​राजकारणातली ‘प्रज्ञा’ ढळते तेव्हा...
पडघम - देशकारण
निखिल परोपटे
  • प्रज्ञा सिंग-ठाकूर
  • Mon , 22 April 2019
  • पडघम देशकारण प्रज्ञा सिंग-ठाकूर Pragya Singh Thakur

‘प्रज्ञा, शील, करुणा’ ही भगवान गौतम बुद्धाने मांडलेली तत्त्वत्रयी. व्यक्ती, समाज किंवा देश यांच्याठायी जर ‘शील-करुणा’ नसेल तर ‘प्रज्ञे’ला काहीही अर्थ उरत नाही, ती कवडीमोल ठरते! हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे स्वत:ला ‘संत’ म्हणवून घेणाऱ्या आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेल्या एक आरोपी प्रज्ञा सिंग-ठाकूर यांचे “दहशतवाद्यांनी केलेल्या मुंबई हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे देशद्रोही, धर्मद्रोही होते. ज्या दिवशी त्यांना दहशतवाद्यांनी मारलं, त्या दिवशी माझं सुतक संपलं” अशी मुक्ताफळे उधळणारे वक्तव्य.

प्रज्ञा सिंग-ठाकूर भाजपच्या भोपाळमधून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत. आपल्या अत्यंत बेताल वक्तव्यांनी त्या सध्या देशभर चर्चेचा व टीकेचा विषय झाल्या आहेत. देवाच्या शापाने जसे दानव मरत होते, तसे माझ्या शापाने करकरे मेले, असे एक ‘दिव्य लॉजिक’ त्या सांगतात. अटकेत असताना आपला छळ झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. (भाजपच्या मातृसंस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मध्ये या छळावर रसभरीत कथन मागे प्रकशितही झाले होते.) छळाचे हे प्रकरण न्यायालयातदेखील गेले होते. पण त्यांचा अटकेत असताना छळ झाला नाही, असे २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्या ‘दिव्य’ वक्तव्यावर भाजप आता काय भूमिका घेणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. पण भाजपने प्रेस नोट काढून त्यांच्या वक्तव्याला चूक म्हटले, पण त्यांची उमेदवारी मागे घेतली नाही. अटकेत असताना जो त्यांचा छळ झाला, त्या उद्वेगातून त्यांनी हे वक्तव्य केले, असा भाजपच्या काही नेत्यांचा अजब तर्क आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला फक्त स्वत:चेच मत असते का? प्रज्ञा सिंग-ठाकूर यांनी करकरे यांच्याबद्दलचे मत त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त केलेले आहे. त्यावर मात्र त्यांचा पक्ष मूग गिळून गप्प आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

मग हे गौडबंगाल नेमके काय आहे?

भाजपने प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्या उमेदवारीतून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहता त्यांची उमेदवारी, त्यांचे बेताल बोलणे अन भाजपच्या वरिष्ठांनी त्यावर दुर्लक्ष करणे, उलट त्यावर पांघरून घालत त्यांचे समर्थन करणे, यात एक सुसंगती दिसून येते. ठरवून केलेले हे कृत्य असावे असे वाटते. 

प्रज्ञा सिंग-ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपने इतर सर्व ​​मुद्द्यांवरील लक्ष, चर्चा मोठ्या शिताफीने बाजूला सारल्या आहेत. काँग्रेस व इतर पक्ष देशभर भाजपने गेल्या पाच वर्षांत काय काम केले, हे जाहीरपणे विचारत आहेत. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी तर जाहीरसभांमध्ये हिशेबच मांडायला सुरुवात केली आहे. अशा वेळी भाजपने आपला अजेंडा राष्ट्रप्रेम, देशद्रोह, हिंदुत्ववादी विचार याकडेच झुकता ठेवला. जेणेकरून विकासाच्या मुद्द्यावरून देशाचे लक्ष बाजूला वळवता येईल. पण विरोधी पक्ष आघाडी घेत असल्याचे पाहून भाजपने नवीन डाव टाकला. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी प्रज्ञा सिंग-ठाकूर यांची भोपाळ या मुस्लीमबहुल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काहीही असो, एक मात्र नक्की, अवघ्या २४ तासांत देशाचे लक्ष भलत्याच विषयाकडे वळवण्यात भाजप कमालीचा यशस्वी झाला आहे.

प्रज्ञा सिंग-ठाकूर यांची उमेदवारी ही एक चाहूल आहे. (भाजपच्या म्हणण्यानुसार तेच पुन्हा सत्तेत येणार आहेत हे गृहीत धरून) पुढील पाच वर्षांत सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्यांची भूमिका काय असेल, याचे हे चित्र आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांना कुठलीही वेसण घालायची नाही, उलट त्यांना पाठीशी घालायचे, यातून भाजप कोणता संदेश देऊ पाहत आहे? तर येणारा सत्ताकाळ हा हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा असेल. त्याला विरोध होणार तर नाहीच, उलट हिंदुत्ववादी विचारांची धार अधिक तीव्र असेल, हे यातून स्पष्टपणे दिसते. त्यासाठी जाणीवपूर्वक असे कडवे चेहरे समोर आणण्याचा घाट घातला जातो आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये उभा भारतीसारखा कडवा चेहरा भाजपच्या मातृसंस्थेकडून समोर आणला गेला होता. आता तर नेतृत्वाचाच इतिहास कडवा आहे. तेव्हा भविष्यातही अशी कडव्या चेहऱ्याची माणसे समोर आणली जातील, असा संदेश यातून दिला जातो आहे का? 

तर दुसऱ्या बाजूला ‘काँग्रेसच्या राजवटीतील अनेक नेत्यांची नावे घेत ‘ते’ही वेगवेगळ्या गुन्ह्यांत आरोपी आहेत. त्यांना मंत्री, मुख्यमंत्री करता (उदा. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ), मग आम्ही एका साध्वीस उमेदवारी दिली, त्याचे इतके भांडवल का करता?’ असा सवाल भाजप करतो आहे. म्हणजे काँग्रेसने माती खाल्ली म्हणून आम्ही शेण खाणार, असा हा प्रकार झाला! 

पण प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्या उमेदवारीने आपण इतके भयभीत का?

आपण नक्की कशाने भयभीत आहोत? प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्या उमेदवारीने, की त्यांच्या निवडून येण्याच्या भयाने? लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. प्रज्ञा सिंग-ठाकूर त्यांच्या अधिकाराचा वापर करून निवडणूक लढवत आहेत. 

एक गोष्ट आपण विसरतो आहोत की, लोकशाहीत मतदार राजा असतो. पण असे तर नाही ना की, आपला यावरचा विश्वासच उडत चालला आहे? अजून तरी लोकशाही असलेल्या या देशाचे भवितव्य इथला मतदारच अत्यंत मूकपणे ठरवतो. आजवर तसेच तो ठरवत आला आहे. 

प्रज्ञा सिंग-ठाकूर यांच्या बेताल वक्तव्याने आपण किंवा आपल्यापैकी अनेक जण अस्वस्थ आहोत, हे राष्ट्र जागरूक असल्याचे लक्षण आहे. तसे ते असायलाही हवे. पण खरा प्रश्न आहे, आपण नेमके कशाने भयभीत आहोत? मतदाराच्या हाती सर्वाधिकार असतात. प्रज्ञा सिंग-ठाकूर यांना स्वीकारायचे की नाकारायचे याचा सर्वस्वी निर्णय मध्य प्रदेशातील मतदारांनी घ्यावयाचा आहे. तिथल्या सुज्ञ मतदारांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे, एवढेच फार तर म्हणता येईल. 

त्यामुळे प्रश्न आहे तो आपण समाज म्हणून लोकशाहीतील सर्वांत मोठ्या उत्सवात विचारांची नौका कुठल्या दिशेला नेऊ देणार आहोत? ही निवडणूक आपल्याही सुज्ञतेची परीक्षा आहे. ‘प्रज्ञा-शील-करुणा’ या तत्त्वत्रयीची जबाबदारी अधिकपणे भारतीय मतदारांच्याच खांद्यावर आहे!

.............................................................................................................................................

लेखक निखिल परोपटे मुक्त पत्रकार आहेत.

nparopate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 23 April 2019

निखिल परोपटे, एव्हढे कशाला घाबरलात? इतकी फाटली असेल तर पत्रकारिता सोडून द्या म्हणतो मी. त्याचं काय आहे की हिंदू दहशतवाद म्हणून जी भाकडकथा रचली होती तिच्यामागील सत्य बाहेर येऊ घातलंय. त्यात अनेक देशद्रोह्यांचा मुखवटा फाटणार आहे. त्यामुळे भयभीत व्हायला तुम्ही काय देशद्रोही आहात का? नाही ना, मग उगीच घाबरू नका. नायतर लोकं तुम्हांस विनाकारण देशद्रोही समजतील. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......