अजूनकाही
पुराणकाळात भंगास्वन नावाचा राजा होऊन गेला. पृथ्वीचा पालनकर्ता हे बिरुद त्याने आपल्या कर्तृत्वाने व दातृत्वाने सार्थ केले होते. धार्मिक व सात्त्विक असा त्याचा लौकिक होता. त्याचा राणीवसा त्याला शोभा व ऐश्वर्य देणारा होता व प्रजाही त्याच्या अंकित होती. राज्यात सुबत्ता व शांती नांदत होती. राज्य भरभराटीला आले असूनही अपत्य नसल्याचे एकच दुःख राजा-राणींना होते. राज्याला वारस नसल्याने राज्य कोण व कसे टिकवणार आणि आपला वंश तरी पुढे चालू राहणार किंवा नाही या विवंचनेत असणाऱ्या भंगास्वनला कुणा सिद्ध पुरुषाने अग्नीष्टुत यज्ञ करण्याचा सल्ला दिला. या यज्ञामुळे पुत्रप्राप्ती होते व पापकर्माचे क्षालनही होते. पण हा यज्ञ देवांचा राजा इंद्र याला आवडत नसे. तसा कोणताही यज्ञ किंवा दुसऱ्याने केलेली तपश्चर्या आपल्या इंद्रपदावर घाला आहे, असे त्याला वाटे व तो अस्वस्थ होई.
आतासुद्धा भंगास्वनने अग्नीष्टुस यज्ञाची दीक्षा घेतल्याचे त्याला हेरांकडून कळल्यावर तो त्यात विघ्ने आणण्याच्या उद्योगाला लागला. राजाचे न्यून शोधण्यासाठी तो त्याच्या पाळतीवरच राहिला. पण त्यात त्याला यश आले नाही. राजाने मोठ्या ऐश्वर्यात मातब्बर नामांकित राजांच्या व ऋषीमुनींच्या उपस्थितीत यज्ञसोहळा पार पाडला. काही महिन्यांतच यज्ञाचे फळ मिळण्याची लक्षणे दिसू लागली आणि योग्य समयी त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. अशा रीतीने त्याला एक-दोन नाही तर शंभर पुत्र झाले. स्वर्गाचे द्वार त्याला खुले झाले.
त्यानंतर भंगास्वन शिकारीसाठी एकटाच राज्याबाहेर दाट वनात गेला. इंद्रही त्याच्या पाठोपाठ होताच. वास्तविक राजाने पुत्रप्राप्तीसाठी हा यज्ञ केला होता. इंद्रपदासाठी नाही, पण त्यामुळे इंद्राचा अहंकार दुखावला गेला होता. यज्ञ आवडत नसल्याने इंद्र यज्ञात स्वतःचा भागही स्वीकारायला गेला नव्हता. भंगास्वन वराह-हरीण यांची शिकार करता करता गहन अरण्यात पोहोचला. अगदी गर्भस्थानी आल्यावर चकवा निर्माण होऊन राजा अश्वासह त्याच त्याच भागांत चकरा मारू लागला. बाहेर पडण्याचे सर्व मार्गच जणू खुंटले गेले. तशाच त्याला तहान-भूकेने इतक्या तीव्रतेने ग्रासले की, तो अंतर्यामी व्याकूळ झाला. ही सर्व इंद्राची माया होती. राजा फळे व पाण्यासाठी वणवण करू लागला. बरीच भ्रमंती केली, पण एकही फळ त्याला दिसले नाही. अचानक पक्ष्यांचा कलरव त्याच्या कानी पडला. ती नक्कीच पाणवठ्याची जागा असणार, या खात्रीने तो त्या दिशेला गेला. त्याचे अनुमान खरे होते.
ते एक रम्य सरोवर होते. एक प्रकारचा दिव्य गंध त्या परिसरात दरवळत होता. बकुळ, चंपक, बूच, सुरंगी आदी गंधमय पुष्पवृक्षांनी आपले गंधवैभव सृष्टीच्या ओटीत रिते केले होते. विविध रंगांच्या गुलमोहोरांचे रंगवैभव तर नेत्रांचे पारणे फिटेल असेच रम्य होते. पुष्पांच्या वेलीतही जणू सौंदर्याची स्पर्धा लागलेली होती. एकेका वृक्षाला असंख्य वेली बिलगल्या होत्या. सरोवराचे लावण्य तर वर्णनातीत होते. पाणी स्फटिकासारखे निर्मळ असून तळाशी विहार करणारे रंगीबेरंगी मासे स्पष्ट दिसत होते. ढालीसारखे कवच धारण करणारे कूर्म संथपणे विहार करत होते. विविधरंगी कमळांनी भ्रमरवृंदावर घातलेली मोहिनी त्यांच्या गुंजारवातूनच व्यक्त होत होती. पाणपक्षी तर नितांत सुंदर होते. वृक्षावरील पक्षीजगतात तर खूपच नावीन्य होते. भारद्वाज, सारस, सुतार, चक्रवाक, हंस या पक्ष्यांनी आपल्या सौंदर्यपूर्ण अस्तित्वाने त्या परिसराला जीवंतपणा प्रदान केला होता. कमलपत्रांवरून कमलपक्षी पळत होते, तर मध्येच एकादा नीळकंठ पाण्यातील चंचल मत्स्याचा वेध घेत होता. मत्त लांडोरीनी वेढलेले मयूर रंगाची उधळण करणाऱ्याला पिसाऱ्यांनी बघणाऱ्याचं मन व नेत्र सुखवत होते.
एकंदरीत गंधर्वाच्या चैत्रबनाची किंवा इंद्राच्या नंदनवनाची आठवण यावी, असे ते सृष्टीदेवीचे लावण्य पाहून भंगास्वनचा मानसिक शीण व शारिरीक थकवा नाहीसा झाला. प्रथम पाणी प्राशन करून वृक्षांवरील फळांचा आस्वाद घ्यावा, असे ठरवून तो अश्वावरून पायउतार झाला. अश्वाचा लगाम सैल करून त्यालाही पाण्याजवळ नेले. स्वतःही पाण्यांत उतरला अन् ओंजळीने पाणी प्यायला अन् काय आश्चर्य!
आपल्या शरीरात बदल होत असल्याचे त्याला जाणवले. त्याने जळाच्या दर्पणांत पाहिले अन् तो दचकला, आश्चर्यचकीत झाला. त्याचे रूपांतर एका लावण्यसंपन्न रमणीत झाले होते. पुरुषी पेहराव नाहीसा होऊन बायकी वस्त्रे दिसू लागली. धनुष्य-बाण, तलवार व चिलखत याऐवजी नवरत्नांचे सुवर्णात मढवलेले अलंकार त्याचे स्त्रीसुलभ सौंदर्य द्विगुणीत करू लागले. हा बदल पाहून तो घाबरला व लाजलासुद्धा. त्याने चोहीकडे नजर टाकली. अश्वांत काही फरक झाला नव्हता. उलट पाणी पिऊन व हिरवे गवत खाऊन तो आनंदाने खिंकाळला. राजा मात्र अस्वस्थ झाला. अश्वावर स्वार होणार कसा? राज्यात जाणार कसा? गेलो तरी प्रजेला विशेषतः राण्यांना-पुत्रांना सांगणार काय? व ते विश्वास ठेवतील काय? या विवंचनेने राजाला ग्रासले.
एकदा वाटले राज्यात जाऊच नये. पण जायलाच हवे. तो अश्वाजवळ आला, तेव्हा आपल्याच हातातील कंकणाच्या व पायांतील पैंजणाच्या ध्वनीने त्याला कापरे भरले. त्याने कशीबशी हिरवळीवर चरणाऱ्या अश्वावर मांड ठोकली. निर्माण झालेल्या चकव्यातून तो मार्ग न चुकता सहीसलामत आपल्या राजधानीत परतला.
स्त्रीत्व प्राप्त झालेल्या भंगास्वनने भीतभीतच राज्यात प्रवेश केला. प्रजेने राजाचा अश्व ओळखला, पण त्यावर राज्याऐवजी एक अनोळखी स्त्री पाहून जो तो एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला. अश्व नानालंकार ल्यायलेला व जनतेच्या नित्य पाहण्यातच होता. पण ही सुंदरी कोण? कुठली? अन् राजा कुठे गेला? प्रधानाने त्या सुंदरीला हात देऊन खाली उतरवले व खात्री करून घेण्यासाठी अश्वाला नावाने हाक मारली. आपले नाव कानावर पडताच ते उमदे जनावर मागील दोन पायांवर उभे राहून आनंदाने उच्च स्वरात खिंकाळले. प्रधानाने पुढे होऊन त्या नवागत स्त्रीस राजाविषयी विचारले, तेव्हा मान खाली घालून ती उद्गारली, ‘मीच. मीच. भंगास्वन राजा.’ राजा, स्त्री झाला तरी त्याचे मन राजाचेच होते.
कुणालाच विश्वास वाटेना व स्त्री झालेल्या राजाला पाहण्यासाठी राजप्रांगणात लोक कुतूहलाने जमू लागले. ही नवलवार्ता अंतःपुरात पोहोचली. सारा राणीवसा भयाने व आश्चर्याने मर्यादेचे उल्लंघन करून प्रांगणात दाखल झाला. हे काय भलतेच? असाच भाव सर्वांच्या मुद्रेवर झळकला. तेव्हा ती रमणी पुढे होऊन म्हणाली, ‘‘दुर्दैवाने हे सत्य आहे. मी जंगलात शिकारीला गेलो व वाट चुकून दैवाच्या प्रेरणेने अशा ठिकाणी गेलो जिथून मी आत्ताच्या स्त्रीच्या रूपात परत येत आहे. विश्वास ठेवणे कठीण पण हे सत्य आहे. मी भंगास्वन राजा.’’ एवढे सांगूनही कोणीही तिच्या किंवा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हा त्या सुंदरीने आपल्या काही पुत्रांची नावे घेऊन त्यांना हाका मारल्या. राण्यांनाही, पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. ओळख पटवण्याचे सारे यत्न फोल ठरले.
आता राज्यात राहण्यात अर्थ नाही. निष्कारण मानहानी करून घेण्यात काय हशील? त्यापेक्षा इथून गेलेले बरे. असा विचार करून तो म्हणाला, ‘‘सर्वांना माझा प्रणाम. पुत्रांनो मी पुन्हा वनात जातो. आपल्या मातांचा नीट सांभाळ करा. प्रधानजी, राज्य व प्रजा तुमच्यावर सोपवतो.”
राजा पुन्हा अश्वावर स्वार झाला. अश्वाच्या मानेवर थोपटताच इशारा समजून तो अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने वनाच्या दिशेने उधळला. कुणीही राजाला अडवले नाही. अशा रीतीने त्या विश्वसनीय व दुःखद प्रकरणावर पडदा पडला.
भंगास्वन दुःखी अंतःकरणाने वनात आला. इथे येऊन तरी काय करणार? राजा वनात भटकून आला, दिवस कंठू लागला. तिथे त्याला एक पर्णकुटी दिसली. एकदा एक तपस्वी वावरताना दिसला. याच्या सोबतीने जवळपास राहू असा विचार त्याने केला. पण परपुरुषाजवळ सतत राहणे योग्य नव्हे. त्या गहन वनात त्या सुंदर स्त्रीला पाहून तपस्वी नवल करू लागला. त्यानेही तिला दोन-तीन वेळा पाहिले होते. त्याने तिची चौकशी केली व मजजवळ राहिलीस तरी चालेल असे तिला सांगितले. राजाने तपस्व्यापुढे विवाहाचा प्रस्ताव मांडला. आता त्याला राज्यात परतायचे नसल्याने लोक काय म्हणतील याचे भय बाळगण्याचे कारण नव्हते. आप्तजनांनी झिडकारले म्हणून नैराश्य आले तरी त्याला आत्महत्येचे पातक करायचे नव्हते. परंतु कुणाचा तरी आधार हवा होता. तपस्वीही सज्जन माणूस होता. त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, पण पूर्वी आपण पुरुष होतो, हे राजा विसरला नाही.
कालांतराने निसर्गनियमानुसार तपस्व्यापासून राजाला शंभर मुलगे झाले. एवढ्या सर्वांना घेऊन जंगलात राहणे बरे नाही म्हणून तपस्व्याच्या विनंतीवरून राजा आपल्या राज्यात पुत्रांसह आला. राजपुत्रांची गाठ घेऊन तो म्हणाला, ‘‘पुत्रांनो, मी पुरुष असतानाचे तुम्ही माझे पुत्र आणि आता मी स्त्री झाल्यावर झालेले हे माझे पुत्र. तुम्ही सर्व गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. माझे जास्त काही मागणे नाही.’’ त्यावेळेस मात्र पुत्रांना दया आली व त्यांनी स्त्रीरूपी पित्याला होकार दिला. राज्य ऐश्वर्यसंपन्न असल्याने शंभर जणांची नक्कीच सोय झाली असती. ते दोनशे बंधू राज्याचा उपभोग घेऊ लागले. इंद्राला हे कळल्यावर तर त्याला रागच आला. राजाला स्त्रीत्व देण्यात त्याचेच कपट असले तरी त्या लज्जास्पद प्रसंगाला राजाने धैर्याने तोंड दिलेले पाहून त्याला कमीपणा वाटला. खूप विचार करून तो ब्राह्मणाचे रूप घेऊन भंगास्वनच्या राज्यात आला. त्याने सर्व राज व तापसपुत्रांचे बारकाईने निरीक्षण केले. संधी पाहून त्याने कलहाची ठिणगी टाकली. राजपुत्रांना तो म्हणाला, ‘‘देव-दैत्य-दानव भाऊ-भाऊ असून त्यांच्यातून विस्तव जात नाही. दोघांचे विळ्याभोपळ्याइतके सख्य. इथे तर तापस व राजा यांचे पुत्र एकत्र. हे तापसपुत्र एक दिवस डाव साधून संपूर्ण राज्य गिळंकृत करतील. तुम्ही भोळे आहात. आयते बीळ मिळाले की, नागराज ते बळकावतो. तुम्ही हे सर्व कसे सहन करता? त्यांना वनात हाकलून द्या.’’
अशा रीतीने त्या ब्राह्मणाने त्या भावंडांत विषाचे बीज पेरले. राजपुत्रांना त्याचे म्हणणे पटले. त्यांनी तापसपुत्रांना सामोपचाराने वनात जायला सांगितले. पण पंचेद्रियांना विषयोपभोगाची चटक असल्याने त्यांनी स्पष्ट नकार दिला. अखेर त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. दोन्हीकडचे पुत्र मेले. एकही शिल्लक नाही राहिला. राजाला दुःख झाले. दोन्ही पुत्र माझेच. एकाचा मी पिता तर दुसऱ्याची मी माता. यज्ञामुळे झालेले पुत्रही मरावेत? असे मनात येऊन राजा विलाप करू लागला. तिचा आक्रोश ऐकून तो दुष्ट ब्राह्मण प्रगटला व म्हणाला, ‘‘कशाला ग रडतेस?’’ राजाने सर्व कथा त्याला सांगितली. अगदी शिकारीला गेल्यापासून ते पुत्रांच्यात युद्ध होईपर्यंत. त्याचा आक्रोश त्या ब्राह्मणाला ऐकवेना. तो मूळ रूपात दर्शन देऊन म्हणाला, ‘‘मूर्ख स्त्रिये, मला अग्नीष्टुप यज्ञ आवडत नाही व तुही मला आग्रहाचे निमंत्रण दिले नाहीस. या रागामुळे मीच सर्व माया निर्माण करून देशोधडीस लावले.’’ राजा इंद्राला शरण येऊन म्हणाला, ‘‘केवळ पुत्रप्राप्तीसाठी मी यज्ञ केला. तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण आता मी निपुत्रिक झालो. काय करू?’’ इंद्राला राजाची दया आली. त्याने राजाच्या इच्छेप्रमाणे हवे असलेले पुत्र जिवंत करण्याचे वचन दिले. त्यावर तो विचार करून म्हणाला, ‘‘देवेंद्रा, मी स्त्री असतानाचे पुत्र जिवंत कर.’’
राजाची इच्छा ऐकून इंद्राला नवल वाटले व त्याने विचारले, ‘‘अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञामुळे झालेले पुत्र तुला नकोत आणि तापसपुत्राचे तुला इतके प्रेम कसे वाटते? राजपुत्र नकोत?’’ त्यावर राजा म्हणाला, ‘‘विवाह या संस्काराविषयी स्त्रीला जास्त प्रेम, महत्त्व वाटते, तसे पुरुषाला वाटत नाही. त्याचा दृष्टिकोन व्यवहाराचा असतो. ना त्याला अपत्यांचे प्रेम, ना पत्नीची ओढ वाटते, पण स्त्रीला मात्र आपल्या गर्भापासून निर्माण झालेले मूल प्रिय असते. लुळेपांगळे असले तरी.’’ राजाच्या भाषणाने इंद्र संतुष्ट झाला. ‘‘तुला पूर्वीचे रूप परत देतो’’ असे इंद्राने म्हणताच राजाने नकार देऊन ‘‘मला स्त्रीच राहू दे’’ असे म्हटले व स्पष्टीकरणही दिले.
‘‘देवेंद्रा, स्त्री-पुरुष संबंधात स्त्री मनाने गुंतलेली असल्याने तिला प्रपंच स्वतःचा वाटतो. पुरुषाला तसे वाटत नाही. तो फक्त भोगवाद जाणतो. त्यागवाद नाही. सध्याच्या स्त्रीरूपांत मी माझ्या पतीचे प्रेम, आपुलकी अनुभवली. त्यामुळे आमरण स्त्री म्हणून आयुष्य काढण्यात मला ना संकोच वाटत, ना शरम. माझ्या उत्तराने पुरुषांना व तुलाही क्रोध येईल, पण वस्तुस्थिती अशीच आहे ना?’’
राजाने सत्त्यावर बोट ठेवताच इंद्र निरुत्तर झाला. त्याने राजाचे तापसपुत्र जिवंत केले. पुन्हा एकदा ते अरण्य जिवंत झाले व इंद्रराजा ऐरावतावर स्वार होऊन आकाशमार्गे अमरावतीस गेला.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 14 April 2019
नमस्कार श्रीकृष्ण तनया! इंद्र प्रत्यक्ष अवतीर्ण होऊन हविर्भाग स्वीकारतो याचा अर्थ त्यावेळेस कलियुग नसावं. तेव्हा स्त्री म्हणून आजन्म वावरण्यास परिस्थिती अनुकूल होती. परंतु आज कलियुगात मात्र बायकांचा जन्म नकोसा होतो. 'देवा, पुढचा जन्म बाईचा नको गं बाई', असे वयस्कर वा मध्यमवयीन बायका बरेचदा म्हणतांना आढळून येतात. तरुणी सहसा असं म्हणंत नाहीत. असो. कथा बोधप्रद आहे. आपला नम्र, -गामा पैलवान