अजूनकाही
बँड पथक हे नेहमी पुरुषांचं असतं. त्यामुळे ‘त्याचा बँड वाजला!’ हे विधानही पुरुषांविषयीच केलं जातं. बिहारमधील महादलित समाजाच्या १२ महिलांनी मात्र पुरुषांचा हा बँड दोन्ही पद्धतीनं वाजवायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं बँड पथक आपली कला सादर करतं आणि त्यांच्या गावातील बायकोला बडवणाऱ्या पुरुषांचाही प्रसंगी ‘बँड’ही वाजवतं. त्याचं नाव आहे, ‘नारी गुंजन सरगम बँड’!
याची सुरुवात झाली ती २०१३मध्ये. बिहारमधील महादलित समाजाच्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा वर्गीस यांना ही कल्पना सुचली. त्यांनी बिहारची राजधानी, पटनापासून जवळ असलेल्या दानापूर गावातील १२ शेतमजूर महिलांना बँडचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
शेतमजुरी करणाऱ्या महिलांचा या पथकात समावेश असल्यानं शेतातील व घरातील काम संपल्यावर त्या रोज एक तास बँड वाजवण्याचा सराव करत. सलग सहा महिने सराव केल्यानंतर त्यांचं पथक तयार झालं.
महादलित समाजाच्या महिलांचा बँड पथकापर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. घरातील व गावातील पुरुषांनी तर त्यांना विरोध केलाच, पण महिलांनाही विरोध केला. एका महिलेला तर तिच्या नवऱ्यानं बँड पथकात सामील झाल्यामुळे चांगलंच झोडपलं. पण तरीही ती पथकात सामील झाली.
या पथकाला अनेकदा धमक्याही दिल्या गेल्या आहेत. पण या ‘बँड वाजवणाऱ्या’ बायका काही बधल्या नाहीत!
या बँडमधील सर्वच महिला निरक्षर आणि शेतमजूर आहेत, पण त्या बँडवर सहजपणे वेगवेगळी गाणी वाजवतात.
त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नव्या बदलाबरोबर आर्थिक कमाईही वाढली आहे. बँड वाजवून काय पोट भरणार आहे का, असं विचारत बायकोला बडवणाऱ्या नवऱ्याला जेव्हा त्याच्या बायकोनं बँड पथकातील कामाचे पहिले ५०० रुपये दिले, तेव्हा तोही हैराण झाला.
विशेष म्हणजे या बायका पुरुषांचाही बँड वाजवतात! म्हणजे त्या गावातील महिलांच्या मदतीलाही धावून जातात. जो नवरा आपल्या बायकोला मारतो, त्याला धमकावयाला हे पथक कमी करत नाही. कधी कधी त्याची धुलाईही करतात.
उत्तर प्रदेशातील ‘गुलाबी गँग’ आता सर्वांना माहीत झाली आहे. तिच्यावर चित्रपट आला, पुस्तकं आलं. लेखांना तर गणतीच नाही. ‘नारी गुंजन सरगम बँड’ही दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होवो. असाच पुरुषांचा बँड वाजवत राहो.
या पथकातील महिला या २५ ते ६० या वयोगटातील आहेत. त्यांचं पथक लग्न, स्वागत समारंभ आणि इतर कार्यक्रमांची निमंत्रणं स्वीकारतं. त्यांनी आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कार्यक्रमापासून पंचतारांकित हॉटेल्स, शिक्षणसंस्था यांच्यासाठीही कार्यक्रम केले आहेत. आता त्यांना राज्याबाहेरूनही कार्यक्रमाची निमंत्रणं येऊ लागली आहेत.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Wed , 21 December 2016
An Interesting Photo Feature!