अजूनकाही
सप्रेम नमस्कार,
परवा, सोमवारी, २९ एप्रिलला मतदानापूर्वी आपण हे पत्र वाचावं म्हणून घाईनं लिहायला घेतलं. या मतदानापूर्वी मी काय विचार केला. मी स्वत:ला कसं समजावलं, हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे, म्हणून हा खटाटोप.
१९७७ ची निवडणूक ही स्वातंत्र्यानंतरची पहिली निर्नायकी निवडणूक होती. मतदानाचं वय नव्हतं, पण बऱ्यापैकी समाजात होतं. रेशनिंग, गहू, तांदूळ, शेती, बेकारी, कारखाने, शिक्षण हे प्रश्न निवडणुकीत नव्हते. मी गरीब असेन किंवा श्रीमंत, माझ्या स्वातंत्र्याचं काय? यावर मतदान झालं. त्या वेळी इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्ष हरला. विरोधकांचा जनता पक्ष सत्तेवर आला. ते भारतातलं पहिलं गैरकाँग्रेसी सरकार होतं. त्यानंतर काय झालं, ते सर्वांना माहीत आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. अनेक पंतप्रधान झाले. काँग्रेसी आणि गैरकाँग्रेसी सरकारं बनली.
या सगळ्या दरम्यान भारतीय जनता पक्ष नावानं पूर्वाश्रमीचा जनसंघ नव्या रूपात अवतरला. १९८४ साली या पक्षाचे फक्त दोन खासदार होते. जनतेच्या दैनंदिन प्रश्नांपेक्षा त्यांनी रामजन्मभूमी मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित केलं. १९८९ मध्ये रामाच्या नावानं विटा गोळा केल्या. १९९० ला अडवाणींनी रथयात्रा काढली. यानंतर धार्मिक दंगली उसळल्या आणि यथावकाश १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी भाजपचे पंतप्रधान झाले. या सगळ्या काळात कोणीही कोणाला ‘देशद्रोही’ म्हणालं नाही किंवा ‘माझ्याविरुद्ध बोललात तर तुम्ही पाकिस्तानचे हस्तक आहात’ असाही कोणी आरोप केला नाही.
मी तुम्हाला हे पत्र लिहायचं खरं कारण म्हणजे मीच मला स्पष्ट करून घेतोय. माझी वृत्ती विरोधी पक्षाची. म्हणजे सत्तेत कुणीही असो, माझी आपुलकी जनतेच्या प्रश्नांशी असते. जनतेनं स्वत:चे प्रश्न ठासून मांडायला हवेत. सरकारवर दबाव टाकून सोडवून घ्यायला हवेत. माझ्या प्रश्नांसाठी भांडण करणं हा माझा हक्क आहे असं मी समजतो. म्हणूनच आजची २०१९ ची निवडणूक मला निर्नायकी वाटते.
भारतात २००९ पासून एका नवीन उमेदवार प्रत्येक निवडणुकीत उभा राहू लागला. ‘नोटा’ (None of the above) मला वरील पैकी कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही म्हणून हा अधिकार मतदाराला दिलेला आहे. मतदारांनी या अधिकाराचा वापर पुरेपूर केला. गुजरात आणि कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांमध्ये काही मतदारसंघात निवडून आलेल्या फरकांपेक्षा अधिक मतं ‘नोटा’ला मिळाली.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4797/The-Paradoxical-Prime-Minister
.............................................................................................................................................
आजची परिस्थिती काय आहे? उत्तर सोपं आहे. तुमचे सगळे प्रश्न सोडवायला एकच माणूस आहे- नरेंद्र मोदी. तुमच्या सगळ्या अडचणीवर एकच उपाय आहे - नरेंद्र मोदी... असं लोकशाहीत आपल्या डोक्यात बिंबवलं जात आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना माहिती उघड झाली की, भाजपच्या मंत्री स्मृती इराणी यांनी स्वत:च्या शिक्षणाची चुकीची माहिती आजपर्यंत दिली आहे. मोदीसाहेबांच्या माहितीबाबतही शंका घेतल्या जात आहेत.
एका मान्य करायला हवं की, इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी, मधु दंडवते किंवा सीताराम येचुरी असोत, कोणीही खोटी माहिती दिल्याचं ऐकिवात नाही. अमित शहा-नरेंद्र मोदींपासून इराणीबाईपर्यंत सगळ्यांना खोटं वागण्याची, बोलण्याची लाज वाटत नाही. एकच खोटं सतत बोलत राहायचं आणि विरोध करणाऱ्यावर ट्रोल नावाची तैनाती फौज सोडून बेजार करायचं. हा उद्योग आता उघडपणे चालू आहे. देशातली भयानक बेकारी, ठप्प आर्थिक प्रगती याबद्दल तुम्ही भांडायला उभे राहिलात की, तुम्हाला ‘देशद्रोही’ ठरवलं जातं. हळूहळू लोकांना हुकूमशाहीची सवय लावण्याचा हा प्रकार आहे.
मोदी सरकारच्या विरोधी लिहिण्यापेक्षा निवडणुकीच्या वेळी माझं कर्तव्य काय हा खरा मुद्दा आहे. भावी सरकारनं जनतेचे प्रश्न ऐकून घ्यावेत. ते सोडवावेत, अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. मग सरकारचं कुठं चुकतं ते सांगण्याचं मला स्वातंत्र्य हवं. माझ्या अडचणी काय आहेत, हे सांगण्याचं स्वातंत्र्य मला हवं. मात्र ज्या वेळी एका माणसाला ‘मसीहा’ मानायला लावलं जातं, त्या वेळी स्वातंत्र्याचा संकोच करावाच लागतो. त्याशिवाय मसिहाचं लुभावणारं ‘विश्वरूपदर्शन’ निर्माण करता येत नाही.
कुठल्याही निर्णयाचं समर्थन मुद्देसूपणानं मांडून करण्यापेक्षा भावनिक आवाहनांवर केलं जातं. धर्म, देशप्रेम यांना वापरून जनतेच्या भावना चेतावल्या जातात. जनताही उपाशी पोटाचे प्रश्न विसरून भावनेच्या आहारी जाते. तेव्हा त्यांना मोदींचं मतिगुंग करणारं दर्शन घडतं. आजही निवडणुकीत भाजपतर्फे एकच उमेदवार उभा आहे की, काय अशी शंका येते. सर्वत्र उमेदवारासाठी मत न मागता मोदींसाठी मागितलं जात आहे. या सगळ्याचा अर्थ काय आहे? तुम्ही विचार करू नका, विरोध करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे… ‘मैं हू ना!, कशाला हवी लोकशाही? मैं हू ना!’
थोडक्यात या देशाची लोकशाही धोक्यात आहे. परस्पर सहजीवन धोक्यात आहे. परस्पर प्रेम, मानवता, सहिष्णुता धोक्यात आहे.
माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की, मतदानापूर्वी विचार करा. आपल्याला आयुष्यात अनेक वेळा ठाम निर्णय घ्यायची वेळ येते. तसंच देशाच्या बाबतीत ठाम निर्णय घ्यायची वेळ आली आहे.
मला ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. या देशात मला लोकशाही हवी आहे का? मला माझे प्रश्न मांडण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटतं का? मला सभ्य, सुसंस्कृत आणि सहिष्णू समाजात जगायचं आहे का? या सर्व प्रश्नांवर मी नीट विचार केला आणि निर्णय घेतला की, ‘नोटा’ बटण दाबायचं नाही. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जो उमेदवार जिंकून येऊ शकतो, त्यालाच मी मत देईन. त्याच्या पक्षाचा मी विचार करणार नाही. मी खूप विचार करून या निर्णयाप्रत आलो आहे.
आपणही विचार करा. भूमिका घ्या आणि न विसरता मतदान करा.
कळावे
आपला,
विजय तांबे.
.............................................................................................................................................
लेखक विजय तांबे कथाकार आहेत.
vtambe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dilip Chirmuley
Mon , 29 April 2019
In this letter the only comment I agree with is the appeal to the voters to not press the NOTA button.
Gamma Pailvan
Mon , 29 April 2019
काय हो विजय तांबे, मोदींमुळे लोकशाही धोक्यात आली असं तुम्ही म्हणता? मग कोणामुळे सावरणार आहे ? नक्षलवाद्यांमुळे का ? जे उघडपणे देशाविरुद्ध युद्ध पुकारून राज्यघटनेस बेदखल करू पाहताहेत त्यांच्याविषयी तुम्ही चकार शब्द काढीत नाही. आणि लोकशाहीच्या सर्व मर्यादा पाळून मोदी कार्य करतोय तर त्याच्याविरुद्ध फुकट बोंबा ठोकता तुम्ही. नक्की झालंय काय तुम्हांस? आपला नम्र, -गामा पैलवान
SUNIL JOSHI
Sat , 27 April 2019
तांबे साहेब तुमचे पत्र वाचले तुम्ही जे पत्राद्वारे सध्याचे जे सरकार आहे त्या बद्दल मांडलेले मत अगदी योग्य आहे. पण तुम्ही जी भूमिका मांडली आहे कि नोटा ला मत टाकू नका हे काही मला पटलेले नाही, आणि दुसरा जो कोणी उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच मतदान करा. म्हणजे जिंकून येण्याचा निकष लाऊन मतदान करावे असे म्हणतात, पण साहेब यामध्ये जनतेची परिस्थिती आगीतून उठून फुफाटयात पडल्यासारखी होईल. आज आपल्या देशातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्याजवळ ना आचार आहे ना विचार आहे. फक्त सत्ता मिळवणे हे एकच ध्येय आहे. सत्तातरण करण्यासाठी दुसरा पर्याय जो कॉंग्रेस आणि आघाडीचा आहे तो सक्षम नाहीच. मग आशा परस्थितीत मला वाटते कि सर्व राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी नोटाला (नोटा) जास्तीत जास्त मतदान करुण पुनर्निवडणूक घेतली तर सर्व राजकीय पक्षांना कळेल कि जनतेला काय पाहिजे , जनतेला गृहीत धरून चालणार नाही , जुम्लेबाजी खोटी आश्वासने, भ्रष्टाचार , धार्मिक आणि जातीय मुद्दे चालणार नाहीत. आणि त्यानंतर जे सरकार येईल ते जबाबदारीने वागेल जनतेचा वचक त्या सरकारवर राहील . माझ्या माहिती प्रमाणे सर्व उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मते पडली तर तिथे पुन्हा निवडणूक होते.