अजूनकाही
गेल्या पाच वर्षांत आपण देशद्रोह, गाय, मुस्लिम अत्याचार, दलित अॅट्रोसिटी, अशा अनेक गोष्टी पाहत आलो आहोत. या गोष्टींनी संबंध देशभर असहिष्णू वातावरण कायम ठेवलं आहे. या असहिष्णू वातावरणाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कार वापस करण्यापासून झाली. (नुकतंच देशभरातल्या ९०० कलावंतांनी मोदी सरकारविरोधी पत्रक काढलं!) त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांत मोदी यांच्या धोरणांविरोधात कसून प्रयत्न सुरू असताना दिसत आहेत. या घटनांचा निषेध वेळोवेळी वेगवेगळ्या स्तरांतून/माध्यमांतून होत होता. याच परिस्थितीमध्ये नवे राजकीय चेहरे जनतेसमोर समोर आले आहेत. उदा. जिग्नेश मेवानी, कन्हैय्या कुमार इ.
दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंबंधी केंद्र सरकारकडून होणाऱ्या अन्यायाला कंटाळून रोहित वेमुला या विद्यार्थ्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याचा निषेध सर्व विद्यापीठांमध्ये होत असताना जेएनयुचे विद्यार्थीही मागे नव्हते. तसंच बीफ बंदी, आक्रमक व विखारी राष्ट्रवादी सूर निघत असताना भांडवलशाही सरकारचा निषेधही जेएनयुमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. आणि यातूनच मोदी सरकारनं देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली कन्हैय्या कुमारला तुरुंगात टाकलं. या अशा अनेक प्रकारच्या धोरणांमुळे कन्हैय्या कुमार हे नेतृत्व पुढे आलं!
राष्ट्रवादाच्या/देशप्रेमाच्या गप्पा देशभर सुरू असताना त्यानं नव्यानं राष्ट्रवादाची ओळख करून दिली. ‘भारत से नहीं, भारत मैं आझादी चाहिये’ अशा भूमिका घेऊन नव्या पिढीला राष्ट्रवादाची खरी व्याख्या समोर आणण्यात कन्हैय्या कुमार यशस्वी झाला. आता तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बेगूसराय लोकसभा निवडणूक लढवत आहे. कन्हैय्या कुमारने जो मोदी सरकार विरोधात देशभर आवाज उठवला, तो परिवर्तनासाठी निश्चितच महत्त्वाचा आहे. त्याने असहिष्णु, जुमलेबाज, गोडसेवादी भाजप नेत्यांना अगदी जेरीस आणलं आहे!
अशाच काळात भीमा कोरेगाव झालं, तिथं दलितांवर हल्ला झाला. ते हल्लेखोर कोण होते? कुठून होते? याविषयीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. पण यानिमित्तानं समोर येऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट हिंदुत्ववादी संघटनांना धारेवर धरलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जणू युद्धच छेडलं. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना ‘नक्षली’ ठरवण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणी अॅड. आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका आधी दलित आणि नंतर मुस्लीम समाजाला आधार देणारी वाटली. त्यांना तो आपला आवाज वाटू लागला. म्हणून दलित समाज आणि बहुतेक मुस्लीम समाज त्यांच्याभोवती एकवटला. आणि अॅड. आंबेडकर हे नेतृत्व जोमानं पुढे आलं. देशभरात अत्याचारांमुळे अस्वस्थ झालेल्या दलित-मुस्लीम समाजांना राष्ट्रीय पातळीवर कन्हैय्या कुमारच्या रूपानं चेहरा मिळाला आणि राज्यात अॅड. आंबेडकरांच्या रूपानं.
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच कन्हैया कुमारची बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामधून उमेदवारी निश्चित झाली. आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अॅड. आंबेडकरांनी आपली उमेदवारी सोलापूर या आरक्षित मतदारसंघातून जाहीर केली. कन्हैय्या कुमार राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असूनही त्याने आपल्या जातीचे (भूमिहार ब्राह्मण) लोक बहुसंख्य असलेल्या मतदारसंघाचीच निवड केली. जिथं २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे तनवीर हसन किमान फरकानं पराभूत झाले होते. तर दुसरीकडे अॅड. आंबेडकरांनी सोलापूर हा आरक्षित मतदारसंघ निवडला, जो काँग्रेसचे दलित नेते सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.
कन्हैया कुमार आणि अॅड. आंबेडकर यांच्यातील साम्य म्हणजे दोघंही संघ आणि मोदी सरकार विरोधात संविधान वाचवण्यासाठी, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी लढत आहेत. पण वास्तविक निवडणुकीत त्यांच्या उमेदवाऱ्या काँग्रेस आणि आरजेडीला मारक ठरत असताना दिसत आहेत.
कन्हैया कुमार राष्ट्रीय स्तरावरील उदयोन्मुख नेता असल्यानं त्याने आपल्या जातीची बहुसंख्या असलेला मतदारसंघ न निवडता अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे थेट ज्यांच्याविरुद्ध संघर्ष आहे, त्यांच्याविरोधात उभं राहणं गरजेचं होतं. आणि महाराष्ट्रात अॅड. आंबेडकरांनी भाजपच्या तगड्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण करणं गरजेचं होतं. अलीकडेच झालेल्या ‘एबीपी माझा’च्या मुलाखतीमध्ये राजीव खांडेकर यांनी तसा प्रश्नही विचारला की, तुम्ही भाजपच्या विरोधात लढत असाल तर तुम्ही सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान न देता, थेट नितीन गडकरींना आव्हान देणं गरजेचं होतं असं आपणास वाटत नाही? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नव्हतं. थोडक्यात सुरक्षित व आरक्षित मतदारसंघाची निवड करण्याचा हेतू स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे मोदींना वा भाजपला आव्हान देण्यापेक्षा त्यांना निवडून येणं महत्त्वाचं वाटतं आहे का? कदाचित यातूनच ‘भाजपची बी टीम’ म्हणून होणाऱ्या टीकेला बळ मिळालं असेल का?
उमर खालिदनेही अशा प्रकारचं कथन समोर ठेवलं की, कन्हैया कुमार यांच्या विरोधातील मुस्लीम नेत्यांनी मुसलमानांसाठी काय आवाज उठवला? मुसलमान नेता हवा की मुसलमानांचा आवाज असणारा नेता? असा प्रश्न विचारून मुस्लीम समाज कन्हैय्या कुमारसाठी अग्रेसर असावा अशी भूमिका मांडली. कन्हैय्या कुमार आज वंचितांचा आवाज आहे, असं खालिदला वाटत असलं तरी, तन्वीर हसन यांनी लालू यादव यांच्यासोबत १९७० पासून हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी नुसता आवाज उठवला नाही तर ते ऐक्य बिहारच्या मातीत रुजवण्याचं काम केलं आहे, हे कसं विसरता येईल? तेजस्वी यादवने आजही ते काम पुढे चालू ठेवलं आहे. त्यामुळे उमर खालिदनं हे लक्षात घ्यायला हवं की, तन्वीर हसन आणि भाजप यांच्या लढाईमध्ये तुम्ही मध्ये घुसला आहात.
काहीच महिन्यांपूर्वी बेगूसरायमधील ‘कुशवाह हॉस्टेल’मधील अत्याचार प्रकरण चर्चेत आलं होतं. याशिवाय कुशवाह समाजाच्या विद्यार्थ्यांवर भूमिहार समाजातील दबंग मुलांनी पिण्याच्या पाण्याच्या वादावरून अत्याचार केले. त्यांना अमानवी, अनैसर्गिक यौनसंबंध करण्यास भाग पाडून, हिंसा करण्यात आली. त्याचा व्हिडिओ करून तो व्हायरल केला गेला.
उमर खालिदला कन्हैय्या कुमार वंचितांचा आवाज वाटत असेल तर त्याने आपल्याच जिल्ह्यातील वंचितांवर होणाऱ्या अत्याचारावर साधं ट्विटसुद्धा का केलं नाही? त्यामुळे उमर खालिद हे बेगूसराय काही ‘लेनिनग्राड’ नाही, तर ‘भूमिहारगड’ आहे, हे लोकांसमोर आणू पाहत नसेल काय, असा प्रश्न पडतो? तो राजकारण करत आहे, हे स्पष्ट आहे. अन्यथा ‘भूमिहार दबंगों से आझादी’ हा नारा डफली वाजवत त्याने नक्की दिला असता. त्यामुळे खालिदने बेगूसरायच्या मुस्लिम समाजाला पुरोगामीत्व शिकवण्यापेक्षा कन्हैय्या कुमार आणि गिरीराज सिंग यांच्या भूमिहार ब्राह्मण समाजातील जातीयवादी लोकांना पुरोगामीत्व शिकवणं जास्त गरजेचं आहे, असं वाटतं. पण ही बाब सोयीस्करपणे बाजूला सारून, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, मुस्लीम मतदार वळवणं हेच महत्त्वाचं काम आहे, असं उमर खालिदला वाटत असावं.
.............................................................................................................................................
या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?search=pravin+bardapurkar&doSearch=1
.............................................................................................................................................
अलीकडेच अॅड. आंबेडकरांनी कन्हैय्या कुमारबद्दल फेसबुकच्या माध्यमातून भूमिका मांडली की, ‘सीपीआयसोबत आमचे मतभेद आहेत, पण तरीही पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन आम्ही कन्हैय्याला पाठिंबा देत आहोत’. त्यांचे सीपीआयशी वाद का आहेत, हे अनेक जण जाणतात आणि ती ब्राह्मणी वर्चस्व असणारी पार्टी आहे, अशी टीका वेळोवेळो केली जाते, हेही जाणतात. म्हणून अॅड. आंबेडकरांना सांगावंसं वाटतं की, बाबासाहेब आंबेडकर ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये म्हणतात, ‘‘पुरोगामी ब्राह्मण आणि पुजारी ब्राह्मण यात कोणताही फरक करता येत नाही. ते एका अंगाच्या दोन बाजू आहेत, ज्या एकमेकांच्या अस्तित्वासाठी लढण्यास बाध्य आहेत.” जी गोष्ट आपण बेगुसरायमध्ये पाहतो आहोत. त्यामुळे अॅड. आंबेडकरांची भूमिका बाबासाहेबांच्या विचारधारेशी सुसंगत नाही, असं दिसतं.
पुढे त्यांनी काँग्रेसची भाजप आणि हिंदुत्ववादी पक्षांबद्दलची धोरणे पुरेशी स्पष्ट नाहीत, असंही स्पष्टपणे मांडलं. पण त्याच वेळी त्यांनी सांगली मतदारसंघातून संघाचे पूर्वाश्रमी गोपीचंद पडळकर यांना तिकीट जाहीर केलं. तेव्हा काँग्रेसच्या भाजप/हिंदुत्ववाद्यांबाबतच्या धोरणात स्पष्टता नाही म्हणणाऱ्या अॅड. आंबेडकरांना पडळकरांकडून कोणतं धोरण अपेक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होतो.
पण ते तसं नसावं. पडळकरांची उमेदवारी सोलापूर मतदारसंघासाठी उपयोगी ठरू शकते. बॅ. असदुद्दीन ओवैसी यांची सोलापूरमध्ये सभा घेताना गोपीचंद पडळकर यांचंही पत्रकांवर मोठं छायाचित्रं छापलं आणि त्यांच्या नावासमोर त्यांची जात कंसात लिहिली होती. त्यामुळे पडळकरांच्या निमित्तानं राजकारणाबाबतची जातीय समीकरणं लक्षात येतात. कारण तिकीट वाटपाच्या वेळीदेखील उमेदवारांच्या जाती कंसात लिहिलेल्या आपण पाहिल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये म्हणतात की, ‘जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी हिंदूंमधील जातींना एकत्र आणून त्या नष्ट करता येत नाहीत.’ कदाचित अॅड. आंबेडकर हे बाबासाहेबांचे विचार विसरले असावेत. त्यामुळे त्यांनी जातींच्या आधारावर एकत्रीकरण केलेलं आपणास दिसतं. त्यामुळे काँग्रेसला पुरोगामी विचारांची स्पष्टता मागत असताना आपल्याभोवती जातग्रस्त शंकेचं मोठं वादळ उभं आहे, हे त्यांना का दिसू नये, हा खरा प्रश्न आहे.
एकेकाळी दाखल्यावरून जात काढून टाका, आरक्षित जागांवरून निवडणूक लढवू नका, अशा भूमिका घेणाऱ्या अॅड. आंबेडकरांनी अलीकडे यू-टर्न मारल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्यांचं निवडणुकीविषयीचं धोरण स्पष्टपणे समोर येत आहे, हे निश्चित.
कन्हैय्या कुमारने जातीय फायदा होईल असं लक्षात घेऊन सोयीस्कर उभं राहणं, वंचित कुशवाह विद्यार्थी अत्याचारावर पाळलेलं मौन, उमर खालिद-शहीला रशीद यांचा बेगूसरायमध्ये मुस्लीम प्रबोधनचा चाललेला कार्यक्रम आणि अॅड. आंबेडकरांनी जातीचा उल्लेख करत जाहीर केलेली यादी, पडळकरांचे संघाशी असलेले संबंध, अशा अनेक कारणांनी डाव्या विचारांना समोर ठेवून खऱ्याखुऱ्या वंचितांच्या डोळ्यात धूळफेक फेकण्याचे कार्यक्रम सुरू असलेले दिसतात. ज्या गोष्टी काँग्रेसच्या अडचणींचं कारण आणि भाजपची ‘बी’ टीम होण्यास कारणीभूत ठरत आहेत असं दिसतं.
त्यामुळे काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत असताना आपण किती जातीपातीच्या खोलात रुतलो आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं आणि स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी काहीशी अवस्था ‘अभिजन वंचित’ आणि ‘तथाकथित डाव्यां’ची झाली आहे, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.
.............................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment