अजूनकाही
१२ डिसेंबर रोजी डोंबिवलीमध्ये फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी विदर्भातील काव्य-समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे निवडून आले! त्यानंतर मुंबई-पुण्यातल्या काही साहित्य-रसिकांना ‘कोण हे अक्षयकुमार काळे?’ असा प्रश्न पडला. साहित्य संमेलनासाठी यंदा चार उमेदवार होते – डोंबिवलीचेच कवी-गीतकार प्रवीण दवणे, जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि अक्षयकुमार काळे. त्यातले प्रवीण दवणेच फक्त बहुतेकांना माहीत असलेलं नाव होतं. पण ते पडले आणि काळे निवडून आले. दवणे हे लोकप्रिय कवी-गीतकार असल्याने त्यांच्या विजयाची ग्वाही अनेक जण खाजगी गप्पांमध्ये देतही होते; परंतु दवणे यांना सणसणीत धोबीपछाड देत काळे विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण १०७४मते होती, त्यांपैकी ८९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील १७ मते अवैध ठरली. उर्वरित मतांपैकी तब्बल ६८९ मते काळे यांना पडली, तर दवणे यांना १४२ मतांवर समाधान मानावे लागले. राजकीय निवडणुकीच्या भाषेत सांगायचे, तर काळे यांना विक्रमी मते मिळाली, तर दवणे यांचे डिपॉझिट जप्त झाले! असो.
काळे यांनी गतवर्षीच आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहणार आणि कुणासाठीही माघार घेणार नाही असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी तयारीलाही सुरुवात केली होती. अक्षयकुमार काळे जसे सतत वावदूक विधाने करून स्वत:ची नकारात्मक प्रसिद्धी करून घ्यायला श्रीपाल सबनीस नाहीत की, लोकप्रिय गाणी लिहिणारे मलाव्य नाहीत! ते पडले समीक्षक, त्यातही काव्यसमीक्षक. त्यामुळे साहित्य-समीक्षेच्या क्षेत्राबाहेर त्यांच्याविषयी फारशी माहिती नसण्याचीच शक्यता अधिक.
त्यामुळे अक्षयकुमार काळे यांची कौटुंबिक, शैक्षणिक, साहित्यिक पार्श्वभूमी यांची ओळख करून देणारा हा माहितीपट. तो काळे यांचा मोठा मुलगा, अमित यांनी, त्यांच्या साठीनिमित्त २०१३मध्ये तयार केला आहे. हा माहितीपट खरोखरच माहितीच्या स्वरूपाचाच आहे. शिवाय त्याची निर्मितीमूल्येही हौशी स्वरूपाचीच आहेत. त्यामुळे त्याकडे त्या दृष्टीनेच पाहिले जायला हवे. या माहितीपटाचा उद्देश काळे यांची ओळख करून देणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment