अजूनकाही
४ ऑक्टोबर १९८३ रोजी मसाप सोलापूर शाखेनं ‘शेक्सपिअर आणि मराठी रंगभूमी’ या विषयावर प्रा. डॉ. वा.पु. गिंडे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. त्र्यं. वि. सरदेशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यावेळी करावयाच्या भाषणासाठी सरदेशमुखांनी केलेली टिपणं… आज जगातिक पुस्तक दिन. शेक्सपिअरचा स्मरणदिन. त्यानिमित्तानं...
.............................................................................................................................................
१.
नाटककार, कवी, तत्त्ववेत्ता इमर्सनला वाटते की, नाटककार म्हणून त्याचे योगदान तसे दुय्यम, कवी आणि तत्त्ववेत्ता म्हणून अधिक श्रेष्ठ.
He was a full man who liked to talk.
नाटक हाताशी, सुलभ होते म्हणून त्याने योजले. त्याला जे सांगायचे होते तेच इतके वजनदार, अर्थगर्भ होते की, ते सांगण्यासाठी त्याने जे वाहन योजले (नाटक) त्याकडे काहीसे दुर्लक्ष होऊ शकते.
एखादा संतपुरुष जे बोलतो – वागतो, ते कसे आपल्याला कोणत्याही भाषेतून सांगितले तरी मोहिनी घालते - चित्रे, गीते, गद्य अशा कोणत्याही माध्यमातून - तसे शेक्सपिअरचे होते. कोणी संत संभाषणातून, प्रार्थनावचनांतून, बोधकथांमधून वा उपदेशवाणीतून आपल्याशी संवाद करतो : महात्मा शेक्सपिअरने मनुष्यजीवनाच्या ग्रंथावर नाटकाद्वारे भाष्य केले इतकेच.
इमर्सन म्हणतो, ‘नाटककार-कवींमध्ये शेक्सपिअरचा दर्जा, त्याची पदवी-कोटी एकदम वेगळी आहे.
He is inconceivably wise, the others conceivably.
प्लेटोशी तुलना करून तो म्हणतो ‘त्याच्या मेंदूतून काय निघेल त्याचा कयास करता येत नाही. प्लेटोविषयी तो पुष्कळ प्रमाणात करता येतो! टॅलेण्ट आणि मेंटल पॉवर याबाबतीत तर शेक्सपिअर अजोड आहे.’
शेक्सपिअर या महानुभाव पुरुषाच्या लगामी अनेक सिद्धी होत्या :
त्याची विषयाची निवड अप्रतिम असे. (Choice of subject)
कथानक सौंदर्याची त्याची जाण महाकवीला साजेशी होती.
प्रसन्न, समृद्ध अभिनव वाग्विलास (happy, abundant, ingenious expression)
“अभिनववाग्विलासिनी चातुर्यकलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी” हे शेक्सपिअरच्या साहित्यसंभाराला यथार्थ लागू पडणारे वर्णन होय.
त्याचा वाग्विलास इतका चित्तवेधक आहे की, असावध मन असेल तर त्याचे इतर गुण थोडे फोकसबाहेर राहतात आणि तेच तर त्याचे श्रेष्ठ कवित्वगुण आहेत.
२.
गटे म्हणायचा की हौशी लेखक आणि थोर कलावंत यांच्यातील फरक हा कलावंतापाशी विविध अनुभवाकृती निर्माण करण्याची शक्ती असते. Architectural beauty...
या आकृती निर्माण करण्याच्या एकंदर प्रक्रियेत गहन विचारसौंदर्य, भव्य कल्पनाविलास, दृष्टान्तांची वेचकता व विपुलता, भाषासौंदर्य इ. गुण प्रसंगोपात कार्यरत होतात. शेक्सपिअरचे अनुकरण करू पाहणारा त्याच्या प्रतिभेच्या सहाय्यक गोष्टींनीच भारून जातो व तपशील सजवतो, पण कृतीचे सत्त्व गमावतो असेच पुष्कळदा होते, असे मॅथ्यू अर्नोल्डला वाटते. (‘शेक्सपिअर अॅण्ड ग्रीक पोएट्स’ या निबंधात)
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4797/The-Paradoxical-Prime-Minister
.............................................................................................................................................
३.
अर्नोल्डच्या मताने शेक्सपिअर स्वतःही कित्येकदा भाषाविलासात असा अडकतो की, एखाद्या घटनेची भावात्मता, एखाद्या व्यक्तिस्वभावाची उलट वैशिष्ट्ये प्रकट करण्याच्या स्थळी भाषेचे थेटपण व सुबोध सहजपण शैलीचे आकर्षण असते हे जवळजवळ विसरतो. त्याची भाषा ‘extremely and faultily difficult’ होते. अर्नोल्डला वाटते, सुस्पष्ट मांडणी, काटेकोर विकासदर्शन, सुबोध प्रसन्न शैली या गुणात ग्रीक नाटककार अनुपमेय होते (अॅंटिगनी, राजा इडिपस)
४.
शेक्सपिअरच्या भाषेला व्यंजनेचे वैभव विपुल आहे, पण ते शेक्सपिअरचे केवळ व्यक्तिगत सामर्थ्य होय. त्याचे अनुकरण कधीच फलदायी होत नाही. अनुकरण करता येते, पण कलागौरवाला ते घातक असते.
ग्रीक नाटककारांच्या आविष्कार रीतीला एक निःसंग निर्मलता आहे (Purity of method). ती शेक्सपिअरपाशी नाही म्हणून तो ‘धोकेबाज आदर्श’ ठरतो (less safe model).
५.
शेक्सपिअर जवळ ज्या अनेक सिद्धी होत्या, त्या कधी कधी त्यालाही गोत्यात आणीत. सामान्य प्रतिभेच्या नाटककाराने त्यांच्या वाट्याला जायचे धाडस केले, तर केव्हा त्याच्या कलेचा त्या गळा घोटतील ते सांगवत नाही.
६.
मॅथ्यू अर्नोल्ड - कवितेच्या प्रांतात दोन प्रकारचे dilenttanti (dilettante - एकवचन - lover of fine arts, amateur, smarterer, one who toys with things) असे गटेने सांगून ठेवले आहे.
पहिला : कवितेच्या तंत्राकडे दुर्लक्ष करतो, आत्मिक भाव व्यक्त केले म्हणजे सर्व झाले असे समजतो.
दुसरा : तंत्रसाधनेने काव्यनिर्माणाचा यत्न करतो. कारागिरी आणि कौशल्य सादर करतो, पण आशय आणि आत्मा याकडे दुर्लक्ष करतो.
पहिला कलेला अपाय करतो, तर दुसरा स्वतःलाच.
७.
नाटककार बेन जॉन्सन शेक्सपिअरविषयी – ‘त्याला जीवन एक दृश्य वाटे : वादचर्चेची गोष्ट नव्हे. त्याचा नीतीधर्म एकच होता : निसर्ग व मानवी स्वभाव समजून घेणे आणि अनुभवणे.
८.
एखाद्याच्या कर्तृत्वाने आपण भारावून जातो, त्याच्यासारखे आपल्यालाही काही करता यावे असे इच्छितो. दिवंगत पूर्वजाला श्रद्धांजली वाहताना आपण म्हणतो की, त्याचे कार्य आपल्या.... नुसार आपण चालवावे हीच त्याला मानवंदना. दिवंगताच्या प्रभावाने हे सारे होते.
कलावंताच्या संदर्भात प्रभाव म्हणजे त्याच्या कृतींमधील गुणांचे अनुकरण करीत प्रभावितांनी निर्माण केलेल्या कृती. अखेर त्या कृती निर्मात्याच्या प्रकृतीधर्मानुसार विशिष्ट देशकालाच्या परिवेशात वेगळ्या सौंदर्याने पण कलाकृतीमधल्या शाश्वत चैतन्याने अवतरतात.
कलावंत व त्याची कृती ही अनुकरण योग्य कितीशी? तिचे थोरपण तिचेच असते. अनुपमेय. माणसाचे व्यक्तिमत्त्व जसे एकाकी तशीच थोर कलाकृती एकाकी उरते. ती मूस निसर्गाने त्याच्या अंताबरोबर मोडून टाकलेली असते. असे जरी असले तरी माणसाची अनुकरणशीलता, पूज्यबुद्धी दाखवण्याची रीत फारशी पालटत नाही.
शेक्सपिअर मोठा, पण त्याच्या आयुष्याच्या व त्या भवतीच्या परिस्थितीच्या चौकटीत (frame of reference) त्याला पाहिले म्हणजे ध्यानी येते की, त्याच्या आगेमागे नामांकित नाटककार होते किड्, मार्लो, ग्रीन, बेन जॉन्सनसारखे.
एकंदर देशस्थिती उत्साहवर्धक होती. युरोपात नवीन विद्या, नवी साहसे यांच्यामागे धावणारी पिढीमागून पिढी निर्माण होत होती. रेनेसान्सचा उत्तरकाळ होता तो. धर्मसुधारणा आणि विज्ञानाची पहाट... भरास आलेल्या होत्या. धाडसी नाविक जगाच्या सफरीवर निघाले होते. ब्रिटनला साम्राज्य निर्माण होण्याचे डोहाळे लागले होते.
९.
१८८०-८१ पासून मराठीत शेक्सपिअरची रूपांतरे होऊ लागली. (गोविंद कानिटकर / गोपाळराव आगरकर / महादेवशास्त्री कोल्हटकर / मोरो शंकर रानडे / कमतनूरकर / कृ.प्र.खाडिलकर इ.)
शेक्सपिअर ही अनुकरण करण्याची गोष्ट आहे काय? त्याने प्रभावित व्हायचे म्हणजे -
निसर्गाच्या अद्भुत वास्तवाने थक्क व्हायचे...
मानवी मनाच्या रहस्यांचा ठाव काढायचा...
जीवनाच्या विविध पैलूंना सामोरे जायचे...
उच्च-नीच, प्रेम-द्वेष, कोमल-उग्र या, अशा द्वद्वांना समत्वाने घ्यायचे...
प्रेम, सौहार्द, सुकुमारता, वात्सल्य यांना सतत मरणभयाला तोंड द्यावे लागते, हे ओळखायचे...
असे प्रभावित व्हायचे तर मन समावेशक (कॅथॉलिक) व तरल, संवेदनशील असावे लागते. जीवनव्यवहार एका निर्मळ वृत्तीने व काही निर्मम भावाने न्याहाळावे, पारखावे लागतात.
मनुष्यस्वभावातील गुणदोषांच्या बाजूने वा विरुद्ध पक्षपाती निर्णय घेता येत नाहीत. अस्तित्वाला निर्लेप आलिंगन देता येणे शेक्सपिअरसारख्या कलावंतालाच साध्य झालेले असते - निदान त्याच्या कलासृष्टीपुरते हे विधान अत्यंत खरे असते. तो आदर्शाचे चित्रण करण्याच्या मागे नाही, आदर्शाचे सूचना, संकेत मात्र तो जरूर पुरवतो.
१०.
शेक्सपिअर प्रभाव मराठी रंगभूमीवर कधी दिसून आला आहे? खाडिलकरांनी पहिलेच नाटक शेक्सपिअरच्या प्रतिभेला अभिवादन करून बेतले : पण एक चमत्कार करून ठेवला. हॅम्लेट आणि आयागो यांच्या भूमिकांना एकाच कथानकाच्या प्रवाहात आणून सोडले. मूळच्या दोन्ही व्यक्तिदर्शनातली सूक्ष्मता आणि भव्यतेने साहजिकच मार खाल्ला आणि पेशव्यांच्या इतिहासातल्या एका दुर्दैवी तरुण नायकाविषयी जमा होणाऱ्या सहानुभूतीवर नाटकाला गुजारा करावा लागला. पुढेपुढे पौराणिक महाकाव्यातील कथानके घेऊन खाडिलकरांनी नाव मिळवले, पण त्यांचा नाटकातील आदर्शचित्रणाचा हव्यास, समकालीन राजकीय घडामोडींची डुब कथानकाला देण्याची हट्टी खोड, सुमार विनोदाचा ‘रिलीफ’ देण्याची रीत... एकूण मांडणी व शैली यात खाडिलकरांच्या ठिकाणी प्रसन्नतेचा व मोहकतेचा अभाव होता. त्यांची व्यक्तीदर्शने आदर्शाचे आरपार आकलन व्हावीत इतकी ठोकळ आणि धोपट होत...
त्यांच्याच समकालात कर्नाटकात टी.पी.कैलासम् महाभारत-रामायण यांमधून कथाबीजे उचलून नाटकांची निर्मिती करत होते. त्यांच्या कृतींशी तुलना केली असता खाडिलकरांच्या कृतींचा बोथटपणा आणि मचूळपणा चांगला ध्यानात येतो. ‘एकलव्य’, ‘कर्ण’, ‘कीचक’, यांच्या जीवनावर कैलासम् यांनी जी नाट्यशिल्पे रचली आहेत, त्यांत शेक्सपिअर आणि ग्रीक नाटककार यांच्या अनेक गुणांचे मोहक दर्शन घडते.
मग शेक्सपिअरचे पांग मराठी रंगभूमीने कुणाच्या कृतींनी फेडले म्हणायचे? १९०५-३० हा काळ एक गडकरी सोडले तर नटप्रभावाचा होता. खाडिलकरी नाटके गंधर्वगीतांनी श्रवणीय झाली होती. समकालीन राजकीय नेतृत्वाच्या आदर्शाला शरण जाऊन कालबाह्य आकर्षणे पोटात साठवून प्रेक्षणीय झाली होती. गंधर्वाला लक्तरे नेसवून स्टेजवर आणीन, असे गडकरी म्हणाले. खाडिलकर, कोल्हटकर यांना सामाजिक, राजकीय दर्जाचे इभ्रतीचे वलय होते, गडकऱ्यांना ते नव्हते. खाडिलकरांनी कलेला दासी करण्याचा प्रयत्न केला.
नाटकवाला घातला कसा जन्माला?
असा हा रमला, घातला कसा जन्माला?, हे दुर्भाग्य खाडिलकरांच्या अनुभवास आले नव्हते.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 23 April 2019
त्र्यं.वि.सरदेशमुख, भाषण चांगलं आहे. मला इंग्रजी साहित्यात फारशी गती नाही. पण शेक्सपियरवरनं एक आठवलं. त्याचं लेखन आणि इंग्लिश देशाचं ब्रिटीश साम्राज्यात होणारं रुपांतर समकालीन आहे. यावरून शेक्सपियर हा प्रत्यक्षात अस्तित्वात नसून त्याच्या कलाकृती वेगळ्याच कोणीतरी लिहिलेल्या असाव्यात असं काही विद्वान मानतात. कदाचित शेक्सपियर हे टोपणनाव असू शकतं. त्याची थोरली मुलगी ज्युडिथ ठार निरक्षर होती. एव्हढ्या थोर साहित्यिकाची मुलगी निरक्षर कशी काय हे एक गूढंच आहे. तर त्याच्या नावाने लिहिणारा माणूस 'ब्रिटीश साम्राज्य' या संज्ञेचा जनक सर जॉन डी असावा असा बळकट तर्क केला जातो. या माणसाने पहिल्या एलिझाबेथ राणीच्या राज्याभिषेकाची तारीख ठरवली होती. हा अतिशय हुशार माणूस होता. त्याला विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान, जादू, धर्मग्रंथ (बायबल वगैरे), प्राचीन विद्या, कविता अशा अनेक विषयांत गती होती. तो कमालीची गुप्तता पाळीत असे. असो. त्याच्या म्हणण्यानुसार देवदूत त्याला साहित्यिक कलाकृती देवभाषेत सांगंत असंत (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/John_Dee#Later_life ) . खरेखोटे देव जाणे. आपला नम्र, -गामा पैलवान