नरेंद्र मोदीच पुन्हा केवळ निवडून नाही, तर पुन्हा जिंकून येवोत!
पडघम - देशकारण
श्रीकांत आगवणे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi मोदी सरकार Modi Government भाजप BJP काँग्रेस Congress मनमोहनसिंग Manmohan Singh नरसिंहराव Narasimha Rao

२०१४ च्या निवडणुकीत विकास, शेतकऱ्यांच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, भ्रष्टाचारमुक्त भारत या लाटेवर स्वार होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले! त्या निवडणुकीतही माझं मत मोदींना नव्हतं. इंदिरा गांधींनंतरच्या काळात वाढलो असल्यानं आणि थोडंफार असलेलं डोकं खांद्यावर अजूनही असल्यानं ते काँग्रेसलाही नव्हतं. यावेळच्या निवडणुकीत काय केलं? NOTAचा नेहमीचा निद्रिस्त अवस्थेतला पर्याय होताच. मी जरी मोदींना मत दिलं नसलं तरी मला ‘मोदीच पुन्हा जिंकून येवोत’ असं वाटतं!!

साल २००४. नॅशनल इन्स्टिट्यूटचं हॉस्टेल. देशभरातून आलेली मुलं. जागतिकीकरणोत्तर, उदारीकरणोत्तर ही पिढी. रात्रीच्या चकाट्या पिटताना १९९२ चा विषय निघाला. रात्र कोलकात्त्याची होती आणि हवेत अजूनही सोशॅलिझमचा ऑक्सिजन होता. एकानं वेगळा विचार मांडला- जर समजा आपली गंगाजळी पूर्ण आटली असती, NRI इंडियन्सकडून देशात परकीय चलनाचा ओघ सुरू नसता झाला, तर काय झालं असतं? डॉ. मनमोहनसिंग आणि नरसिंहराव यांचं नियोजन, दूरदृष्टी यांचं जे आख्यान आपण लावतो, ते कदाचित नसतं. पूर्ण अर्थव्यवस्था झोपली असती. भारत देश एका रात्रीत दूर गोष्टीपल्याडच्या आफ्रिकेतल्या निबिड देशांच्या रांगेत उभा असता? रेशनच्या दुकानासमोर असलेल्या रांगा आणखी मोठ्या झाल्या असत्या? या रांगा (लॅटिन अमेरिका- पूर्व युरोपच्या) रिकाम्या सुपर मार्केटपुढच्या रांगांपेक्षा भेसूर-भयाण असत्या? नक्कीच नसत्या! शेती करणारा देश युद्धात कधीच हरत नसतो, हे सार्वकालिक सत्य खोटं ठरलं असतं? भारतात १९९२ पर्यंत तरी ७० टक्के लोक शेतीच करत होते! 

जगाच्या इतिहासातला भीषण बंगाल दुष्काळ मनुष्यनिर्मित होता. आफ्रिकेतल्या अन्नान दशेला लागलेली मरणप्राय प्रजा हे सारं मानवनिर्मित. वसाहतीच्या लुटमारीतून मिळवलेल्या बक्कळ पैशातून श्रीमंत झालेले, नव्या जमान्यात भांडवलशाहीचा काटेरी पंजा घालून ओरबाडणारे आणि भांडवलशाहीच्या आहुतीत नवीन बळींची तजवीज होण्यासाठी डंकेल मांडणारे, हे सारे-सारे युरोपियन असावेत, हा काही योगायोग नाही!

डंकेल आणि गेटशी फारकत घेतली असती तर काही काळ या देशाला त्रास सहन करावा लागला असता. निओ-लिबरलच्या काळात ‘सोशल वेलफेअर स्टेट’ अवस्थेतून बाहेर पडत असताना त्रास भोगावा लागलाच असता. तो सहनही केला असता (‘मला ५० दिवसांची मुदत द्या’सारखी घोषणा सुरू करावी लागली असती!). त्याचा त्रास हा त्या पिढीला नवीन नव्हता. या पिढीनं लहानपणी शाळेच्या वर्गात चरख्यावर हातरुमाल कातला होता, तरुणपणी लाल बहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून सोमवारी उपवास ठेवला होता आणि जॉर्ज फर्नांडिसच्या खांद्याला खांदा लावून कोका कोल्याला ‘बाय बाय’ केला होता! या पिढीला स्वप्नं होती, पण सुख लुबाडण्याचा हव्यास नव्हता. त्या पिढीवर विश्वास ठेवून देशाला परत एकदा नेहरूविअन दृष्टी देऊ शकलो असतो! क्युबासारखी एक वर्ष कॉलेजेसना सुट्टी देऊन सर्व साक्षरता मोहीम सुरू केली असती, इराणसारखी स्वस्त आरोग्य व्यवस्था उभी करू शकलो असतो, जर्मनीसारखी शहरात पण शेती करण्याची सोय करून श्रमसंस्कार केले असते!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman

.............................................................................................................................................

यांसारख्या प्रॅक्टिकल योजनांची अतिआदर्शवादी स्वप्नं म्हणून टिंगल करणारा, बुद्धिभेद करणारा वर्ग भांडवलशाही शिक्षण व्यवस्थेनं आधीच तयार करून ठेवला होता. अमेरिकेनं विद्यापीठांत सेमिनार, पेपर रिडिंग, सिम्पोझियम या हत्यारांनी अख्खा बोलिव्हिया लुबाडला. त्यांच्यासाठी भारत देश सुपिक होता… आणि आपण भांडवलशाही रक्तपिपासू जगापासून वेगळे पडलो असतो. पण अलिप्ततावादी देश म्हणून जेवढी इज्जत आणि दरारा होता, तोच दरारा आपण आर्थिक अलिप्ततावादी म्हणून ठेवू शकलो असतो.

क्युबा, पॅराग्वे, इराण, भूतान, इस्टोनिया यांसारख्या खिजगणित नसलेल्या देशांसारखे आपण स्वनिर्भर असतो. आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, समाधान या निकषांवर आपण वरचढ असतो, पण आपण कष्टाचा, सत्याचा लांबचा मार्ग सोडला! शॉर्टकट भांडवलशाहीला शरण गेलो. मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थेऐवजी आपण स्वस्त मनुष्यपुरवठा करणारी कॉलेजेस बांधली. ‘आम्ही कामगारांचे चीन-तैवानपेक्षा अधिक शोषण करू’ अशी आश्वासनं देऊ देऊ फॅक्टऱ्या आणल्या. कामगारांना पर्यटन-भत्ता(!) देऊनही नफा कमवणाऱ्या कंपन्या आपण विकृत अर्थशात्रीय नियमानं कवडीमोलानं विकल्या. ‘अंथरून पाहून पाय पसरावेत’चं परंपरागत शहाणपण आपण बाजारात विकून खाल्लं, शेअर बाजार कशाहीपेक्षा पाऊस चांगला येणार, या बातमीवरच उसळतो, या उशिरा आलेल्या अकलेचाही कांदा करून झाला… आणि एकीकडे भूकबळी, तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या इतकं वाईट दुष्टचक्र भोगायचं नशिबी आलं! 

असो. या जर-तरच्या गोष्टी. इतिहास बदलता येत नाही, पण शिकता येतो. गेलेली संधी परत येत नाही, पण पुढची चूक करू नये ही संधी तर आपल्या हातात असते! 

आता ही वेळ आली आहे. मोदी जिंकून यावेत! घसघशीत मतांनी निवडून येवोत!! माझ्या हातात नील चीझमन आणि ब्रिअन क्लास या प्रोफेसर दुकलीनं लिहिलेलं ‘How To Rig An Elction’ची प्रत आहे. निवडणूक आधी जिंकायची असते आणि मग निवडणुकीला उभं राहायचं असतं, अशा उदाहरणांनी या पुस्तकाची पानं भरली आहेत. सध्या लोकशाही हा जगभरातल्या हुकूमशहांना सत्तेवर येण्याचा ‘सरधोपट राजमार्ग’ आहे! उगाच का अमेरिका-युरोप ‘तेल’ देशांना ‘बऱ्याबोलानं वागा, नाहीतर लोकशाही निर्यात करू‘ अशी धमकी देतात!! 

सिंगापूरच्या च्युइंगमवर बंदीचं कौतुक असलेल्या आणि तरीही त्या मुर्दाड हुकूमशाहीला पाहू न शकणाऱ्या भारतीयांसाठी मोदींनी परत यायला हवं! पाकिस्तानच्या इमरान खाननं मोदींची जाहीर चुम्माचाटी करूनही ज्यांना अणुबॉम्ब वापरायची खुमखुमी आहे, त्यांच्यासाठी ‘राजे, तुम्ही परत या’च्या चालीवर ‘मोदी, तुम्ही परत या!!’ 

मोदी निवडून आल्यावर काय होईल? तर नोटबंदीच्या अमाप यशाबद्दल चकार शब्द न काढणारं ‘मोदी सरकार’ परत पुन्हा नव्यानं एक फतवा काढेल, एका झटक्यात देश रस्त्यावर आणेल. नोटबंदी जारी  झाल्यावर मी देशाबाहेर होतो. उपग्रहातून पृथ्वी जशी सगळ्या परिप्रेक्ष्यातून दिसते, तसा भारत परदेशातून दिसतो, मग तुमची दृष्टी कितीही वेगळी असो! २४ तासांच्या आत या ढिसाळ निर्णयाचा परिणाम दिसू लागला होता. होत्याचं नव्हतं झालं होतं. आरक्षण, संविधान यासाठी कधीही रस्त्यावर येणार नाही, याची जेवढी खात्री होती, त्याहीपेक्षा खिशात हात घातल्यावर हा देश, ही नव-श्रीमंत, चंगळवादी स्वतःच्या हक्काबद्दल अति जागरूक जनता नक्कीच रस्त्यावर येईल ही अपेक्षा होती!

२६/११ च्या वेळी तीन दिवस मुंबई सुन्न होती. ताजची कोंडी फुटल्याबरोबर सारी मुंबई ताजसमोर आली. घोषणा दिल्या, नारे दिले, लिओपोल्डमध्ये जाऊन बिअर पचवल्या… पण किमान ते तरी केलं अशी म्हणायची वेळ आली! कोणी रस्त्यावर आलं नाही. सगळे एकटे पडले. सगळे एकटे असतात म्हणून तर माणूस पक्ष, युनियन, संघटना यांत भागीदार होतो. इथं तर सगळे चिडीचूप.

कोणीतरी पहिल्यांदा रस्त्यावर यायच असतं, मग मागे लोक जमतात हे सर्व लोक विसरले? कि कुठल्या गुंगीत त्यांनी ही आक्रमकता विझवून टाकली होती? हीच का ती जनता जिने पाकिस्तानचे तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधींना घरी बसवलं होतं? हीच का ती जनता जी आंबेडकर, नेहरू, गांधी या प्राचीन इतिहासातल्या आणि अर्वाचीन काळातल्या पुल, तेंडुलकर, राजेश खन्ना, ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला रस्त्यावर उतरली होती? निर्भया, अण्णाच्या ‘लोकपाल’साठी जमली होती? पैशासाठी नाही, तर मग आता कशासाठी ही जनता उतरणार रस्त्यावर? क्रिकेटसाठी, जातीसाठी, धर्मासाठी, देशासाठी?

देश म्हणजे काय? पाकिस्तानच्या अल्याडचा म्हणजे माझा देश? की यातले लोक म्हणजे माझा देश? लोक म्हणजे कोण? माझ्या जातीतली? २००० च्या नोटेनं भ्रष्टाचार कमी होणार यावर जर सगळ्यांचा विश्वास होता, तर खरंच मोदी परत येवोत! त्यांनी परत ‘तुघलकी निर्णय’ घेवो. ‘तुघलक’बद्दल मला राग असण्याएवढा माझा इतिहासचा अभ्यास नाही, पण एवढा नक्कीच आहे की, भारत हा काही मध्ययुगीन काळात नाही, जिथं एक माणूस त्याच्या मनाला येईल असा निर्णय घेईल आणि एका रात्रीत १००-१५० जणांचा बळी  घेईल!  

सुट्टी जोडून संप करणारे आणि लाच घेताना पकडले गेलात तरी अर्धा पगार हाती येईल, अशी कायम नोकरी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांची युनियन पण गप्प बसली? तिनं का नाही कामकाज बंद करून देश ठप्प केला आणि मोदींना उत्तर द्यायला भाग पाडलं? का म्हणून मोदी जपानमध्ये हसत भाषण देत होते? मग का म्हणून मी बँक कर्मचाऱ्याबद्दल, त्यांच्या मागण्याबद्दल सहवेदना ठेवावी? 

कोणीतरी फेसबुकवर म्हटलंय की, जेव्हा पुस्तक रस्त्यावर आणि चपला एसी दुकानात जातील, तो खरा ‘काळ’! अशा काळात पैसे, पैसे आणि पैसेच! उच्चशिक्षण फक्त पैसे मिळवण्यासाठीच घ्यायचं. आयआयटी, आयआयएम, एम्समधून शिकणारे आणि ABVP सारख्या संस्थेत जाऊन मेंदू बाजूला काढणारे लोक तुमच्या आसपास आहेत का? त्यांच्या सेवावृत्तीबद्दल आदर आहे का? आहेर द्यायच्या लायनीत उभे राहणारे आणि खाण माफियाशी साटंलोटं असणारे पर्रीकर तुमचे आवडते नेते होते का? पूर्वोत्तर भारतात जाऊन हिंदू धर्म वाचवणारे तुम्हाला धर्मरक्षक वाटतात का? पुतीन आणि अजित डोवाल हे तुम्हाला कणखर वाटतात का? ‘URI’ सिनेमा बघून तुमचा उर भरून आला का? बुलेट ट्रेन आणि भव्य विमानतळ म्हणजेच विकास या तुमच्या कल्पना आहेत का? बंगाल-केरळात येता-जाता संप असतात. तिकडे मोलकारीणीच्या संघटना असतात, याची तुम्ही खिल्ली उडवता का? या साऱ्यांची उत्तर ‘होय’ असतील (किंवा असतीलच) म्हणूनच मानवी हक्क, सद्भावना, मानवता, बंधुत्व हे बोलणारे लोक ‘जोक्स’ बनतात!

२००० लोकांच्या कत्तली होवोत किंवा तितकेच बलात्कार, कोणाला फरक पडतो? पुराणकथेतल्या रामावरून जर दंगली होत असतील, तर प्लास्टिक सर्जनाचा आविष्कार असलेला गणपती का मागे राहील? अखलाक नावाचा एक माणूस निव्वळ अफवा उठली म्हणून मारला जातो आणि त्याचं समर्थन केलं जातं; तो देश, रवांडा-कांगोचा दहा लाख लोकांचा कत्तलखाना बनण्यापासून किती दिवस लांब आहे? 

लाखो लोंकाच्या कत्तली झाल्यावर आज जर्मनीत हिटलरचं नामोनिशाण नाही. चूक उमजल्यावर येणारं शहाणपण त्यांच्यात आलंय. जरी ते उशिरा आलेलं असलं तरी ते खूप महत्त्वाचं आणि कायमस्वरूपी आहे. तिथं एक तर तुम्ही हिटलरच्या विरुद्ध असता नाहीतर निओ-नाझी असता. आपल्यासारखं काठावर नसता. पुण्या-मुंबईच्या लोकांचे जर्मन मित्र एकाच वेळी निओ-नाझीचेही मित्र नसतात, ते नसतात म्हणूनच तुमचा मुलगा जर्मनीला आहे याचं कौतुक करू शकता. भारतीयांनी भेटेल त्या जर्मन माणसाला ‘हिटलर’ या विषयावर बोलू नये, अशी सक्त ताकीद जर्मन भाषेच्या पहिल्या वर्गात देण्यात येते!

पुण्यात एक आणि पाँडिचेरीत एक, अशी दोन दुकानं तरी मला माहित आहेत, ज्यांची नावं ‘हिटलर’ अशी आहेत. त्या दुकानात जाणाऱ्या लोकांना ‘हिटलर’ क्रूरकर्मा होता, हे राज ठाकरेंच्या भाषणाआधीही ठाऊक होतं का? आपल्या आत एक मोदी आहेत, ज्याला मुसलमान, अर्बन-नक्षल यांना भर चौकात ठेचून मारायचं असतं, त्यांच्या घरात घुसून मारायची सुप्त इच्छा असते… त्यांना जिवाच्या आकांतानं पळून आश्रयाला आलेल्या रोहिंग्यांना हाकलून देणं म्हणजे मर्दपणाची कृती वाटते. 

आपल्याला बुद्धाच्या-महावीरांच्या-केशकंबलीच्या नास्तिक भारताबद्दल माहीत नसतं; १६०० भाषा असलेल्या भारताबद्दल माहिती नसतं; बहाई, पारसीसारख्या लाथाडल्या गेलेल्या धर्मियांचा देश म्हणजे भारत ही ओळख ज्यांना नको असते, ते आपणच असतो का? असे आपले मित्र असतात आणि त्यांना आपण तसंच असू देतो का? त्यांना त्यांची चूक दाखवणं म्हणजे ट्रोलिंग करणं असं वाटून तरी ब्लॉक करतो का? सभारंभात मांडीला मांडी लावून बसतो का? ‘तो माणूस म्हणून वाईट नाही’, ‘तो आपला यार आहे’, ‘ती आपली बायको/ तो आपला नवरा आहे’ असं म्हणून कानाडोळा करून सोडून देतो का? ताटातलं अन्न हे swiggy तून नाही तर शेतातून येतं, हे साधं शास्त्र माहीत आहे का?

‘पप्पू’, ‘गुंगाबाबा’ अशा नावांनी चिडवल्या जाणाऱ्या लोकांची सौम्यता, ऋजुता जाणवते का? मौनीबाबा आणि पाच वर्षं पत्रकारांना सामोरा ना जाणारा पंतप्रधान यातला फरक कळतो का? छायाचित्रांचा हव्यास असलेल्या माणूस आपल्याला दिसतो का? अमेरिकेपुढे मिंधं होऊन पुरात अडकलेल्या इराणच्या मदतीला ‘हो’ न देणारी ५६ इंचाची छाती दिसते का? जगाच्या नाकावर टिच्चून इजिप्तला त्याचा सुवेझ कालवा देणाऱ्या पंतप्रधानावर तुम्ही व्हॉट्सअॅपवर जोक्स शेअर करता का? बुलेट ट्रेनचं अव्यवहारी गणित दिसतं का? स्वतःला आध्यात्मिक म्हणवणाऱ्या सडेल बाबांच्या दुकानदारीत लाईन लावताना तुमचा मेंदू जागेवर असतो का?

आपल्याला कशाचंच काहीच कळत नसेल, वाटत नसेल, आपण आपल्या सेल्फीमग्नतेमधून स्वमग्न अवस्थेत गेलो असू, तर मोदी परत येवोत. आपल्या आतला सैतान जागा होवो. दंगलीची जाळपोळ आपल्या घरापर्यंत घुसो, आपल्या सुरक्षित असलेल्या घराचं घरपण गळो, किचनमध्ये घुसून काय शिजवलंय, तुम्ही बेडरूममध्ये काय पाहता, हे तपासून पाहण्याची सनद आपल्या शेजारच्याला मिळो, आपल्या गर्लफ्रेंडला-बहिणीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके मिळोत, सौदी अरेबियासारखा ‘शिस्तबद्ध’ असा हा देश होवो, संस्कार-पोलिसांचे जत्थे रस्त्या-रस्त्यावर फिरोत, आपण सारे एकमेकांचे पोलीस बनून सारा देश एक मोठा तुरुंग बनो... मोदी परत येवोत... मोदी परत येवोत...

नामदेव ढसाळ यांनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे हा देश एका गळूसारखा होवो. मोदी पुन्हा निवडून आले नाहीत, तर हे गळू पिकणार नाही, सुकणार नाही... ते तसंच आतल्याआत ठसठसत राहील. परत हे गळू कधीही येईल ही भीती राहीलच. त्यापेक्षा मोदी परत येवोत, हा देश आपल्या साऱ्या दोषांसकट गळूसारखा पिकून येवो… फसफसून पू भरलेल्या जखमेसारखा होवो... असह्य वेदना होतील, पण एकदाचं हे गळू फुटेल, सारा पू  वाहून जाईल... आणि ही जखम कायमची भरून येईल…

लेखक श्रीकांत आगवणे मुक्त फिल्ममेकर आहेत.

mydharavi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 02 May 2019

श्रीकांत आगवणे, फार त्रास होतोय का? २३ मे पर्यंत कळ काढा. मग चालू त्रास फिका पडेल. बाकी, तुम्ही बहाई व पारसी धर्मांची नावं घेतलीत ते बरं केलंत. जर पारशी, बहाई, शिया, बेणे इस्रायली भारतात हिंदूंसोबत गुण्यागोविंद्याने नांदू शकतात तर मुस्लिम का नांदंत नाहीत? कधी विचार केलाय का तुम्ही? की बुद्धी चालवायचीच नाहीये ? आणि ABVP वाल्यांची मात्र अक्कल काढायचं बरं सुचतंय तुम्हांस ! इतका मोदीद्वेष बरा नाही, कारण की तुम्ही त्यापायी आंधळे झाले आहात. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......