अजूनकाही
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस.लक्ष्मण आणि सौरव गांगुली या ‘फॅब फोर’ चौकडीनंतर भारतीय क्रिकेटचे भवितव्य धुसर वाटू लागले होते. हे ‘फॅब फोर’ जवळपास दीड दशके भारतीय कसोटी क्रिकेटचे तारणहार होते. त्यांची जागा कोण भरून काढणार, हा प्रश्न भारतीय क्रिकेटशौकिनांना पडला होता. त्यातच ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग ढोणीने कसोटी क्रिकेटमधून काढता पाय घेत सर्व धुरा धडाकेबाज विराट कोहलीकडे सोपवली होती. भारतीय क्रिकेटच्या स्थित्यंतराच्या काळात कोहली सर्व काही कसे निभावून नेणार, हीच चिंता सर्वांना सतावत होती. पण कुणावाचून कुणाचे अडत नाही, हे भारताच्या यंग ब्रिगेडने सिद्ध करून दाखवले.
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय तसेच रवीचंद्रन अश्विन ही कसोटी क्रिकेटला सरावलेली मंडळी वगळता भारतीय क्रिकेटची धुरा यशस्वीपणे सांभाळेल, असे क्रिकेटपटू भारतीय संघाकडे फारच कमी होते. पण नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने भारतीय संघाला अनेक स्टार क्रिकेटपटू मिळाले. लोकेश राहुल, जयंत यादव यांच्यासारख्या खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली असली तरी सध्या एकाच नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे करुण नायरची. आपल्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात पहिल्यावहिल्या शतकाचे रूपांतर त्रिशतकी खेळीत करणाऱ्या करुण नायरने दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे फॅब फोरच्या अस्तानंतर आता खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा ‘करुणोदय’ झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
२०१६ हे वर्ष विशेषत: शेवटचे दोन महिने देशवासीयांसाठी फारच हालअपेष्टांचे गेले. मात्र करुण नायर या भारतीय क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्यासाठी मात्र हे वर्ष फारच लाभदायी ठरले. पाच महिन्यांपूर्वी करुण नायरवर जीवघेणा प्रसंग ओढवला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वनडेत यशस्वी पदार्पण केल्याबद्दल करुण नायरसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केरळमधील अरुणमला मंदिरात होणाऱ्या ‘वल्ला संध्या’ या कार्यक्रमाला बोटीतून जात असताना अचानक बोट पलटली. या बोटीतून प्रवास करणारे सुमारे १०० प्रवासी जीव वाचवण्यासाठी आटापिटा करत होते. पोहता न येणारा नायरही आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. काही नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून करुणला वाचवले. या दुर्घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र या मृत्यूमुखींमध्ये त्याच्या काही नातेवाईकांचा समावेश असल्याने करुण अक्षरश: खचला होता. त्याला या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अथक प्रयत्न केले.
आणि आता पाच महिन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा फलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात करुण नायरचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. इतकेच नव्हे तर पहिल्याच शतकाचे रूपांतर त्रिशतकात करणारा तो सर गारफिल्ड सोबर्स आणि बॉब सिम्पसन यांच्यानंतरचा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या महान फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवल्याचा अभिमान त्याला कायम वाटत राहणार, हे नक्की. अवघ्या तीन सत्रात नाबाद ३०३ धावांची खेळी करून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत वेगवान त्रिशतक झळकावण्याची किमया त्याने केली.
पदार्पणातच जबरदस्त कामगिरी हे करुण नायरच्या कामगिरीचं जणू ब्रिदवाक्यच ठरले आहे. २०१३-१४ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर करुण नायरने तब्बल १५ वर्षानंतर कर्नाटकला पहिल्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. सलग तीन शतके ठोकणाऱ्या करुण नायरचा या यशात वाटा मोलाचा होता. बाद फेरीतील दोन सामन्यांत आणि अंतिम सामन्यांत त्याने झळकावलेल्या शतकी खेळीमुळेच कर्नाटकने महाराष्ट्राचा धुव्वा उडवून रणजी करंडकावर नाव कोरले होते. नायरने १० सामन्यांत उभारलेल्या ७०९ धावांमुळे कर्नाटकने पुढील मोसमांतही रणजी करंडक आपल्याकडेच राखला. इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यात तामिळनाडूविरुद्ध त्रिशतक झळकावण्याचा करिश्माही त्याने साकारला होता. १९४६-४७नंतर रणजी करंकडाच्या अंतिम फेरीत त्रिशतक झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकच्या दोनच फलंदाजांना त्रिशतकी खेळी साकारता आली आहे, त्यापैकी करुण नायर हा एक.
२०१४ साली करुण नायरला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने ७५ लाखांना करारबद्ध केले. पण त्याच्या मॅच विनिंग खेळी पाहता, २०१६मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यावर तब्बल ४ कोटी रुपयांची बोली लावली. करुणच्या बेस प्राइसपेक्षा (आधारभूत किंमत) ही बोली ४० पटीने अधिक होती.
गेल्या दोन वर्षांत भारतीय संघ परदेशात फक्त तीनच कसोटी मालिका खेळला. त्यातही दोन मालिका भारतीय उपखंडात आणि एक मालिका भारतीय खेळपट्ट्यांशी साधर्म्य असलेल्या कॅरेबियन बेटांवर खेळला आहे. त्यामुळे परदेशातील या तिन्ही मालिकांमध्ये जवळपास पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची फारशी सत्त्वपरीक्षा लागली नाही. गेल्या तीन-चार महिन्यांत भारतीय संघ मायदेशातच आठ कसोटी सामने खेळला. या आठही सामन्यांत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत न्यूझीलंड आणि इंग्लंडचा अक्षरश: धुव्वा उडवला. सध्या तुफान फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहली भारताच्या या यशाचा शिल्पकार असला तरी युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी विसरता कामा नये.
गेल्या काही वर्षांपूर्वी भारताकडे सक्षम अशी दुसरी फळी कधीच नव्हती. पण लोकेश राहुल, जयंत यादव आणि करुण नायर या नवख्या खेळाडूंनी इंग्लंडला नतमस्तक होण्यास भाग पाडले. आयपीएल आणि भारत अ संघाकडून खेळतानाचा अनुभव त्यांच्या कामी येतोय. भारत अ संघाकडून केलेले परदेशी दौरे युवा खेळाडूंना परिपक्व बनवण्यासाठी मोलाचे ठरत आहेत. गेल्या दोन दशकांत खेळाडूंसाठी अशी सोय नव्हती. त्यामुळे कदाचित भारताकडे चांगल्या खेळाडूंची दुसरी फळी नव्हती. कदाचित त्यामुळेच अनेक दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिर होऊ शकली नाहीत. आता वेगवेगळ्या चाचण्यांमधून तावून-सुलाखून बाहेर पडलेला खेळाडू भारतीय संघात दाखल होऊ लागलाय. एके काळी ऑस्ट्रेलियाने ही पद्धत राबवली होती. त्याची गोड फळे त्यांना गेल्या २० वर्षांत चाखता आली. आता भारतही हीच पद्धत राबवत आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणसारखे महान खेळाडू युवा खेळाडूंना घडवण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटच्या भवितव्याविषयी चिंता करण्याचे कारण वाटत नाही. भविष्यात करुण नायरसारखे अनेक गुणी खेळाडू देशाला मिळतील, हे मात्र नक्की.
लेखक मुक्त क्रीडा पत्रकार आहेत.
tusharvaity@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Rohit Deo
Thu , 22 December 2016
It's to early to say whether Karun Nair will take place of Fab four... But definitely he shown character and has ability to play big innings... Don't forget Main contribution to his success is Rahul Dravid... He gave him opportunity and groom him in Rajasthan Royals, Delhi Daredevil and of course in India A... For time being team India me Acche din Hai... Let's see how this young team perform in Australia, England and South Africa...