२२०वाला अंदाज आम्हाला विश्वासार्ह वाटतो आहे... अंदाजपंजे असला तरी…
संकीर्ण - व्यंगनामा
प्रज्वला तट्टे
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  • Thu , 18 April 2019
  • संकीर्ण व्यंगनामा नितीन गडकरी Nitin Gadkari भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

त्याचं झालं असं की, नागपुरातल्या निवडणुका झाल्यावर आमच्यासारख्या कुण्या रिकामटेकड्यानं बसल्याजागी एका कागदाच्या चिटोऱ्यावर मतदारसंघातल्या कोणत्या जातीनं कोण्या पक्षाला किती मतदान केलं याचे अंदाज खरडले. त्यात ‘आमचे-आपले’ गडकरीसाहेब पन्नास हजारांनी हरणार असा हिशोब मांडला. त्या चिटोऱ्याचा फोटो काढला. व्हॉट्सअॅपवर टाकला. हा हा म्हणता ते चिटोरं व्हायरल झालं. होता होता ते भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे गेलं. त्यानं दुसऱ्याला दाखवलं. तर ‘तू मला दाखवलंसच कशाला? देशद्रोही कुठला!’, म्हणून दुसऱ्यानं पहिल्याला विचारलं. त्यांची आपसांतच बाचाबाची सुरू झाली. गोष्ट मुद्द्यावरून गुद्द्यावर आली अन त्याची बातमीसुद्धा झाली! अंदाज व्यक्त केला कुणी आणि मार खातंय कोण?

आमचंसुद्धा घरीदारी, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर असंच ट्रोलिंग होतं. तेही ‘आमच्या आपल्या’ लोकांकडून. कारण काहींना वाटतं की, मोदी कधी हरूच शकत नाहीत आणि गडकरी तर कधी म्हणजे कधीच हरू शकत नाहीत! ते व्हायरल चिटोरं दाखवल्यावर, समजा गडकरी हरले किंवा चला, तुम्ही म्हणता तर मोदी पण हरले आणि दुसरं कुणी सत्तेत आल तर आपल्याला काय फरक पडतो, हा बचावसुद्धा तयारच असतो.

मोदी पंतप्रधान झाल्यानं आपल्याला कसा गल्लीपासून न्यूयॉर्कपर्यंत फरक पडतो, ते हेच आम्हाला ठासून सांगतात आणि म्हणून आम्हाला त्या पहिल्या भाजप कार्यकर्त्यांचं दुःख समजू शकलं. निंदकाच्या शेजारी कशाला घरात आम्ही राहत असल्यामुळे ट्रोलिंगची पहिली सवय आम्हाला घरातून झालेली असते. पण म्हणून आम्हाला त्याचं दुःख होत नाही असं नाही! फरक एवढाच की, आमचं ट्रोलिंग होतं ते आम्ही स्वतः व्यक्त केलेल्या अंदाजांसाठी... म्हणजे ज्यावर आमचा स्वतःचा कॉपीराईट असतो अशा अंदाजांसाठी... जे आम्ही आमच्या घराच्या मध्यवर्ती असलेल्या जेवणाचा नावानं असलेल्या पण जेवणासाठी एकही प्लेट ठेवता येणार नाही, अशा टेबलला खुर्ची लावून बसून व्यक्त करतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?search=pravin+bardapurkar&doSearch=1

.............................................................................................................................................

इथंच बसून सहा महिन्यांपूर्वी रात्री कुटुंब जेवत असताना आम्ही बोललो की, ‘२०१९ची निवडणूक हरले तर मोदी ‘हमारे-अपने’ मेहुल भाईंसोबत अँटागुआच्या बेटावर पारंगदा होतील.’ त्या वेळी आमचे दोन कार्टी आणि निंदक सोफ्यावर हातात प्लेट घेऊन टीव्हीत निरव मोदी-चोक्सी संबंधित बातम्यांकडे डोळे लावून बसली होती आणि आमच्या ‘आणखी काय हवं, पोळी हवी का? भात हवा का?’ या प्रश्नांना दाद देत नव्हती. मात्र ‘जे जगभर फिरतात ते पायउतार झाल्यावर स्वतःसाठी सुरक्षित देशाच्या शोधात!’ असा आमचा थिसिस सिद्ध करणारा तर्क आम्ही दिल्याबरोबर आमची कार्टी फिद्दकन् हसली. त्या वेळी तिला मरणाचा ठसका बसला होता, तेव्हा खरं तर आम्हाला मनातून आनंदच झाला होता. पण तेव्हापासून आमच्या निंदकानं ते शब्द जे पकडून ठेवले आणि मित्रपरिवारात, नात्यागोत्यांत त्यावरून आमची यथेच्छ टवाळी सुरू झाली! निवडणूक आल्यावर तर त्याला चेवच आलाय. म्हणून भाजप कार्यकर्त्याच्या दुःखाची आम्ही अनुभूती घेऊ शकलो!

तर आमच्या अंदाजांची चिरफाड करणाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की, आम्ही बसल्याजागी, रिकामटेकडे, कुणाला गरज नसताना आपले अंदाज काढतो. शास्त्रशुद्ध पद्धतीनं ओपिनियन पोल्स काढणाऱ्या कंपन्या कोट्यवधी रुपये घेऊन ‘हवे तसे’ अंदाज सांगत असताना आमच्या फुकटच्या अंदाजाची कुणाला गरज काय? त्यापेक्षा घरातली चार कामं जास्त करून घर टापटीप ठेवावं, मुलांचा अभ्यास घ्यावा! पण आमचं म्हणणं हे की, या पोलवाल्यांना जनतेच्या सद्सद्विवेकबुद्धीची माहिती नसल्यामुळे देशात मोदी-संघ-भाजपविरोधी हवा असल्याचं ते सांगत नाहीत. आम्ही फुकट अंदाज सांगतो म्हणून ते खरं तर अमूल्य आहेत. हल्ली आमचं कार्टं आम्हाला पेपर सोडवून आल्यावर ‘आई, तू पेपरमध्ये येऊ शकतात म्हणून माझ्याकडून घोकून घेतलेले प्रश्न आलेच नाहीत, वेगळेच आले’, म्हणून आवर्जून सांगतं. त्यामुळे मुलांचा अभ्यास घेण्यातला आमचा रस कमी झाला आहे.

आणि आमच्या अकोल्याच्या मैत्रिणीच्या संघाच्या स्वयंसेवक वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आम्हाला सांगितलं होतं की, ‘अकोला जिल्ह्यात भारिपचा प्रयोग आम्हीच घडवून आणला, हा प्रयोग यशस्वी झाल्यापासून बघा आमची सीट निघून येते की नाही?’, यात तथ्य असल्याचं आम्हाला अचानक वाटू लागलं. त्या माहितीवर आधारित आणखी महाराष्ट्रभर वंचितनं उभ्या केलेल्या उमेदवारांच्या जातींचा आम्ही अभ्यास केला. तो तसा सोपाच होता, कारण उमेदवारांची जात पक्षानंच जाहीर केली होती. तर हे वंचितचे उमेदवार काँग्रेसची मतं कापण्यासाठीच उभे केले आहेत हा साक्षात्कार आम्हाला यावेळी लवकरच झाला.

दुसरं म्हणजे कर्नाटकातही प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची वाटाघाटीची क्षमता (bargaining power) दाखवून देण्यासाठी खूप वणवण भटकंती केली होती, पण कुठे पन्नास कुठे शंभर अशी मतं मिळवून ती सिद्ध केली होती. त्यामुळे भाजप आणि भाजपला मदत करणारे सर्व या निवडणुकीत आपटणार अशा आमच्या अंदाजाबद्दल निंदकाशी आम्ही पैज लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मुलांच्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांसारखाच हाही आमचा अंदाज चुकेल अशी खात्री असूनही ते आमच्याशी पैज लावायला तयार नाहीत. तर असो.

तसं बसल्या जागी अंदाज लावणं सोपं नसतं. ज्या जागी आम्ही अंदाज लावत बसतो, तिथून घरातल्या रांधणीपासून, बैठक, झोपण्याच्या खोल्यांकडे जाणारी बोळ, अंगण वगैरे सगळं आम्हाला दिसत असतं. एकीकडे कुकर गॅसवर चढवलेला असतो. तिकडे आमचं कार्टं स्मार्ट टीव्हीवर ‘अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हा सिनेमा एकशे सत्तावीसव्यांदा बघत बसलेलं असतं. कार्टी कॉम्प्युटरवर स्वतःचेच फोटो पुन्हा पुन्हा बघत बसलेली असते. घरात अशी शांतता आहे म्हटल्यावर आम्ही पण आमचा नुकताच क्लिक झालेला एक अंदाज टॅबवर टायपून काढायचा विचार करतो.

नुकताच मोदींना रशियाच्या पुतीन यांनी पुरस्कार दिल्याची बातमी ऐकून आम्हाला त्याच्या पुढचा एक भयंकर अंदाज आलेला असतो. पुतीन केवढा भयंकर माणूस आहे, हे ‘लोकसत्ता’तले गिरीश कुबेर यांचे लेख वाचून आम्हाला कळलेलं असतं. तर हा पुतीन मोदींना उगीच कशाला पुरस्कार देईल?

अमेरिकेत ट्रम्पला निवडून आणलं, तसंच पुतीन भारतातल्या निवडणुकांमध्येही ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत, हा आमचा प्राथमिक अंदाज लिहून काढण्याच्या तयारीत असतानाच आम्हाला आमच्या कारट्यांचा एक पाळीव ससा रांधणीत जाऊन शू करत असल्याचं दिसलं. एक दीर्घ श्वास घेऊन आम्ही शांत बसलो. मनात आलं ते लिहून काढल्याशिवाय दुसऱ्या विषयाकडे वळू नये असा पण करून आम्ही टाईप करायला सुरुवात करताच दुसरा पाळीव ससा टेबलाखाली लेंड्या टाकताना आम्हाला दिसतो. आता मुलांना ‘आपापले ससे पिंजऱ्यात बंद करा’ म्हणून सांगायला गेलो, आणि त्यांनी जर का ऐकलं नाही आणि मग जर का आमचा इगो दुखावला आणि आम्ही जोरात ओरडलो तर ‘ओरडलीसच का?’, म्हणून मुलांनी असहकार पुकारला आणि ‘अस्सं कस्सं ऐकत नाहात?’ म्हणून आमचे हात त्यांच्या कानाखाली आवाज काढायला शिवशिवले आणि त्यावरून पुढचा कलगीतुरा होऊन पुन्हा सगळा लिहिण्याचा मूड निघून गेला तर काय करता? जगभराचे अंदाज आम्ही काढू पण लिहिण्याचा मूड केव्हा असेल आणि केव्हा नसेल याचा आमचा आम्हालाच अंदाज येत नाही. तर सशांच्या हगण्यामुतण्याकडे दुर्लक्ष करत आम्ही नेटानं टाईपायला बसतो.

पण तेवढ्यात, ‘माझे सॉक्स, सॉक्स कुठे आहेत?’ असा आवाज शिट्टीच्या पार्श्वसंगीतासोबतच आमच्या कानठळ्या बसवतो. तो आवाज निंदकाचा उर्फ आमच्या कार्ट्यांच्या बाबाचा असतो. तो आतापर्यंत घरातच होता, पण अंघोळीला गेलेला होता हे मात्र आम्ही साफ विसरलेलो असतो. गॅस बंद करून, सॉक्स काढून देतानाच सॉक्स या शब्दावरून आठवलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या आमच्या सटोडिया मित्रांनी अलीकडेच सांगितलेला अंदाज पटकन विसरून जाण्याच्या आत टायपायचे ठरवतो.

या निवडणुकीत काँग्रेसला २००-२२० जागा मिळतील असा अंदाज सटोडीयांनी सांगितल्याचे टाईप करतानाच आमच्या कारट्यांच्यात आता कुणी कॉम्प्युटर आणि कुणी स्मार्ट टीव्ही बघायचं यावरून जुंपल्याचं आमच्या लक्षात येतं. त्याकडे दुर्लक्ष करत, याच सटोडीयांनी यापूर्वी सर्व उद्योग कसे आणि कोणकोण महाराष्ट्राबाहेर खेचून नेतात आणि गडकरी-फडणवीसांचे त्यांच्यासमोर कसं काही चालत नाही याची माहिती एका वाक्यात आम्ही टायपून घेतो. पण ‘आमच्या-आपल्या’ वंशजांमध्ये यादवी सुरू झाल्यामुळे हातचं टाइपिंगचं काम अर्धवट सोडून आम्हाला त्यांचं भांडण सोडवायला जायचं आहे... म्हणून तूर्तास थांबतो....

पण त्यापूर्वी जाता जाता एक गोष्ट सांगून टाकतो. ती मुंबईच्या गोडाऊनमधल्या नव्या नोटांची कोण्याच चॅनलनं दाखवली नाही म्हणून आम्ही आवर्जून युट्युबवर जाऊन पाहिलेली ‘भिंत’ कपिल सिब्बल यांनी दाखवण्यापूर्वीच आमच्याकडे सटोडीयांनी एक माहिती दिली होती. ती म्हणजे नोटबंदीच्या दरम्यान तीन लाख कोटी रुपये अधिकचे आणि बेहिशोबी छापून घेतले गेले आहेत. त्यावरूनच २२०वाला अंदाज आम्हाला विश्वासार्ह वाटतो आहे...

अरे थांबा..

मारामारी करू नका!

.............................................................................................................................................

लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......