अजूनकाही
आठवडा होऊन गेला, मी अलिगढमधील कुलपांच्या उद्योगधंद्यावर आलेल्या सावटाबद्दल वार्तांकन करायला गेलो होतो. तिथल्या एका स्थानिक रहिवाश्याशी माझा वाद झाला. अलिगढमधील माझ्या ओळखीच्या एका पत्रकाराचा तो मित्र होता. सहसा मी अशा ध्रुवीकरण झालेल्या वातावरणात राजकीय वादविवाद करण्याचे टाळतो, कारण तेच तेच बोलले जाते आणि हाती काहीच लागत नाही. पण आम्ही कोणाला तरी भेटायला चाललो होतो आणि गाडीमध्ये बसून करण्यासारखे दुसरे काही नव्हते.
त्याचे म्हणणे होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुसरी संधी मिळाली पाहिजे, कारण आपल्याला ‘दुबळ्या आघाडी’पेक्षा ‘सामर्थ्यवान नेत्याची’ गरज आहे. उलट मी वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुर्दशा आणि सीमेवरील चकमकींबद्दल बोलू लागलो. ते त्याने कबूल केले आणि म्हणाला, “हो, मोदींनी त्यांची पाच टक्केही वचने पूर्ण केलेली नाहीत, पण...” मग क्षणभर थांबला, त्याने ड्रायव्हरकडे पाहिले आणि विचारले, “कोई मुस्लीम तो नहीं है ना गाडी में?” अंदाज होताच, त्यानुसार तो पुढे जे बोलला त्याचा एका वाक्यात सारांश असा होता - मुसलमानांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली आहे.
मी गेले अडीच महिने छत्तीसगढ, बिहार आणि उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या हिंदी भागात बेरोजगारीचा माग काढत हिंडत आहे. ४० अंशाहून वर चढलेल्या पाऱ्यापेक्षा सगळीकडे दिसणाऱ्या मुसलमानविरोधी भावनेने मला घराची ओढ अधिक वाटत आहे. मुसलमानांना त्रास देण्याबद्दल - त्यात काहींना अत्यंत भीषणपणे जमावाने ठार करणेही आले, इतक्या बहुसंख्येने असणाऱ्या हिंदूंना विशेष काही वाटत नाही, हे निरीक्षण मला अस्वस्थ करणारे आहे. जमावाने कायदा हातात घेऊन मुसलमान माणसाला ठार करावे, असे अर्थातच प्रत्येकाला वाटत नसले तरी त्याबद्दल अनेकांना कसली फिकीरही नाही.
समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर द्वेषाचे गांभीर्य बदलते. वरच्या जातीतल्या माणसाशी सुरू झालेले संभाषण लगेचच मुस्लीमविरोधी बडबडीकडे घसरते. यादव नसलेले इतर मागासवर्गीय आणि चांभार नसलेले काही दलित यांना बोलते करायला पत्रकाराला जरा प्रयत्न करावे लागतात, पण शेवटी ते वर येतेच.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman
.............................................................................................................................................
मोतिहारीच्या सुप्रसिद्ध –किंवा आता कुप्रसिद्ध झालेल्या साखर कारखान्यात एके काळी काम करत असलेले कामगार तिथे आसपास राहतात. कारखाना बंद झाल्यावर ते बेरोजगार झाले आणि १५ वर्षांहून अधिक काळ ते जगण्यासाठी धडपडत आहेत. बिहारमधल्या राजकारणात हा सर्वांत अधिक चर्चिला जाणारा विषय आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी तेव्हाचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार नरेंद्र मोदींनी मोतिहारीला भेट दिली होती आणि त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळाली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या पुढच्या भेटीच्या वेळी त्या कारखान्यात तयार झालेल्या साखरेचा चहा ते घेतील. “अगली बार जब आऊंगा तो अभी बंद मिल की चिनीसे बनी चाय पिऊंगा.” असे ते म्हणाले, पण त्यांनी आश्वासन अजिबात पूर्ण केले नाही.
असे असले तरी बहुसंख्य असलेले उच्च जातीचे कामगार म्हणतात की, ते मोदींना मत देतील कारण ‘देशाला त्यांची गरज आहे’ आणि ‘हिंदूंनी एकत्र होण्याची गरज आहे’. हिंदूंचे भले होणे म्हणजे देशाचे भले होणे हे गृहीतक दुर्लक्षित करता येण्यासारखे नव्हतेच. यादव नसलेले इतर मागासवर्गीय त्यांची हिंदुत्वाची ओळख दाखवण्याआधी प्रथम उज्वला योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना याबद्दल बोलले.
मत दिलेच पाहिजे असे लोकांना वाटायला हिंदुत्व हे अर्थातच एकमेव कारण नाही. अर्थव्यवस्था, स्थानिक जातीय समीकरणे, व्यक्तीची तत्त्वप्रणाली या इतर अनेक कारणांपैकी ते एक आहे. जे केंद्रात मोदींसाठी मत देतात, त्यांना विधानसभेसाठी अरविंद केजरीवालांना मत देण्यात काही वाटत नाही. २०१४ मध्ये दिल्लीमधील सात लोकसभा जागा भाजपने जिंकल्या, पण २०१७ मध्ये त्याच मतदारांनी ‘आप’ला मत दिले. केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्ली विधानसभेच्या ७०पैकी ६७ जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशमध्ये मी अनेक मतदारांना भेटलो, जे मोदींची स्तुती करतात, पण म्हणतात की विधानसभेसाठी आम्ही आज सर्वांत अधिक हिंदुत्वाचा चेहरा मानल्या गेलेल्या योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी अखिलेश यादवना मत देऊ. असे म्हटल्यावरही मुसलमानांबद्दलचा राग दिसतच राहतो आणि तो दुर्लक्ष करण्याजोगा नाही.
मी याबद्दल एके दिवशी ट्वीट केले आणि त्यावर प्रतिक्रियांचा स्फोट झाला. अनेक शिव्या होत्या, पण अनेकांनी म्हटले की, मुस्लीमविरोधी भावना ही पूर्वीपासून होतीच. अर्थातच ती नवी नाही. ती नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या काळाच्या आधीपासून होती. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जवळपास गेली १०० वर्षे यासंदर्भात सुसंगती राखून आहे.
मात्र पूर्वीपेक्षा आता मुस्लिमांबद्दल वाईट बोलणे अधिक ‘फॅशनेबल’ आणि योग्य समजले जाते. मतदारांना त्यांच्या राज्याची, जिल्ह्याची आणि खेड्याची नस माहीत असते. त्यांना विशिष्ट मर्यादेपलीकडचे काय आहे आणि कायदेशीर आहे हे माहीत असते. अमेरिकेतील २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या आधीच्या मतचाचण्या अत्यंत चुकीच्या ठरल्या. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक मतदार लोकांमध्ये बोलताना डेमोक्रॅट्सना पाठिंबा देत होते. ट्रम्प यांना मान्यता देणे हे फार चांगले समजले जात नव्हते. ते तीन वर्षांनी बदलले हे उघडच आहे.
पुन्हा भारताकडे वळूया. ज्या युवा वर्गाला व्हॉट्सअॅपमधून माहिती मिळत असते, तो मुसलमानांची वास्तवात होत असलेली गांजणूक विशेष महत्त्वाची नसल्यासारखे आत्मविश्वासपूर्वक भासवतो, आणि ते अस्वस्थ करते. त्याबद्दलचे समर्थन वेगवेगळे असते. ते खोट्या फॉरवर्डसपासून मोदींच्या विकासाच्या दृष्टीबद्दल असते. आणि ते आर्थिक विकास आणि बहुसंख्य लोकांचे श्रेष्ठत्व यातील तडजोड सुचवत असते.
बिहारमधील दरभंगा या गावापासून ७५ किलोमीटरवर गोरा नावाचे एक खेडे आहे. तिथे गुरांच्या व्यापारात असलेले मुसलमान बहुसंख्य आहेत. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यावर कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या व्यवस्थांनी हळूहळू त्या लोकांचे जिणे कठीण केले.
आज ते सर्वजण योग्य रोजगाराअभावी व्यथित आहेत. संधी मिळाली तर आणि संधी मिळेल तेव्हा रोजंदारीवर कष्ट करत आहेत.
पूर्वी गुरांचा व्यापार करणाऱ्या काही लोकांना मी बातमीसाठी भेटलो. त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर मला एक तरुण त्या खेड्याजवळ एका चहाच्या टपरीवर भेटला. माझ्या गोरा भेटीचे निमित्त काय, असे त्याने विचारले. मी सांगितले. गोरातील मुसलमानांना अयोग्य वागणूक मिळत आहे हे त्याने मान्य केले. पण लगेच म्हणाला, “पण मुसलमान लोकसुद्धा भाजपपासून अंतर ठेवून असतात. त्यांनाही थोडे समजले पाहिजे. हिंदूंना आवडत नसेल तर गुरांचा व्यापार का करावा?”
म्हणूनच सध्याचा हा संकेत विरोधकांनी उधळून लावला तरी भंगलेल्या समाजातील अंतर मिटवण्यासाठी त्यांना किती धैर्य असेल याविषयी मला शंका आहे. मतांचा हा मोठा गठ्ठा आहे, ज्यापासून कोणताच पक्ष अलिप्त राहू शकत नाही. समस्या ही आहे की, हा गठ्ठा इस्लामच्या भीतीवर आधारित आहे.
ज्या हिंदूंना मनापासून खात्री वाटायला लागली आहे की, पूर्वी त्यांना कमी महत्त्व दिले गेल्यानंतर आता त्यांचा समुदाय काही ठामपणे म्हणू शकतो, त्या हिंदूंची संख्या आपल्या कल्पनेपेक्षा जास्त आहे. दमन होईल हा गंड भाजपच्या भयंकर प्रभावी आणि भेदक समाजमाध्यम यंत्रणेने बहुसंख्याक असलेल्यांना यशस्वीपणे विकला आणि त्यांना असुरक्षित आणि भयभीत केले.
भयग्रस्ततेतून आलेला आत्यंतिक देशाभिमान साध्या कथनांद्वारे निर्माण केला जात आहे, ज्यात बाहेरील आणि अंतर्गत शत्रूंचा अंतर्भाव आहे. बाहेरील शत्रू ओळखणे सोपे आहे. तो फार दूर नाही, त्याचा डोळा काश्मीरवर आहे आणि तो धोकादायकरित्या अण्वस्त्रांनी सज्ज आहे. शत्रूचा सामना करण्यासाठी आपल्याला सामर्थ्यवान नेता हवा. देशातील जो कोणी त्या सामर्थ्यवान नेत्याला विरोध करतो किंवा गैरसोयीचे प्रश्न विचारतो, तो बाहेरच्या शत्रूला मदत करतो. त्यामुळे अंतर्गत शत्रू म्हणजे विरोधी पक्षनेते, विचारवंत, उदारमतवादी पत्रकार आणि अभ्यासक. उदारमतवादी आणि सर्वसमावेशक असणे म्हणजे ‘अंतर्गत शत्रू’- हे नेहमी अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल बोलताना दिसतात आणि त्यामुळे त्यांना अंतर्गत शत्रूंच्या यादीत घालणे सोपे आहे.
त्याच वेळी जनमानसावर प्रभाव पाडू शकणाऱ्या हिंदी वाहिन्या जे चालले आहे, त्याला मान तुकवून आणि अल्पसंख्याकांकडे ते कोणी परके असल्यासारखे बघून खूप नुकसान करत आहेत. सतत असे कार्यक्रम ज्यामध्ये चिडून प्रश्न असतात की, हिंदुत्वाची ओळख मजबूत करण्यासाठी हिंदू ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत, ते राममंदिर होणार तरी कधी आहे? एका प्रसिद्ध हिंदी वाहिनीमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने मला सांगितले, “वाहिन्यांनी जर त्यांचे काम अगदी २५ टक्के जरी प्रामाणिकपणे केले तरी मोदींसाठी सर्व संपलेले असेल!”
पण वाहिन्या त्यांचे काम नीट करत नसल्यामुळे आणि विश्वासार्हता व मूलभूत संपर्क कौशल्यांचा अभाव असलेला पक्ष भाजपाचा विरोध करत असल्यामुळे मोदी त्यांचे आवाहन पुढे रेटण्यात यशस्वी होत आहेत. हे एखाद्या सामर्थ्यवान आणि इतरांना नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या पुरुषासारखे आहे. असे करताना ते देशाला अशा प्रकारे बदलवत आहेत, जिथे सर्वसमावेशकता हा गुण नाही, आणि सहिष्णुता हा दुबळेपणा आहे.
म्हणूनच मला राहुल गांधींच्या ‘भारताचा आत्मा वाचवण्याच्या’ मोहीमेबद्दल शंका वाटत आहे. तिचा हेतू चांगला असून आणि ती आवश्यक असूनही तिचा वास्तवाशी मेळ दिसत नाही. राहुलचा शांततावाद आणि मोदींचा मर्दानी राष्ट्रवाद यात फक्त एकच विजयी ठरणार आहे.
मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद : माधवी कुलकर्णी
.............................................................................................................................................
मूळ इंग्रजी लेखाची लिंक -
.............................................................................................................................................
लेखक पार्थ एम. एन. हे ‘लॉस एंजलिस टाइम्स’चे भारतातले विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. शिवाय ते अनेक ऑनलाईन पोर्टल्ससाठीही लेखन करतात.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment