आज जगातिक पुस्तक दिन आणि शेक्सपिअरचा स्मरणदिन. त्यानिमित्तानं हा विशेष लेख...
.............................................................................................................................................
पुस्तकं कुणी वाचत नाही. वाचन-संस्कृतीचं काय होणार? पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांची ही शेवटची पिढी. पुस्तकांचे व्यवहार ठप्प होत चाल्लेत. काय होणाराय ह्या पुस्तकांचं? असं कितीही कुणीही काही म्हटलं तरी मला त्याचा काहीच फरक पडत नाही. कॅनडापासून कोरिया ते आईसलँडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत कुठेही अशी ओरड केव्हाही उठसूठ होत नाही. पुस्तकांविषयीची नकारात्मक बोंब मारणारी माणसं जगाचा विचार करून बोलत नाहीत. ती बोलतात त्यांच्या देशापुरतं. ती बोलतात त्यांच्या राज्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या जिल्ह्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या तालुक्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या गावापुरतं. ती बोलतात त्यांच्या घरापुरतं. ती बोलतात निराशेनं आणि भौतिक सुखाच्या अति नादामुळे हातातून निसटून गेलेल्या वाचनाच्या आवडीपुरतं.
अशा लोकांना पृथ्वीचा एखादा कोपरा पुस्तकांच्या प्रेमानं भरून गेलाय याचा साधा भासही होत नाही काय? की त्यांना हे भास खरेखुरे होतील/ असतील याची भीती वाटते? त्यामुळे अशा नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हाती असलेल्या पुस्तकाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत त्या पुस्तकाला मनोमन सांगायला हवं की, तू इतक्या सहज ह्या जगातून नष्ट होणारी गोष्ट नाहीस. तू कधीतरी नष्ट होशील मान्य आहे, पण तू हातात असताना तो तेवढा क्षण माझ्या स्वतःतून नष्ट होणं अमान्य. हे नष्ट होणं अमान्य का? कारण पुस्तकांची देखभाल करणारे पुस्तकांचे डॉक्टर अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांची अनेक रूपं आहेत. त्या अनेक रूपांपैकी महत्त्वाची दोन रूपं म्हणजे एक पुस्तकसंग्राहक आणि दुसरा बुक बाइंडर.
पुस्तकसंग्राहकांविषयी पुष्कळ लिहिलं गेलंय, पण बुक बाइंडरवर कुणीतरी कुठेतरी लिहिलंय तिथंपर्यंत फार कमी वाचक पोहचले आहेत. कोणत्याही बुक बाइंडरविषयी माझ्या मनात नितांतसुंदर आदर आहे. त्या आदरामुळेच गेली चार वर्षे एका बुक बाइंडरच्या अद्भुत कलेच्या प्रेमात पडून त्यांच्या बुक बाइंडिंगच्या कच्च्या मालाला समजून घेता घेता ते त्यांच्या पक्क्या मनाला त्या कच्च्या मालात कसे मिसळवून टाकतात ते समजून घेतोय. आजही हातात फाटलेलं पुस्तक घेऊन त्यांच्यासमोर जेव्हा उभा राहतो, तेव्हा त्यांना ‘डॉक्टर’ अशी हाक मारतो. तेव्हा ती हाक ऐकून ते ज्या तऱ्हेनं हसतात, त्या हसण्याच्या पलिकडचं गुपित सांगतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मंगेश सखाराम मांडवकर. वय ४८. मूळचे माणगाव, रायगड. गेले पंचवीस वर्षं बुक बाइंडिंगचा एकहाती व्यवसाय करत आहेत. साधं राहणीमान. रंगीत चौकटी सुती शर्ट. त्याखाली हाफ पॅंट (रिबॉक, नाईक, प्यूमा असल्या डुप्लिकेट टॅग असलेली). कानाला पेंसिल अडकवलेली. विरळ पण तितक्याच हसऱ्या मिशा. आवाजात सदैव इको साऊंड सिस्टीम. काही वाक्यं दोनदा बोलण्याची सवय. तितकेच अबोल. पुस्तकांकडे खोलवर हरवून पाहण्याची काळीभोर बाहुल्यांची नजर. शर्टाच्या वरच्या खिशात दहा-वीसच्या कोंबलेल्या नोटा नेहमीच्याच. पायात झिजलेली पॅरागॉन टाइप चप्पल. ना हातात घड्याळ, ना गळ्यात सोनं. नोकियाचा जुना मोबाईल. कटिंग मशिनच्या धारेवर अलवारपणे बोट फिरवत माझ्याकडे न पाहता दुसरीकडेच पाहत बोलणार “बेंद्रे पुस्तक फार शेवटाला आहे. तरी मी जमवतो. एकदम भारी ठीकठाक करतो. पुठ्ठा मजबूत घेतो. तेवढी कव्हरची (मुखपृष्ठाची) कलर झेरॉक्स आणून द्या. आणि मला वेळ द्या. तीन दिवस. मला कसं आरामात काम करायला आवडतं. काम चांगलं व्हायचं असेल तर घाई नाही. तेवढी बॅंक्याच्या स्लीपा बायडींचं काम जोरात आहे, तेवढं करतो, मग तुमचं. चालेल ना बेंद्रे?”
चार वर्षं त्यांच्याकडे येणंजाणं आहे. या चार वर्षांत त्यांची मुलाखात घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण स्वतःविषयी एक शब्द सांगेनात. मी म्हणायचो, ‘अहो मुलाखत नको, पण थोडं तुमच्याविषयी सांगा ना. तुम्ही हे सगळं का करताय? कुठे राहता? कुटुंबात कोणकोण? हा व्यवसाय कधीपासून?’ कित्येकदा त्यांना मी हे विचारलं, पण त्यांनी कधीच काही सांगितलं नाही. गेल्या वर्षी अगदी मनमारून ते कबूल झाले की, “बोला तुम्हाला काय माहिती हवी. तुम्ही जे विचाराल ते सगळं सांगतो.” माझा तर तेव्हा विश्वास बसेना की, हा माणूस स्वतःविषयी सांगायला तयार झाला. चार वर्षांची ओळख शेवटी फुलून आली. तीही गुलमोहरासारखी. कारण बुक बाइंडर म्हणजे उन्हाळ्यात बहरणाऱ्या गुलमोहरासारखाच. तर मी जसजसं विचारू लागलो तसे डॉक्टरसाहेब बोलू लागले. उत्तर देऊ लागले.
मी : हा व्यवसायच का?
डॉक्टर : माझे वडील दहा वर्षं काळबादेवी मेट्रो सिनेमाजवळ बुक बाइंडरचं आणि छपाईचं काम करायचे. बुक बाइंडिंग करण्याचं सगळं काम त्यांनीच शिकवलं. वडील बोल्ले, आता तू हेच कर. समाधानानं कर. वाचायला, लिहायला येईल तेवढं शिकलो. नंतर मेट्रो सिनेमाला बुक बायडिंग सुरू केली. गिरगावातील कितीतरी माणसं माझ्याकडे यायची. मला शोधत. त्यांना माझं पुस्तक बांधणं आवडायचं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
मी : कधी वाटलं नाही की, हा व्यवसाय सोडून दुसरं काही करावं?
डॉक्टर : चूकूनपण नाय.
मी : का असं?
डॉक्टर : आठवत नाय. पोटापुरतं करायचं होतं. मग तेच केलं. आणि तेच जमलं.
मी : गेली चार वर्षं मी तुमच्याकडून पुस्तकं बायडिंग करून घेतोय. बाइंडिंगच्या क्वालिटीमध्ये जराही फरक पडला नाही. इतकं सातत्य कसं जमतं? की फक्त मलाच चांगली बाइंडिंग करून देता मुद्दामहून?
(बस, ह्या प्रश्नानंतर ते गप्प झाले. अगदीच गप्प. मी म्हटलं बोला. सहज प्रश्न विचारलाय, राग नका मानू.)
जवळजवळ पाच-दहा मिनिटे ते त्यांच्या कामात गुंतून राहिले. माझ्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष करतच राहिले. आणि नंतर मध्येच म्हणाले.
डॉक्टर : तुम्ही कुणी खास नाहीत. माझं काम सगळ्यांसाठी समान. सगळ्यांचं काम मी चांगलं करून देतो. आता तुमचं काय ते प्रश्नबिश्न राहू देत.
त्यानंतर ती मुलाखत तशीच अर्धवट राहिली. मी पुन्हा कधी प्रश्नांचा भडिमार केला नाही. मी तितकाच गप्प झालो, जितके ते. त्यानंतर अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो. माझं ‘डॉक्टर’ म्हणून हाक मारणं तसंच चालू राहिलं आणि त्यांचं हाक ऐकून हसणंही तसंच.
पण त्या दरम्यान एक गोष्ट घडत गेली. मी त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांचं काम पाहण्यात अधिक रस घेऊ लागलो. बाइंडिंगसाठी पुस्तक नसलं तरी उगाच दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत भरभर जेवून उरलेला वेळ त्यांची जादुई कलाकारी पाहण्यात घालवू लागलो. त्यांनी मला कधी रोखलं नाही. उलट त्यांचं काम ते माझ्यासमोर हातचं न राखता सादर करू लागले. कटिंग मशिनमध्ये पुठ्ठा कापण्याचा आवेग असू दे वा हाताला चिकटलेला हट्टी डिंक असू दे, तो समरसून अर्धा-पाऊण तास त्यांचं काम बघणं खूप poetic वाटत आलंय.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पुस्तकाची बिघडलेली तब्येत पुन्हा नव्यानं ठीक होताना त्याची प्रक्रिया, त्याचं औषधपाणी पाहणं एखाद्या पुस्तकप्रेमीला एखाद्या साहसाहून कमी नाही. एखाद्या पुस्तकाचं पान निखळलं, धागा उसवला, कव्हरचा कोपरा फाटला, पान मध्येच फाटलं, तरी डॉक्टर ज्या पद्धतीनं हाताळतात ते कमालीच थोर आहे! म्हणजे आधी ते पुस्तकाला हात लावतात. मग चारही बाजून निरखून पाहणार. पुठ्ठावर कटिंगची एक लाईन मारणार. पानं वेगळी करणार पुठ्ठा वेगळा करणार. मग भल्या मोठ्या पुठ्ठ्यावर बसून सगळी पानं पुन्हा एकत्रित करण्याची लय आणि त्यावर मग स्टेपलचं किंवा धाग्याचं शिवणं. त्या पुढे ते जे जे काही करतात ते नीट यांत्रिकरित्या समजून सांगण्याची माझी मानसिकता नाही. पण ती सगळी प्रक्रिया समाधी अवस्था मिळवून देणारी आहे.
बाइंडिंग झालेलं पुस्तक ते माझ्याकडे सोपवतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहायचं मी विसरत नाही. पुस्तक हाती दिल्यावर त्या पुस्तकाला मी नीट तपासल्यावर ‘कस्लं ठणठणीत केलात हो ह्या पुस्तकाला’ असं मी सहज बोलून जातो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान माझ्या बुकशेल्फमध्ये त्या बाइंडिंग केलेल्या पुस्तकासोबत गुपचूप निवांतपणे पसरत राहतं.
त्यांच्याबद्दल ते फार काही सांगणार नाहीत, हे मनाशी पक्कं केल्यावर मी उगाच माझ्याविषयी त्यांना सांगत राहतो. आणि ते ऐकतातही. त्यांचं ऐकणं तितकंच त्यांच्या बोलण्यासारखं भासतं. एकदा सहज निवांत वेळ मिळाला म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनाही फार काम नव्हतं. माझ्यासाठी कॉफी मागवत बोल्ले, ‘बसा बेंद्रे. कुठं दौरा?’ मी म्हटलं, ‘तुमच्याकडेच.’ आणि मग आम्ही काहीबाही शिवसेनेवर बोल्लो आणि विषयांतर केव्हा झालं कळलंच नाही. मी माझ्या जवळ नसलेल्या पुस्तकांविषयी सांगू लागलो-
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
“डॉक्टर, मी आधी दिव्याला राहायचो, आता अंबरनाथ गाठलं. शिफ्ट झालो खरा, पण माझी सगळी पुस्तकं अजून दिव्याच्या घरी आहेत. अंबरनाथला जेमतेम शंभर पुस्तकं आहेत. बाकी माझ्या आयुष्याची सगळी कमाई दिव्याच्या घरी. कितीतरी पुस्तकं खराब झाली आहेत. पानं पिवळी पडलेत. बाइंडिंग निखळू लागल्यात. एकूणच मी फार अस्वस्थता अनुभवतोय. अशी अस्वस्थता जी केवळ पुस्तकांच्या पोटातून माझ्या पोटात ढवळून निघतेय.”
तेव्हा अचानक डॉक्टर बोल्ले, “संध्याकाळी तुमच्या घरी येऊ काय?” मी शॉक. चक्क डॉक्टर असं बोलतील हे मी मनात आणलं नाही. म्हटलं, “माझी काही कामं आहेत ठाण्यात, ती आटोपल्यानंतर आपण एकत्र निघू दिव्याला.”
संध्याकाळी दार उघडलं तसे डॉक्टर घरात शिरले. नदीला पहिला पूर येतो, तेव्हा तो पाहण्यासाठी आपण काठावर ज्या पद्धतीने उभा राहतो, अगदी तसाच डॉक्टरचे हात माझ्या बुकशेल्फला पहिल्यांदा स्पर्श करताना शेल्फकाठावर उभा राहिल्यासारखा मलाच मी दिसलो. डॉक्टर बोल्ले- “बेंद्रे, तुम्हाला काय काळजी करण्यासारखं कारण नाही. आपण ह्या ठीक नसलेल्या पुस्तकांना दुरुस्त करू.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
ह्या माणसानं चार वर्षं माझ्या पुस्तकांची काळजी घेतलेय. येणारी अनेक वर्षं ते माझ्या पुस्तकांची काळजी घेत राहतील. पण ते नसतील तेव्हा नवा डॉक्टर माझ्या पुस्तकांना मानवणार नाही. त्याचा गुण येणार नाही, ह्या नकारात्मक विचारानेच मी खचून जातो. त्यांची बाइंडिंगची कला इतकी जबरदस्त आहे की, मला हा किस्सा आठवतो -
“तू तुझे डोळे शांतपणे मिटून घे.” ती म्हणाली. “एक पुस्तक बांधणी करणारी कारागीर म्हणून मी हे शिकलेय की मला माझ्या बोटांवर विश्वास आहे डोळ्यांपेक्षा.” हे बोलणं आहे पुस्तकांशी तादात्म्य पावलेल्या एका कुशल पुस्तक बांधणी करणाऱ्या कारागीर, ग्रंथपाल आणि पुस्तकप्रेमी स्मिथ हीच. (University of San Diego’s Copley Library)
कधीकधी वाटतं माझी पुस्तकं सतत आजारी पडोत. त्यांना ह्या डॉक्टरला भेटण्याची संधी मिळत राहो.
.............................................................................................................................................
लेखक विजय बेंद्रे तरुण पुस्तक संग्राहक आहेत.
vjbendre46@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ramesh singh
Tue , 23 April 2019
"पुस्तकांविषयीची नकारात्मक बोंब मारणारी माणसं जगाचा विचार करून बोलत नाहीत. ती बोलतात त्यांच्या देशापुरतं. ती बोलतात त्यांच्या राज्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या जिल्ह्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या तालुक्यापुरतं. ती बोलतात त्यांच्या गावापुरतं. ती बोलतात त्यांच्या घरापुरतं. ती बोलतात निराशेनं आणि भौतिक सुखाच्या अति नादामुळे हातातून निसटून गेलेल्या वाचनाच्या आवडीपुरतं. अशा लोकांना पृथ्वीचा एखादा कोपरा पुस्तकांच्या प्रेमानं भरून गेलाय याचा साधा भासही होत नाही काय?" स्वतः बेंद्रे एका कोपऱ्याविषयी बोलत असताना आधीच्या परिच्छेदाची प्रस्तुतता कशी लावतात हे देव जाणे. पुस्तकांचे वेड असावे, परंतु तारतम्यही टिकवणे इष्ट राहील. पवित्रा घेण्याचे टाळलेत तर वास्तवाचा लेखाजोखा घेता येईल.