‘द केन म्युटिनी’ : अपरिहार्य बंडाची करुण कहाणी
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘द केन म्युटिनी’चं एक पोस्टर
  • Tue , 20 December 2016
  • न-क्लासिक द केन म्युटिनी The Caine Mutiny हम्फ्री बोगार्ट Humphrey Bogart फिलिप फ्रान्सिस क्वीग Phillip Francis Queeg

१९९९मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने क्लासिक अमेरिकी ड्रामापटांमधला सर्वांत महान नट म्हणून हम्फ्री बोगार्टचा सन्मान केला... अर्थातच मरणोत्तर! कारण १९५७मध्येच बोगार्ट सर्व मानसन्मानांच्या पलीकडे गेला होता. पण अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यात कणभरही अतिशयोक्ती नव्हती. ग्रेगरी पेक, कॅरी ग्रँट यांसारखे देखणे कलाकार स्वतःच्या उपजत चार्मिंग व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्या काळातल्या तरुणींना भुरळ पाडत रुपेरी पडदा गाजवत असतानाच्या काळात ओबडधोबड चेहऱ्याचा, चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव खेळवत वावरणारा बोगार्टचा शैलीदार नायक प्रेक्षकांना कमालीचा आवडून गेला. उण्यापुऱ्या ५७ वर्षांच्या आयुष्यात बोगार्टने ७५हून अधिक चित्रपट केले. त्यातले बहुतांशी केवळ यशस्वीच नव्हे, तर मापदंड निर्माण करणारे ठरले. त्यातलाच एक ‘द केन म्युटिनी’.

अतिशय मानाच्या पुलित्झर पुरस्कार-विजेत्या ‘द केन म्युटिनी’ या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हा चित्रपट होता. या चित्रपटाची कथा ‘यूएसएस केन’ या युद्धनौकेवर घडते. नुकत्याच नौदलात दाखल झालेल्या विली किथ या तरुणाची ‘केन’वर नियुक्ती होते. ‘युद्धनौकेवर काम करायला मिळणार’, या स्वप्नरंजनात तो ‘केन’वर दाखल होतो खरा, पण तिथली एकूण परिस्थिती पाहून त्याचा हळूहळू भ्रमनिरास व्हायला लागतो. युद्धनौका म्हटल्यावर त्याच्या डोळ्यांसमोर जे चित्र असतं, तिथलं काहीच ‘केन’वर नसतं. शैथिल्य आलेले नौसैनिक, काम करण्यात फारसा रस नसलेला बोटीचा प्रमुख कमांडर, कामापेक्षाही कादंबरी लिहिण्यात मश्गुल असलेला कम्युनिकेशन ऑफिसर असं सगळं चित्र पाहून तो काहीसा नाउमेद होतो; पण काही दिवसांमध्येच कमांडरची बदली होते आणि त्याच्या जागी अतिशय कडक अशा फिलिप फ्रान्सिस क्वीग या नव्या कमांडरची नियुक्ती होते. क्वीग आल्याआल्याच सगळ्यांना फैलावर घेत बोटीवर शिस्तीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कीथला आनंद होतो, पण त्याचा हा आनंद अल्पायुषी ठरतो. कारण क्वीगच्या या कडक शिस्तीच्या आवरणाखाली मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असल्याचा संशय बोटीवरच्या नौसैनिकांमध्ये हळूहळू पसरायला लागतो. बोटीवर हे वादळ घोंघावत असतानाच प्रत्यक्षात आलेल्या चक्रीवादळाचा सामना करताना क्वीग स्वतःच्या सर्व संवेदना हरवून बसतो; बोट बुडण्याची शक्यता निर्माण होते आणि त्या क्षणी क्वीगच्या विरोधात बंड होतं.

‘द केन म्युटिनी’ हा सर्वार्थानं बोगार्टचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथेच्या केंद्रबिंदूशी नाट्य असलं, तरी मुळात चित्रपटात फारशा नाट्यमय घटना नाहीत. क्वीगचं मानसिक संतुलन बिघडल्याचा पुरावा देणाऱ्या दोन-तीन घटना आहेत, पण प्रेक्षकाला सतत खिळवून ठेवेल, त्याला खुर्चीच्या टोकाशी बसून राहायला भाग पाडेल, असा घटनाक्रम चित्रपटात फारसा नाही. तरीही बोगार्ट प्रेक्षकांचं बखोट धरून त्यांना बसवून ठेवतो. साध्यासाध्या जागा बोगार्टने अशा काही सादर केल्यात की थक्क व्हायला होतं. स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणं, मुळात त्या मान्यच न करणं, गोष्टी चुकीच्या घडल्यानंतर त्यासाठी कारणं देत राहणं, घटना घडून गेल्यानंतर सहकाऱ्यांना लंगड्या सबबी देत स्वतःचीच बाजू योग्य असल्याचं पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं, हे करत असताना त्यांच्या नजरेला नजर न भिडवणं, यातून क्वीगच्या व्यक्तिमत्त्वाची अत्यंत केविलवाणी बाजू बोगार्ट उभी करतो.

क्वीग चुकतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे इतरांचेही जीव तो धोक्यात घालतोय हे दिसत असतानाही प्रेक्षकाला क्वीगविषयी कणव वाटत राहते, ही बोगार्टची कमाल आहे. त्याच वेळी दुसरीकडे क्वीगला त्याच्या कनिष्ठांवर वर्चस्व गाजवण्याची एखादी संधी मिळते. त्या वेळच्या त्याच्या भावमुद्रा, त्याच्या हालचालींमध्ये येणारी गती, बोलण्यात येणारा तिखटपणा, आत्मप्रौढी यातून क्वीगची दुसरी बाजू बोगार्ट यथार्थपणे उभी करतो. या विरोधाभासी वर्तणुकीतून क्वीगचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं हळूहळू अधोरेखित होत जातं आणि अखेरच्या कोर्ट मार्शलच्या प्रसंगात क्वीगच्या प्रदीर्घ अशा संवादांमधून या बिघडलेपणावर शिक्कामोर्तब होतं. हा प्रसंग दिग्दर्शकाने टाइट क्लोजअपमधून चित्रित केला आहे. या प्रसंगात क्वीग एकटाच बोलतो आणि क्वीगचं सर्वांसमोर उघडं पडणं बोगार्टच्या चेहऱ्यावरची नस अन नस जिवंत करतं. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे हा सर्वार्थानं बोगार्टचा चित्रपट आहे. त्याच्यापेक्षा काकणभर जरी कमी गुणवत्तेचा नट क्वीगच्या भूमिकेत असता, तरी ‘द केन म्युटिनी’चा डोलारा कोसळला असता, इतका बोगार्टने तो चित्रपट आपलासा केला आहे.

निर्माता स्टॅनली क्रॅमर आणि दिग्दर्शक एडवर्ड दमित्रिक यांना ‘द केन म्युटिनी’ बनवताना खूप त्रास झाला. या चित्रपटासाठी अमेरिकी नौदलाचं सहकार्य अत्यावश्यक होतं आणि नेमकं तेच पुरेशा प्रमाणात मिळत नव्हतं. युद्धनौकेचा कप्तान मानसिक संतुलन गमावलेला दाखवल्यामुळे अमेरिकी नौदलाची प्रतिमा खराब होईल, अशी नौदलाला भीती वाटत होती. त्यामुळे क्रॅमर आणि दमित्रिक यांनी कादंबरीचं पटकथेत रूपांतर करताना क्वीगच्या व्यक्तिरेखेची तीव्रता काहीशी कमी केली आणि त्याच्या मानसिक आजाराला अनेक वर्षं युद्ध लढल्याचं कारण बहाल केलं. त्यात क्वीगची व्यक्तिरेखा बोगार्ट रंगवत असल्याचाही निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या जोडीला भरपूर फायदा झाला. जगाशी फटकून वागणारा, पण तरीही मनाने चांगला असलेला अँटी हिरो रुपेरी पडद्यावर बोगार्ट वर्षानुवर्षं रंगवत आला होता. त्यामुळे क्वीगच्या व्यक्तिरेखेला बोगार्टच्या रूपाने प्रेक्षकांची आपसूक सहानुभूती मिळाली आणि नौदलाला वाटणारी भीती फोल ठरली.

कमांडर क्वीग पूर्णत: खलनायक होऊ नये, अशीच पटकथाकार स्टॅनली रॉबर्ट्सने पटकथेची बांधणी केली होती. किंबहुना ‘द केन म्युटिनी’मधली सगळीच पात्रं गुंतागुंतीची आहेत. क्वीगविरोधात बंड करण्यासाठी लेफ्टनंट मॅरिकला उद्युक्त करणारा लेफ्टनंट टॉम कीफर (संस्मरणीय भूमिकेत फ्रेड मॅकमरे) ऐन वेळी कच खातो आणि कोर्ट मार्शलदरम्यान सुनावणीच्या वेळी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेत स्वतःच्या सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडतो. कोर्ट मार्शल क्वीगच्या विरोधात गेल्यानंतर ‘केन’वरचे इतर अधिकारी आणि सैनिक यांची पार्टी चालू असताना लेफ्टनंट मॅरिकची बाजू लढवणारा वकील तिथं येतो आणि त्यांनाच दोष द्यायला लागतो. ‘’क्वीगने तुमच्याकडे मदत मागितली होती, पण तुम्ही ती केली नाहीत. का? कारण तो तुम्हाला आवडत नव्हता’’, असं तो त्यांना सुनावतो. त्या वेळी कोणाकडेच उत्तर नसतं. तो कीफरलाही सोडत नाही. ‘’तुझ्यासारख्या बुद्धी ताळ्यावर असलेल्या, पण भ्याड माणसापेक्षा मानसिक संतुलन गमावलेला क्वीग बरा. निदान तो तुझ्यासारखा भित्रा तरी नाही’’, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्या वेळी कोण बरोबर आणि कोण चूक या प्रश्नाचा भुंगा प्रेक्षकाच्या डोक्यात शिरल्याशिवाय राहत नाही.

‘द केन म्युटिनी’ ही कादंबरी वाचल्यापासून बोगार्टला यातला कमांडर फिलिप क्वीग रंगवायचा होता. निर्माता स्टॅनली क्रॅमरने कादंबरीचे हक्क विकत घेतल्याचं समजल्याबरोबर बोगार्टने त्याला फोन करून त्याच्याकडे क्वीग रंगवण्याची इच्छा व्यक्त केली. बोगार्टने यापूर्वी असं क्वचितच केलं होतं; पण क्वीगच्या व्यक्तिरेखेनं त्याला जबरदस्त भुरळ घातली होती. ‘द केन म्युटिनी’ बोगार्टच्या अखेरच्या चार-पाच चित्रपटांपैकी एक ठरला आणि क्वीगची व्यक्तिरेखा बोगार्टच्या कारकिर्दीतल्या अखेरच्या संस्मरणीय भूमिकांमधली सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा ठरली. या भूमिकेसाठी त्याला ऑस्करचं नामांकन मिळालं, पण ज्याप्रमाणे ‘स्ल्यूथ’च्या वेळी सर लॉरेन्स ऑलिव्हिए आणि मायकल केन यांना मार्लन ब्रँडो आडवा आला होता, तसाच तो याही वेळी बोगार्टला पुन्हा आडवा आला. ब्रँडोला ‘ऑन द वॉटरफ्रंट’साठी (ज्यावरून आपल्याकडे विक्रम भट्टने आमीर खानला घेऊन ‘गुलाम’ केला होता!) सर्वोत्कृष्ट ऑस्करचा पुरस्कार मिळाला आणि कारकिर्दीतला अखेरचा ऑस्कर मिळवण्याची बोगार्टची संधी हुकली.

‘द केन म्युटिनी’ने एकूण सात विभागांमध्ये ऑस्कर्सची नामांकनं मिळवली. बोगार्टबरोबरच सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट संगीत याही महत्त्वाच्या विभागांमध्ये चित्रपटाला नामांकनं मिळाली. या चित्रपटात क्वीग ज्याची जागा घेतो, त्या दव्रिस या कप्तानाच्या छोट्याश्या भूमिकेतल्या टॉम टुली या नटाला सर्वांत आश्चर्यकारक नामांकन होतं. टुलीलाही पुरस्कार मिळाला नाही आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, बोगार्टच्याच ‘द बेअरफुट काँटेसा’ या दुसऱ्या चित्रपटातल्या एडमंड ओब्रायन या कलावंताकडून टुलीला हार पत्करावी लागली.

बोगार्टने ‘द सन’च्या २८ ऑगस्ट १९५४च्या अंकात लिहिलेल्या गेस्ट कॉलममध्ये त्याने साकारलेल्या क्वीगविषयी धम्माल वर्णन केलं आहे. पडद्यावर तुसडा विनोद करण्याच्या बोगार्टच्या शैलीशी मिळता जुळता असा त्याचा हा लेख आहे; पण त्याची क्वीगविषयीची विचार-प्रक्रियाही या लेखातून कळून येते. बोगार्ट म्हणतो, ‘आपल्या सगळ्यांमध्येच एक क्वीग असतो. छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आपण वरचढ ठरतो, त्या वेळी आपण सुखावतो; आपला इगो सुखावतो, पण ज्या वेळी आपल्यासमोर मोठी लढाई उभी ठाकते, त्या वेळी आपण गांगरतो. क्वीगचंही नेमकं तसंच आहे. ‘नौसैनिकांनी शर्ट इन का केले नाहीत? त्यांचे केस का वाढलेत? मेसमधली स्ट्रॉबेरी कोणी चोरली?’ असल्या बाबींमधून स्वतःच्या सैनिकांवर वचक बसवण्याने क्वीगला आनंद होतो. तो स्वत:ला ग्रेट समजायला लागतो, पण ज्या वेळी खऱ्याखुऱ्या आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरं जायची वेळ येते, त्या वेळी तो हतबुद्ध होतो; त्याचा सारा पुरुषार्थ गळून पडतो.’ स्वतःच्या भवतालच्या साध्या माणसांमध्येच बोगार्टने अशा तऱ्हेने क्वीगचा गाभा शोधल्यामुळे आज सहा दशकं उलटल्यानंतरही ‘द केन म्युटिनी’चा हा अँटी हिरो विलक्षण लोभस वाटतो.

याच लेखात बोगार्टने म्हटलंय की, ‘क्वीगच्या व्यक्तिरेखेपासून येत्या अनेक वर्षांत माझी सुटका होणार नाही.’ त्याचं हे म्हणणं त्याच्या मृत्यूनेच खरं ठरवलं. ‘द केन म्युटिनी’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत बोगार्टने मृत्यूला कवटाळलं. सिगरेट आणि दारूचा शौकीन असलेल्या बोगार्टला कॅन्सर झाला होता, पण पडद्यावरच्याच बेदरकारपणाने प्रत्यक्ष जीवनातही वागण्याची सवय त्याला बहुधा जडली असावी. डॉक्टरकडे जाण्याच्या फंदात न पडता तो ढासळत्या प्रकृतीनिशी काम करत राहिला. त्यामुळे कॅन्सरचं निदान झालं, त्या वेळी खूप उशीर झाला होता. ‘द केन म्युटिनी’तलं बंड तो जिंकू शकला नाही, तसंच मृत्यूविरुद्धचं बंड जिंकणंही त्याला शक्य झालं नाही!

 

बोगार्टचा ‘द सन’मधील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - https://www.newspapers.com/clip/4951431/bogart_newspaper_column_on_capt_queeg/

 

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......