अजूनकाही
मी संतोष घनश्याम परिवारे अर्थात सं.घ. परिवारे असे जाहीर करू इच्छितो की, आमचे ‘नथुराम-मोहन टीव्ही चॅनेल’ अर्थात ‘नमो टीव्ही’ हिच्याविषयी नाना शंका-कुशंका प्रसृत केल्या जात असून तिच्याविषयी नाहक अपप्रचार केला जात आहे. मी सदर वाहिनीचा संस्थापक, व्यवस्थापक, प्रचारक म्हणून सांगू इच्छितो की, देशाची सेवा करणाऱ्या वहिनीला असो की वाहिनीला असो, अशा प्रकारच्या छळाची सवय करवून घ्यावीच लागते. किती नि:शंक, निरभ्र, नि:स्वार्थ व निष्कपट हेतूंनी मी ‘नमो टीव्ही’ वाहिनी सुरू केली.
तिने सतत देशाचा विचार करत राहावा म्हणून जाहिराती घ्यायच्या नाहीत असे मी ठरवले! एवढेच काय तिने बातम्या, बातम्यांच्या वेळा, बातमीदार, न्यूज अँकर, संपादक, न्यूज एडिटर, कॅमेरापर्सन आदी ‘देशद्रोही’ लोकांवर विसंबून राहू नये अशी व्यवस्थासुद्धा मी केली. काय सांगता येते हो, कोणाच्या मनात काय येईल ते! एकवेळ ‘मन की बात’ आम्ही करू, परंतु हे पत्रकार लोक फार मनकवडे! त्यांना मनातल्या गोष्टी कशा काय समजतात कोण जाणे! म्हणून आमची वाहिनी मनुष्यविरहित आहे. तसे पाहिले तर एक शाखाच ती, पण ती सामान्य मानवी नसेल असा क्रांतिकारक प्रयोग मी सुरू केला.
जमिनीशी निगडीत कोणतेच व्यवहार मी या वाहिनीत आणले नाहीत, हेही फार धक्कादायक व थक्क करणारे तुम्हाला वाटेल. मी आहेच तसा कल्पक आणि अफलातून काही करणारा! म्हणजे इमारत, पत्ता, कार्यालय, माठ, टेबल-खुर्च्या अशा भौतिक गोष्टींची गरजच पडणार नाही, असे मी ठरवून टाकले. नाही तरी आमच्या शाखांना कोठे टेबल-खुर्च्या, पत्ता अन इमारत लागते? या वाहिनीच्या उभारणीवेळी मी सायबर स्पेसमध्ये जागा पक्की घेतली आणि सुरू केले प्रक्षेपण!
तसा माझा नावनोंदणी, करभरणा, सदस्यांची पावती, ध्येयधोरणे अशा तद्दन फालतू गोष्टींवरही विश्वास नसल्याने मी या वाहिनीचे प्रक्षेपण तसेच केले. शत्रूला नमस्कार करण्याच्या निमित्ताने हातात लपवलेल्या पिस्तुलीने गोळ्या घालाव्यात या मताचा मी आहे. गाफील ठेवून हल्ला करावा म्हणजे जय आपलाच असे माझे ठाम मत आहे.
म्हणून ही वाहिनी मी सर्वांना गाफील ठेवून सुरू केली आहे. त्यातून गोळ्या, इजा करणाऱ्या वस्तू मी झाडणार नाही. मी झाडणार भाषणे, मुलाखती! मी म्हणजे मी व्यक्तिश: नाही, बरे का! या देशात चांगली भाषणे करणारी जी माणसे आहेत, त्यांनाच फक्त मी नमो टीव्हीत दाखवणार आहे.
फार शोध घ्यावा लागला यासाठी! एक ‘भाषणबाज जनता पार्टी’ देशात आहे. तीत सगळे लोक अत्यंत बोलके, बोलघेवडे किंबहुना वाचाळ आहेत. त्यातून निवडून काढून मी त्यांना बोलते केले. म्हणजे त्यांचे आधीचे जे बोल होते, तेच मी या वाहिनीमधून ऐकवले.
भाषण ऐकताना कसा समृद्ध अनुभव यायला हवा. तो मी संपूर्ण देतो. भाषण देणारे खूप दाखवले की, लक्ष विचलित होते, तुलना होऊ लागते, मुद्दे डळमळतात, म्हणून मी सध्या दोन-तीन लोकांनीच बोलत राहावे असे निश्चित केले आहे. शिवाय ही बोलणारी तोंडे सत्तेतील असतील तर आणखी मजा येईल असेही मी ठरवले. कारण सत्ता नेहमी ‘सत्याच्या बाजूने’ उभी असते आणि सत्य सदा सत्तेच्या शेजारी उभे राहून चवऱ्या ढाळत असते, असे मी लहानपणापासून ऐकत आलो असल्याने तो प्रयोग मी राबवला आहे. ट्राय, प्रसारभारती, माहिती व प्रसारण खाते यांना मात्र मी खड्यासारखे बाजूला ठेवले. सत्ता आपल्यापाशी असताना या छोट्या लोकांना कोण विचारेल?
बाकी माझ्या ‘नमो’ अर्थात ‘नथुराम-मोहन टीव्ही’च्या नावाचे तुम्हाला रहस्य सांगतो. ‘नथुराम’ तर तुम्हाला ऐकून ठाऊकच असेल. तो थोर राष्ट्रभक्त, संपादक होता. ‘मोहन’ म्हणजे आपले मोहनदास करमचंद गांधी. तेही थोर राष्ट्रभक्त व संपादक होते. एक संपादक दुसऱ्या संपादकाला नेहमी पाण्यात पाहतो. परस्परांचा ते मत्सर करतात. त्यामुळे दोघे अपप्रचार व असत्यकथन करत राहतात. दोघांना एकत्र आणल्यास सामंजस्य, संयम आणि सहिष्णुता यांचा पवित्र अनुभव साऱ्यांना येत राहील एवढीच माझी प्रामाणिक इच्छा. बाकी सब झूट आहे…
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment