अजूनकाही
सार्वजनिक क्षेत्रातील प्रसारणाला ‘पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ म्हणतात! अमेरिकेसारख्या खाजगी प्रसिद्धी माध्यमांनी गजबजलेल्या देशात ‘पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ याच नावाची एक वाहिनी असून तीही लोकप्रिय, मनोरंजक आणि प्रबोधन करणारी मानली जाते.
भारतात प्रसारभारतीच्या अधिपत्याखालील दूरदर्शन, आकाशवाणी या संस्था सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात मोडतात. सुप्रसिद्ध बीबीसी हे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन सार्वजनिक क्षेत्रात गणले जाते. खाजगी क्षेत्रातील माध्यमे आपापली धोरणे, हितसंबंध, राजकीय कल आणि श्रोता-प्रेक्षक वर्ग यांप्रमाणे कार्य करतात.
सार्वजनिक म्हणजे तसे सरकारी माध्यमच! सरकारी बाजू, धोरणे, घोषणा, कार्यक्रम यांचा प्रचार आणि देशाच्या संविधानात्मक मूल्यांची रुजवण, यांसाठी या माध्यमांचा उपयोग होत असतो. पण सरकारी माध्यमे सत्ताधारी या एकाच पक्षाची प्रसिद्धी करण्यात गुंतलेली अन खाजगी माध्यमांवर सरकार चालवणाऱ्या पक्षाचा प्रचंड दबाव, यामुळे वस्तुस्थिती कळेनाशी होते. वास्तव दडपले जाते. प्रत्यक्ष आणि प्रतिमा, घोषणा आणि व्यवहार यांमधील तफावत सांगू दिली जात नाही. अशा वेळी पर्यायी माध्यमे जन्मतात!
इंटरनेटवर आधारलेली माध्यमे प्रस्थापितांची जागा घेऊ लागताच, त्यातही कबजा करण्यात सराईत झालेल्या सत्ताधारी पक्षाने मांड ठोकली. झाले! पत्रकारितेची गळचेपी इतकी झाली की, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीवेळचे सेन्सॉर अधिकारी फारच प्रेमळ व लडिवाळ वाटू लागले! ‘आमची नोकरी घालवू नका रे!’ अशी वत्सल तंबी देऊन ते नको तेवढ्या बातम्या कापायला लावत. आताचे अधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वचकून निष्प्रभ झालेले! त्यामुळे आता पक्षच सेन्सॉरशिप करत राहतो. ‘पत्रकारांनो, नोकरी घालवून घ्यायची का?’ अशी डरकाळी फोडून ते फक्त नजरेच्या पल्लवीने कोण, काय, किती, कसे, का, कधी हे सहा ‘क’कार वगळायला सांगतात. या सहा ‘क’कारांनी बातमी बनत असते. ‘ ‘त’ म्हणता ‘ताकभात’ ’, तसे आता ‘ ‘क’ म्हणता ‘कपात’ ’ होत राहते, अवघ्या देशातील न्यूजरूममध्ये!
महाराष्ट्रात अशा वेळी ‘राज ठाकरे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ सुरू झाली, ही नक्कीच आशादायी, स्वागतार्ह आणि अनिवार्य अशी गोष्ट झाली! त्यांच्या भाषणात बातमी, अग्रलेख, व्यंगचित्र, भाष्य, दृश्यात्मक पुरावे, संवाद आणि निवेदन, निरीक्षण, प्रत्यक्ष भेट आणि निष्कर्षही असतो. म्हणजे ‘ट्राय’च्या नव्या नियमांनुसार कोणत्याही वाहिनीचे प्रक्षेपण आम्ही पाहिले तरी त्यांत जे मिळणार नाही, ते ठाकरे यांच्या प्रसारणात आम्हाला मिळते!
पत्रकारांनी कॅमेरापर्सनला घेऊन जे दाखवायचे, ते आता चक्क एक राजकीय पुढारी करू लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणांची पोकळ स्थिती, सरकारी कार्यक्रमांचा बोजवारा, अशा अनेक गोष्टी पत्रकारांनी दाखवायच्या असतात. त्यांनी हे काम करणे कधीचेच सोडून दिल्याने राज ठाकरे यांना आपली स्वत:ची एक ‘वार्ता-विश्लेषण सेवा’ सुरू करावी लागली आहे.
राज ठाकरे तसे एक चांगले वक्ते आहेत. त्यांचे निवडणूक प्रचारातील आगमन हीसुद्धा उत्साहवर्धक बाब होय. सध्या प्रचारसभा म्हणजे निव्वळ निरुत्साहाचा अन नाउमेदीचा नमुना! प्रचारसभांमधून वक्त्यांचे भाषिक कौशल्य दिसते. मुद्द्यांची नेमकी मांडणी, श्रोत्यांना किस्से, विनोद, तत्त्वज्ञान, स्वानुभव, इतिहास, राजकारण, विचार इ. सांगत सांगत प्रचार होत असतो. परंतु सारेच पक्ष एकतर पाणचट व वाह्यात भाषा वापरणाऱ्यांची ‘होळी’ झाले आहेत. वाचन नाही की अभ्यास आणि चिंतन नाही की श्रवण!
उगाच त्या पार्थ पवारची चेष्टा करण्यात आली! प्रीतम मुंडे, संतोष दानवे, अतुल सावे, पूनम महाजन हे संघपरिवारातील घराणेशाहीचे प्रतिनिधी जणू फर्डे वक्ते आहेत म्हणून जिंकतात!! महाराष्ट्र केवढा प्रगल्भ अन लोकप्रिय वक्त्यांचा प्रदेश होता!!! आता गुत्तेदार, उद्योजक, बिल्डर, संस्थाचालक, शेतकरी यांसारखे व्यवसाय नोंदवणारे उमेदवार उभे ठाकताच श्रोत्यांना कंटाळा आणतात. आज पैश्याचे महत्त्व वाढले, ते चांगल्या वक्त्यांच्या अभावामुळेच.
ठाकरे कुटुंबच तसे लोकशाही अन लोकशाहीचा चौथा खांब यांचा फार पुळका नसलेले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची ‘पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ प्रदीर्ष काळ चालणार नाही. शिवाय ती अंगलटही येऊ शकते. डझनभर आमदार आणि महापालिका हातात असताना मनसेला काही जमले नाही. आता तिची टिंगल ‘उनसे’ अशी होत असली, तरी ती जे माध्यमांनी करायचे असते, ते करते आहे. त्यामुळे ते लोकशाही सावरण्याचेही कार्य आहे असे आम्ही मानतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशत व दबाव वापरून जे वास्तव दडपून टाकले, ते राज ठाकरे उकरून काढत आहेत.
त्यातून महाराष्ट्राचे नवनिर्माण आरंभले तर ते कोणाला नको असेल?
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment