अजूनकाही
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाने इतिहास घडवला! हे भाषण सुरू होते, त्या वेळेला ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘बुनियाद’ या टीव्ही मालिकांचे दिवस आठवले! या मालिकांचे दूरदर्शनवर प्रक्षेपण सुरू असताना गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या व्यक्तीच्या कानावर फक्त तोच एक आवाज यायचा. राज ठाकरेंचे भाषण सुरू असतानाही अख्ख्या महाराष्ट्रात त्या थेट प्रक्षेपणाच्या काळात फक्त त्यांचाच आवाज ऐकायला येत होता. साम आणि TV9 ला तर या भाषणाने टीआरपी मिळवून दिलाच, पण आज यूट्यूबवरही सर्वांत अधिक बघितला गेलेला तोच व्हिडिओ आहे. दोन दिवस उलटून गेल्यावरही मराठी चर्चाविश्वात त्याच भाषणाची चर्चा होते आहे. बीबीसी हिंदी आणि एनडीटीव्हीनेही या भाषणाची दखल घेतली. या निमित्ताने राज ठाकरेंनी थेट देश पातळीवर झेप घेतली आहे. येणाऱ्या दिवसांत निवडणुका संपेपर्यंत ते आणखी दौरे करणार आहेत असे त्यांनी सांगितले. जिथे जिथे त्यांचे भाषण होईल, तिथला भाजप-शिवसेनेचा उमेदवार पडेल असे आजच बोलले जात आहे. हिंदी समजू शकणाऱ्या विदर्भात जर एखादे भाषण त्यांनी हिंदीत दिले तर (‘गोदी मीडिया’चा भाग नसलेल्या) राष्ट्रीय हिंदी टीव्ही वाहिन्यांमध्ये त्याच्या प्रक्षेपणासाठी चढाओढ लागेल, इतके आर्थिक मूल्य राज ठाकरेंच्या भाषणाला आले आहे.
खरे तर राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात काहीही नवीन सांगितले नाही. सजग वाचक, पत्रकार, राजकीय नेत्यांना आणि सोशल मीडियावर कृतिशील अथवा स्थितीशील का होईना, पण हजर असलेल्यांना, ठाकरेंनी भाषणात मांडलेले सर्व मुद्दे आधीपासूनच माहीत होते. राष्ट्रीय वाहिन्या आणि छापील दैनिकांच्या चाळणीत अडकून बसलेली बरीचशी माहिती राज ठाकरेंनी जल्पकावरून घेऊन आपल्या भाषणाच्या वेळी स्क्रीनवर दाखवली. भाजपशासित राज्यांच्या गोरक्षण संस्थांमध्ये गायी भुकेने मरत असल्याचे चित्र आपण व्हॉट्सअॅपवर पाहिले नव्हते काय? पाहिले होते. पण ही माहिती आपल्याला छापील दैनिकांनी आणि राष्ट्रीय वाहिन्यांनी दाखवली नव्हती. म्हणजेच ती आपल्यापर्यंत राजमार्गाने न येता आडमार्गाने आली होती. ठाकरेंनी ती बेधडक शिवाजी पार्कच्या सभेत दाखवून त्याला एक विश्वासार्हता मिळवून दिली. ज्यांच्या मनात व्हॉट्सअॅपवर पाहिलेल्या त्या मृत गायींच्या चित्राबद्दल काही किंतु, परंतु असतील, तर ते निघून गेले. परिघावर असलेली मने राज ठाकरेंनी पूर्णतः वळवली!
लोकांना त्या भाषणातील ठाकरेंची मोदीविरोधी मांडणीइतकीच विश्वासार्ह वाटली, ती त्यांची राजकीय भूमिका. मनसेला निवडणूक लढवायचीच नव्हती, ही भूमिका त्यांनी ठोसपणे मांडली. काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेला गृहीत धरणारे कोण? असा सवाल खडा केला. आणि मग मोदी-शहा जोडीला झोडपायला सुरुवात केली. या पूर्वीही अनेकदा पंतप्रधान कोण होणार याचा विचार न करता लोकांनी मते दिली. जे पंतप्रधान झाले त्यांनी आपापल्या परीने देशाला पुढे नेले. आताही कुणीही पंतप्रधान होऊ शकते. राहुल गांधी पण होऊ शकतात आणि देशाचे भले करू शकतात, पण मोदी-शहा नकोत, अशी त्यांची एकूण मांडणी होती. म्हणजे राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी मनसेने अनुमोदन दिले, पण ते याच निवडणुकीपुरते असा त्याचा अर्थ. पण याचा अर्थ हा मुळीच नाही की, काँग्रेस-राष्ट्रवादीला ठाकरेंच्या लोकप्रियतेची भविष्यात डोकेदुखी होणार नाही. अनेक राजकीय निरीक्षकांनी ही गोष्ट आजच लक्षात आणून दिली आहे. काँग्रेस-भाजप यांच्या विरोधात तिसरी आघाडी हवी, असे ज्या पुरोगाम्यांना वाटत होते, त्यांनाही ठाकरेंच्या निमित्ताने एक पर्याय आजपासूनच दिसू लागला आहे.
तर दुसरीकडे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’ने आजच्या या संकटसमयी काँग्रेसशी युती करून आधी मोदी-शहा यांना हटवावे आणि नंतर मग काँग्रेसला एक सशक्त पर्याय द्यावा, असे वाटणारा एक मोठा वर्ग सध्या महाराष्ट्रात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अॅड. आंबेडकरांची आघाडी झाली असती, तर जिथे जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यावे लागणार तिथल्या पुरोगाम्यांना ते ‘सत्पात्री दान’ दिल्यासारखे वाटले असते. त्यांचा अॅड. आंबेडकरांनी पुरता भ्रमनिरास केला. आता भाजपविरोधी मत वाया जाऊ नये म्हणून त्यांना जड अंतःकरणाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यावे लागणार आहे. विदर्भातले आंबेडकरवादी तर गावोगावी सभा घेऊन दलितांनी वंचितला मते देऊन भाजपविरोधी मते विभाजित न करता फक्त अन फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करावे, असे सांगत आहेत.
विविध सर्वेक्षणांचे निवडणूकपूर्व निकाल यायला लागले आहेत. त्यात ‘वंचित बहुजन आघाडी’ला किमान अकोल्याची जागा मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात नाही आहे. त्यात पुन्हा सोलापूर आणि अकोल्याची निवडणूक एकाच दिवशी येते. या दोन्ही ठिकाणी अॅड. आंबेडकर उभे आहेत. त्यामुळे हाही एक ‘रिस्क फॅक्टर’ त्यांच्या बाबतीत आहेच. त्याऐवजी अॅड. आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली असती तर वंचितचे किमान सहा खासदार बनले असते, त्याआधारे लगेच येणाऱ्या विधानसभेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर वंचितला दमदार पाऊल टाकता आले असते. भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकलणारा पुरोगामी पर्याय महाराष्ट्राला-देशाला मिळाला असता…
आज तरी निवडणूक न लढवण्याचे शहाणपण दाखवणारे राज ठाकरे उद्याची पुरोगामी मते मिळवून भाजप-काँग्रेसला मनसेचा पर्याय देऊ शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना तर गेल्या पाच वर्षांत भाजपशी कलगीतुरा केल्यावर या निवडणुकीत कोणत्या तोंडाने मते मागणार, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडतो आहे. उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांचा फोटो असलेल्या युतीचा प्रचार करणाऱ्या बॅनरवर धनुष्यबाणाचे बारीकसही चिन्ह नसते, केवळ कमळ असते. ही निवडणूक शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईला चालना देणारी ठरू शकते.
शिवसेनेची हीच पोकळी भविष्यात राज ठाकरे भरून काढू शकतात. या लोकसभेच्या निवडणुकांतल्या त्यांच्या सभा ‘लढाई’पूर्वीची ‘अंगडाई’ ठरू शकतात. याउलट ‘वंचित बहुजन आघाडी’चे ‘तेलही गेले नि तूपही गेले’ अशी गत होऊ शकते.
.............................................................................................................................................
लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
prajwalat2@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Hemant Mirje
Thu , 25 April 2019
राज ठाकरेंची देहबोलीच भाव खाऊन जाते, आणि धाडस म्हणावं तर त्याला उपमा नाही
Hemant Mirje
Thu , 25 April 2019
सत्य नेहमी कटू असत म्हणतात ते खरं आहे, आंबेडकरांनी सुवर्ण संधी घालवली।
Gamma Pailvan
Thu , 11 April 2019
च्यायला म्हणे वंचित बहुजन आघाडी! भारतातला बहुजन वंचित कधीच नव्हता. इंग्रजी राज्यात मात्र तो देशोधडीला लागला. वंबआवाले मात्र त्यासाठी ब्राह्मणांना दोष देतात. भ्रामक इंग्रजी कल्पना वापरून ते बहुजनांना म्हणे सुबत्तेच्या वाटेवर नेणारेत. बोंबला तिच्यायला! -गामा पैलवान
Ravikant Ughade
Tue , 09 April 2019
उज्ज्वला तट्टे यांना किती रुपये दिले आहेत वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्यासाठी.