रिंगणनाट्य – दिशा आणि दृष्टीचा वस्तुपाठ
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. सुनीलकुमार लवटे
  • अतुल पेठे यांची एक मुद्रा आणि ‘रिंगणनाट्य’चं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • सुनीलकुमार लवटे Suneelkumar Lawate Atul Pethe अतुल पेठे रिंगणनाट्य

बंगाली नाट्यकर्मी ‘नाटक खेल बो’ (नाटक खेळू या) म्हणतात, तर मराठी नाट्यकर्मी ‘नाटक करू या’ म्हणतात. नाटक हा मुळात खेळ आहे. ते करण्याची कृत्रिमता नाटकात आली, ती त्याला अभिजात बनण्याच्या अट्टाहासातून. यामुळे नाटक रंगमंच, नेपथ्य, दिग्दर्शन, वेशभूषा, प्रकाश-योजना, संगीत आणि संहितेत करकचून बांधलं गेलं. बर्टोल्ट ब्रेख्त, ब्रनो एकार्डट, बॉब अर्न्सटथल, पीटर स्युमनसारख्या नाटककारांनी युरोपातील शेक्सपिअर, शॉ, इब्सेन, चेकॉव्ह प्रभूती नाटककारांच्या पारंपरिक, सांगीतिक नाट्यपरंपरेस छेद देत मुक्त नाटक करत प्रायोगिक नाटकांचा मार्ग प्रशस्त केला. नाटक पुन्हा खेळ बनला. या खेळास प्रबोधन, प्रचार, प्रसाराचं माध्यम बनवलं रंगकर्मी मेयेलोद मेयेल्होल्द यांनी. ही गोष्ट आहे १९१८ची. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात ‘ऑक्टोबर क्रांती’नं जगातील विविध क्षेत्रात मन्वंतर घडवून आणलं होतं. ऑक्टोबर क्रांतीच्या पहिल्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून मेयेलोदने मायोस्कोवस्की या नाटककाराचं ‘मिस्ट्री बुफे’ हे नाटक चक्क रस्त्यावर सादर केलं. त्या प्रयोगाला, उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. बहुधा ते जगातलं पहिलं पथनाट्य असावं. साधेपणा, समकालीनता, प्रेक्षकांना साद घालणारे नि त्यांचा प्रतिसाद मिळवणारे संवाद, साधे पोशाख, रोजच्या जीवनातील प्रसंग यामुळे ते नाटक लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी लिहिलेलं नाटकं ठरलं.

इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते म्हणतात. भारतात आणीबाणीच्या काळात अगदी असंच घडलं. वर्षं होतं १९७५. स्थळ मुंबईचं बोरीबंदर रेल्वेस्थानक. (आताचं छ.शिवाजी टर्मिनस उर्फ सीएसटी). जागर संस्थेनं आणीबाणीविरोधी पथनाट्य सादर करायला प्रारंभ केला नि पोलीस आले. नाटक ऐन रंगात आलेलं. प्रेक्षकांनी पोलिसांना उत्स्फूर्त रोखून धरलं आणि बजावलं की, ‘खबरदार, “रिंगण’ तोडून आत जाल तर रिंगणाच्या बाहेर जिवंत जाऊ कणार नाही.’ खेळ यशस्वी झाला हे वेगळं सांगायला नको. ‘रिंगण’ची ठिणगी या घटनेत पाहता येईल. ती ठिणगी परत पेटली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं. अतुल पेठे व अजीम उर्फ राजू इनामदार लिखित ‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक वाचताना ‘रिंगण’ या नाटक व गाण्यांनी आकाराला येणाऱ्या, कार्यकर्ते कलाकारांनी साकारलेल्या विचारगर्भ, कलात्मक, सृजनशील नाट्यप्रकाराची प्रकृती कळते. वैचारिक बांधीलकी असलेले रंगकर्मी म्हणून पेठे-इनामदारांना महाराष्ट्र ओळखतो.

‘रिंगणनाट्य’ हा तसा नवा नाट्यप्रकार. पथनाट्याचा हा रुंदावलेला परीघ म्हणूनही याकडे पाहता येईल. तरी ते पथनाट्यापेक्षा सर्वांगांनी भिन्न आहे. म्हणजे असं की, रिंगण मनोरंजनातून प्रबोधन करतं. यातले कलाकार चळवळीतले कार्यकर्ते असतात. त्यांच्यात समूहभाव असतो. ते विचारांना बांधील असतात. तसं हे पथनाट्यासारखं ‘झिरो बजेट’ नाटक. विचार हा त्याचा आत्मा. प्रेक्षकांवर काय बिंबवायचं ते निश्चित असतं. संवाद छोटे, प्रेक्षक प्रतिसादी व प्रबोधनकारी असतात. ध्वनियंत्रणा, प्रकाश-योजना, नेपथ्य, वेशभूषा असल्या पूर्वअटी नसतात. सादरीकरणात लवचीकता, रस्त्यावर नि सभागृहात दोन्ही ठिकाणी ते सादर करता येतं. प्रयोगानंतर प्रेक्षक-संवाद असतो. कलाकार कार्यकर्ते असल्याने उत्तरे देतात. भाषा बोला-चालीची, प्रसंग अनुभव असतो. परिणाम सहमती असते. नाटकात गाणं-बजावणं-बतावणी सारं असतं. त्यामुळे ते प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. मला आठवतं, दिल्लीच्या जागतिक पुस्तक मेळ्यात ‘सुकरात से दाभोलकर वाया तुकाराम’ हा ‘रिंगण’चा हिंदी प्रयोग असा रंगला की, प्रेक्षक मोठ्या संख्येनं तर जमलेच पण पुस्तक विक्रेतेही आपापले स्टॉल सोडून नाटक पाहत राहिले. ही असते ‘रिंगण’ची ताकद.

‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक तसं पाहिलं तर रिंगण नाट्यप्रकाराच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा वृतान्त आहे, पण या पुस्तकास ‘रिंगण संहिता’ असं रूप आलं आहे. हे पुस्तक मुखपृष्ठापासून वाचक व नाट्यप्रेमींची पकड घेतं. मुखपृष्ठ लक्षवेधी आहे आणि लक्ष्यकेंद्रही. आसपासची पानं कार्यशाळेचं नैसर्गिक सौंदर्य दाखवतात. नाटकाप्रमाणे या पुस्तकाचा प्रारंभही ‘रसिकजनांच्या रसिक मनाला वंदन आम्ही करितो’ या नांदीनं होतो. ‘रिंगण धरण्यापूर्वी’ या प्रस्तावनेत नाटक कार्यशाळेचा वृतान्त देण्यापूर्वी लेखकद्वय रिंगणनाट्यामागील पार्श्वभूमी विशद करतात. त्यातून रिंगणविश्व उभं राहतं. रिंगणनाट्य एका कार्यशाळेचा वृतान्त असला तरी नाटकप्रक्रिया समजावणारी संहिता म्हणूनही या पुस्तकाचं आगळं महत्त्व आहे. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करायचे. त्यांच्या निर्घृण हत्येच्या कृतिशील, सनदशीर, सर्जनशील निषेधाचं साधन म्हणून ‘रिंगण’चा जन्म झाला.

पेठे-इनामदार हे नाट्यकर्मी एक प्रकारे सफदर हाश्मी, बादल सरकार, हबीब तन्वीर या नाट्यकर्मींचे वंशज आहेत. त्यांनी घेतलेल्या पाच दिवसांच्या कार्यशाळेत प्रत्येक दिवशी रिंगणच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेचा विषय होता, संविधान. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही,  धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही मूल्यं मानून माणूस नावाचा समाज घडवणारं नाटक रचणं, रिंगण धरणं हा या कार्यशाळेचा हेतू होता. काही संघटना कारस्थान शाळा योजतात. तिथं हिंसू निर्माण केले जातात. इथं तसं नव्हतं. दर्जा व संधीचं संविधानिक आश्वासन लक्षात घेऊन सामाजिक न्यायाच्या दिशेनं स्त्री-पुरुष समानता, दलितांविषयी सहानुभूती, वंचितांप्रती भावसाक्षरता, लोकशाहीवरील विश्वास, अहिंसेवरची दृढता यावर भर देणारी व्याख्यानं, लेखन-वाचन, चर्चा, घोषणा-गाणी तयार करत ‘रिंगणनाट्य’ तयार करणं, त्याचं सादरीकरण व त्याला मिळालेला प्रेक्षक प्रतिसादाचं मूल्यमापन असं या कार्यशाळेचं नियोजन होतं. ‘नियोजनाबरहुकूम कार्यवाही’ हा खास पेठेकृत समर्पक परिणाम. याशिवाय जिज्ञासूंसाठी या पुस्तकात संविधानविषयक घोषणा, गाण्यांचा (जी शिबिरात तयार झाली) खजिना आहे. तसंच ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक आणि ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ची मूळ संहिता वाचावयास मिळते. ज्यांना ‘रिंगण’ धरायचं आहे, कार्यशाळा योजायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक चांगली मार्गदर्शिका आहे.

याशिवाय हे पुस्तक नाटकाविषयी बऱ्याच गोष्टी समजावतं. नाटक हे कलेतून वैचारिक दृष्टिकोन विकसित करायचं साधन आहे. ते माणूस बदलाचं माध्यम आहे. सर्व काळात कलावंत, विचारक, वैज्ञानिक, विवेकवादी यांच्याकडे सनातन, प्रतिगामी शक्ती ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून पाहत आल्यात. पण समाजाचा विवेक व विचार कधीच मरत नसतो आणि हत्येनं तो संपवता येत नाही असा दृढविश्वास हे पुस्तक देतं.

‘रिंगणनाट्य’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची संहिता सामूहिक चर्चा, विचार विनिमयातून जन्मते आणि समूहाकडून समूहासाठी सादर होते. त्याअर्थानं ‘रिंगण’ हे समाजनाट्य आहे. हे नाटक सर्वांना कृतिशीलतेतून सृजनशील बनवतं. हे नाटक प्रेक्षक, रंगकर्मी, कलाकार, कार्यकर्ते यांना दृष्टी देतं. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची जाण विकसित करण्याचं साधन, माध्यम म्हणून या पुस्तकाची उपयुक्तता मोलाची आहे. ‘रिंगण’चे आजवर ५०० ठिकाणी प्रयोग झाले आहेत. त्यात २५० कार्यकर्ते रंगकर्मी बनले. त्यातून विवेकवादी विचारधारा बुलंद होण्यास साहाय्य झालं. ‘जीवनासाठी कला’ हे खांडेकर-फडके प्रभुतींचं सूत्र प्रत्यक्षात आलं. ज्यांना आवाज नसतो, त्यांना स्वर देण्याचं काम ‘रिंगण’ करतं.

हे पुस्तक वाचताना मिळणारा दिलासा उमेद जागवणारा आहे. मागे राहिलेल्या वंचित घटकांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचं कार्य भारतीय राज्यघटना करते, हे समाजभान, ही समाजदृष्टी हे पुस्तक देतं. शिवाय एकट्या वंचित व्यक्तीलाही विकासाचा हक्क व सामाजिक न्याय मिळवून देणारी घटना म्हणून लोकशाहीतील तिचं महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करतं. हे पुस्तक नाटकाचं तंत्र सांगत माणुसकीचं गाणं ऐकवतं. नाटक हा शिळोप्याचा उद्योग नसून उभारणीचं तत्त्वज्ञान होऊ शकतं असा विश्वास हे पुस्तक जागवतं. ज्यांना समष्टीगत जीवन अंगीकारायचं आहे त्या सर्वांनी एकदा अशा कार्यशाळेच्या मांडवाखाली काही दिवस घालवलेच पाहिजेत. कार्यशाळा ते नाटकसंहितेची निर्मिती असा प्रवास उलगडणारं हे पुस्तक वेदनेचा विलाप न राहता विवेकाचा विचार बनतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे.

रिंगणनाट्य – अतुल पेठे, राजू इनामदार, साधना प्रकाशन, पुणे, पाने – १७८, मूल्य – १५० रुपये.

 

लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.

drsklawate@gmail.com

'रिंगणनाट्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

https://goo.gl/CgaFCI

 

Post Comment

Nilesh Pashte

Sat , 22 October 2016

टेस्ट प्रतिक्रिया


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......