अजूनकाही
१. नोटाबंदीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजे वाराणसीतील हस्तोद्योगाला मोठा फटका बसला असून सुप्रसिद्ध बनारसी साडीच्या व्यवसायातील कारागिरांवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. या कामगारांना २५० रुपये रोज मिळत असे. नोटाबंदीमुळे रोख रक्कम बाजारातून नाहीशी झाल्यामुळे त्यांच्या हाताला काम उरलेलं नाही.
यांच्यातले बहुतेक कारागीर मुस्लिम आहेत. त्यांनी फक्त ५० दिवस उपाशी राहून पंतप्रधानांना साथ दिली तर त्यांची देशभक्ती आपोआपच सिद्ध होईल. शिवाय पंतप्रधान यानंतर जेव्हा केव्हा रजत शर्मांच्या 'फिक्सिंग की अदालत' कार्यक्रमात जातील, तेव्हा तेव्हा डोळे मिचकावून कठोर स्वरात 'मैने बनारस में कर दिखाया' असं सांगून योग्य संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचवतीलच.
……………………………………
२. सहारा उद्योगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० कोटी रुपये दिल्याच्या शिळ्याच कढीला राहुल गांधी यांनी नव्याने ऊत आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंगेसमान पवित्र असून त्यांचे संपूर्ण जीवन हे प्रामाणिकपणाचा एक आदर्शच आहे, असा प्रतिवाद भाजपने केला आहे. राहुल गांधी हे गांभीर्य नसलेले पार्ट टाईम राजकीय नेते आहेत, असंही भाजपने म्हटलं आहे.
राहुल गांधींनी डोंगर पोखरून उंदीर काढला, हे खरंच. पण, धोतरात उंदीर शिरल्यासारखी पळापळ का सुरू झाली आहे भाजपची? मोदींना गंगेची उपमा देताना गंगेची विद्यमान स्थिती तरी आठवायची होती! 'राम तेरी गंगा मैली' तरी (गंभीरपणे, धबधबादृष्यासाठी नव्हे!) आठवायचा होता. फुलटाइम आणि गंभीर मानल्या जाणाऱ्यांनी देशाची जी काही स्थिती केली आहे दीड महिन्यात, ते पाहता पार्टटाइम नेताच परवडला म्हणायचा!
……………………………………
3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल नाही. सरकारचे निर्णय नागपूरच्या संघ कार्यालयातून होत नाहीत. संघाला हिंदुत्त्वाधारित सशक्त राष्ट्राची निर्मिती करायची आहे. त्यासाठी समाजात योग्य ते बदल करण्यासाठी आणि देशाचे भवितव्य योग्य नेत्यांच्या हातात देण्यासाठी संघ प्रयत्नशील असतो. आम्ही देशाला प्रामाणिकपणे काम करणारा पंतप्रधान दिला आहे. त्यामुळे, सरकारच्या कामकाजात दखल देण्याची संघाला गरज नाही. : सरसंघचालक मोहन भागवत
आता 'बिट्वीन द लाइन्स' वाचल्यावर कळणारा मथितार्थ येणेप्रमाणे :- संघाच्या रिमोट कंट्रोलने पंतप्रधान नेमला जातो. त्यानंतर बाकी सगळा कारभार हा संघनियुक्त पंतप्रधान संघशाखेत ऐकलेल्या बौद्धिकांतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर हाकू शकतो. त्यात संघाचा काही 'हात' नसतो. सरकारचं कामकाजच संघनियुक्त पंप्रंच्या हातात असताना वेगळी दखल देण्याची गरजच काय? भले शाबास!
……………………………………
४. १९६८ मध्ये वॉटरगेट प्रकरणावर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सल्ला देणाऱ्या एका मराठी संपादकांच्या अग्रलेखाची खिल्ली उडवून संरक्षणमंत्री पर्रीकर गोव्यात नुकतेच एका सभेत म्हणाले की, ‘काहींना त्यांच्या मर्यादा माहिती नसतात. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही चांगले सल्ले आहेत. विवस्त्र व्हा आणि नाचा. आणखी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळते.’
यात पर्रीकर काय चुकीचं बोलले? काहींना आपल्या मर्यादा माहिती नसतात, ते वायफळ बडबड करतात, हे दोन जिल्ह्यांच्या राज्याचाच कारभार हाकण्याच्या 'कौशल्या'च्या बळावर केंद्रात पोहोचलेल्या पर्रीकरांकडे पाहूनच कळत नाही का? शिवाय त्यांनी आपल्याच अनुभवातून विवस्त्र नाचल्यावर चांगली प्रसिद्धी मिळते, हे सिद्धही केलं आहे. त्यांना हा सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच आहे.
……………………………………
५. महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची चिक्की घोटाळ्यातून क्लीनचीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळ्याची फाईल बंद केली आहे. तसंच यासंबंधीचा अहवालही गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.
क्रिकेटमध्ये एखाद्या टीमने आपल्याच एखाद्या भिडूला अंपायरिंगला उभं केलं की, तो सरळसरळ आउट असलेल्या आपल्या संघभिडूला आपल्या अधिकारात 'नॉटआऊट' घोषित करतो आणि मग बाकीचे त्या अंपायरला चिकीखाऊ म्हणतात, हे लाचलुचपत विभागाला आणि त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवणाऱ्यांना ठाऊक असेल काय?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment