अजूनकाही
हा विषय सखोल आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच मांडावा असाही आहे. कारण निवडणुकांच्या आगेमागे समाजात जी प्रचंड घुसळण होते, त्यातून समाजमन बनण्याच्या, बदलण्याच्या काही शक्यता तयार होतात. आपण ज्या काळामध्ये राहतो आहोत, त्या काळातल्या शक्यतांचा मागोवा घेणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अंगभूत जबाबदारी आहे असं मी मानतो. खरे प्रश्न, खरे वाटणारे प्रश्न, खोटे प्रश्न आणि आभासी प्रश्न यांच्यात फरक करायला शिकणं आणि त्या दृष्टीनं विचार आणि कृतीची मोर्चेबांधणी करणं गरजेचं आहे. मात्र हे करत असताना आपण जे जे ज्या ज्या व्यासपीठावरून बोलतो, त्याचा संकोच होतो आहे आणि त्यामुळे अंतिमः कोरडं समाधान किंवा आत्मरतता एवढ्याच गोष्टी आपल्या हाती उरतात. हळूहळू आपलं वास्तवातलं जगणं ललित साहित्यासारखं काल्पनिक होऊन जातं. अशा परिस्थितीत ही कोंडी ज्याची त्यालाच फोडावी लागते. त्यासाठी शंकाकुशंका, अस्वस्थतता आणि भीती या सगळ्यांवर मात करत राहावं लागतं. हा लेख त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
नरेंद्र मोदी सत्तेवर आले म्हणजे नेमका काय बदल घडला? एका पक्षाचा एक पंतप्रधान जाऊन दुसऱ्या पक्षाचा दुसरा पंतप्रधान आला, एवढ्यापुरताच हा बदल मर्यादित नाही. अधांतरी संसद, आघाडीचं सरकार या गोष्टी जाऊन जवळपास एका सरकारचं स्थिर वाटणारं सरकार येणं हा यातला एक महत्त्वाचा बदल आहे. त्याहीपेक्षा बऱ्याचदा केंद्रापासून डावीकडे असलेलं उदारमतवादी, पुरोगामी म्हणवलं जाणारं सरकार जाऊन आर्थिक आणि धार्मिक बाबतीत उजव्या विचारसरणीचं सरकार येणं हाही एक बदलाचा भाग आहे.
या गोष्टी एवढ्यापुरत्याच थांबलेल्या नाहीत. काँग्रेसच्याबाबतीत वर्षानुवर्षं सत्ता सांभाळल्यामुळे आलेलं जडत्व, पैशांची सूज आणि अपारदर्शकता या गोष्टींना या देशातला एक मोठा वर्ग कंटाळला होता. याचा अर्थ या वर्गाला काँग्रेसच्या राज्यकर्तेपणाच्या काळात काही फायदा झाला नव्हता असा नाही. किंबहुना हा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय अभिजनवर्ग काँग्रेसच्या उपकारकेंद्री व्यवस्थेच्या काळातला सगळ्यात मोठा लाभार्थी होता.
विशेषतः या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याच्या अगोदर खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाची लाट आल्यानंतर तंत्रज्ञानावर स्वार झालेला जो नवा मध्यमवर्ग तयार झाला, त्यानं देशविदेशात आपले पंख पसरले, भरपूर पैसा कमावला; पण त्यांच्या आर्थिक भरणपोषणाबरोबरच त्याचं सांस्कृतिक–संकुचितपणाचं भरणपोषणही याच काळात झालं. त्यामुळे आता माहिती – तंत्रज्ञानाचा, समाजमाध्यमांचा परिपूर्ण वापर करून मागासलेलं ज्ञान किंवा माहिती प्रसृत करणारा जो तंत्रकुशल वर्ग आहे, तो जागतिकीकरणाचं अपरिहार्य फलित आहे.
तंत्रज्ञान माणसाला काय शिकवतं, याच्या पाठ्यपुस्तकातल्या व्याख्या आणि प्रत्यक्षात तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या देशविदेशातल्या भारतीयांनी त्याचा केलेला वापर पाहिला की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्यंत अशास्त्रीय विचार यांचा संयोग होऊ शकतो हे उदाहरणासहित पटतं. हे सगळं २०१४ आधी घडत नव्हतं का? तर नक्कीच घडत होतं, पण त्याला व्यापक राजमान्यता नव्हती. २०१४ नंतर या सर्व मूर्खपणाला व्यवस्थेचं पाठबळ मिळाल्यामुळे एकेकाळी ज्याला ‘fringe element’ म्हटलं जात होतं, तेच लोक आता व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येऊन बसले आहेत. एके काळी ‘संतोषी मातेच्या पत्रां’ना जे आध्यात्मिक भीतीमूल्य होतं, तेच आता व्हॉट्सअॅपवरच्या ढकलगोष्टींना आलं आहे.
हा सगळा वेडाचार फक्त सत्ताधाऱ्यांच्या किंवा परिवाराच्या समर्थकांकडून होतो आहे असं नाही. काँग्रेसच्या किंवा इतर पक्षांच्या समर्थकांकडूनदेखील तेच होतं आहे. पण दोन्हीतला फरक लक्षात घेतला पाहिजे. ट्रोलांच्या संघटित, पगारी आणि हिंस्त्र फौजा पहिल्यांदा परिवारानं उभा केल्या. स्त्री असेल तर तिला ‘वेश्या’ म्हणणं, फोटोशॉप केलेलं तिचं नग्न छायाचित्र टाकणं. स्त्री किंवा पुरुषाला मुलगी असल्यास तिच्यावर बलात्कार करू असं म्हणणं, या गोष्टी अतिशय सर्रासपणे होत आहेत. भलेभले लोक याला बिचकून एकतर आपली फेसबुक, ट्विटर खाती बंद करतात.
गेली पाच वर्षं मी वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्ष – संघटनांच्या नेत्यांच्या विरोधात लिहिलं आहे. हेच काम मी २०१४ च्या आधीही करत होतो, पण तेव्हा कोणीही ‘तुला हे लिहिताना भीती वाटत नाही का?’ असा प्रश्न विचारला नव्हता. आता मात्र तो प्रश्न घरच्या लोकांपासून मित्रपरिवारांपर्यंत सातत्यानं विचारला जातो. मी जे लिहितो आहे ते अनेकांना जहाल वाटतं. माझ्या लिहिण्यात शिवीगाळ किंवा असभ्य शब्द नसतात. उपहास असतो, अनेकदा तो टोकदारही असतो. पण माझ्यापेक्षा अधिक टोकदारपणे भाषेचा आणि मुद्द्यांचा वापर करणारे लोक समाजमाध्यमांवर आहेत. मी लिहिलेल्या पोस्टवर अर्वाच्य लिहिणारे लोक येतच नाहीत असं नाही. पण याबाबतीत मी विश्वंभर चौधरींसारखा सहनशील नाही. असे उद्योग करणाऱ्यांना मी तात्काळ अन्फ्रेंड, ब्लॉक किंवा अन्फॉलो करतो. याबाबतीत एका मर्यादेपलीकडे लोकांचं विचारपरिवर्तन करणं हा वेळेचा अपव्यय आहे असं मला वाटतं. याचा अर्थ मी लिहिलेल्या पोस्टवर किंवा मांडलेल्या पोस्टवर गोडगोड लिहिणारे लोकच माझे मित्र आहेत असं नाही, पण रचनात्मक टीका करणारे आणि समाजमाध्यमांपलीकडे चर्चेच्या शक्यता जिवंत ठेवणारे लोक मला महत्त्वाचे वाटतात. सर्व मतभेदांपलीकडे त्यांच्याशी मैत्री किंवा संवाद कायम राहतो.
प्राप्त परिस्थितीत व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमावर लोक मोठ्या प्रमाणात संदेशांची ढकलाढकली करत असतात. फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर यांपैकी जास्त बिनडोक माध्यम कुठलं? याचा मला निर्णय घेता आलेला नाही. आपल्या संपर्कात किंवा व्हर्च्युअल परिसरात काय प्रकारचे लोक आहेत, यावर आपल्याला येणारा अनुभव अवलंबून आहे. उदा. शाळा – महाविद्यालयातील माजी मित्रांचे गट हे सर्वाधिक हताश करणारे आहेत असा माझा अनुभव आहे. याचं कारण यातले अनेक लोक मनानं शाळा–महाविद्यालयांमधून बाहेरच पडलेले नसतात. वाचनाचा आणि त्यामुळे चिंतनाचा सार्वत्रिक दुष्काळ हा तर दखलपात्र प्रश्न आहेच. पण त्याहीपलीकडे यातील नवश्रीमंतांची सुबत्ता त्यांच्या मठ्ठपणाचं तत्त्वज्ञानात रूपांतर करायला मदत करणारी आहे. त्यामुळे पुरोगामी-प्रतिगामी, देशप्रेमी-देशद्रोही, वरचे-खालचे, आरक्षणवाले-बिगरआरक्षणवाले, हिंदू-मुसलमान या सर्व वर्गवाऱ्यांमध्ये निर्विवाद, निर्नायक विधान करणारं कथन लोकप्रिय असतं.
ट्विटरवर शब्दसंख्येला मर्यादा आहे. त्यामुळे अतिरिक्त मजकूर जोडपत्रात जातो. फेसबुकवर तुम्ही पानंच्या पानं लिहू शकता, अर्थात ते कुणीही वाचलं नाही तरी चालेल अशी तुमची अपेक्षा असेल तर. व्हॉट्सअॅपवर एका व्यक्तीला, एका छोट्या गटाला किंवा २५६ लोकांना एकावेळी मजकूर पाठवायची सोय आहे. मात्र आपण पाठवतोय तो मजकूर आपण आधी वाचलाच पाहिजे अशी पूर्वअट नाही. त्यामुळे अनेकदा एखादा हजारएक शब्दांचा मजकूरही समाजमाध्यमांवर पडताक्षणीच त्यावर कमिंटलेलं दिसतं किंवा इमोजी पडलेली दिसते. याचा अर्थ ‘विचारप्रसाराआधीची वाचन’ ही पायरी आपण काढून टाकली आहे. बऱ्याचदा व्हॉट्सअपवरच्या प्रतिक्रिया या इमोजीत संपून जातात, फेसबुकवरच्या प्रतिक्रियांचं टोक शेअर करणं हे असतं. लोकांच्या ऑनलाईन राहण्याच्या वेळांचा अभ्यास केला तर तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकतेमुळे आणि डेटा स्वस्त झाल्यामुळे लोक सर्वकाळ ऑनलाईन राहतात, म्हणजे सक्रिय असतातच असं नाही; पण त्यांच्या खात्यात नोटिफिकेशन पडत राहतात. फार कमी पानांवर आणि कमी पोस्टवर एखाद्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होते. इथं मी प्राधान्यानं राजकीय चर्चांचाच विचार करतो आहे. एखाद्या व्यक्तीला ट्रोल करण्यापासून बाजूच्या किंवा विरोधी प्रतिक्रियांची बँक तयार करून ती कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यापर्यंत अनेक गोष्टी यंत्रवत पद्धतीनं आणि अजस्त्र रूपात केल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचे पहिले हुशार वापरकर्ते असल्याने परिवाराचा या प्रक्रियेवर वरचष्मा आहे.
फेसबुकचा अल्गोरिदम पाहिला आणि त्यातलं सरकारचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण लक्षात घेतलं तर तुमची मतं पटणाऱ्या मोजक्या लोकांपर्यंतच तुमची पोस्ट जाण्याचा धोका वाढला आहे. दीर्घकाळ फेसबुकवर सक्रिय असलेला मित्र असं म्हणाला की, फेसबुकवरच्या मंडळींची मतं ठरलेली असल्यामुळे तिथं काही लिहिणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. त्यामुळे तो व्हॉट्सअॅपवर भर देतो. ट्विटर आणि इन्स्टाग्राम मला अद्याप नीट वापरता आलेलं नाही. पण त्यावर सक्रीय असलेल्या इतरांना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं, ते लक्षात घेता लिहिणं हीसुद्धा धाडसाची गोष्ट आहे, असा समज झाला तर आश्चर्य वाटायला नको!
माझ्यासारखा अगदी परिघाबाहेरचा कार्यकर्ता मुख्य राजकीय कथनांच्या मारामारीमध्ये जवळपास अदखलपात्र असतानाही लिहिताना आपण कुणाच्या शेपटावर पाय तर ठेवत नाही ना, अशी भीती वाटते. त्यातून लिहिणं थांबतं असं नाही, पण कमी नक्की होतं. आधीच बाहेरचं पर्यावरण पुरेसं निराशा आणणारं आहे. त्यात या पर्यावरणाचा सामना करण्यासाठी आपण काहीच करत नाही आहोत किंवा जे करत आहोत त्याचा काहीच परिणाम होत नाही आहे, ही गोष्ट पुरेसा ऊर्जापात घडवून आणणारी आहे. अशा काळात तुम्ही कविता लिहू शकता, पण त्याही छापल्या जातीलच याची खात्री नाही. परिणामी सर्व प्रकारच्या प्रातिभदर्शनाला वंध्यामैथुनाचं रूप येतं. अगदी नकारात्मक विचार करायचा तर हे मुक्त चिंतनही त्याच विचारप्रक्रियेचा भाग आहे असं म्हणता येईल.
ही कोंडी कशी फोडायची याचं वैश्विक उत्तर देत बसण्याऐवजी मी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न कसा करतो आहे, याचा नमुना मांडणं जास्त सोपं आहे आणि व्यवहार्यही.
मी मला जे जे जेव्हा जेव्हा सुचेल, ते ते तेव्हा तेव्हा आहे, त्या स्वरूपात मांडत राहतो. कधी ते गद्य असतं, कधी ते पद्य असतं. कधी मिश्रण असतं, कधी बोचरा उपहास असतो, कधी यमकेगिरीही असते. या सर्व लिहिण्यामागे कोणाला काय आवडेल यापेक्षासुद्धा त्यावेळी ती अभिव्यक्ती माझी मानसिक गरज आहे एवढाच विचार मी करतो.
जेव्हा माझ्याकडून हे होत नाही, तेव्हा इतरांनी लिहिलेलं आणि मला आवडलेलं मी शेअर करतो, वाटलं तर त्याबद्दलचं माझं मत लिहितो, पण लिहिलंच पाहिजे असं स्वतःवर बंधन घालत नाही. काही वेळा यातलं काहीच न करता मी फक्त वाचतो. या वाचण्यामध्ये शब्द असतातच; पण श्राव्य-दृकश्राव्य माध्यमं, व्यंगचित्रं, मीमस् या सर्व गोष्टी पाळून त्याचा आनंद घेतो. माझी भूमिका स्पष्टपणे धार्मिक–सांस्कृतिक राजकारणाच्या विरोधात आहे. याचा अर्थ या राजकारणाचा विरोध करणारं काहीच मी वाचत नाही असा नाही. त्याचप्रमाणे माझ्या भूमिकेला ठाम किंवा थोडाबहुत विरोध असणारे माझं वाचत असतील, पण अनुल्लेखानं मारत असतील, हेही मला समजू शकतं. मात्र फेसबुकबाहेर म्हणजे समाजमाध्यमांबाहेर ज्यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि ज्यांच्या समाजमाध्यमांवरील भूमिकेमुळे समन्वयाच्या कोणत्याही शक्यता नाहीत अशी मला खात्री पटली आहे, त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध समाजमाध्यमेतर मार्गानं टिकवण्याचे किंवा वाढवण्याचे मी प्रयत्न करतो. ज्यांच्या बाबतीत हे शक्य होत नाही, त्यांच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती राहील असा प्रयत्न करतो.
एवढं करूनही मतभेद व्हायचे तिथं होतातच. टोकदारपणा हा माझा मूळ स्वभाव असल्यामुळे माणसं तुटण्याची शक्यता राहतेच. पण दुसरीकडे मी संघटकही असल्यामुळे आपल्यातले कंगोरे प्रमाणाबाहेर टोकदार होणार नाहीत, याची काळजी घेण्याबद्दल मी स्वतःला नेहमी बजावतो, पण दरवेळी त्यात यश येतंच असं नाही. भीतीचं काय करायचं? हा प्रश्न सतत सोबत असतो, त्याबाबतीत अल्बर्ट एलिस मदतील येतो. भीती असते आणि ती राहणार हे मान्य करायचं, पण भूमिका आहे आणि ती मांडत राहावी लागणार हेही स्वतःला सांगत राहायचं. असं भीती आणि धाडसानं एकमेकाला छेद दिल्यानंतर जे उरतं, ते आपलं अस्तित्व आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहून माणसं घटना, प्रक्रिया यांचा दरवेळी नव्यानं अर्थ लावावा लागतो, हे लक्षात घेऊन मार्ग काढला तर गोष्टी सोप्या होतात, असा माझा अनुभव आहे.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या–अभ्यासकाच्या या नोंदींचा भयमुक्ततेचा व्यापक पट मांडण्याच्या प्रक्रियेत काही उपयोग झाला तर आनंद होईलच आणि भवतालातले भीतीचे थरही विरत जातील.
.............................................................................................................................................
लेखक डॉ. दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
santhadeep@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment