अजूनकाही
महाराष्ट्रातली यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार करण्याचं संपूर्ण श्रेय राज ठाकरेंना दिलं पाहिजे. त्यांचा पक्ष एकही जागा लढवत नसताना त्यांनी आपल्या भाषणांनी राज्यभरात एक जबरदस्त तुफान निर्माण केलं आहे. १९७७पासून आजपर्यंत लोकसभा, विधानसभा आणि सर्व छोट्या-मोठ्या निवडणुकांचा मी साक्षीदार आहे. पण ज्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही, अशा पक्षाच्या नेत्यानं मैदान गाजवल्याची एकही घटना मला आठवत नाही.
एका दृष्टीनं राज ठाकरेंचा सध्याचा अवतार हा त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभूतपूर्व म्हटला पाहिजे. ते उत्तम वक्ते तर पूर्वीपासूनच आहेत, पण या वेळी त्यांच्या वक्तृत्वात मुद्देसूदपणा आणि अभ्यासू वृत्ती दिसते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजवर कधीही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव हे त्यांचं लक्ष्य आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यायला ते सांगत आहेत. मोदी-शहा जायला हवेत, त्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी हरकत काय, हा त्यांचा आपल्या सभेला येणाऱ्या लाखो श्रोत्यांना थेट संदेश आहे.
राज ठाकरेंच्या परिपक्व झालेल्या या वक्तृत्वाचं विश्लेषण मी करणार आहेच, पण त्या आधी या मागचं राजकारण बघूया. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेना यांच्यात थेट सामना होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे फारशी रंगतही नव्हती. पण अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅ. ओवैसींनी एन्ट्री घेतली आणि वातावरण बदलून गेलं. काँग्रेसशी समझोता करायला नकार देऊन अॅड. आंबेडकरांनी या आघाडीला अक्षरश: गॅसवर ठेवलं. साहजिकच आपली आघाडी मजबूत करण्याची गरज शरद पवारांना वाटली. त्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घ्यावं, अशी सूचना काँग्रेस नेत्यांना केली. पवारांना प्रत्येक राजकीय नेत्याची ताकद नेमकी कळते.
राज यांचं आक्रमक वक्तृत्व, त्यांना मराठी तरुणांचा असलेला जोरदार पाठिंबा आणि शहरी मतदारसंघात असलेली त्यांच्या पक्षाची दीडेक लाख मतं यावर पवारांची नजर होती. पण कालबाह्य झालेल्या काँग्रेस नेत्यांना शरद पवारांचं हे चाणाक्ष गणित समजलंच नाही. किंवा समजूनही त्यांनी आपल्या कोषात राहणं पसंत केलं. राज ठाकरेंशी युती केली तर आपली उत्तर भारतीय मतं जातील अशी त्यांना भीती वाटली.
पण राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती. त्यांचा मुख्य शत्रू मोदी-शहा होता. त्यांची पाडव्याची सभा जबरदस्त झाली. मग मात्र काँग्रेस नेत्यांचा अहंकार गळून पडला. उलट, राजनी आपल्याकडे यावं म्हणून अशोक चव्हाणांपासून सुशीलकुमार शिंदेंपर्यंत सगळे काँग्रेसी गयावया करू लागले. आता निवडणुकीपर्यंत राज ठाकरेंच्या दहापेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात होतील. यातली प्रत्येक सभा प्रचंड होते आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची धार सभेगणिक वाढते आहे. प्रत्येक सभेत ते एक नवं नाट्य उभं करत आहेत. साहजिकच याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल असा अंदाज आहे.
अडचण फक्त एकच आहे. मनसेच्या मतदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं बटण दाबायची सवय नाही. पण आपल्या नेत्याच्या आदेशामुळे मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनं प्रत्यक्ष प्रचारातही उतरले आहेत. ही मतं जर त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली तर काँग्रेस-राष्ट्रवादीचं पारडं जड होऊ शकतं. आता येऊया राज ठाकरेंच्या भाषणशैलीकडे. राज ठाकरे आपल्या भाषणात ऑडिओ-व्हिज्युअल प्रेझेंटेशनचा वापर करत आहेत. त्याचा मोठा परिणाम श्रोत्यांवर होताना दिसतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्राचा वापर करणारा राज ठाकरे हा महाराष्ट्रातलाच नव्हे, तर देशातला पहिला राजकीय नेता असावा. या निवडणुकीतले विरोधी पक्षातले दुसरे प्रभावी वक्ते आहेत बॅ. ओवैसी. पण त्यांचा भर वक्तृत्त्वशैली आणि मुद्यांवर असतो. तेही श्रोत्यांना संमोहित करतात, पण ऑडिओ-व्हिज्युअलचा वापर त्यांनी आजवर केलेला नाही. राज ठाकरेंचं भाषण हा एका परीनं एकपात्री प्रयोगच आहे.
१९८८ पासून राज ठाकरेंना मी पाहतो आहे. ते सुरुवातीला विद्यार्थिसेनेत होते आणि मग शिवसेनेचे प्रमुख नेते झाले. १९८८च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २५० ते ३०० सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला होता. एका बाजूला छगन भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे सेनेचा किल्ला लढवत होते. बाळासाहेब तर होतेच, पण त्या काळी उद्धव ठाकरे राजकारणातही नव्हते. राज बाळासाहेबांचे लाडके होते. त्यामुळे त्यांच्या पायात पाय घालण्याचा विचार दुसरा कोणताही शिवसेना नेता करू शकत नव्हता. सगळे जण राजनाच बाळासाहेबांचा खरा वारसदार मानत होते.
राज यांचं संगोपन मातोश्रीवर बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या सहवासात झालं आहे. त्यामुळे व्यंगचित्रांपासून वक्तृत्वापर्यंत सगळी शैली त्यांनी बाळासाहेबांचीच उचलली आहे. सुरुवातीच्या काळात ते भाषण करत, तेव्हा तरुणपणीचे बाळासाहेबच बोलताहेत असं वाटत असे. त्यांची दुसऱ्याची खिल्ली उडवण्याची, विनोद-नकला करण्याची शैली किंवा ठाकरी भाषा आपल्या काकांकडून उचलली आहे.
आक्रमकपणा तर प्रबोधनकारांमध्येही होता. व्यासपीठावर उभं राहण्याची पद्धत, मधूनमधून रुमालाने तोंड पुसण्याची लकब बाळासाहेबांचीच आहे. पण आता भाषणाच्या बाबतीत राज ठाकरे बाळासाहेबांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांचं भाषण मुद्देसूद असतं, त्यात विनोद असले तरी हल्ली त्याचा अतिरेक नसतो. नकलाही असतात, पण पूर्वीप्रमाणे त्या आता मुद्यांवर मात करत नाहीत.
जाहीर सभेत हातात कागदपत्रं घेऊन बोलण्याची पद्धत राज ठाकरेंनीच सुरू केली. ही मूळची जॉर्ज फर्नांडिस स्टाईल. आता भाषणाच्या वेळी राजसाठी माईकच्या बाजूला टेबल मांडलं जातं, त्यावर त्यांचे सहकारी अनिल शिदोरे कागदपत्रांच्या चळी रचून ठेवतात आणि मग भाषणाच्या दरम्यान त्यातला नेमका कागद त्यांच्या हाती देतात. याला व्हिडिओ क्लिप्सची जोड मिळाली आहे. शब्द आणि दृश्य यांचा प्रभावी संयोग त्यांच्या भाषणात असतो.
बाळासाहेबांप्रमाणे राज ठाकरेही उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणात व्यंगचित्रकलेचंही प्रतिबिंब असतं. बाळासाहेबांच्या भाषणात व्यंगचित्रकाराच्या मनातल्या प्रतिमा सहजपणे येत. (उदाहरणार्थ, ‘मैद्याचं पोतं’ बनलेले शरद पवार किंवा ‘डुकराच्या रूपा’तले आचार्य अत्रे). राज आपल्या भाषणात मोदी-शहा, फडणवीस, गडकरी यांचं जे काही चित्र रेखाटतात ती व्यंगचित्रकाराचीच ताकद आहे. एक प्रकारे ही गुंगवून टाकणारी मैफलच म्हणायला हवी.
म्हणूनच एकदोन (भाजपधार्जिणे) अपवाद सोडता प्रत्येक मराठी न्यूज चॅनेल राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण आणि लाईव्ह दाखवतं. इतर नेते यावर चिडतात, पण २९०७ पासूनच हा प्रकार सुरू आहे. कारण राज ठाकरे हे सर्वाधिक टीआरपी देणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी, केजरीवाल आणि काही प्रमाणात राहुल गांधी यांना हा टीआरपी मिळतो. डिजिटल माध्यमांच्या युगात श्रोत्यांना मैदानात खेचून आणण्याची करामत राज ठाकरे यांनी सातत्यानं करून दाखवली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नव्हे, तर ज्यांना राजकारण करायचं आहे त्या सर्वांनाच राज ठाकरेंच्या वक्तृत्त्वापासून काही शिकता येईल.
गंमतीची गोष्ट म्हणजे, राज ठाकरेंना एरवी शिव्या घालणारी सेक्युलर मंडळीही या वेळी त्यांच्या प्रेमात पडली आहेत. अनेक हिंदी-इंग्रजी पत्रकार त्यांच्या भाषणाची वारेमाप स्तुती करत आहेत. त्यांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. कारण इतक्या प्रखरपणे कोणत्याही नेत्यानं मोदी-शहांवर आजवर हल्ला केला नव्हता. या हल्ल्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपविरोधी मंडळींच्या मनाचा ठाव घेतला असला तरी त्यांची पूर्वीची मतं बदलली आहेत असं नाही.
मनसेच्या निर्मितीपासून भूमिकांचा गोंधळ राज ठाकरेंच्या मनात चालू आहे. अर्थात, त्यांना तो गोंधळ वाटत नाही. कारण कोणत्याही घटनेला उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायची सवय त्यांनी शिवसेनाप्रमुखांकडूनच घेतली आहे. ते गुजरातला गेले तेव्हा मोदींच्या विकासाच्या मॉडेलच्या प्रेमात पडले. मग हे मॉडेल बोगस आहे असं हळूहळू त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्यावर थेट हल्ला चढवायला सुरुवात केली.
बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेंकडे लपवाछपवी नसते. जे आवडतं ते ते बोलून दाखवतात आणि जे आवडत नाही त्याला ठोकून काढतात. मनामध्ये राग ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणूनच टीकाकार त्यांचे कायमचे शत्रू कधीही होत नाहीत. या गोष्टीचा उपयोग भावी राजकारणात आपला राजकीय पाठिंबा व्यापक करण्यासाठी ते करतात का याकडे विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे अशा प्रकारे जाहीर सभा घ्यायला का लागले, काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांना काय आश्वासन दिलं हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. भाजपवाले ते कुजकटपणे विचारताहेत, कारण राज यांच्या भाषणामुळे आपलं नुकसान होऊ शकतं याची भीती त्यांना वाटतेय. काही मोदीभक्त राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांत गरळ ओकत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अशा एका भक्ताला सणसणीत प्रसाद दिला आणि त्याला उठाबशा काढून माफी मागायला लावली. कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरीचं समर्थन मी करणार नाही. पण चेकाळलेल्या भक्तांना त्यांच्याच भाषेत असा धडा मिळाला तर मला वाईटही वाटणार नाही.
राज ठाकरे यांची ही शैली सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. ज्यांना त्याचा निषेध करायचाय त्यांनी तो जरूर करावा. पण सेना-भाजपनं कायम विरोधकांच्या अहिंसेचा आणि लोकशाहीचा गैरफायदा घेतला आहे हे विसरता येणार नाही. ‘महानगर’च्या काळात आमच्यावर एवढे हल्ले झाले, पण आम्ही हात उचलला नाही. २००९साली ‘आयबीएन लोकमत’वर शिवसैनिकांनी हल्ला केला तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ त्यातल्या काही जणांना चोपून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर ही सगळी मंडळी दयेसाठी माझ्यापुढे गयावया करू लागली. या प्रसंगातून माझ्यासारख्या अहिंसावाद्यालाही मोठा धडा मिळाला आहे. यापुढे सेना-भाजपवाले राज ठाकरेंबाबत तरी असा प्रकार करायला धजावणार नाहीत.
राज ठाकरे यांच्या भाषणाचा परिणाम नेमका काय होतो हे निकालाच्या दिवशी, म्हणजे २३ मे रोजी कळेल. मात्र, गुढी पाडव्याच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीला १०-१२ जागा तरी मिळतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात होती. आता मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी १६ ते १८ जागांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे.
मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर आलेल्या बातम्या विचारात घेतल्या तर पुढच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी सुधारू शकते. याचं श्रेय जनतेच्या मनात मोदी सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला तर आहेच, पण राज ठाकरेंच्या भाषणांनाही आहे.
खरं राजकारण रंगणार आहे, ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी. शरद पवारांनी राज ठाकरेंना काही ठोस आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. पवार राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या काही जागा मनसेला देऊ शकतात. अशा २५ ते ३० जागा मनसेला मिळाल्या तर त्यांचे आमदार विधानसभेत पुन्हा एकदा पोचू शकतात. मग पुढच्या राजकारणात राज ठाकरेंचा पत्ता निश्चितपणे महत्त्वाचा ठरेल. राज ठाकरे आणि मनसेच्या दृष्टीने ही नवीकोरी सुरुवात असेल.
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 18 April 2019
Dhananjay Bhosale
Thu , 18 April 2019
2019 ची निवडणूक रंजक बनविण्यात खरोखरच राज ठाकरेंचं मोठं योगदान आहेच पण दर्दी श्रोते तुमच्या बेधडक चर्चा पाहण्यापासून वंचित आहेत....