आपण उदारमतवादी लोकशाहीचे समर्थन केले पाहिजे. त्यात मानवाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यात कमीतकमी मर्यादा आहेत म्हणून.
पडघम - विज्ञाननामा
युव्हाल नोआ हरारी
  • युव्हाल नोआ हरारी
  • Thu , 11 April 2019
  • पडघम विज्ञाननामा युव्हाल नोआ हरारी Yuval Noah Harari एकविसाव्या शतकासाठी २१ धडे 21 Lessons for the 21st Century सेपिअन्स Sapiens होमो डेउस Homo Deus

आजच्या घडीला आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत, त्या समस्यांना उद्देशून ‘सेपिअन्स’, ‘होमो डेउस’ या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी ‘21 Lessons for the 21st Century’ हे नवं पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकाचा लवकरच मराठी अनुवादही मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होतोय. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महिनाभराने, म्हणजे १४ सप्टेंबर २०१८ रोजी हरारी यांनी ‘द गार्डियन’मध्ये ‘the myth of freedom’ हा दीर्घ लेख लिहिला. त्याचा हा मराठी अनुवाद...

.............................................................................................................................................

सामाजिक विसंवादाची किंमत देऊनसुद्धा विद्वानांनी आपल्याला जाणवले ते सत्य सांगावे काय? कल्पित कथांनी सामाजिक स्वास्थ्य टिकते म्हणून तुम्ही त्याच सांगत राहाव्या काय? ‘21 Lessons for the 21st Century’ या माझ्या अलीकडच्या पुस्तकात मला उदारमतवादाच्या संदर्भात या दुविधेशी झगडावे लागले.

एका बाजूला मला वाटते की, उदारमतवाद या गोष्टीत दोष आहेत. तो मानवजातीची सत्ये सांगत नाही. २१ व्या शतकात टिकून समृद्ध होण्यासाठी आपल्याला त्यापलीकडे गेले पाहिजे. दुसऱ्या बाजूला जागतिक व्यवस्थेसाठी उदारमतवाद हा अजूनही महत्त्वाचा विषय आहे. शिवाय उदारमतवादावर आता धार्मिक आणि राष्ट्रवादी कट्टरपंथीयांकडून हल्ले होत आहेत. हे लोक स्मरणरंजनातून आलेल्या कपोलकल्पितांवर विश्वास ठेवतात, आणि ते तर अधिक धोकादायक आणि अपायकारक आहे.

मग संधिसाधू राजकीय पुढाऱ्यांकडून आणि हुकूमशहांकडून उदारमतवाद्यांवर आणखी हल्ला करण्यासाठी माझे शब्द संदर्भाविना वापरले जातील हा धोका पत्करूनही मी माझ्या मनातले मोकळेपणाने मांडावे? की मी स्वतःवर निर्बंध घालून घ्यावेत? अनुदार राजवटींची हीच खूण असते की, त्यांच्या सीमेबाहेरचेही भाषण-स्वातंत्र्य त्या अधिक कठीण करतात. अशा राजवटी आता वाढत असल्याने आपल्या प्रजातींच्या भविष्याविषयी चिकित्सात्मक विचार करणे अधिकाधिक धोकादायक बनत आहे.

मी शेवटी स्वनिर्बंधापेक्षा मुक्तचर्चेची निवड केली. त्याचे श्रेय अर्थात उदारमतवादी लोकशाही आणि तिची पुनर्बांधणी होण्याची असलेली गरज यावरच्या माझ्या विश्वासाला जाते. इतर मतप्रणालींपेक्षा उदारमतवादाचा मोठा फायदा हा आहे की, तो लवचिक आणि अनाग्रही असतो. कोणत्याही सामाजिक व्यवस्थेपेक्षा उदारमतवाद टीका जास्त चांगल्या प्रकारे सहन करू शकतो. खरोखरच ही एकच अशी सामाजिक व्यवस्था आहे की, ती लोकांना अगदी स्वतःच्याच गृहितकांबद्दलसुद्धा प्रश्न करण्याची परवानगी देते. उदारमतवाद अगोदरच तीन मोठ्या अरिष्टांतून तरला आहे- पहिले महायुद्ध, १९३० मधील हुकूमशाहीचे आव्हान आणि १९५०-१९७० दरम्यानचे साम्यवाद्यांचे आव्हान. उदारमतवाद आत्ता धोक्यात आहे असे तुम्हाला वाटत असेल तर १९१८, १९३८ किंवा १९६८ मध्ये गोष्टी किती वाईट होत्या हे आठवा.

१९६८ मध्ये उदारमतवादी लोकशाही व्यवस्था धोक्यात आल्या होत्या आणि त्यांचे देश दंगली, खून, दहशतवादी हल्ले आणि मतप्रणालींच्या हिंस्त्र लढायांनी विदीर्ण झाले होते. मार्टिन ल्युथर किंग यांची जेव्हा हत्या झाली, त्या दिवशीच्या वॉशिंग्टन शहरातील दंग्यात तुम्ही असता, किंवा मे १९६८ मधे पॅरिसमध्ये असला असतात, किंवा ऑगस्ट १९६८च्या शिकागोमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीत असता, तर तुम्हाला वाटले असते की आता शेवटच आला. जेव्हा वॉशिंग्टन, पॅरिस आणि शिकागो हे अनागोंदीकडे चालले होते, तेव्हा मॉस्को आणि लेनिनग्राड अगदी शांत होते आणि सोव्हिएत राज्यव्यवस्था ही निरंतर टिकण्याचे नशीब घेऊन आल्यासारखे वाटत होती. आणि तरी २० वर्षांनंतर तीच सोव्हिएत व्यवस्था कोलमडली. १९६० मधील संघर्षांनी लोकशाही बळकट झाली तर सोव्हिएत ब्लॉकमधील गुदमरवून टाकणाऱ्या वातावरणाने त्याच्या मृत्यूची आगाऊ सूचनाच दिली.

म्हणून आपण आशा करू की, उदारमतवाद पुन्हा एकदा नवीन रूपात येईल. पण आज त्याच्या समोरील मुख्य आव्हान एकाधिकारशाही वा साम्यवाद नाही, अगदी पावसाळ्यानंतर सगळीकडे पसरणाऱ्या बेडकांसारखे पसरत असलेले स्वार्थी राजकीय पुढारी वा हुकूमशहाही नाहीत. या वेळेस मुख्य आव्हान प्रयोगशाळांमधून आहे.

उदारमतवादाचा पाया आहे माणसाच्या स्वातंत्र्यावर विश्वास. उंदीर आणि माकडांना नसते, पण माणसांना ‘स्वतंत्र   इच्छा’ असते असे मानले जाते. ही स्वेच्छाच मानवी भावना आणि मानवी निवड यांना जगात अंतिम नैतिक आणि राजकीय अधिकार देते. उदारमतवाद आपल्याला सांगतो की, मतदाराला सर्व कळते, ग्राहक नेहमीच बरोबर असतो, आणि आपण आपला विचार केला पाहिजे आणि आपल्या मनाचे ऐकले पाहिजे.

दुर्दैवाने ‘स्वेच्छा’ हे वैज्ञानिक वास्तव नाही. ते मिथक आहे आणि ख्रिश्चन धर्मशास्त्रातून आले आहे. पाप्यांना त्यांच्या वाईट निवडींबद्दल शिक्षा देणे आणि संतांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस देणे यात देव कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी धर्मवेत्त्यांनी ‘स्व-इच्छेची’ कल्पना मांडली. जर आपल्या निवडी मुक्तपणे होत नसतील तर त्यासाठी देवाने आपल्याला शिक्षा अगर बक्षीस का द्यावे? धर्मवेत्त्यांनुसार देवाने असे करणे योग्य आहे, कारण आपल्या निवडींमधे आपल्या आत्म्याच्या स्वेच्छांचे प्रतिबिंब दिसते आणि आत्मे सर्व शारीरिक आणि जीवशास्त्रीय मर्यांदांपलीकडे असतात.

या मिथकाचा आणि विज्ञान आता होमो सेपिअन्स व इतर प्राण्यांबद्दल आपल्याला जे शिकवते, त्याचा काही संबंध नाही. मानवांना निश्चितपणे इच्छा आहे, पण ती स्वतंत्र नाही. तुम्हाला काय इच्छा आहेत हे तुम्ही ठरवू शकत  नाही. आपण अंतर्मुख असावे की बहिर्मुख, आयुष्य सहज घेणारे असावे की चिंतातूर, आनंदी की सरळ हे तुम्ही नाही ठरवत. माणसे निवड करतात, पण त्या निवडी स्वतंत्र नसतात. प्रत्येक निवड जीवशास्त्रीय, सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीवर खूप अवलंबून असते आणि या परिस्थिती तुम्ही ठरवू शकत नाही. काय खायचे, कोणाशी लग्न करायचे, कोणाला मत द्यायचे याची मी निवड करू शकतो, पण या निवडी काही अंशी माझ्या जनुकांवर, माझ्या जीवरसायनावर, माझ्या लैंगिकतेवर, माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर, माझ्या राष्ट्रीय संस्कृती वगैरेवर ठरतात. आणि कोणती जनुके असावीत वा कोणते कुटुंब असावे हे मी निवडलेले नव्हते.

हा काही अमूर्त सिद्धांत नाही. तुम्हाला तो सहजपणे दिसू शकतो. पुढच्या क्षणी आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे लक्ष द्या. तो विचार मनात येण्याची निवड तुम्ही स्वेच्छेने केली होती का? अर्थातच नाही. तुम्ही जर आपल्या मनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केलेत, तर तुमच्या लक्षात येईल की, तिथे काय चालले आहे त्यावर तुमचे अगदीच थोडे नियंत्रण असते, आणि तुम्ही काय विचार करायचा, कोणती भावना येऊ द्यायची आणि आपल्याला काय हवे आहे, याची तुमची निवड पूर्णपणे स्वतंत्र नाही.

‘स्वतंत्र इच्छा’ हे कायमच मिथक असले तरी आधीच्या शतकांमध्ये ते सहायकारी होते. जे लोक उलट तपासण्यांविरुद्ध लढा देत होते, राजे मंडळी, केजीबी, आणि केकेके यांच्या ‘दिव्य’ हक्कांविरोधात लढत होते, त्या लोकांना या मिथकाने धैर्य दिले. त्या मिथकाची काही किंमतही द्यावी लागली. तुमच्या भावना आणि निवडी या जीवरसायनशास्त्र आणि चेताशास्त्र यामुळे होतात, यापेक्षा ‘निवडीच्या पूर्ण स्वातंत्र्यातून’ येतात, यावर विश्वास ठेवण्यात १७७६ आणि १९४५ मध्ये तुलनेने कमी नुकसान होते.

पण आता स्व-इच्छेवरचा विश्वास अचानक धोकादायक होतो. जर सरकारे आणि संस्था माणूस नावाच्या प्राण्यावर डल्ला मारून ताबा मिळवण्यात (हॅक) यशस्वी ठरली, तर जी माणसे पूर्ण स्वायत्त असण्यावर विश्वास ठेवतात, त्यांना हाताळणे सर्वांत सोपे ठरेल.

मानवांवर यशस्वीपणे ताबा मिळवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी आवश्यक असतात- जीवशास्त्राचे चांगले आकलन आणि पुष्कळशी गणनशक्ती. उलटतपासण्या करणाऱ्या न्यायसभा आणि केजीबी यांच्याकडे ते ज्ञान आणि ती शक्ती नव्हती. पण लवकरच सरकारे आणि संस्थांकडे हे दोन्हीही असेल, आणि एकदा का ते तुमच्यावर ताबा मिळवू शकले, तर ते केवळ तुमच्या निवडींचे अंदाजच सांगू शकतील असे नाही, तर तुमच्या भावनांची पुनर्रचनाही करू शकतील. हे करण्यासाठी सरकार आणि संस्थांना तुम्ही पूर्णपणे माहीत असण्याची गरज नाही. ते अशक्य आहे. तुम्ही स्वतःला जितके ओळखता त्यापेक्षा किंचित जास्त त्यांनी ओळखणे गरजेचे आहे. आणि ते अशक्य नाही, कारण बहुतेक लोक स्वतःला नीट ओळखत नाहीत.

तुमचा जर पारंपरिक उदारमतवादावर विश्वास असेल, तर तुम्हाला हे आव्हान सरळ फेटाळायचा मोह होईल. “छे, असे कधीच होणार नाही. कोणालाही माणसाच्या आत्म्यावर कधी डल्ला मारता येणार नाही. कारण तो जनुके, चेतापेशी आणि गणनविधी (algorithms) यापलीकडे असतो. माझ्या निवडींचे अंदाज वर्तवण्यात आणि त्यात ढवळाढवळ करण्यात कोणीच यशस्वी होणार नाही, कारण माझ्या निवडी म्हणजे माझ्या इच्छा स्वातंत्र्याचं प्रतिबिंब आहे.” दुर्दैवाने आव्हान फेटाळण्याने ते संपणार नाही. ते तुम्हाला त्यासंदर्भात अधिक असुरक्षित बनवेल.

साध्या गोष्टींपासून याची सुरुवात होते. तुम्ही जेव्हा इंटरनेटवर काही बघत असता, तेव्हा एक ठळक बातमी तुमच्या दृष्टीस पडेल- “स्थलांतरितांच्या टोळीचा स्थानिक स्त्रीवर बलात्कार.” तुम्ही त्यावर क्लिक करता. अगदी त्याच क्षणी तुमची शेजारीणही इंटरनेटवर आहे, आणि एक वेगळी ठळक बातमी तिचे लक्ष वेधून घेते - “ट्रम्प यांची इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची तयारी”. ती त्यावर क्लिक करते. दोन्ही ठळक बातम्या खोट्या आहेत, कदाचित रशियाच्या ट्रोल्सकडून तयार केलेल्या, किंवा जाहिरातींपासूनचे आपले उत्पन्न वाढावे, या उद्देशाने प्रेक्षकसंख्या वाढण्यासाठी एखाद्या वेबसाईटने तयार केलेल्या. तुम्ही आणि तुमच्या शेजारीण दोघांनाही वाटते की, तुम्ही त्या मथळ्यांवर तुमच्या स्वतःच्या इच्छेने क्लिक केले, पण खरे तर डल्ला मारून तुमचा ताबा घेण्यात आला आहे.

अर्थात प्रचारतंत्र आणि फेरफार काही नवीन नाहीत. पण पूर्वी त्याचा वापर सरसकट होता, आता अत्यंत नेमके नेम धरून केला जातो. जेव्हा हिटलरने रेडिओवर भाषण केले, तेव्हा त्याने सर्वांत सामान्य माणसांना उद्देशून सरसकटपणे  केले, कारण तो प्रत्येकाच्या मेंदूतील विशिष्ट मर्मस्थानावर बेतून संदेश देऊ शकत नव्हता. आता नेमके हेच करणे शक्य आहे. आता गणनविधी (algorithm) सांगू शकतो की, तुमच्या मनात स्थलांतरितांबद्दल आधीच पूर्वग्रह आहेत, तुमच्या शेजारणीला पहिल्यापासून ट्रम्प आवडत नाहीत, म्हणूनच तुम्हाला एका बातमीचा मथळा दिसतो तर शेजारणीला अगदीच वेगळा. अलीकडील काही वर्षांत जगातल्या काही अतिहुशार मंडळींनी मानवी मेंदूवर डल्ला मारण्यासाठी अशा प्रकारे काम केले आहे, जेणेकरून तुम्ही जाहिरातींवर क्लिक केले रे केले की, वस्तू विकता येतील. आता या पद्धती राजकारणी लोक आणि मतप्रणाली तुमच्या गळी उतरवण्यासाठीही वापरल्या जात आहेत.

आणि ही फक्त सुरुवात आहे. सध्या हे डल्ला मारणारे लोक सिग्नल्सच्या विश्लेषणावर आणि बाहेरील जगातील कृतींवर अवलंबून आहेत - तुम्ही कोणती उत्पादने खरेदी करता, कुठे जाता, संगणकावर कोणते शब्द शोधता. मात्र अगदी काही वर्षांतच या मंडळींसाठी बायोमेट्रिक सेन्सर्स तुमच्या आतल्या दुनियेची दारे उघडी करतील आणि तुमच्या हृदयात काय चालले आहे, हे त्यांना कळेल. मुक्त कल्पनाविलासाला प्रिय असलेले रूपकात्मक हृदय नाही, तर तो मांसल पंप, जो तुमच्या रक्तदाबावर आणि मेंदूच्या अनेक क्रियांवर नियंत्रण ठेवतो. मग हे डल्ला मारणारे तुमच्या हृदयाच्या गतीची सांगड तुमच्या क्रेडिट कार्डमधील माहितीशी घालू शकतील आणि तुमच्या रक्तदाबाची सांगड तुम्ही इंटरनेटवर काय काय शोधलेत त्याच्याशी. तुमची मनःस्थिती आणि तुमच्या आवडींकडे सातत्याने लक्ष ठेवून असणाऱ्या हातातल्या बायोमेट्रिक कड्यांचा वापर उलटतपासण्या करणारी न्यायासाने आणि केजीबीने कसा केला असता? लक्ष ठेवत रहा.

दमनकारी सरकारे आणि कट्टरधर्मियांकडून होणाऱ्या बाह्य हल्ल्यांविरोधात उदारमतवादाने वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी युक्तिवाद आणि संस्थांचा प्रभावी दारूगोळा विकसित केला आहे. पण जेथे व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला घातला जातोय, आणि जेथे ‘व्यक्ती’ आणि ‘स्वातंत्र्य’ या शब्दांनाच फारसा अर्थ उरला नाही, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी उदारमतवाद सज्ज नाही. २१ व्या शतकात टिकून राहण्यासाठी आणि उन्नती होण्यासाठी माणूस ही स्वतंत्र व्यक्ती आहे हा भोळसट दृष्टीकोन सोडून दिला पाहिजे, (हा दृष्टीकोन जसा ख्रिश्चन धर्मशास्त्रातून आला, तसाच नंतरच्या आधुनिक ज्ञानातूनही आला) आणि मानव खरे काय आहेत हे स्वीकारले पाहिजे. म्हणजे ते डल्ला मारून ताब्यात घेता येऊ शकणारे प्राणी आहेत. आपण स्वतःला अधिक चांगले जाणून घेतले पाहिजे.

अर्थात हा काही नवीन सल्ला म्हणता येणार नाही. पूर्वीपासून साधूसंत लोकांना सतत सांगत आले ‘स्वतःला जाणा’. तरी सॉक्रेटिस, बुद्ध आणि कन्फ्युशियस यांच्या काळात तुम्हाला खरी स्पर्धा नव्हती. तुम्ही जर स्वतःला ओळखण्याकडे दुर्लक्ष केलेत तरी बाकीच्या लोकांना ते तेव्हा कळत नसे. याउलट आता तुम्हाला स्पर्धा आहे. तुम्ही या ओळी वाचत असताना सरकारे आणि महामंडळे तुमचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही स्वतःला जितके ओळखता, त्यापेक्षा जास्त जर त्यांनी तुम्हाला ओळखले तर त्यांना पाहिजे ती गोष्ट ते तुम्हाला विकू शकतील- मग ती एखादी वस्तू असेल वा राजकारणी.

तुमची मर्मस्थाने कळणे हे विशेष महत्त्वाचे असते. जे तुमचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी ते प्रमुख साधन असते. आधीच अस्तित्वात असलेल्या सदोष कोड लाईन्सद्वारे संगणकांवर डल्ला मारून त्यांचा ताबा घेतला जातो. माणसांवर ताबा त्यांच्या मनात असलेली भीती, तिरस्कार, पूर्वग्रह आणि लालसा याद्वारे मिळवला जातो. हे ताबा घेणारे शून्यातून भीती किंवा तिरस्कार निर्माण करू शकत नाहीत. पण लोकांच्या मनात अगोदरच असलेली भीती आणि तिरस्कार जेव्हा त्यांच्या लक्षात येतो, तेव्हा संबंधित भावनिक बटणे पुढे करून उलट आणखी क्षोभ भडकवणे सोपे होते.

जर स्वप्रयत्नातून लोक स्वतःला जाणून घेऊ शकत नसतील, तर कदाचित हे डल्लामारू जे तंत्रज्ञान वापरतात, त्याचाच उलट वापर करून स्वतःला सुरक्षित करता येईल. जसा तुमच्या संगणकात व्हायरस नष्ट करणारा कार्यक्रम असतो, तसा कदाचित आपल्या मेंदूसाठी आपल्याला आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या सहायकाला अनुभवाने तुमचे विशिष्ट मर्मस्थान कळेल- मग ते मजेदार मांजरींच्या व्हिडिओचे असेल किंवा चीड आणणाऱ्या ट्रम्प कथा असतील - तो तुमच्या वतीने त्या ब्लॉक करेल.

पण हा खरे तर मूळ मुद्दा नाही. जर माणसे ही ताब्यात घेता येण्याजोगे प्राणी असतील आणि जर आपल्या निवडी व मते म्हणजे आपले इच्छा स्वातंत्र्य नसेल तर राजकारणाचा मुद्दा काय असला पाहिजे? ३०० वर्षे उदारमतवादी आदर्शांनी अशा राजकीय धारणेला उत्तेजन दिले, जिचे ध्येय जास्तीत जास्त लोकांना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षांचा पाठपुरावा करण्याची क्षमता देईल. आपण कधी नव्हे इतके त्या ध्येयपूर्ती जवळ आलो आहोत. पण आपण कधी नव्हे इतके हेही कळण्याच्या जवळ आहोत की, हे सर्व भ्रामक कल्पनेवर आधारलेले होते. माणसांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा म्हणून आपण जे तंत्रज्ञान शोधले, त्याच तंत्रज्ञानाने स्वप्नांची पुनर्रचना करणेही शक्य होते. मग मी माझ्या स्वप्नांवर कसा विश्वास ठेवू?

एका दृष्टीकोनातून बघितले तर हा शोध माणसांना अगदी वेगळ्याच प्रकारचे स्वातंत्र्य देतो. पूर्वी आपल्या इच्छा आपण नीट ओळखत होतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा कोणताही विचार मनात यायचा, तेव्हा त्याच्या पूर्तीसाठी आपण धावायचो. रोलरकोस्टरसारखे वरखाली होणारे विचार, भावना आणि इच्छा मनात ठेवून आपण इकडेतिकडे वेड्यासारखे धावण्यात दिवस घालवले आहेत, ज्याला आपण इच्छास्वातंत्र्य समजण्याची चूक केली. या रोलरकोस्टरशी संबंध ठेवणे आपण बंद केले तर? आपल्या मनात येणाऱ्या विचाराकडे नीट लक्ष देऊन आपण स्वतःला विचारले – ‘हा कुठून आला? तर काय होईल?

सुरुवात करणाऱ्यांसाठी- आपले विचार आणि इच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छांचे प्रतिबिंब नाही हे कळल्यावर आपण त्याबाबत कमी पछाडले जाऊ. मी जर स्वतःला अगदी मुक्त समजत असेन, माझ्या इच्छा जगापासून संपूर्णपणे स्वायत्तपणे निवडत असेन, तर मी आणि इतरांच्यात तो एक अडथळा निर्माण होतो. मला खरोखरच ते इतर कोणी नको आहेत – मी स्वतंत्र आहे. माझ्या प्रत्येक लहरीला एकदम प्रचंड महत्त्व येते. शेवटी विश्वातील सर्व संभाव्य इच्छांमधून मी ही विशिष्ट इच्छा निवडलेली असते. जेव्हा आपण आपल्या इच्छांना इतके महत्त्व देतो, तेव्हा आपण साहजिकच त्यानुसार सर्व जगावर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या लहरींखातर आपण युद्ध करतो, जंगले तोडतो, आणि पूर्ण पर्यावरणाचे असंतुलन करतो. पण जर आपल्याला कळले की, आपल्या इच्छा या आपल्या इच्छा स्वातंत्र्यातून आलेल्या नाहीत, तर कदाचित आपण त्यांत कमी गर्क होऊ आणि इतर जगाशीही अधिक जोडले जाऊ.

काही वेळेस लोकांना वाटतं की, जर आपण ‘स्वइच्छे’बद्दल असलेला समज सोडून दिला, तर आपण पूर्णपणे उदासीन होऊ आणि कुठेतरी कोपऱ्यात पडून राहून उपाशी मरू. खरे तर या भ्रमापासून दूर जाण्याने दोन विरुद्ध परिणाम होतील. पहिला, उर्वरित जगाशी एक मजबूत दुवा निर्माण होईल आणि तुम्हाला तुमच्या परिसराबद्दल, दुसऱ्यांच्या गरजा व इच्छांबद्दल अधिक सजग बनवेल. तुम्ही जेव्हा कोणाशीतरी संवाद करता, तेव्हा होतं तसं. जर तुम्हाला काय म्हणायचंय याकडेच तुम्ही लक्ष केंद्रित करत असाल, तर तुम्ही फारच कमी ऐकत असता. तुम्ही तुमचेच ऐकवायला टपलेले असता. पण जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे विचार बाजूला ठेवता, तेव्हा तुम्ही अचानक इतर लोकांचे आवाज ऐकू लागता.

दुसरे, स्वेच्छेचे मिथक सोडून देण्याने खोल असलेली उत्सुकता जागृत होऊ शकते. जर तुमच्या मनात उमटणाऱ्या विचार आणि इच्छांशी तुमचे घनिष्ट नाते असेल तर स्वतःला जाणून घेण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागत नाहीत. तुम्हाला वाटतं तुम्हाला माहीत आहेच, तुम्ही कोण आहात. पण एकदा तुम्हाला कळलं, “अरे, हा मी नाही. ही काहीतरी बदलती जीवरासायानिक घटना आहे” की, मग तुम्हाला हेही कळतं की तुम्ही खरे कोण किंवा काय आहात याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही. कोणीही माणूस हाती घेऊ शकेल अशा शोधाच्या अत्यंत रोमहर्षक प्रवासाची ही सुरुवात असू शकते.

इच्छा स्वातंत्र्याबद्दल शंका घेणे किंवा माणसाचे खरे स्वरूप समजावून घेण्यात नवीन काहीच नाही. आपण मानवांनी अशा चर्चा यापूर्वी हजारो वेळा केल्या आहेत. पण पूर्वी आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हते. आणि तंत्रज्ञान सर्व काही बदलून टाकते. तत्त्वज्ञानातीत पूर्वीच्या समस्या आता इंजिनिअरिंग आणि राजकारणातील वास्तवातील समस्या झाल्या आहेत. आणि तत्त्वज्ञानी मंडळींकडे खूप संयम असतो - ते कशातरीबद्दल कोणत्याही निष्कर्षाविना ३००० वर्षे वाद घालू शकतात- इंजिनिअर असलेल्यांमध्ये इतका संयम नसतो. राजकारणी तर सर्वांत कमी संयमी असतात.

ज्या युगात सरकारे आणि महामंडळे मानवी मनाचा ताबा घेऊ शकतात, तेव्हा उदारमतवादी लोकशाही कशा प्रकारे काम करते? ‘मतदार सर्व जाणतो’ आणि ‘ग्राहक नेहमीच बरोबर असतो’ या विश्वासाचे काय होते? तुम्ही ताबा घेतले जाऊ शकणारे प्राणी आहात, तुमचे हृदय हे सरकारचे दलाल असू शकते, हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही कसे जगता? तुमच्या मेंदूतला भावनांचा अनुभव घेणारा भाग पुतीनसाठी काम करू शकत असेल आणि तुम्ही स्वतःला जाणता त्यापेक्षा तुम्हाला अधिक जाणणाऱ्या गणनविधीचा (algorithm) परिणाम म्हणून तुमच्या मनात येणारा विचार असेल हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही कसे जगता? मानवजातीला आता पडलेले हे अत्यंत रोचक प्रश्न आहेत.

............................................................................................................................................................

युव्हाल नोआ हरारी यांच्या ‘सेपिअन्स’ आणि ‘होमो डेउस’ या पुस्तकांच्या मराठी अनुवादांच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4641/Sapiens---Homo-Deus-Combo-Set

............................................................................................................................................................

दुर्दैवाने हे प्रश्न बहुसंख्य लोकांकडून विचारले जात नाहीत. ‘स्वइच्छेच्या’ भ्रमापलीकडे काय आहे ते शोधण्याऐवजी सर्व जगभरातील लोक आणखी जुन्या भ्रामक कल्पनांचा आसरा घेऊ पाहात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि जैवअभियांत्रिकी आव्हानाला तोंड देण्याऐवजी अनेक जण धार्मिक आणि राष्ट्रवादी कल्पनारम्यतेकडे वळत आहेत आणि या कल्पना तर उलट आजच्या काळातील वैज्ञानिक वास्तवाशी उदारमतवादापेक्षाही कमी संबंधित आहेत. नवीन राजकीय आदर्शांपेक्षा विसाव्या शतकातील किंवा अगदी मध्ययुगातलेही उरलेले असे पुनर्संचयित करून आपल्याला देऊ केले जात आहे.

जेव्हा तुम्ही या स्मरणरंजनात गुंतता, तेव्हा तुम्ही ‘बायबल’मधील सत्य आणि राष्ट्राचे पावित्र्य यासारख्या गोष्टीबद्दल वाद घालता. (विशेषतः माझ्यासारखे तुम्हीही इस्त्रायलमध्ये राहात असाल तर.) एक अभ्यासक म्हणून हे निराशाजनक आहे. व्हॉल्टेअरच्या काळात ‘बायबल’बद्दल वाद घालणे हा असामान्य गुण होता - आणि राष्ट्रवादाच्या  योग्यायोग्यतेबद्दल शंभर वर्षांपूर्वी चर्चा करणे ही तत्त्वज्ञानाची प्रगती होती - पण २०१८ मध्ये हे करणे म्हणजे वेळ व्यर्थ दवडणे वाटते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवअभियांत्रिकी हे उत्क्रांतीचा मार्गच बदलू पाहात आहेत आणि त्यांचे काय करायचे ते कळायला आपल्यापाशी काही दशके आहेत. उत्तरे कुठून मिळणार आहेत, हे मला माहीत नाही, पण हे निश्चित की ती हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथांमधून नक्कीच मिळणार नाहीत.

मग काय करायचे? आपल्याला एकच वेळी दोन आघाड्यांवर लढण्याची गरज आहे. आपण उदारमतवादी लोकशाहीचे समर्थन केले पाहिजे. इतर पर्यायांपेक्षा ती सरकारचे अधिक सौम्य रूप असल्याचे सिद्ध झाली आहे म्हणूनच केवळ नाही, तर त्यात मानवाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यात कमीतकमी मर्यादा आहेत म्हणूनही. त्याच वेळी आपण उदारमतवादासंबंधीच्या पारंपरिक गृहीतकांबद्दल प्रश्न विचारणे आणि २१व्या शतकातील वैज्ञानिक वास्तवाशी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याशी सुसंगत असणारी नवीन राजकीय योजना विकसित करणे गरजेचे आहे.

ग्रीक पौराणिक कथा सांगतात की, झ्यूस आणि पोसायडन हे दोन महान देव यांच्यात थेटस या देवतेशी विवाह करण्यात स्पर्धा होती. पण जेव्हा त्यांनी हे भविष्य ऐकले की, थेटसच्या पोटी जन्माला येणारा पुत्र त्याच्या पित्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली असेल, तेव्हा त्यांनी भिऊन काढता पाय घेतला. देव अमर राहण्याची योजना असल्याने त्यांना आपल्याशी स्पर्धा करू शकेल, असे अधिक सबल अपत्य नको असते. म्हणून थेटसने मर्त्य मानवाशी- राजा पेलीयसशी विवाह केला आणि अकीलसला जन्म दिला. मर्त्य लोकांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा अधिक कर्तबगार असावे हे आवडते. ही गोष्ट आपल्याला काही महत्त्वाचे शिकवू शकेल. ज्यांना निरंतर सत्ता गाजवायची असते असे हुकूमशहा, त्यांना उलथवून टाकू शकणाऱ्या कल्पनांच्या जन्माला उत्तेजन देत नाहीत. पण उदारमतवादी लोकशाही नवीन दृष्टिकोनांच्या निर्मितीला प्रेरणा देते, अगदी तिच्या मूलाधाराबद्दल प्रश्न केले गेले तरी.

अनुवाद - माधवी कुलकर्णी

............................................................................................................................................................

‘द गार्डियन’मधल्या मूळ इंग्रजी लेखासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 15 April 2019

युव्हाल नोआ हरारी यांचं एक विधान महत्त्वाचं वाटलं : >> उत्तरे कुठून मिळणार आहेत, हे मला माहीत नाही, पण हे निश्चित की ती हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथांमधून नक्कीच मिळणार नाहीत. >>. काय गंमत आहे. हरारी बुवांना नेमका प्रश्न विचारता येत नाहीये, पण उत्तर मात्र हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथांमधून मिळणार नाही याची खात्री आहे. हा एक प्रकारचा पूर्वग्रहच नव्हे काय? बायबल हा विस्कळीत ग्रंथसमूह असल्याने तिथून फारशा अपेक्षा नाहीत. पण महाभारत व रामायण हे तर सुरचित ग्रंथ आहेत ना? तिथे प्रश्नतरी शोधायला हवा ना? अगदी रामायण व महाभारत सोडले तरी हिंदूंची नीतिशास्त्रे व इतर वैदिक वाङ्मयाचा भलाथोरला खजिना आहे ना? तो उपसायला हवाय ना? एव्हढा बोध जरी भारतीय बुद्धीजीवी वर्गाने घेतला तरी पुरे आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......