अजूनकाही
‘नॅशनल तौहिद जमात’ या श्रीलंकेतील अगदी लहानशा दहशतवादी गटाने संपूर्ण देश हादरवून सोडला. श्रीलंकेतील तपास यंत्रणा, तसेच इंटरपोलकडूनही या नरसंहाराचा तपास केला जात आहे. ‘तौहिद जमात’ हा शब्द नावात असलेल्या संघटनांचाही तपास केला जात आहे. ‘नॅशनल तौहिद जमात’ ही इसिसची श्रीलंकेतील समर्थक संघटना आहे. या संघटनेने स्वत:च आपण इसिस समर्थक असल्याचे सांगितलेले आहे.
संघटनेच्या नामोल्लेखासह देशी व विदेशी गुप्तचर यंत्रणांनी या दहशतवादी हल्ल्याचा इशारा आधीच दिलेला होता. मात्र नॅशनल तौहिद जमात (एनटीजे) ही छोटीशी संघटना असले काही करू शकत नाही, या भ्रमात श्रीलंका सरकार राहिले आणि भ्रमाचा हा भोपळा सलग आठ साखळी बॉम्बस्फोटांच्या रूपात फुटला. इसिसने कोलंबोतील साखळी, मानवी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली असली, तरी या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग श्रीलंकन नागरिकांचाच आहे. सीरियाहून कुणीही आलेले नाही. इसिसची केवळ प्रेरणा आणि मदत आहे. ‘नॅशनल तौहिद जमात’च्या श्रीलंकन सदस्यांनीच हे स्फोट घडवून आणलेले आहेत. श्रीलंकन सरकारनेही हाच निष्कर्ष काढलेला आहे.
‘नॅशनल तौहिद जमात’ नावाची एक संघटना भारतातही सक्रिय असल्याने आपल्यासाठी ही बाब अधिक चिंताजनक आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनंतर भारतातही हाय अॅलर्ट जारी होणे, यातच सर्व आले. भारतातील गुप्तचर यंत्रणांकडून तामिळनाडू तौहिद जमातसंदर्भातील इत्थंभूत माहितीही या पार्श्वभूमीवर तपासली जात आहे.
‘तौहिद’ म्हणजे काय?
‘तौहिद’ म्हणजे अल्लाह एकच आहे. या तत्त्वानुसार मूर्तीपूजा, तसेच अल्लाहव्यतिरिक्त कुणालाही तसा दर्जा देणे गुन्हा आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram
.............................................................................................................................................
‘नॅशनल तौहिद जमात’चा ट्रॅक रेकॉर्ड
या संघटनेचा म्होरक्या मोहम्मद झहरान हा श्रीलंका तौहिद जमात संघटनेतून बाहेर पडला आणि त्याने आपला स्वतंत्र गट नावातून श्रीलंका वगळून स्थापन केला.
‘नॅशनल तौहिद जमात’ने याआधी डिसेंबर २०१८ मध्ये बौद्ध मंदिरांना आपले लक्ष्य केले होते. गौतम बुद्धांच्या मूर्तीलाही हानी पोहोचवली होती. या संघटनेच्या श्रीलंकन सदस्यांनी आपल्या फेसबुक पेजवर इसिसचे उघड उघड समर्थन केलेले आहे. काही आठवड्यांनंतर हे पेज अपडेट होत असते. या संघटनेचे ट्विटर मात्र मार्च २०१८ पासून अपडेट नाही.
चार ‘तौहिद’, एक तमिळनाडूतही...
‘नॅशनल तौहिद जमात’शी नामसाधर्म्य असलेल्या अन्य एकूण तीन संघटना आहेत. ‘श्रीलंका तौहिद जमात’ आणि ‘सिलोन तौहिद जमात’ या नावाने दोन श्रीलंकेत कार्यरत आहेत. ‘तामिळनाडू नॅशनल तौहिद जमात’ नावाने एक संघटना भारतात अर्थातच तामिळनाडूत कार्यरत आहे.
विशेष म्हणजे या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारतासह काही परदेशी गुप्तचर संघटनांनी हल्ला होण्यापूर्वी दोन तास आधी या बाबत माहिती पुरवली होती. पण श्रीलंका सरकार त्यात कमी पडले.
भारतात अधिक सतर्क राहण्याची गरज
सध्या भारतात १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्ष, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा सगळे जण गुंतलेले आहेत. श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यानंतर भारतालादेखील सावध राहण्याची गरज आहे.
‘नॅशनल तौहिद जमात’चे ‘इसिस’ कनेक्शन लक्षात घेता भारताला अधिक सतर्क राहून या संघटनेवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. दक्षिण आशिया हे इसिसचे आता सॉफ्ट टार्गेट झाले आहे. भारतात झालेला पुलवामा आत्मघाती हल्ला, तो इसिस ज्या पद्धतीने करते तसाच होता. त्यातही आईडीच वापरण्यात आले होते. जागतिक पातळीवर आपल्या क्रूरतेची दखल घेतली जावी, असा दहशतवादी संघटनांचा हेतू असतो. आज इसिसचे लोण केवळ जम्मू-काश्मीरमध्येच नव्हे तर मुंबई, पुणे, हैद्राबाद, पनवेल आणि विदर्भातदेखील पोहोचले आहे. इसिस भरतीत या भागातील काही तरुण गेले होते.
या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर इसिसचा धोका भारताच्या उंबरठ्यावर आला आहे. म्हणून आता भारताला बेसावध राहून चालणार नाही.
.............................................................................................................................................
लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.
drsudhiragrawal239@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment