तुम्ही कोणाच्या बाजूचे… शहीद करकरेंच्या की प्रज्ञा सिंग-ठाकूरच्या?
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • प्रज्ञा सिंग-ठाकूर यांचं सोशल मीडियावर फिरणारं एक चित्र
  • Thu , 25 April 2019
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle प्रज्ञा सिंग-ठाकूर Pragya Singh Thakur भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah

हेमंत करकरेंची आठवण झाली की माझ्या अंगावर काटा येतो.

त्यांचा माझा वैयक्तिक परिचय होता. भेटीही झाल्या होत्या. त्यांच्याइतका सचोटीचा, व्यावसायिक पोलीस अधिकारी मी क्वचितच पाहिला आहे. २६/११च्या हल्ल्यात अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट चढवणारे करकरे आजही डोळ्यासमोर येतात. नंतर दिसला तो कसाबच्या गोळ्यांनी आरपार भेदलेला त्यांचा देह. करकरे असे अचानक जातील असं ध्यानीमनीही नव्हतं. त्यांच्या हौतात्म्यानंतर कविता करकरेंची पहिली मुलाखत मीच घेतली होती. त्यांचा भग्न झालेला चेहरा आणि डोळ्यातले अश्रू आजही मला आठवत राहतात. 

देशासाठी कसलीही पर्वा न करता प्राण ओवाळून टाकणाऱ्या अशा शहिदाचा आमच्या पंतप्रधानांनी अपमान करावा? गेल्या आठवड्यापासून माझ्या डोक्यात विलक्षण तिडीक गेली आहे. पंतप्रधान मोदींबद्दल माझं मत कधीच बरं नव्हतं, पण ते स्वार्थी, विकृत आणि देशविरोधी आहेत, याविषयी आता माझ्या मनात शंका राहिलेली नाही. तसं नसतं तर करकरेंसारख्या शहिदाचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा सिंग-ठाकूरला त्यांनी डोक्यावर घेतलं नसतं. मोदी नावाच्या राजकारण्याकडूनच नाही, तर माणसाकडूनही आता माझी कोणतीही अपेक्षा नाही. कारण माणुसकीला मान खाली घालावी लागेल, असं लाजीरवाणं कृत्य त्यांनी विचारपूर्वक केलं आहे. 

होय, विचारपूर्वक. मोदी आणि अमित शहा यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंग-ठाकूरला भोपाळमधून उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय अनवधानानं किंवा निव्वळ उत्स्फूर्तपणे घेतलेला नाही. त्या मागे हिंदू-मुस्लीम मतांमध्ये ध्रुवीकरण घडवून आणण्याची रणनीती आहे.

भोपाळ हे मध्य प्रदेशातलं ऐतिहासिक शहर आहे. हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजाची इथं मोठी लोकसंख्या आहे. दंगलीच्या काळात या शहरातलं वातावरण नेहमीच तणावाचं असतं. एकेकाळी इथे हिंदू-मुस्लीम दोस्तीच्या कहाण्या सांगितल्या जायच्या. पण शहाबानो खटला आणि रथयात्रेपासून इथल्या समाजाचा सूर जो काही बिघडला तो कायमचाच. भारत नावाच्या देशाला झालेल्या धर्मांधतेच्या दुखण्याचं एक लक्षण आहे भोपाळ. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी या शहरातून आपली उमेदवारी जाहीर केल्यानं मोदी-शहांचं लक्ष इथं वळलं. प्रज्ञा सिंग-ठाकूरसारखी अतिरेकी हिंदुत्ववादीच दिग्विजयना धडा शिकवू शकेल, असं या जोडगोळीच्या मनानं घेतलं आणि प्रज्ञा सिंगची उमेदवारी निश्चित झाली.

पण या उमेदवारीची सुरुवात झाली धादान्त खोटेपणातून. प्रज्ञा सिंग ही मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटली आहे, असा प्रचार मोदीभक्तांनी आणि भाजपवाल्यांनी सुरू केला. थोडा इतिहास तपासला तरी या प्रचारातला भंपकपणा कळू शकतो. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात प्रज्ञा सिंग-ठाकूर ही कर्नल प्रसाद पुरोहितबरोबर आजही प्रमुख आरोपी आहे. आठ वर्षं तुरुंगात घालवल्यानंतर तब्येतीचं कारण दिल्यामुळे तिला जामीन मिळाला आहे. संघ स्वयंसेवक सुनील जोशी याच्या खुनाच्या प्रकरणातही ती आरोपी होती. त्यातून ती सुटली असली तरी मालेगाव खटल्यातून ती सुटलेली नाही. मोदी सरकारच्या अखत्यारितल्या एनआयएनं कर्नल पुरोहित आणि तिला सोडवण्यासाठी आटापिटा केला. तिच्यावरचा ‘मकोका’ही काढून टाकण्यात आला. पण न्यायालयाने तिच्यावरचे आरोप कायम ठेवून युएपीए या दहशतवादविरोधी कायद्यातल्या कलमावर शिक्कामोर्तब केलं आहे. साहजिकच ती निर्दोष सुटली आहे, असं मोदीही म्हणू शकत नाहीत किंवा त्यांचे गणंगही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

अलिकडेच एका भाषणात पंतप्रधान मोदींनी तिच्या उमेदवारीचं समर्थन केलं. ती हिंदू द्वेषाविरुद्धच्या लढ्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. आपण एका आरोपित दहशतवाद्याचं समर्थन करत आहोत, याचंही भान त्यांना राहिलं नाही किंवा त्यांनी ते मुद्दामहून केलं. असं समर्थन मोदींनी दाऊद इब्राहिम किंवा हाफीज सईदच्या भारतीय आवृत्तीचं केलं असतं का हा खरा प्रश्न आहे. एकीकडे दहशतवाद्याचा धर्म महत्त्वाचा नाही अशी बोंब मारायची आणि दुसरीकडे त्यांचा धर्मच महत्त्वाचा मानायचा असा हा संघ परिवाराचा ढोंगीपणा आहे.

प्रज्ञा सिंग-ठाकूर हिंदुत्ववादी असल्यामुळेच मोदी-शहा तिचं समर्थन करत आहेत. म्हणजे, भाजप हिंदुत्ववादी दहशतवादाच्या बाजूचा आहे. किंबहुना, माझा असा आरोप आहे की भाजप हे हिंदुत्ववादी आतंकवादाचं राजकीय व्यासपीठ आहे. प्रज्ञा सिंग-ठाकूरच्या उमेदवारीमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उद्या दाभोलकर-पानसरे-लंकेश हत्येमधले खुनीही सुटले तर धक्का बसण्याचं कारण नाही.

उमेदवारी जाहीर झाल्यावर या प्रज्ञा सिंग-ठाकूरने आपले हिंदुत्ववादी बॉम्ब फोडायला सुरुवात केली. पहिला बॉम्ब तिने शहीद करकरेंवरच टाकला. ‘माझ्या शापामुळे करकरेंवर ही पाळी आली,’ हे तिचं वादग्रस्त विधान. ‘मी बाबरी मशीद पाडण्यात सहभागी होते’ हे दुसरं विधान, तर ‘गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो’ हे तिसरं विधान. यापैकी नंतरची दोन विधानं भंपकपणाची म्हणता येतील. कारण बाबरी मशीद उदध्वस्त करण्यात आली, तेव्हा प्रज्ञा किती वर्षांची होती, या विषयी संभ्रम आहे आणि निवडणूक आयोगानंही याबाबत तिचे कान ओढले आहेत. कॅन्सरविषयीचा तिचा दावा तर अंधश्रद्धामूलक म्हणूनच घटनाविरोधी आहे. काय लायकीच्या व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिली आहे, हे यावरून स्पष्ट होतं. विशेष म्हणजे स्वत:ला ‘नव्या भारताचे उदगाते’ म्हणवून घेणारे पंतप्रधान यावर शिक्कामोर्तब करत आहेत.

पण यापेक्षा घोर अपमान या ‘दहशतवादी’ व्यक्तीनं शहीद करकरेंचा केला आहे. शाप दिला म्हणजे नेमकं काय केलं? तो शाप कसाबच्या रूपाने दिला होता काय? कसाब आणि प्रज्ञाचे संबंध होते काय? की तंत्रमंत्राच्या आधारे प्रज्ञाला ही करामत अवगत होती? असे प्रश्न विचारले की मोदी आणि प्रज्ञाचे भक्त आपल्यावर रागावतात. कारण त्यांच्या दृष्टीनं प्रज्ञा ही ‘साध्वी’ आहे आणि ‘साध्वी’पुढे नतमस्तक व्हायचं असतं, तिला सवाल करायचे नसतात!

पण बॉम्बस्फोट, खूनबाजी, कटकारस्थान यामध्ये सामील असलेल्या व्यक्तीला ‘साध्वी’ कसं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच. वास्तविक ही प्रज्ञा म्हणजे मूळ हिंदू परंपरेची बदनामी आहे. हिंदू धर्म सहिष्णुतेसाठी ओळखला जातो असं ही मंडळी सांगतात. प्रज्ञा तर थेट असहिष्णुतेचं प्रतीक आहे. मग ती हिंदू धर्माची प्रतिष्ठा कशी काय वाढवणार? पण संघवाले या प्रश्नाची उत्तरं देणार नाहीत. कारण ती त्यांच्या सोयीची नाहीत. 

प्रश्न हा आहे की, मोदी-शहा आणि त्यांच्या या उमेदवारानं शहीद करकरेंचा जो अपमान केलाय त्याचं काय करायचं? एरवी हे संघोजी इतरांना ‘देशद्रोही’ ठरवतात, ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणतात. मालेगावमध्ये तर कर्नल पुरोहित आणि प्रज्ञा सिंगचीच ‘तुकडे तुकडे गँग’ होती. ‘अभिनव भारत’ने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खुनाचा कट केला होता, हे स्वत: करकरेंनी अडवाणींना भेटून सांगितलं होतं. कारण या अतिरेक्यांना संघाचा मवाळपणा मान्य नव्हता. आज राजकीय सोय म्हणून मोदी या खुनी प्रवृत्तीला जवळ करत आहेत.

पण करकरेंच्या तपासात या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांबद्दल जे पुरावे सापडले होते, त्याचा नीट पाठपुरावा झाला असता तर आज असिमानंदांपासून प्रज्ञापर्यंत सगळे फासावर लटकले असते. पण आधी युपीए सरकारमध्येही दम नव्हता आणि आता तर मोदी सरकारला हे सगळे खटलेच कमकुवत करायचे आहेत. म्हणूनच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्यावर दबाव आणला. करकरे जेव्हा यातले काही पुरावे घेऊन त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे गेले, तेव्हा गृहमंत्र्यांनाच घाम फुटला. हे पुरावे जाहीर झाले तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध ‘हिंदू बॅकलॅश’ येईल अशी भीती त्यांना वाटली. म्हणून मग करकरेंवर दबाव आणण्यात आला. करकरे शहीद झाल्यावर हा दबाव कशा प्रकारचा होता, हे सांगणारा लेख माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी इंग्रजी वृत्तपत्रात लिहिला होता. त्यानंतर हिंदुत्ववादी दहशतवादाचे हे खटले कसे सडवण्यात आले आणि एकेक आरोपी कसे सुटले हे सगळं आपण गेल्या पाच वर्षांत पाहिलं आहे. 

या निवडणुकीत मतदानाच्या तीन फेऱ्यांनंतर भाजपच्या गोटात काहीसं निरुत्साहाचं वातावरण आहे. मोदींनी सुरुवातीला पुलवामा आणि बालाकोटचा मुद्दा वापरून पाहिला. ‘स्ट्राँग लीडर’चे ढोलही पिटून झाले. मध्ये मध्ये राममंदिराची पुडीही सोडण्यात आली. पण या सगळ्याचा काहीही उपयोग होत नाही असं म्हटल्यावर प्रज्ञा सिंगच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्वाचं हत्यार बाहेर काढण्यात आलं आहे. हाच संघाचा आणि भाजपचा खरा चेहरा आहे. अडवाणी, मोदी, शहा, आदित्यनाथ आणि आता ही प्रज्ञा. हिंदू राष्ट्राची पहिली प्रयोगशाळा गुजरातमध्ये स्थापन झाली. आता ती देशभर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रज्ञाची उमेदवारी हे त्याच प्रयत्नातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.

म्हणूनच ही निवडणूक ऐतिहासिक आहे. ज्यांचं या देशावर, देशाच्या संविधानावर प्रेम असेल त्यांनी हिंदू राष्ट्र निर्मितीचा हा आतंकवादी धोका ओळखला पाहिजे. या निवडणुकीत आपण शहीद हेमंत करकरेंच्या बाजूचे की प्रज्ञा सिंग-ठाकूरच्या, हे ठरवण्याची हीच वेळ आहे. लक्षात असू द्या, कविता करकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेले एक कोटी रुपये नाकारले होते!

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून त्याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 26 April 2019

निखील वागळे, तुमचं अभिनंदन. अभिनंदन अशासाठी की शेवटी तुम्ही मला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडलंच. वस्तुत: तुमच्या कथनास एखाद्या चिलटाच्या गुणगुणण्यापेक्षा जास्त भाव देऊ नये, अशा मताचा मी आहे. पण काये की कधीतरी ते घोंघावणारं चिलट अंगावर बसून डंख मारतं. त्याअगोदर त्याचा बंदोबस्त केलेला बरा पडतो. तसाच तुमचा बंदोबस्त करूया. २६/११ चे हुतात्मे अशोक कामटे यांच्या वीरपत्नी विनिता कामटे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती खणून काढली. तिच्या आधारे त्यांनी 'टू द लास्ट बुलेट' नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर विनितबाईंनी खणून काढलेल्या माहितीनुसार २६/११ च्या रात्री राकेश मारिया हे पोलीस नियंत्रण कक्षात होते. तिथून त्यांनी करकरे, कामटे व साळसकर हे तिचे ज्यात बसून होते ते पोलीस वाहन भेकडकसाबच्या टोळीच्या तावडीत सोपवलं. यावरून राकेश मारिया हा किमान तिहेरी खुनी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर त्याच्याविरुद्ध लिहून दाखवा. साध्वी प्रज्ञा हे सॉफ्ट टारगेट आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......