‘लेखनमित्र’ : प्रमाणित व्यावहारिक मराठी लेखनासाठीचा उपयुक्त कोश
ग्रंथनामा - झलक
संतोष शिंत्रे
  • ‘लेखनमित्र’ या कोशाचे मुखपृष्ठ
  • Fri , 05 April 2019
  • ग्रंथनामा झलक लेखनमित्र Lekhanmitra संतोष शिंत्रे Santosh shintre लौकिका रास्ते - गोखले Loukika Raste - Gokhale

‘लेखनमित्र - प्रत्येक लिहित्या हाताचा’ हा प्रमाणित व्यावहारिक मराठी लेखनासाठीचा उपयुक्त, संदर्भकोश संतोष शिंत्रे-लौकिका रास्ते-गोखले यांनी तयार केला आहे. या कोशाला शिंत्रे यांनी लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

गेली सोळा वर्षे मी व्यावसायिक संहिता लेखनाच्या व्यवसायात आहे. यातल्या प्रत्येक टप्प्यावर व्यावहारिक आणि उपयोजित लेखनासाठी अचूक आणि समर्पक अशा इंग्रजी-मराठी पर्यायी शब्दांची गरज मी अनुभवली आहे. काही वेळा एकाच इंग्रजी शब्दाचे एकाहून अधिक मराठी पर्याय समोर येतात. अशा वेळी होणारा गोंधळही मला परिचित आहे. सामाजिक संस्थांचे अहवाल, प्रशिक्षण कार्यक्रम, संकेतस्थळे, ई-लर्निंग संहिता अशा लेखनाच्या वेळी विशेष करून हे सगळे प्रकार होत असतात. मराठी शब्दांना समर्पक इंग्रजी पर्याय शोधणे, हे कदाचित त्याहून अवघड काम. तेही मी वेळोवेळी यथाशक्ती पार पाडत आलो आहेच.

या सगळ्या धडपडींमध्ये, एका बाजूने मराठीत आजवर प्रकाशित झालेल्या समृद्ध कोशवाड्मयाशी परिचय होत गेला. असे कोश माझ्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहाचाही भाग बनत गेले. यात १९७४ सालच्या रमाबाई जोशी यांच्या ‘मराठी-तमिळ व्यावहारिक शब्दकोष’ (‘ष’ मूळ नावानुसार) पासून अगदी अलीकडच्या सुरेश वाघे यांच्या संकल्पना कोशाच्या पाच भागांपर्यंत अनेक ग्रंथांची आनंददायी भर पडत गेली. राज्य शासनाने प्रकाशित केलेले न्याय व्यवहार, वित्त, पदनाम, वृत्तपत्रविद्या हे कोशही संग्रही होतेच. त्यांचाही वेळोवेळी उपयोग होतच असे. शासननिर्मित कोशांमधील काही शब्दांच्या निवडीवर तज्ज्ञांमध्ये मतांतरे असतीलही; पण त्यांची उपयुक्तता नाकारताच येणार नाही. विविध विषयांना वाहिलेले हे कोश, विशेषतः सामाजिक कार्ये आणि मानव्यशाखा यांच्याशी संबंधित लेखनातली प्रमाणित तरीही ग्रांथिक भाषेतल्या इंग्रजी-मराठी प्रतिशब्दांची गरज पुष्कळ प्रमाणात भागवतात. फक्त अशा संबंधित लेखनापुरतेच सर्व साधारण गरजेचे हे शब्द एकाच कोशात असते तर… असा विचार काही वर्षांपूर्वीच मनाला पुसटसा स्पर्शून गेला. हाच विचार प्रस्तुत कोशात प्रत्यक्षात उतरला आहे.

२०१३ मध्ये माझे पर्यावरण पत्रकारितेवरील पुस्तक इंग्रजी आणि मराठीत (एकाच वेळी) प्रकाशित झाले. पर्यावरण विषयकलेखन करताना त्यातील काही पारिभाषिक शब्द, संज्ञा यांचा इंग्रजी-मराठी लघुकोश त्याच्या मराठी आवृत्तीच्या शेवटी मी दिला होता. तोही वाचकांना आवडून गेला. पत्रकारितेत निदान काही प्रमाणात त्याचा उपयोग सुरू झाला आहे, ही समाधानाची बाब. ते सगळे शब्द याही कोशात आहेतच.

याच सुमारास आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. माझी एक कथा वाचून शाबासकी म्हणून एका ज्येष्ठ वाचकाने पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी अभ्रास परिषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या अत्यंत अभ्यासपूर्ण नियतकालिकाचे वर्षभरासाठीचे सभासदत्व मला पुरस्कृत केले. मी विज्ञानशाखेचा. भाषा विचाराची इतकी मुद्देसूद, गांभीर्यपूर्वक, उहापोह करताना काही उपयुक्त निष्कर्ष काढणारी, अशी मांडणी मला आजवर कधीच सामोरी आली नव्हती (दोष माझा!). या नियतकालिकातील सगळेच लेख मला गेली काही वर्षे अत्यंत आनंददायी असा वैचारिक खुराक पुरवत आले आहेत, येतील. प्रस्तुत ‘लेखनमित्र’च्या निर्मितीमागील भूमिका आणि प्रेरणा विशद करतानाही मी ‘भाषा आणि जीवन’च्या ऑक्टोबर-डिसेंबर २०१५, अंक चारमधील गवसलेली काही विचारमौक्तिके उद्धृत करू इच्छितो. त्यामुळे कोशनिर्मितीमागची प्रेरणा स्पष्ट होईल.

‘...परिभाषा, शब्दकोश हे भाषाविकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या ह्या भूमिकेमुळे भाषेत नेमकेपणा येतो. तिचे सौंदर्य खुलते. बाहेरच्या भाषाव्यवहारांमधली अकारण घुसखोरी होऊन जे भाषिक प्रदूषण होते, त्याला प्रतिबंध केला जातो आणि ह्या सगळ्या उपयुक्त बाबींमुळेच परिभाषा, शब्दकोश ह्यांना जणू शरीरातील श्वेतपेशी, रोग प्रतिकारक शक्ती मानले जाते.’ (विजय पाध्ये, पान ५३)

‘...पारिभाषिक संज्ञांची निर्मिती करण्यासाठी एकार्थता, स्पष्टार्थता एकरूपता, सधनता, अल्पाक्षरता, सातत्य, शब्दसौष्ठव, हे निकष पाळले गेले, तर त्या पारिभाषिक संज्ञा समाजाकडून बहुतांशी सहज स्वीकारल्या जातात.’ (विजय पाध्ये, पान ५२)

हे निकष पाळूनही, मराठीत आज अनेक व्यक्ती, संस्था, लेखक, संशोधक, विचारवंत उत्तमोत्तम नव्या शब्दांची निर्मिती करत आहेतच. ‘आपली सृष्टी आपले धन’सारखे कोश निसर्ग पर्यावरण विषयकलेखन वाचनासाठी अत्यंत सुलभ काही शब्द देऊन गेले आहेत. श्री. राजीव साने यांच्यासारखे अचूकतेचा आग्रह धरणारे लेखक ‘डिस्कव्हरी’ आणि ‘इन्व्हेंशन’मधला फरक ‘तथ्यशोध’ आणि ‘कार्यशोध’ इतक्या अचूकतेने दाखवून जातात; ‘डिप्रेशन’ला ‘रसग्लानी’ हा यथार्थ शब्द शोधून, त्याचे पटेल असे स्पष्टीकरणही देतात. ‘गतिमान संतुलन’चे दिलीप कुलकर्णी त्यांच्या धारणाक्षम विकासाच्या वैचारिक मांडणीतच अनेक अर्थवाही, सोपे शब्द देऊन जातात. ‘प्रयास’ सारख्या काही सेवाभावी संस्थाही त्यांच्या मराठी प्रकाशनांमध्ये काही अचूक तांत्रिक प्रतिशब्द योजताना दिसतात. फक्त हे सगळेच ‘निर्मिक’ आणि त्यांनी निर्मिलेले हे शब्द त्या त्या माध्यमांमध्ये किंवा कार्यक्षेत्रांमध्ये विखुरले जाऊन गरजवंताना एकगठ्ठा स्वरूपात सामोरे येत नाहीत. प्रस्तुत कोशाने ही उणीव काही अंशी भरून निघावी.

उपयोजित, व्यावहारिक लेखन हे ‘आंतरशाखीय’ प्रभावक्षेत्र आहे. एका विषयाला वाहून घेतलेले काम करत असतानाही, अनेक वेळा इतर शाखांशी जोडलेल्या अनेक शब्दांची गरज आपल्या लेखनात, संवादात अनेक वेळा भासते. बऱ्याच वेळा असे लेखन, संवाद हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमधून प्रभावीपणे करावा लागतो. नुसते प्रतिशब्दच नव्हे, तर त्या भाषेचा यथायोग्य उपयोग होणे निकडीचे असते.

‘अंतर्नाद’ मासिकातील ‘लेखकांसाठी सूचना’ मराठीसाठी, तर इंग्रजी भाषेचे ‘स्टाईल गाईड’ इंग्रजीसाठी याच उद्देशाने प्रस्तुत कोशात दिलेले आहे. (‘दॅट’ वापरावे की ‘वुईच’...इ.) मराठी ग्रंथातच इंग्रजी स्टाईल गाईड समाविष्ट असल्याने वाचकांची मोठीच गरज भागेल असे वाटते. सदर ग्रंथाची पहिली प्रतिकृती (डमी) पाहिल्यानंतर अनेक जणांनी मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्द या पुस्तकात कुठे मिळतील याच्या सूचीची मागणी केली. मग तशी सूची (इंडेक्स) बनवून ती पुस्तकात समाविष्ट केली. ई-मेल संवादही सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर वापरतात. हे माध्यम (अजूनही) ज्या कार्यकर्त्यांना, वाचकांना व्यावहारिक संवादासाठी काहीसे अपरिचित भासत असेल, त्यांना औपचारिक ई-मेल्सचे कोशात दिलेले शिष्टाचार, सभ्यता संकेत उपयुक्त ठरावेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4259/Lekhanmitra---Pratyek-lihityaa-hatachaa%E2%80%A6

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 05 April 2019

लेखातल्या अक्षर अन अक्षराशी सहमत! शब्दकोशामुळे परकीय शब्दांची घुसखोरी थांबते हा नवीन विचार मिळाला. त्याबद्दल लेखकाचे आभार. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......