देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापायला लागलंय. मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही राजकीय गरमागरमी आणखीच वाढत जाईल. निवडणुकीच्या रंगतदार, खमंग चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत ऐकायला मिळताहेत. २०१९ सालची १७ वी लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानली जातेय.
देश मोठ्या राजकीय स्थित्यंतरातून जातोय. मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गरिबी, कुपोषण अशा विकासाच्या मुद्द्यांऐवजी राष्ट्रवाद, देशभक्ती, प्रतिष्ठा असे भावनिक मुद्दे जास्त चर्चिले जाताहेत. देशात सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चित्र रंगवलं जात आहे. काँग्रेची धुरा राहुल गांधींच्या खांद्यावर आल्यापासून त्यांच्यात परिपक्वता आल्याचे वेळोवळी देशानं अनुभवलंय. याचा परिणाम म्हणून राहुल गांधी पंतप्रधान मोदींना टक्कर देताना दिसतात. याचा प्रत्यय मागील काही विधानसभा आणि पोटनिवडणुकीत आलाय.
अशा वातावरणात ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुमारे ७ कोटी नव्या, तरुण मतदारांचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर काही तरुणही उमेदवारीच्या निमित्तानं आपलं भविष्य आजमावून पाहत आहेत. तरुणांना संसदेत प्रतिनिधित्व, निर्णयप्रक्रियेत सामावून घेणं ही काळाची गरज बनली आहे.
मात्र राजकीय पार्श्वभूमी नसताना किती तरुण उमेदवार निवडणूक लढवत आहेत? स्वकर्तृत्वावर किती तरुणांना उमेदवारी मिळवली आहे? सामान्य तरुण कार्यकर्त्यांना किती राजकीय पक्षांनी संधी दिली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
प्रस्थापित राजकीय नेत्यांना डावलून काही नवोदित उमेदवार पुढे आले आहेत. घराणेशाही आणि आपला राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी काही तरुण उमेदवार उभे राहिले आहेत. शिवाय राजकीय वारसा नसतानाही काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काही विद्यमान खासदारांनी किंवा नेत्यांनी तिकीट नाकारल्यानं आपल्या मुलाला उभं केलं आहे. तर अनेकांनी पक्षांतर करता येत नाही म्हणून आपल्या मुलाला दुसऱ्या पक्षात पाठवून नवी राजकीय खेळी खेळली आहे. आपण राज्यात मंत्री असल्यानं आपल्या मुलाला केंद्रात पाठवण्याच्या उद्देशानं उमेदवारी दिली आहे. म्हणजेच तरुण उमेदवार लोकसभा लढवण्याची अनेक कारणं आहेत.
कारणं काहीही असोत, पण तरुण पिढी राजकारणात सक्रिय होऊन पुढे येत आहे, ही निश्चितच लोकशाहीच्या दृष्टीनं आश्वासक आणि महत्त्वाची बाब आहे. संसदेत गेलेले तरुण नक्कीच तरुणांच्या प्रश्नांवर आवाज उठवतील, असा विश्वास वाटतो. असो.
अनेक तरुण उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता ३१ वर्षीय कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसराय मतदारसंघातून भाकपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दक्षिण बंगलोरमधून २८ वर्षीय तेजस्वी सूर्या हा तरुण भाजपकडून उभा राहिला आहे. २९ वर्षीय बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँला तृणमूल काँग्रेसनं बसिरट मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. एच. डी. कुमारस्वामी यांचे २९ वर्षीय पुत्र निखिल गौडा मंड्या मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. दक्षिण दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पार्टीने राघव चढ्ढा या २९ वर्षीय तरुणाला उमेदवारी दिलीय, तर २५ वर्षीय हार्दिक पटेलची काँग्रेसने जामनगरमधून उमेदवारी निश्चित केली होती, पण त्याच्यावर असलेल्या शिक्षेवर स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर हार्दिकचे भवितव्य अवलंबून आहे.
महाराष्ट्रातही २८ ते ४० वर्षांदरम्यानचे अनेक तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
२८ वर्षीय पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे
देशाच्या राजकारणाचा तळ ढवळून काढलेली घटना म्हणजे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून घेतलेली माघार. त्यांनी माढा मतदारसंघातून माघार घेऊन आपला नातू पार्थ पवारची मावळमधून उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीतील सर्वांत तरुण चेहरा आणि पवारांची तिसरी पिढी म्हणून पार्थकडे पाहिले जातेय. मावळ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण लोकसभेला मात्र इथं मागच्या दोन्ही वेळी शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं होतं. यावेळीही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. बारणे यांच्यावर शहर भाजपची नाराजी आहे. ती अनेकदा उघडपणे व्यक्त झालीय. त्यामुळे त्यांना ही निवडणूक नक्कीच अवघड जाईल. शेकापची भक्कम साथ पार्थ यांना मिळालीय, तर मूळ राष्ट्रवादीचे पण सध्या भाजपमध्ये गेलेले अनेक स्थानिक नेते अजितदादांच्या चाणाक्ष खेळीनं पार्थ यांना आतून मदत करतील, असं बोललं जातंय. आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. हा त्या खेळीचाच एक भाग आहे. त्यामुळे पवारांची तिसरी पिढी संसदेत पोहचणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
२८ वर्षीय वैशाली येडे विरुद्ध भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे
तिरंगी लढतीमुळे महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं २८ वर्षीय वैशाली येडे यांना उमेदवारी दिलीय, तर शिवसेनेने सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या भावना गवळी यांना निवडणुकीत उतरवले आहे, तर काँग्रेसने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिलीय. पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी ठाकरे यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांमोर येडे यांनीही मोठे आव्हान निर्माण केले आहे. ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक असल्याने त्या महाराष्ट्रभर पोहचल्यात. शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी असल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
३२ वर्षीय हीना गावित विरुद्ध के. सी. पाडवी
नंदुरबार मतदारसंघात भाजपने ३२ वर्षीय हीना गावित यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा उमेदवारीची माळ टाकलीय. गेल्या निवडणुकीत त्यांनी वडील विजयकुमार गावित यांच्यासोबत राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळवली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांना पराभवाचा धक्का देऊन त्या ‘जायंट किलर’ ठरल्या होत्या. या वेळी त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांच्याशी होणार आहे. नव्या दमाची उच्चशिक्षित तरुणी आणि अनुभवी राजकारणी अशी ही लढत आहे. मराठा क्रांती मोर्चाने त्यांना केलेल्या विरोधानंतर भाजप आणि हिना गावित यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला. तिथं पुन्हा काँग्रेसचं वर्चस्व निर्माण होणार का, ही चर्चा २३ मे पर्यंत चालणार आहे.
३३ वर्षीय संग्राम जगताप विरुद्ध सुजय आणि सुवेंद्र गांधी
अहमदनगर हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. नात्यागोत्यांचं राजकारण आणि सामदामदंडभेद या सर्व नीतींचा वापर, हे इथलं विजयाचं गणित आहे. या मतदारसंघात दोन तुल्यबळ तरुण उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन उमेदवारी मिळवली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘राजकीय डाव’ टाकत ३३ वर्षीय तरुण संग्राम जगताप यांना मैदानात उतरवलं आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे ते चिरंजीव आहेत. विखेंचं जिल्ह्यात असलेलं मोठं नेटवर्क, चार वर्षांपासून सुरू असलेली लोकसभेची तयारी आणि सेनेची साथ अशी सुजय विखेंची भक्कम बाजू आहे. तर विद्यमान खासदार असूनही डावलल्यामुळे दिलीप गांधी यांचे ३६ वर्षीय पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतलीय. गांधी यांची उमेदवारी आणि निष्ठावंत भाजप समर्थकांची नाराजी विखेंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले आपले जावई जगताप यांच्यामागे पाठबळ उभे करतात की, पक्षाचे उमेदवार विखे यांना ताकद देतात, यावर या लढतीचा निकाल अवलंबून आहे. खरं तर पवार घराणं विरुद्ध विखे घराणं अशी ही पारंपरिक लढत आहे.
३८ वर्षीय डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील
राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी असलेली लढत म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक. सलग तीन वेळा पराभव पहावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ३८ वर्षीय डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून आणून उमेदवारी दिलीय. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले तरुण आणि सुशिक्षित कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा राष्ट्रवादीनं घेण्याचा प्लॅन आखलाय. पण गेल्या तीन निवडणुकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेला शिरूरचा गड हॅट्रिक नोंदवून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभेद्य ठेवला आहे. मात्र आपल्याच पक्षातून म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या कोल्हे यांच्याशी त्यांना लढावं लागणार आहे. आढळराव पाटील चौथ्यांदा लोकसभेची पायरी चढतात की, डॉ. अमोल कोल्हे त्यांचा उधळलेला वारू रोखतात, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
३८ वर्षीय धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी
महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाची लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि शिवसेनेचे ३८ वर्षीय तरुण उमेदवार धैर्यशील माने यांच्यात बघायला मिळेल. राजू शेट्टी यांनी सामान्य माणसांशी असलेली नाळ, दांडगा जनसंपर्क आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाठबळ या बळावर सलग तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी कंबर कसलीय. तर दुसरीकडे दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार राहिलेल्या निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील त्यांना टक्कर देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कामाला लागलेत. रुकडी, हातकणंगले, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. आईची पुण्याई, शिक्षणसंस्थेचे पाठबळ, भाजपची शिवसेनेला साथ, यामुळे ही लढत रंगतदार होईल, असा अंदाज आहे.
३१ वर्षीय डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध बाबाजी पाटील
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी आपली पकड अधिक मजबूत केलीय. दांडगा जनसंपर्क, वडिलांचे मंत्रीपद आणि शिवसेनेचा बालेकिल्ला यामुळे कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे या दुसऱ्या विजयासाठी जोमानं कामाला लागलेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसनं बाबाजी पाटील यांना उभं केलं आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि ठाणे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल.
३१ वर्षीय रक्षा खडसे विरुद्ध डॉ. उल्हास पाटील
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातून काढल्यानंतर अस्वस्थ असलेले एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. २०१४ साली त्यांनी मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. रक्षा खडसे यांची कामगिरी अपेक्षित न झाल्यानं त्यांचं तिकीट कापणार असल्याच्या चर्चा होत्या. पण तसं काही झालं नाही. उमेदवार न मिळाल्यानं यावेळी ही जागा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिली आहे. काँग्रेसनं डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हे माजी खासदार असून प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात जम आहे.
३४ वर्षीय कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामती मतदारसंघात यावेळी चुरस निर्माण झालीय. गेल्या वेळी सुप्रिया सुळे यांना काठावर विजय मिळाला होता. त्यांच्या विरुद्ध रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निकराची लढाई दिली होती. यावेळी दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. कमळ चिन्ह असल्याचा फायदा त्यांना यावेळी होणार असल्याचं भाजप नेते सांगत आहेत, तर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी बारामती जिंकणारच अशी घोषणाच केलीय. त्याच वेळी लोकसभेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या सुप्रिया सुळे होम पीचवर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाल्यात. भाजपनं कांचन कुल यांच्या पाठीशी मोठी ताकद लावल्यानं सुळे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.
३५ वर्षीय प्रीतम मुंढे विरुद्ध बजरंग सोनवणे
बीड लोकसभा मतदारसंघ कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेला आहे. स्व. गोपीनाथ मुंढे यांनी भाजपचं वर्चस्व या मतदारसंघात निर्माण केलं आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्या मागच्या वेळी विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या. पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ भाजपनं टाकलीय. पंकजा मुंडे यांनी बेरजेचं राजकारण करून विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणलं आहे. पुरेशी मतं नसतानाही विधानपरिषदेची जागा खेचून आणली आणि आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. भाजप आणि राष्ट्रवादी असा मतदारसंघात संघर्ष होताना दिसतो. राष्ट्रवादीनं अनुभवी अमरसिंह पंडित यांच्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत उतरवलं आहे. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी उमेदवारासाठी सर्व यंत्रणा कामाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खरं तर हा सामना पंकजा मुंढे आणि धनंजय मुंढे या बहीण-भावातच रंगणार आहे.
३८ वर्षीय पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त
उत्तर-मध्य मुंबईतून पुन्हा एकदा पूनम महाजन भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचं आव्हान असणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत पूनम महाजन निवडून आल्या होत्या. खासदार म्हणून गेल्या पाच वर्षांत पूनम महाजन यांची कामगिरी जेमतेमच आहे. प्रमोद महाजन यांची पुण्याई, संघाचं नेटवर्क, भाजपची ताकद हीच त्यांची जमेची बाजू. शिवसेना-भाजप युतीची ताकद यामुळे पुन्हा त्या संसदेत जाण्यास उत्सुक आहेत. तर राज्यात काही प्रमाणात मरगळ आलेल्या काँग्रेसनं प्रिया दत्त यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि त्यांना मिळालेली मनसेची अप्रत्यक्ष साथ, या बळावर प्रिया दत्त गेल्या निवडणुकीतील बदला घेणार की, पुन्हा पूनम महाजनच यांना संसदेचं तिकीट मिळणार, याचा फैसला निकालानंतरच होऊ शकेल.
३६ वर्षीय ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजीतसिंह पाटील
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. गेल्या वेळी मोदी लाटेमध्ये शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते पद्मसिंह पाटील यांना पराभवाचा धक्का दिला होता. पाच वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. मतदारसंघात गायकवाडांची नाराजी तसंच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण अशा कारणांमुळे मातोश्रीनं या एकमेव विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आणि माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांनी ओमराजे यांच्या बाजूनं झुकतं माप दिलं. पण गायकवाड समर्थकांची नाराजी मातोश्रीपर्यंत पोहोचली. हे बंड शमवण्यात युतीच्या नेत्यांना यश आलं असलं तरी निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते मदत करतीलच याची काही शाश्वती नाही. दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी जोरात प्रचाराला सुरुवात केलीय. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ओमराजेंचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या पराभवाची पुनरावृत्ती करणार की ओमराजे पराभवाची परतफेड करणार, याच धुमशान लवकरच उस्मानाबादमध्ये बघायला मिळेल.
.............................................................................................................................................
लेखक मोतीराम पौळ मुक्त पत्रकार, राजकीय अभ्यासक आहेत.
motirampoulpatil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment