डॉ. विन्टसर्फ - कर्तृत्वाने उजळून आलेले व्यक्तिमत्त्व!
पडघम - विज्ञाननामा
भूषण निगळे
  • डॉ. विन्टसर्फ
  • Wed , 17 April 2019
  • पडघम विज्ञाननामा डॉ. विन्टसर्फ Vint Cerf

विद्यार्थिदशेत आपले मन अजून संस्कारक्षम असल्यामुळे काही व्यक्ती केवळ त्यांच्या कार्यामुळे आदर्शवत् वाटतात. या व्यक्ती नेहमी प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात असतातच असे नाही; मात्र त्यांचे कार्यच असे असते की, या व्यक्तींबद्दल आपल्याला नकळत एक गूढ आकर्षण आणि आपुलकी वाटू लागते. निव्वळ त्यांच्या कर्तृत्वामुळे आदर्श बनलेल्या माझ्या काही मोजक्या आदर्शांपैकी एका व्यक्तीला भेटण्याची संधी नुकतीच मिळाली आणि विलक्षण आनंद झाला. ती व्यक्ती म्हणजे ख्यातनाम संगणक शास्त्रज्ञ डॉ. विन्टसर्फ.

‘आता हे डॉ. सर्फ कोण?’ असा प्रश्न पडणे साहजिक आहे. सर्वसाधारण वाचकांना रोजच्या आयुष्यात डॉ. सर्फ यांचे नाव माहिती असण्याचे काहीच कारण नाही. उदाहरणार्थ- कार्ल लँडस्टाईनर, हॉर्वर्ड फ्लोरे आणि विलियम फोगे यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असण्याची शक्यता आहे. मात्र कार्ल लँडस्टाईनर यांनी रक्तगटांचा शोध लावून जवळजवळ एक अब्ज लोकांचे प्राण वाचवले, हॉर्वर्ड फ्लोरे यांनी पेनिसिलिनचे संशोधन करून आठ कोटी रुग्णांचे प्राण वाचवले, तर विलियम फोगे यांनी देवीसारख्या महाभयानक रोगाच्या निर्मूलनासाठी आपले आयुष्य झिजवले आणि १३ कोटींहून अधिक संभाव्य रोग्यांना वाचवले- हे कळताच आपल्याला आश्चर्य वाटते, कारण प्रसिद्धीच्या फंदात न पडता हे संशोधक आपले काम करत असतात.

डॉ. सर्फ यांची महती अशीच आहे. आधी उल्लेखित संशोधकांसारखे लोकांचे प्राण जरी प्रत्यक्षपणे त्यांनी वाचवले नसले, तरी अब्जावधी लोकांच्या जीवनातला अविभाज्य हिस्सा बनलेल्या इंटरनेटचे ते (दोघांपैकी) एक जनक आहेत.

आधुनिक दैनंदिन व्यवहारांत- मग ते शैक्षणिक क्षेत्र असो वा आर्थिक कारभार असोत अथवा राजकीय घडामोडी- इंटरनेटचा वापर होत नाही, असा भाग विरळा. आधी संरक्षणक्षेत्रासाठी विकसित केल्या गेलेल्या इंटरनेटची व्याप्ती आता सर्वदूर आहे. चकचकीत कार्यालयातील अधिकारी व्यक्ती असो अथवा समाजमाध्यमांतून दूरवर पसरलेल्या आपल्या नातेवाइकांशी शिळोप्याच्या गप्पा मारणारी गृहिणी, गगनचुंबी इमारतीत राहणारे अत्याधुनिक जीवनशैलीत राहणारे कुटुंब असो अथवा एखाद्या महानगरातल्या झोपडपट्टीत राहणारा गरीब परिवार; इंटरनेट हे आता या साऱ्यांचे करमणूक-ज्ञान-रोजगार मिळवण्याचे साधन झाले आहे.

संगणक, मोबाईल, माहितीपुरवठा करणारे सर्व्हर्स (शक्तिशाली संगणक) या साऱ्यांना एकमेकांना जोडत एका महाकाय जाळ्यात आणण्यासाठी जे पायाभूत तंत्रज्ञान लागते, त्याचे संशोधन (आणि मग अंमलबजावणी) ज्या संगणक शास्त्रज्ञांच्या जोडगोळीने केली, त्यातले डॉ. सर्फ यांना जर्मनीतल्या हायडलबर्ग या शहरात भाषणासाठी नुकतेच आमंत्रित केले होते. डॉ. सर्फ यांना जवळून पाहत त्यांचे विचार ऐकण्याची दुर्मीळ संधी सोडायची नाही, असे ठरवून मी त्यांचे भाषण होणार होते त्या सभागृहात पोहोचलो.

डॉ. सर्फ यांनी कुठली जटिल तांत्रिक समस्या सोडवली, हे समजून घेण्यासाठी १९६०च्या दशकातील संगणक तंत्रज्ञानाकडे एक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक आहे. संगणकांचा प्रसार घरोघरी जरी एव्हाना झाला नव्हता तरी सरकारी, शैक्षणिक, बँकिंग आणि संरक्षणक्षेत्रात संगणक तंत्रज्ञान फायद्याचे ठरत होते (विशेषतः अमेरिकेत). संगणकांना एकेकटे, सुटे न वापरता त्यांना एका जाळ्यात (नेटवर्क या अर्थाने) संरचित केल्यास त्यांची उपयुक्तता वाढते, हेसुद्धा लक्षात येऊ लागले होते. मात्र प्रत्येक प्रमुख संगणक कंपनीचे स्वतःचे जाळे होते. या जाळ्यांतले संगणक प्रतिस्पर्धी जाळ्यांतल्या संगणकांशी सहजासहजी संपर्क साधू शकत नव्हते. उदाहरणार्थ- आयबीएमच्या जाळ्यातल्या संगणकावर चालणारा प्रोग्राम डीईसी कंपनीच्या जाळ्यातल्या संगणकाशी बोलू शकत नव्हता. शिवाय, ही जाळी भरवशाची नव्हती. संदेश गहाळ होणे, संदेशांची क्रमवारी बदलणे (जसे की- बहुपानी संदेश पाठवायचा असल्यास पान क्रमांक तीनचा संदेश पान क्रमांक दोनच्या आधी पोचणे), संदेश चुकीच्या संगणकावर पोहोचणे या चुका हमखास होत असत.

या समस्येवर एक उपाय म्हणजे, सर्व उपभोक्त्यांनी एकाच कंपनीचे जाळे वापरणे. परंतु एकाच कंपनीचे तंत्रज्ञान वापरल्यास त्या कंपनीच्या हातात बरीच सत्ता एकवटण्याचा धोका होता, म्हणून हा पर्याय सर्वमान्य नव्हता. वेगवेगळी संगणक जाळी सुलभपणे जोडण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मग अमेरिकन लष्कर पुढे सरसावले आणि डार्पा (DARPA) या आपल्या संशोधन-यंत्रणेला यावर आपले लक्ष केंद्रित करण्यात सांगण्यात आले.

विद्यार्थिदशेत असताना डॉ. सर्फ यांनी डार्पा संस्थेच्या ‘डार्पानेट’ या जाळ्यातील चार संगणकांना एकत्र जोडण्याचे काम केले होते. पण हे संगणक एकाच पायाभूत तंत्रज्ञानावर आधारित होते. वेगवेगळ्या तंत्रज्ञानांवर चालणारी जाळी कशी जोडायची, हा प्रश्न त्यांनाही बऱ्याच काळापासून भेडसावत होता. शेवटी रॉबर्ट कान या प्राध्यापक-संशोधकाने ‘ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण दोघेही एकत्र काम करू’, असे त्यांना सुचवले आणि १९७२ पासून कान-सर्फ जोडगोळी स्टॅनफर्ड विद्यापीठात या प्रश्नाला भिडू लागली.

