अजूनकाही
चांगल्या मनोरंजक सिनेमासाठी कथा दमदार असावी लागते. त्याचबरोबर ती पडद्यावर साकारताना त्यातले चढ-उतार अचूक पद्धतीनं रेखाटण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कथेचा विषय नेमक्या पद्धतीनं मांडता आला, तरच सिनेमा प्रेक्षकांना भावतो. कथेचा प्रारंभ आणि शेवट यांच्या दरम्यान दिग्दर्शकाला अनेक प्रयोग करून पाहता येतात. मात्र कथेतले चढ-उतार आणि पडद्यावरची कलाकृती यांचा अचूक मेळ घालता आला नाही, तर चांगल्या कथेची माती होते. हे टाळायचं असेल तर दिग्दर्शकाकडे कलाकृतीबद्दल असलेली स्पष्ट जाणीव आणि पडद्यावर नेमकं काय दाखवायचं याचं भान असावं लागतं. या दोन्हींचा चांगला मिलाफ मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ या सिनेमात दिसून येतो.
‘राजकारण’ हा विषय असलेला सिनेमा हा सिनेसृष्टीत चालत आलेला एक पारंपरिक ‘ट्रेंड’ आहे. मात्र राजकारणाचं आणि मानवी स्वभावाचं वास्तव चित्रण मांडणारे सिनेमेच प्रभावी ठरतात. राजकारणासारख्या विषयाच्या आत दडून बसलेले अनेक पदर अशा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनासहित बघायला मिळतात. ‘कागर’ हा असाच सिनेमा आहे. (‘कागर’ म्हणजे ‘पालवी’.) याची कथा राजकीय वर्तुळाच्या परिघावर फिरत राहते आणि काही साचेबद्ध, तर काही चकित करणारे पदर उलगडून दाखवते.
राजकारण सरळ, साध्या, प्रामाणिक माणसांचा खेळ नाही, हे गृहीत धरून रचलेली कथा राजकीय-सामाजिक वास्तवाशी साधर्म्य साधते. सत्तापिपासू राजकारणातील डाव आणि भावनिक पातळीवरील मानवी आंतरसंबंध यात मोठी दरी असते. त्यातून निर्माण होणारा कलह मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला त्या दरीत ढकलण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी पारंपरिक राजकीय व्यवस्थेच्या जुनाट खोडाला टक्कर देऊन नव्यानं तग धरू पाहणाऱ्या रोपट्याचं राजकारणात विशेष अप्रूप असतं. ही रोपटी म्हणजे राजकीय व्यवस्थेतील नवीन पिढी असते.
या तरुण पिढीला राजकीय पटलावर आदर्श निर्माण करायचा असतो. या पिढीची स्वप्नंही सतत नवं काहीतरी करू पाहणारी असतात. त्यांच्या स्वप्नावर घाला घालणारे ‘धूर्त’ राजकारणी मात्र त्यांचा टिकाव लागू देत नाहीत. अशा वेळी निर्माण होणारं द्वंद्व दोन पिढीतलं अंतर आणि प्रवृत्ती भेद दाखवून देतं. या भेदावर ‘कागर’ची कथा उभी राहते. भेद हा केंद्रबिंदू असलेला हा सिनेमा मनोरंजन आणि सामाजिक वास्तवाला स्पर्श करून जातो.
पण सिनेमाची मांडणी करताना मात्र दिग्दर्शकाचा थोडा गोंधळ उडालेला दिसतो. पूर्वार्धात कथा लयबद्ध चालते, मात्र उत्तर्रार्धात येणारे चढ-उतार कथेला हेलकावे देत राहतात. त्यामुळे सिनेमाचा शेवट गोंधळलेला अवस्थेत गती पकडतो आणि पारंपरिक पद्धतीचं गृहीत सिद्ध करण्याच्या भानगडीत दिग्दर्शकाकडूनही गोंधळ झाला आहे. असं असलं तरी या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच पातळीवर अनेक विषयांना हात घातला आहे. त्यामुळे प्रेक्षकाला ठाम अंदाज बांधता येत नाही. कथा प्रत्येक वळणावर मागची गोष्ट जोडून ठेवते. त्यामुळे सिनेमात सलगपणा आला आहे.
दिग्दर्शक मकरंद माने यांनी आपल्या खास शैलीत सिनेमा तयार केला आहे. सिनेमाची कथा दमदार आहे. प्रेम आणि राजकीय वास्तवात गुंफलेली कथा असल्यामुळे सिनेमात वास्तवाचा आणि भावनेचा मिलाफ झालेला आहे. पटकथा थोडीफार धरसोड करते. सिनेमाचे संवाद प्रभावी असले तरी त्यातली पुनरावृत्ती टाळता आली असती. भाषा हा या सिनेमाचा एक महत्त्वाचा घटक आहे. अस्सल ग्रामीण बोलीभाषा प्रत्येक संवादातून दिसून येते. संगीताचं प्रमाण अति आहे. वेगवेगळ्या प्रकारचं संगीत वापरलेलं असल्यामुळे सिनेमातली गाणी प्रभावी ठरत नाहीत. त्यातला गडदपणा सहज लक्षात येतो.
अभिनयाच्या बाबतीत सिनेमा चांगलाच प्रभावी आहे. शुभंकर तावडे याचा हा पहिला सिनेमा आहे, तर रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा. दोघांचाही अभिनय सिनेमाला साजेसा आहे. मात्र रिंकूच्या चाहत्यांना तिचा ‘सैराट’ अभिनय पाहायला मिळत नाही. शंशाक शेंडे यांचा अभिनय कसदार आहे. शेंडे यांची भूमिका आणि त्यांचा अभिनय सिनेमाला उंचीवर घेऊन जातो. सिनेमातल्या तांत्रिक बाबींचा अपवाद वगळता एकूण सिनेमा चांगला आहे.
थोडक्यात दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ नंतरचा हा तिसरा सिनेमा म्हणजे मराठी सिनेसृष्टीला फुटलेली ‘पालवी’ आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment