अजूनकाही
भारतीय राजकारणामध्ये बेताल वक्तव्यांची परंपरा काही नवी नाही. आजपर्यंत अनेकांनी बेछूट आणि बेताल वक्तव्ये करण्याचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. किंबहुना कोण जास्तीत जास्त बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करू शकतो, याची जणू स्पर्धाच चालू असते! विशेष म्हणजे अशा वक्तव्यांची मक्तेदारी कोणत्याही एका विचारधारेची नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पक्ष व संघटनांशी संबंधित अनेक जण या स्पर्धेत आहेत. अजित पवारांचे धरणाबाबतचे विधान असेल, राम कदम यांचे दहीहंडी दरम्यान मुलीबाबत केलेले वक्तव्य असेल, प्रशांत परिचारकांचे सैनिकांच्या पत्नींबाबतचे वक्तव्य असेल, रावसाहेब दानवेंचे शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणे असेल किंवा अलीकडेच आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबाबत केलेले विधान असेल… ही यादी संपणार नाही!
साक्षी महाराज, दिग्विजय सिंग यांसारख्या काही व्यक्तींनी तर स्वतःशीच जबरदस्त स्पर्धा करत एकापेक्षा एक नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेले आपण सर्वांनीच पाहिलेले आहेत. या प्रकारची विधाने ‘चुकून’ बोलली जातात, प्रसारमाध्यमे त्यांचा ‘विपर्यास’ करतात, का ती प्रसिद्धीसाठी ‘जाणीवपूर्वक’ केली जातात, हा संशोधनाचा विषय असू शकतो. काही वक्तव्ये ही अनावधानाने बोलण्याच्या ओघात झालेली असावीत, हे जरी आपण मान्य केले तरी किमान वक्तव्ये केल्यानंतर आपण काहीतरी चुकीचे बोललो, हे मान्य करून दिलगिरी व्यक्त करण्याचे धाडस तरी दाखवणे गरजेचे आहे, परंतु काही अपवाद वगळता हा समजूतदारपणा फार अभावानेच पाहावयास मिळतो. त्यामुळे काही वेळा माध्यमांचा खोडसाळपणा जरी ध्यानात घेतला तरी बहुतेक विधाने ही ‘जाणीवपूर्वक’ प्रसिद्धीसाठी अथवा ‘वाद निर्माण करण्यासाठी’ किंवा ‘एखाद्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी’ केलेली आपल्याला आढळून येतात.
याची आज आठवण यायचे कारण म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि नुकत्याच भोपाळमधून लोकसभा रिंगणात उतरलेल्या प्रज्ञा सिंह-ठाकूर यांचे माजी एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या बाबतीत केलेले संतापजनक विधान. “हेमंत करकरे यांना मी शाप दिला आणि त्यामुळेच दहशतवाद्यांनी त्यांचा अंत केला आणि माझं सुतक सुटलं” असे वक्तव्य त्यांनी एका सभेत जाहीरपणे केले. त्यावरून देशभरात आणि सोशल मीडियावर वादंग माजल्यावर आपले विधान त्यांनी मागे घेतले, तरी मूळ प्रश्न शिल्लकच राहतो.
आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. संविधानाने दिलेले भाषण-स्वातंत्र्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य हे सर्वांचे अधिकार आहेत, यात काहीच शंका नाही. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! संविधानाने जसे अधिकार दिलेत, तशी काही कर्तव्येदेखील सांगितलेली आहेत. त्याचा कदाचित आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. किंबहुना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
प्रज्ञा सिंह-ठाकूर यांनी केलेले हे विधान जाणीवपूर्वक काही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केले आहे की, काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. कारण आपण केलेल्या विधानाबाबत स्वतःला ‘साध्वी’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीला किंचितही पश्चाताप झालेला जाणवत नाही. याउलट त्या विधानाची पाठराखण करायला फौज तयार आहे. या पाठीराख्यांचा मुख्य मुद्दा काय? तर ती हिंदू संत आहे. हिंदू धर्मातील साधू-संतांना आणि हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठीच त्यांना या खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले आहे.
या तथाकथित हिंदू धर्मरक्षकांना आवर्जून सांगावेसे वाटते की, हा हिंदू धर्म नक्कीच नाही. हिंदू धर्म तो आहे, जो ज्ञानोबा-तुकोबांनी सांगितला आहे. महाराष्ट्राची आणि देशाची संतपरंपरा हिंदू धर्म सांगते. ‘साध्वी’ या शब्दाचा अर्थदेखील न समजलेल्या व्यक्तीला ‘संत’ म्हणणे हा त्या थोर संतपरंपरेचा अपमान आहे. त्यामुळे प्रज्ञा सिंह-ठाकूर ही व्यक्ती विशिष्ट धर्माशी, पक्षाशी, विचारधारेशी संबंधित आहे, हे न पाहता त्या वक्तव्याचे गांभीर्य पाहणे जास्त आवश्यक आहे, असे वाटत नाही का?
भारतात बहुपक्षीय संविधानिक लोकशाही आहे आणि प्रत्येकाला स्वतःची काही राजकीय मते, भूमिका आहेत, हे मान्यच आहे आणि तेच भारतीय लोकशाहीच खरे सौंदर्य आहे. परंतु स्वतःला ‘साध्वी’ म्हणवून घेणाऱ्या आणि बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादाच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात राहून आलेल्या (आणि सध्या जामिनावर असलेल्या) प्रज्ञा सिंह-ठाकूरने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले, ते संतापजनक आहेच. परंतु त्या वक्तव्याचे समर्थन केले जाते, हे त्याच्यापेक्षा जास्त संतापजनक आणि क्लेशदायक आहे.
प्रत्येकाची काही तरी एक राजकीय आणि वैचारिक भूमिका असू शकते, किंबहुना असायलाच हवी. मी त्याचा आदर करतो, परंतु देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या बाबतीत तरी आपण आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून थोडी संवेदनशील भूमिका घेणार आहोत की नाही? प्रज्ञा सिंह-ठाकूरच्या समर्थनार्थ काही लोक म्हणतात, ‘ती निर्दोष आहे. तिला या प्रकरणात नाहक अडकवले. हे हिंदू धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे वगैरे वगैरे...’
प्रज्ञा सिंह-ठाकूर निर्दोष आहे किंवा नाही हा मुद्दा इथं महत्त्वाचा नाही. त्याबद्दल न्यायालय निर्णय देईल आणि तो निर्णय कुणाला आवडो किंवा न आवडो मान्य करावा लागेल. परंतु देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्तव्य बजावताना स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या ‘अधिकाऱ्याला मी शाप दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला’ हे विधान त्यांनी सांडलेल्या रक्ताचा अपमान नाही का?
यामधून तुमचा खरा चेहरा दिसतो.
संपूर्ण देशभर ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ ठरवायची चढाओढ लागलेली असताना स्वतःला ‘देशभक्त’ म्हणवून घेणारे या वक्तव्याचे निर्लज्जपणे समर्थन करतात! किती हा कर्मदरिद्रीपणा!! जेव्हा तुम्ही प्रज्ञा सिंह-ठाकूरचे समर्थन करता, तेव्हा तुम्ही हे मान्य करता की करकरेंनी जीव पणाला लावून चूक केली.
चुकीचे वक्तव्य करणारी व्यक्ती ही फक्त माझ्या धर्माची, माझ्या राजकीय विचारधारेशी संबंधित आहे, म्हणून मी तिचे समर्थन करणार, अशी जर कुणी भूमिका घेत असेल तर त्याची किव करावी तेवढी थोडीच! पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, हा देश हे कधीही स्वीकारणार नाही. अजून तरी या समाजाची सद्सदविवेकबुद्धी जागृत आहे.
सध्या लोकसभा निवडणूकांचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे. दोन टप्प्यांचे मतदान झालेले आहे. आपण जर या वक्तव्याचा निषेध केला तर आपल्या राजकीय पक्षाला फायदा होईल किंवा नुकसान होईल एवढा संकुचित विचार करणारा हा समाज नक्कीच नाही. काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात आणि त्याबद्दल प्रत्येकाने एक ठाम भूमिका घेणे नितांत आवश्यक आहे. स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेणारा समाज अशी ठोस भूमिका घेताना आज दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. परंतु हा देश अनेक वैचारिक आक्रमणे पचवूनही ठामपणे उभा आहे.
या देशातील सर्वसामान्य नागरिक अशा बेताल, असंवेदनशील वक्तव्यांना आणि व्यक्तींना पाठीशी घालणार नाही, हा आशावाद अजूनतरी नक्कीच जिवंत आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय भोसले माहिती तंत्रज्ञान अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
bhosale.dhananjay@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 22 April 2019
धनंजय भोसले, तुम्ही एक स्पष्टपणे एक मुद्दा मांडलाय ते फार चांगलं केलंत : >> प्रज्ञा सिंह-ठाकूर निर्दोष आहे किंवा नाही हा मुद्दा इथं महत्त्वाचा नाही. >> नेमका हाच मुद्दा आम्हा पाठराख्यांना महत्त्वाचा वाटतो. भारतात विनापरवाना घुसलेला पाकिस्तानी नागरिक अजमत अली खुशाल समझोता एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवून परत पाकिस्तानात पळून जातो. आणि बोंबा मात्र हिंदू दहशतवादी म्हणून मारल्या जातात. तुम्ही कधी एकाच वेळी दहाबारा टग्या पुरुषांचा मार खाल्ला आहे का? साध्वींनी खाल्लाय. तुम्ही कधी कर्करोगाने ग्रस्त होता का? साध्वी होत्या. तुम्ही कधी तुरुंगात ड्रगमाफियांसोबत रात्र घालवली आहे का? साध्वींनी रात्रंदिवस घालवलेत. हे सगळं कुठलाही पुरावा नसतांना साध्वींनी का म्हणून सोसायचं? करकरे कशावरून हुतात्मा आहेत? करकरे, साळसकर व कामटे एकाच पोलीस वाहनात होते. राकेश मारियांनी नियंत्रण कक्षात बसून नेमकं तेच वाहन आक्रमकांच्या तोंडी दिलं. हे विनिता कामट्यांनी (दिवंगत अशोक कामटे यांच्या पत्नी) पुराव्याने सिद्ध केलं आहे. राकेश मारियांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांचा खून केला आहे आणि आरडाओरडा मात्र हिंदू दहशतवाद्यांच्या नावाने ! शिवाय साध्वींनी उद्वेगाने शापही द्यायचा नाही? खासा न्याय आहे तुमचा. असो. शेवटी एक किस्सा सांगतो. साहित्याचे नोबेल विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांच्या एका पुस्तकातला आहे. ते भारतभेटीवर आले होते. त्यांना मुंबईच्या टोळीयुद्धावर एक प्रकरण लिहायचं होतं. त्यांची एका लोकल गँगस्टरशी एक भेट घडवून आणली. हा एक मराठी माणूस होता/असावा. बरोबर गुंडांच्या टोळीतले पाचसहा सहकारी होते. मुलाखतीत म्होरक्या म्हणाला की कुठल्याही क्षणी आमचं मरण आमच्यासमोर उभं राहू शकतं. पण आम्हाला त्याची काळजी नाही. मग नायपॉलांनी विचारलं की तुम्ही गँगस्टर मरायला घाबरंत नाही, म्हणजे तुम्हा लोकांना कशाचीही भीती वाटंत नसेल. तर म्होरक्या म्हणतो कसा की आम्ही गरीबांच्या तळतळाटास थरकांप भितो. स्वत:च्या जीवावर उदार झालेले खुनी निरपराध्यांच्या शिव्याशापांना टरकून असतात. यावरून घ्यायचाय तो बोध घ्या, म्हणून सुचवेन. आपला नम्र, -गामा पैलवान