वेगवेगळी जाळी जर एकमेकांना सुलभपणे जोडायची असली तर हे जोडणी तंत्रज्ञान किचकट असता कामा नये, असे कान-सर्फ यांना वाटत होते. तसेच जाळ्यांचे तांत्रिक वेगळेपण हे नुकसान नसून सामर्थ्य आहे आणि म्हणूनच हे वैविध्य टिकवायला पाहिजे, असेही त्यांना वाटत होते. मानवी समाजातले भिन्न गट जर सामोपचाराने एकत्र वावरत असतील, तर त्यामागे काही विशिष्ट समाजमान्य शिष्टाचार असतात. असेच शिष्टाचार जाळ्यांतील संगणकांना वापरून त्यांची जोडणी केली तर पाहावे, असा विचार त्यांनी केला. तीन नियमांत त्यांनी हे शिष्टाचार सूत्रबद्ध केले : एका जाळ्यातील कुठलाही संगणक दुसऱ्या जाळ्यातील संगणकाशी थेट संपर्क साधू शकेल, दोन जाळी एकमेकांशी बोलताना मध्ये कुठलाही मध्यस्थ नसेल आणि जाळ्यांतील संगणकांना किंवा जाळ्यांना आपल्या अंतर्गत रचनेत कुठलाही बदल करावा लागणार नाही. या शिष्टाचार नियमावलीला त्यांनी (संगणक- शास्त्रातल्या आद्याक्षरे वापरण्याच्या परंपरेला जागत) टीसीपी/आयपी (TCP/IP) असे नाव दिले.

टीसीपी/आयपी पद्धतीनुसार दळणवळण व्यवस्थेचे चार थर असून प्रत्येक थराने काय करावे आणि करू नये याचे नियम पाळायचे असतात. संगणकाने संदेश निर्माण केल्यावर त्या संदेशाचे अनेक वेगवेगळ्या छोट्या तुकड्यांत विभाजन करणे (एकच महाकाय संदेश पाठवण्याऐवजी छोटे तुकडे पाठवणे सोपे जाते म्हणून), या तुकड्यांवर गंतव्य संगणकाचा पत्ता लिहिणे आणि सरतेशेवटी ही तुकड्यांची माळा प्रत्यक्ष दळणवळण यंत्रणेद्वारे (जसे की- उपग्रह लिंक) पाठवणे, इत्यादी कामे हे थर करतात. संदेश मिळवणाऱ्या संगणकावर हेच थर उलट क्रमाने काम करतात. उदाहरणार्थ- एका संदेशाचे दोन हजार तुकडे असल्याचे कळताच या तुकड्यांची क्रमवार संगती लावल्यावरच एकत्रित संदेश तयार करून गंतव्य संगणकावर दाखवण्यात येतो.

(या पद्धतीचे कार्य समजायला ‘साधना’चा एक वाचक प्रस्तुत अंक पीडीएफ स्वरूपात अमेरिकेतील सिअ‍ॅटल येथे वाचत आहे अशी कल्पना करू. पूर्ण अंक जरी दहा एमबी एवढ्या आकाराचा असला, तरी प्रत्यक्ष दळणवळण यंत्रणेला एवढ्या प्रचंड आकाराचा डेटा एकाच वेळी हाताळणे शक्य नसते. मग या अंकाचे हजारो भाग पाडण्यात येतात- एका तुकड्याचा सरासरी आकार पूर्ण अंकाच्या एकदशसहस्त्रांश एवढाच असतो. हे हजारो तुकडे मग जगभराच्या उपलब्ध यंत्रणेतून पाठवण्यात येतात- काही तुकडे उपग्रह जोडणीतून पुणे-सिअ‍ॅटल असा प्रवास करतील, तर काही तुकडे समुद्राखालच्या केबल्समधून हे अंतर क्षणार्धात कापतील. या तुकड्यांतील एक जरी तुकडा हरवला तरी अंक पूर्णपणे तयार होणार नाही आणि हा तुकडा पुन्हा पाठवावा लागेल.

सरतेशेवटी या साऱ्या तुकड्यांची क्रमवार संगती लावून अंक तयार करून वाचकाला देण्यात येईल. सदर वाचक मग हा अंक त्याच्या मोबाईलवर वाचेल- काही क्षणांतच अचूकपणे हा अंक पुण्याहून सिअ‍ॅटलला कसा पोहोचला, हे त्याला कदाचित तितकेसे महत्त्वाचे वाटणार नाही!)

अशा रीतीने कान-सर्फ यांनी १९७४ मध्ये आपली शिष्टाचारप्रणाली डार्पाला सादर केली. वरिष्ठांकडून आणि इतर तज्ज्ञांकडून होकार मिळताच प्रणालीच्या अंमलबजावणीला डॉ. सर्फ सज्ज झाले. इथे डॉ. सर्फ यांचे मोठेपण सिद्ध होते. शिष्टाचारप्रणालीचा केवळ विकासच करून डॉ. सर्फ थांबले नाहीत, तर तिची कार्यवाही यशस्वी होईल याची जबाबदारी त्यांनी घेतली. स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि लंडन विद्यापीठ या दोन वेगवेगळ्या जाळ्यांनी टीसीपी/आयपीचा वापर करून १९७५ मध्ये संदेशांची देवाण-घेवाण केली, तर १९७७ मध्ये तीन वेगवेगळी जाळी त्यांना एकमेकांना जोडता आली. डॉ. सर्फ आपल्या सहकाऱ्यांबरोबर तब्बल सात वर्षे अथकपणे शिष्टाचारप्रणालीवर काम करत होते. या काळात त्यांना अनेक संकटांचा, बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला; पण डॉ. सर्फ न डगमगता काम करत होते.

संगणक जाळी जोडण्याच्या कामाने १९८२ मध्ये वेग धरला आणि १९८९ पर्यंत जगभरातले संगणक एकमेकांना जोडण्यात येऊ लागले. टीसीपी/आयपीची सुलभता आणि वेग पाहून खासगी कंपन्यांनीही मग फारसा विरोध न करता तिचा स्वीकार केला. टीमबर्नर्स ली यांनी १९९२ मध्ये वेब तंत्रज्ञानाचा शोध लावल्यावर तर प्रगत देशांतल्या जनसामान्यांनाही इंटरनेटचा वापर करणे सोपे होऊ लागले. काही वर्षांतच याहू-गुगल-फेसबुकचा उदर झाल्यावर मग तर इंटरनेट घरोघरी पोहोचले आणि मोबाईल क्रांतीनंतर तर प्रत्येकाच्या खिशात! हा सारा डोलारा मात्र कान-सर्फ यांनी उभारलेल्या विस्तृत, कणखर पायावर उभा आहे.

हा सारा इतिहास माझ्या डोळ्यांवर तरळून गेला आणि मी डॉ. सर्फ यांचे भाषण तल्लीनपणे ऐकू लागलो. त्यांच्या भाषणात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. साऱ्या जगाचाच इतिहास बदलणाऱ्या आपल्या कामगिरीबद्दल गर्वही जाणवत नव्हता. आपल्या अनेक सहकाऱ्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख तर केलाच, पण आपल्या हातून झालेल्या चुकांबद्दलही डॉ. सर्फ वारंवार बोलले. उदा.- जाळ्यात सक्रिय असेपर्यंत प्रत्येक संगणकाला एक विशिष्ट पत्ता दिला जातो. 192.67.3.205 असा माझ्या संगणकाचा आता पत्ता आहे, या पत्त्यावरून जगातला कुठलाही संगणक माझ्या संगणकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतो.

डॉ. सर्फ यांच्या योजनेनुसार ४३० कोटी संगणक/वस्तू इंटरनेटवर सहभागी होऊ शकतात. १९८२ मध्ये ही संख्या अतिप्रचंड होती- संगणक क्रांती किमान एक दशक दूर होती आणि मोबाईल क्रांती तर जवळजळ तीन दशके. त्यामुळे इतके पत्ते सहज पुरतील असे वाटले होते. मात्र माहितीचा स्फोट होऊन फार मोठ्या प्रमाणात लोक इंटरनेटशी जोडले जाऊ लागले आणि १९९० च्या दशकात आयपी 6 या पुढील आवृत्तीवर काम सुरू झाले. या समितीत डॉ. सर्फ यांचा जरी सक्रिय सहभाग असला तरी १९७४ मध्येच आपण दूरदृष्टी दाखवायला हवी होती, असे त्यांनी वारंवार नमूद केले आहे. हे म्हणजे ‘मी फक्त १००च आंतरराष्ट्रीय शतके ठोकली’ असे म्हणत सचिन तेंडुलकरने दिलगिरी व्यक्त करण्यासारखे आहे. इंटरनेट सुरक्षेबद्दल आपण अजून मूलभूत विचार करावयाला होता, असेही त्यांना वाटते.

इंटरनेटच्या भवितव्याबद्दल डॉ. सर्फ बरेच आशावादी जरी असले तरी ‘सावध ऐका, पुढल्या हाका’ असेही त्यांना वाटते. या ‘भीतीमागे’ ‘आमच्या वेळी हे असे नव्हते’ असा जाणकार वयोवृद्धांचा जसा अनेकदा सूर लागतो, त्यातला भाग नव्हता, तर अनेक दशकांच्या सक्रिय चिंतनातून उमटलेले गंभीर चिंतन होते. शेवटी इंटरनेट हे मानवनिर्मित तंत्रज्ञान असल्यामुळे जाणते-अजाणतेपणे केलेल्या चुका फार महागात पडू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. माहितीचे प्रसारण-संवर्धन ज्या माध्यमांतून होते, त्या माध्यमांच्या आयुष्याबाबत जास्त विचार व्हायला पाहिजे, असे त्यांना वाटते. उदा.- १००० वर्षांपूर्वीची भूर्जपत्रे अजूनही आपण वाचू शकतो, मात्र अवघ्या दहा वर्षांपूर्वी चलनात असलेल्या सीडीसारख्या माध्यमांचा आता आपण वापर करू शकत नाही, कारण त्यांच्यावरची माहिती वाचणारी यंत्रेच आता सहसा मिळत नाहीत.

डॉ. सर्फ यांचे विचारप्रवर्तक, नर्मविनोदाची सतत पखरण असलेले भाषण संपल्यावर क्षणभर शांतता पसरली. मग आम्ही भानावर येऊन टाळ्या वाजवल्या आणि काही सेकंदांतच सारे सभागृह उभे राहिले- जर्मन सभांत असा मान वक्त्यांना फार क्वचित दिला जातो. हजारो लोकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने डॉ. सर्फ थोडेसे भारावल्यासारखे वाटले. अर्थात, असा सन्मान आणि प्रतिसाद डॉ. सर्फ यांना नवा नाही. संगणकशास्त्रातल्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांनी डॉ. सर्फ सन्मानित झाले आहेत. संगणक शास्त्रज्ञ ज्यांना सर्वांत जास्त मानतात, त्या अ‍ॅलन ट्युरिंग यांच्या नावाने दिलेला सर्वोच्च सन्मान २००२ मध्ये डॉ. सर्फ यांना मिळाला आहे.

डॉ. सर्फ यांच्याबरोबर छायाचित्र काढून घ्यायला बरेच लोक उत्सुक होते, त्या रांगेत मी शिरलो. रांग पुढे सरकत असताना मी भाषणावर विचार करू लागलो. शिष्टाचारप्रणाली बनवताना स्वायत्तता, वैविध्य आणि सुलभता ही मूल्ये कान-सर्फ यांनी शिरोधार्य मानून त्यांची चिकाटीने अंमलबजावणी केली. इंटरनेटमध्ये सहभागी होताना संगणकांना ना एकाच तंत्रज्ञानाचे बंधन असते, ना एका विशिष्ट कार्यप्रणालीचे. संगणकांना आपल्या हव्या त्या (संगणकीय) भाषा वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. संगणकांची क्षमता आणि सामर्थ्यसुद्धा वेगवेगळे असू शकते- म्हणूनच अमेरिकेतला अफाट ताकदीचा एखादा महासंगणक आणि भारतातील एका खेड्यातला साधा स्मार्टफोनसुद्धा एकाच वेळी भेदभावाशिवाय इंटरनेटला जोडले जाऊ शकतात. इंटरनेट तंत्रज्ञान तटस्थ, निरपेक्ष असते- त्या अर्थी उदारमतवाद इंटरनेटच्या अंतरंगात पुरेपूर भरला आहे.

मग मनात असा विचार आला की, कान-सर्फ हे स्वतः उदारमतवादी नसते तर? अथवा तत्कालीन अमेरिकेऐवजी एखाद्या एकाधिकारशाही देशात इंटरनेटचा शोध लागला असता का? मग कुठले शिष्टाचार त्या देशातल्या संशोधकांनी प्रमाणित केले असते? इंटरनेट मग मोकळे, स्वायत्त व स्वतंत्र असते का? इंटरनेटच्या बालपणीच्या काळात (म्हणजे अगदी हल्ली-हल्लीपर्यंत) विचारस्वातंत्र्य, परमताचा आदर भरपूर दिसून येत असे- ते चित्र दिसले असते का? इथे चीनचे उदाहरण हळहळ वाटण्यासारखे आहे. चीनने आपल्या इंटरनेटभोवती एक अभेद्य चक्रव्यूह रचला आहे, ज्यायोगे चिनी इंटरनेटचे अतिशय कडक नियंत्रण केले जाते. चीनच्या बाहेरचे संगणक चीनच्या आतल्या संगणकांशी सहजासहजी संपर्क साधू शकत नाहीत, आणि चिनी नागरिकांना चीनच्या बाहेरची संकेतस्थळे (गुगल, फेसबुक, बीबीसी, इत्यादी) वापरता येत नाहीत (खुद्द चिनी मजकूर निर्दयपणे सेन्सॉर केला जातो, हे सांगायला नकोच). सुदैवाने बहुतेक लोकशाही देशांत (अजून तरी!) अशी बंधने नाहीत आणि अशी बंधने भंग करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.

डॉ. सर्फ यांच्या अगदी जवळ मी आता पोचलो होतो. वयोमानानुसार त्यांना कमी ऐकू येत होते असे वाटत होते, पण हस्तांदोलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी ते दोन शब्द तरी बोलताना दिसत होते. डॉ. सर्फ यांना काय सांगावे याचा मी विचार करू लागलो. किशोरवयातले आपले आदर्श आपल्या मोठेपणी कधी कधी तकलादू वाटू लागतात. काळ बदलतो, आपले विचार उत्क्रांत होऊन नव्या व्यक्ती आदर्शमान वाटू लागतात. मात्र फार थोड्या व्यक्ती अशा असतात, ज्यांचे कर्तृत्व काळाने अधिकच उजळून निघते. डॉ. सर्फ यांनी ज्या शोधात महत्त्वाची भूमिका निभावली, त्यातून ज्ञानाची अथांग दालने सर्वसामान्यांसाठी उघडली, जनसमूह जोडले गेले, स्थळ- काळाची बंधने सैलावली, नव्या व्यापारस्त्रोतांचा उगम झाला, भौतिक बंधनांच्या जाचातून दळणवळण बरेचसे स्वतंत्र झाले; सारेच चांगले घडले असे नव्हे, पण खूपसे चांगले झाले. सर्वव्यापी, साऱ्या जगालाच गवसणी घालणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध लावणारे- पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मूलभूत मानवी मूल्यांधारित तत्त्वज्ञानावर त्या तंत्रज्ञानाची उभारणी करणारे डॉ. सर्फ मला आता जास्तच जवळचे, कालसमर्पक वाटू लागले.

‘धन्यवाद, डॉ. सर्फ!’ एवढेच शब्द मला सुचले...

.............................................................................................................................................

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ६ एप्रिल २०१९च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखक भूषण निगळे हे साहित्यात रुची असलेले संगणक अभियंता आहेत. ते जर्मनीतील Hemsbach इथं राहतात.

bhushan.nigale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 17 April 2019

छान लेख. आजून वाचायला आवडेल. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......