्यांच्या ठिकाणी होती. एकदम नव्या आणि अनपेक्षित प्रतिक्रियांतून ते मैफिलीला थरारून टाकत असत. चंद्रकांत भालेराव, तु. शं. कुळकर्णी यांच्या ठिकाणीही त्यांची खास विनोदशैली होती. त्यामुळे या मैफिलीत विनोदाचे फटाके फुटत. पवारांचीही एक खास विनोदपद्धती होती. आपल्या या खास विनोदशैलीसह ते जेव्हा आमच्या दैनंदिन बैठकीत सामील झाले, तेव्हा या बैठकीची रंगत अनेक पटींनी वाढली. त्याचबरोबर या मैफिलीत त्यांची उपस्थिती अनिवार्य बनून गेली.
भेट झाल्यानंतर आम्हा दोघांची मैत्री झपाट्यानं वृद्धिंगत होत गेली. औरंगाबादला आल्यावर पवार मिलकॉर्नरला राहू लागले. त्यांचं हे घर माझ्या घरापासून दोनएक किलोमीटर अंतरावर. सायंकाळी मी चालत त्यांच्या घरी जात असे. दोन खोल्यांचं हे घर ब्रह्मचाऱ्याचं आदर्श घर होतं. तसं ते ऐसपैस असूनही त्यात जागोजाग भरपूर पसारा होता. खोलीभर इथंतिथं पुस्तकं आणि वर्तमानपत्रं पडलेली असत. वापरून मळलेले पण धोब्याकडे टाकायचे राहून गेलेले कपडे, वेडीवाकडी पसरलेली वर्तमानपत्रं असा घरभर पसारा असे. पुरोगामी विचाराला वाहिलेलं पण कंटाळवाणं असं एक साप्ताहिक पोष्टानं पवारांकडे येत असे. सामाजिक जाणीवेपोटी त्यांनी त्याची वर्गणी भरलेली होती; पण आवर्जून वाचावं असं त्यात फारसं नसं. पोष्टानं हे साप्ताहिक आलं, की त्याचं आवरणही न फाडता पवार ते कॉटखाली सरकवून देत. न उघडलेल्या या अंकांचा भलाथोरला ढीग कॉटखाली साचलेला असे.
मी पवारांच्या खोलीवर गेलो आणि प्रसन्न चेहऱ्यानं पवार जर म्हणाले, “आज आपण शेव-चिवडा खाऊ या.” तर मी समजायचो की पवार आज विशेष खुशीत आहेत. पवारांना शेवचिवड्यांसारखे पदार्थ फार प्रिय असत. मग शेव-चिवडा खाऊन पवारांची ही खुशी साजरी केली जाई. अनेकदा ऑम्लेट-पाव असा बेत आखून तो त्यांच्या खोलीवर पार पाडला जाई. पवारांना दूधपाणी एकत्र करून, त्यात भरपूर साखर आणि चहापत्ती टाकून, उकळून तयार केलेला चहा फार आवडे. तोही आम्ही घेत असू. नंतर मात्र त्यांना अतिशय फिका, उच्च दर्जाचा चहा आवडू लागला. पत्तीवर गरम पाणी टाकून थोडासा मूरवू देऊन तयार होणारा चहा ते घेऊ लागले.
कुटुंबाबाहेर एकटेच, दीर्घ काळ राहिलेल्याच्या खाण्यापिण्याच्या आणि पसारा करून ठेवण्याच्या ज्या सवयी असतात, त्या अर्थातच पवारांनाही होत्या. पुढे लग्न झाल्यावर सुजातावहिनींनी घराला शिस्तीचं, टापटिपीचं वळण लावलं. पवारांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत आमूलाग्र बदल झाला. त्याचं श्रेय अर्थातच सुजातावहिनींच्या सुगरणपणाकडे जातं. सुजातावहिनींच्या आगमनानंतरही पवारांची पसारा करण्याची सवय मात्र गेली नाही. लग्नानंतर पवारांच्या घरात जो नीटनेटकेपणा, टापटीप दिसू लागली, ती पवारांच्या सवयीत बदल झाल्यामुळे नव्हे; तर पवारांनी पसारा केला, की तो ताबडतोब आवरून टाकण्याच्या सुजातावहिनींच्या कार्यपद्धतीमुळे.
पवारांच्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीतून शेव-चिवडा किंवा ब्रेड-ऑम्लेट खाऊन आम्ही साहित्य परिषदेकडे किंवा अनंतरावांच्या जाधव मंडीतल्या घरी जायला निघत असू. औरंगाबादमधलं आमचं भटकणं पायीच असे. कधीकधी पवार रात्री जेवायला माझ्याकडे असत. जेवण झालं, की आम्ही भटकायला बाहेर पडत असू. कधी सरस्वती भुवन हायस्कूलच्या ग्राउंडवर तर कधी चौकामधल्या मोहंमदभाई फोटो स्टुडिओच्या पायऱ्यांवर जाऊन गप्पा मारत बसत असू. गप्पा कसल्या, भांडणाच्या सीमेवर पोचणारे वाङ्मयीन प्रश्नांवरचे ते वितंडवाद असत. आम्ही दोघंही तिशीच्या आतले, प्रत्येक वेळी आपणच जिंकलं पाहिजे, ही तारुण्यातली स्वाभाविक इच्छा आम्ही दोघांच्याही ठिकाणी असे. त्यामुळे वाङ्मयीन प्रश्नांवर आम्ही हिरिरीनं भांडत असू.
वाङ्मयातलं फक्त आपल्यालाच कळतं, असा भ्रम आम्हा दोघांच्याही ठिकाणी असे. आमच्या भूमिका परस्परविरोधी असत आणि आम्ही दोघंही आपापल्या मुद्द्यांना चिकटून राहत असू. वाद घालताना तेच ते युक्तिवाद पुन:पुन्हा करत असू. बरीच रात्र झाली, की पवार आपल्या मठीकडे जायला निघत. अर्ध्या रस्त्यापर्यंत मी त्यांना सोबत करी.
पुढे वयाच्या वाढीबरोबर बरीच प्रगल्भता आली. वाङ्मयाकडे पाहण्याच्या भूमिकांमध्ये अमुक एक ‘खरी’ आणि अमुक एक ‘खोटी’ असं निखालसपणे म्हणता येत नसतं; अमुक एका भूमिकेतून वाङ्मयाची अधिक चांगल्याप्रकारे, अधिक सुसंगत आणि पूर्णतेला नजीक अशी व्यवस्था लावता येते, असं मात्र म्हणता येतं; याचं भान आम्हा दोघांनाही आलं. हळूहळू आमच्यातले वाङ्मयीन वितंडवाद नाहीसे झाले आणि त्याची जागा चर्चांनी घेतली. “तुम्ही जी भूमिका घेता आहात तिच्यात तुमचं हे म्हणणं सुसंगत ठरत नाही; खरं म्हणजे तुम्ही असं असं म्हणणं रास्त ठरेल.” असं आम्ही एकमेकांना पटवून देऊ लागलो. आमच्या नंतरच्या चर्चा अधिक विधायक बनल्या. माझ्या भूमिकेतल्या अनेक विसंगती आणि त्रुटी पवारांशी झालेल्या या प्रकारच्या चर्चांमुळेच मला काढून टाकता आल्या.
सामान्यपणे मराठी वाङ्मयाचा प्राध्यापक म्हटला, की त्याचं जीवनातील विविध अशा व्यावहारिक अंगांचं ज्ञान शून्य असतं; राजकारण, समाजकारण आणि अन्य ज्ञानशाखा यांचा तर त्याला पुसटसाही गंध नसतो, अशी एक समजूत असते. ती पूर्णांशानं खोटीही नसते. मराठीचे प्राध्यापक असूनही पवारांचा मात्र अनेक जीवनक्षेत्रांशी आणि अभ्यासशाखांशी जिवंत संपर्क होता. महाराष्ट्राचा, विशेषत: एकोणिसाव्या शतकाचा सामाजिक-वैचारिक इतिहास त्यांनी बारकाईनं अभ्यासला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास त्यांना ज्ञात होता. भारतातले वेगवेगळे पक्ष, त्यांच्या राजकीय भूमिका, ध्येयधोरणं, त्यांच्या राजकीय कृती या सर्वांचं सूक्ष्म निरीक्षण करण्याची त्यांना सवय होती. त्यातून त्यांची मतंही तयार झाली होती. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या ज्ञानक्षेत्रांत त्यांचं वाचन होतं. समाजप्रबोधन संस्थेनं म्हणूनच त्यांच्याकडून ‘विवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ हे पुस्तक लिहून घेतलं होतं. त्यात त्यांनी तत्त्वज्ञानातील विवेकवाद आणि फ्रॉईडचं मनोविश्लेषणशास्त्र यांचा आधार घेत एका जीवनदृष्टीची तर्कशुद्ध मांडणी केली होती. एका मराठीच्या प्राध्यापकाचं पहिलंच पुस्तक असं तत्त्वज्ञानपर होतं.
सभ्यता, सौजन्य पाळण्यात पवार कधी चुकायचे नाहीत आणि दुसऱ्याचं असभ्य, उद्धट वर्तन कधी खपवूनही घ्यायचे नाहीत; परंतु सौजन्य, सभ्यता हा पवारांबाबत केवळ उपचाराचा भाग नाही. माणसाचं ‘माणूस’ म्हणून जे एक मूल्य असतं त्यावरची श्रद्धा आणि माणसातील माणूसपणाबद्दलचा आदरभाव, पवारांना वाटणाऱ्या या महत्त्वाच्या गोष्टींतून त्यांच्यातील सौजन्याचा, सभ्यपणाचा उगम झालेला आहे. म्हणूनच वामन मल्हार हे त्यांचे आवडते लेखक आहेत.
पवारांवर सुप्रसिद्ध समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. महर्षी शिंद्यांच्या विचारांना भक्कम आध्यात्मिक बैठक आहे. त्यात अंत:प्रेरणेला महत्त्वाचं स्थान आहे. पवारांचा दृष्टिकोनही मानवकेंद्रित राहत आला आहे. त्यांच्या विचार-आचारांत करुणेला महत्त्वाचं स्थान आहे. महर्षी शिंदे आणि पवार यांच्या भूमिकांतील ही साम्यस्थळं आहेत. म्हणूनच पवार कदाचित महर्षी शिंद्यांकडे ओढले गेले असतील. महर्षी शिंद्यांमुळे पवारांच्या भूमिकेला आध्यात्मिकतेची जोड मिळाली असावी.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे पवारांच्या पत्नीचे-सुजातावहिनींचे- आजोबा. पवारांचा विवाह झाल्यानंतर महर्षी शिंद्यांचं आत्मचरित्र आणि संशोधनपर वैचारिक वाङ्मय त्यांच्या वाचनात आलं. त्यांच्या जीवनानं आणि कार्यानं ते प्रभावित झाले. संपूर्ण समाजाच्या संदर्भात समाजसुधारणेचा विचार करणारे, धर्मामधील कोळिष्टकं झाडून-झटकून त्याला एक कालसुसंगत आणि आधुनिक रूप देऊ पाहणारे, त्यासाठी ब्राह्मोसमाज-प्रार्थनासमाजाच्या प्रसाराला आणि कार्याला वाहून घेणारे, अस्पृश्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी, आणि जातिभेदनिर्मूलनासाठी आयुष्यभर अहोरात्र कष्टणारे, अनेक सामाजिक प्रश्नांची आणि समाजातील अनिष्ट रूढींची पाळंमुळं इतिहासाच्या अंध:कारात शोधून त्यावर उपाय सुचवणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे अभूतपूर्व सुधारक, संशोधक आणि विचारवंत होते. परंतु त्यांच्या कार्याची योग्य ती दखल महाराष्ट्रानं घेतली नाही. त्यांच्या युगप्रवर्तक, ऐतिहासिक कार्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे पवार अस्वस्थ झाले. विठ्ठल रामजींचं जीवन आणि कार्य हे नव्यानं महाराष्ट्रासमोर आणणं, हे पवारांचं जीवितकार्य बनलं. आपलं दैनंदिन अध्ययन-अध्यापनाचं काम सांभाळून चौतीसएक वर्षं या कामासाठी पवार राबले. या अभ्यासकाळात पवारांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंद्यांच्या जीवनावर, वाङ्मयावर आणि कार्यावर एकूण सात पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांच्या या दीर्घकालीन अभ्यासातून त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनाची, कार्याची आणि विचारांची चिकित्सा व मूल्यमापन करणारं एक बृहद् चरित्र सिद्ध केलं.
पवारांनी आठ-दहा वर्षं खपून विनोदाच्या स्वरूपावर मूलगामी, सैद्धान्तिक स्वरूपाचं संशोधन केलं. हे करत असताना त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील विनोदाचाही विचार केला. आपल्या या संशोधनातून त्यांनी विनोदात्मकतेच्या सुखात्म जाणिवेचा सिद्धान्त मांडला. विनोदाला मानवी जीवनसंवर्धक मूल्य असून विनोदाची श्रेष्ठता या मूल्यावर ठरत असते; असा त्यांचा निष्कर्ष आहे. चिं. वि. जोशी, वा.म. जोशी यांचा विनोद त्यांना श्रेष्ठ दर्जाचा वाटतो. सुप्रसिद्ध विनोदी लेखक पु.ल. देशपांडे आणि समीक्षक मं. वि. राजाध्यक्ष हे त्यांच्या विनोदावरच्या प्रबंधाचे परीक्षक होते. प्रंबधावरील आपल्या अभिप्रायात दोघांनीही – विशेषत: पु.ल. देशपांड्यांनी पवारांनी मांडलेल्या सिद्धान्ताचं तोंड भरून कौतुक केलं. पीएच.डी.वरील पदवीनंतरही पवारांचा विनोदासंबंधीचा अभ्यास चालू राहिला. त्यांचा एकंदरीत आजवरच्या विनोदविषय अभ्यासावर आधारित असा ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूप’ हा ग्रंथ मौज प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. विनोदमीमांसेबद्दल खूपच दरिद्री असलेल्या मराठी समीक्षेचं हे दारिद्रय पवारांच्या या ग्रंथानं खूपच कमी होणार आहे.
पवारांनी पदव्युत्तर अध्यापनाद्वारे आणि संशोधन-मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मराठी वाङ्मयाभ्यासकांची एक पिढी घडवली. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. भास्कर चंदनशिव, डॉ. बाबूराव गायकवाड यांसारखे विद्यार्थी त्यांच्या तालमीत तयार झाले. शिवाजी विद्यापीठातून आपल्या अध्यापन मार्गदर्शनातून डॉ. वासुदेव सावंत, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. रोहिणी तुकदेव, डॉ. राजन गवस हे आणि यांसारखे अनेक अभ्यासक त्यांनी घडवले.
आपल्या अध्यापकीय जीवनात पवारांना फार मोठं यश मिळालं. कॉलेजातील अध्यापकापासून शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रारंभकापर्यंत पवारांनी विद्यापीठीय अध्यापनातल्या सर्व भूमिका यशस्वीपणे बजावल्या.
गेली चाळीसएक वर्षांची आमची अतूट मैत्री आहे. या दीर्घ काळात आमच्यात कधी विकल्प आला नाही, की आमच्या संबंधात कधी दुरावा निर्माण झाला नाही. या मैत्रीच्या संबंधात मला नेहमी एक प्रश्न पडत आला आहे, आम्हा दोघांची मैत्री जमली कशी आणि ती टिकली कशी? लिहिण्याबाबतचा आळशीपणा आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षेचा अभाव हे दोन ‘दोष’ सोडले, तर आम्हा दोघांच्याही स्वभावात कसलंही साम्य नाही; तरीही आम्ही दोघे मित्र आहोत. मला वाटतं, आम्हा दोघांच्या दीर्घकालीन मैत्रीला पवारांचा उदार, समंजस, प्रेमळ आणि सौजन्यशील स्वभावच कारणीभूत आहे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment