अजूनकाही
कमलांकृत अथवा आश्रित माध्यमं, भाजपचे सर्व चौकीदार, प्रवक्ते, मंत्री, भाट यांनी कितीही चेष्टा केली, खिल्ली उडवली, जहरीली टीका किंवा सेल्फ अग्रेसिव्ह, देशद्रोहाची लेबलं चिकटवली, तरीही काँग्रेसनं सादर केलेला ‘हम निभाएंगे’ हा जाहीरनामा अंगुलीभर वरच उरतो!
प्रमुख माध्यमांनी शेपट्या विकल्यानंतर नेटवर सुरू झालेल्या ‘वायर’, ‘क्विंट’, ‘अल्ट न्यूज’, ‘मॅक्स महाराष्ट्र’, ‘लल्लन टॉप’, ‘नॅशनल दस्तक’, अशा निष्पक्ष पोर्टल्सनी या जाहीरनाम्याची सखोल दखल घेतलीय. मराठी वृत्तवाहिन्यांसारखा यासाठी पैसे आणणार कुठून, असला बालबुद्धी प्रश्न कुणीही विचारलेला नाही. कारण पत्रकारितेबरोबर किमान लेखन, वाचन, आकलन या बाबतीत सजग राहिलं की, ‘सरकार’ नावाची व्यवस्था काय असते, हे कळतं. महसूल वाढ अथवा अनुदानासाठीच्या तरतुदी कशा करायच्या, हे त्या व्यवस्थेला माहीत असतं. जर मोदी सरकार वर्षाला सहा हजार देणार म्हणतं, तेव्हा या बालबुद्धीला असले प्रश्न पडत नाहीत. आणि एकदा अजेंडाच राबवायचा म्हटला की, अभ्यास बाजूला सारून पोपटपंचीच चालू राहते!
झालंय काय, २०१४ साली पप्पू ठरवलेले पप्पू राहुल गांधी मागच्या तीन वर्षांत जरा गंभीर झालेत. मोदींना टार्गेट करत त्यांनी मधल्या काळात काही पोटनिवडणुका व तीन राज्यं भाजपकडून काढून घेतलीत. कर्नाटकात सर्वाधिक आमदार निवडून येऊनही भाजपला तिथं हात चोळत बसवलं, तर गुजरातमध्ये नाकात दम आणला!
‘हम निभाएंगे’ हा जाहीरनामा नीट पाहिला तर राहुल गांधींनी जाहीरनामा ही औपचारिकता न ठेवता सरळ धोरणंच जाहीर केली आहेत असं दिसतं. शेती, शिक्षण, आरोग्य, लघु-मध्यम-उद्योजक, महिला अशा मोजक्याच विषयांना प्राधान्य देत ठोस योजना मांडल्यात. स्वत:ला ‘चायवाला’ म्हणवणाऱ्या मोदींना बुद्धिवंताबद्दल न्यूनगंडात्मक आकस आहे. त्यामुळे ते ‘हॉर्वर्ड नाही, हार्डवर्क’ असे पीजे करतात. ‘बुद्धिवान मित्र’ असं म्हणून विरोधी आघाडीतील बुद्धिवंतांना हिणवतात. पदाचा अहंगंड आणि बुद्धीचा न्यूनगंड यांच्या मिश्रणातून अशा गोष्टी अनेकांच्या बाबतीत घडतात.
मात्र पुलवामा नंतर एअर स्ट्राईक किंवा अलीकडच्या सॅटेलाईट मिशननंतर मोदी देशभक्ती, सेना, काँग्रेस, ७० साल, नेहरू-गांधी परिवार करता करता परवा विदर्भात पवार कुटुंबावर घसरले. पंतप्रधान आणि देशातल्या सर्वांत मोठ्या पक्षाचा नेता सध्या इतका भरकटलेला प्रचार करतोय की, सांगायला काही मुद्दे नसलेल्या वक्त्याचं भाषण जसं विसकटत जातं, तसं त्यांचं होतंय. याउलट माध्यम-प्रतिकूल परिस्थितीवरही राहुल गांधी अधिकाधिक पाय रोवताना दिसताहेत.
देशभर पसरलेल्या पण राज्याराज्यांत विस्कळीत असलेल्या, संघटना नसलेल्या, आयाराम-गयारामांवर नियंत्रण नसलेल्या, फर्डं वक्तृत्व किंवा खूप मोठा जनाधार असलेला एकही नेता नसलेल्या, अशा भोक पडलेल्या काँग्रेस नावाच्या गलबताचं शीड राहुल गांधींच्या हातात आहे. जुन्या पिढीचा राग, मधल्या पिढीची नकारात्मकता आणि नव्या पिढीचं ‘कनेक्ट’ नसलेला काँग्रेस हा पक्ष. देशभर मोदीविरोधी आघाडी उभी करू शकला नाहीए की, राज्याराज्यात भाजप विरुद्ध इतर असंही राजकीय गणित जमवू शकलेला नाही. याउलट युपीत बसपा-सपा, प. बंगालमध्ये तृणमूल, तर केरळात डाव्यांना दुखावत काँग्रेस आपल्याच नादात आहे. अखिलेश आणि तेजस्वी हे दोन यादव समजुतीनं घेताहेत म्हणून ठीक आहे. प्रियांका गांधींना सक्रिय राजकारणात उतरवलं खरं, पण त्यांच्याबद्दलच्या अनेक संदिग्धता तशाच आहेत. स्टार प्रचारक नाहीत, सक्षम उमेदवार नाहीत, अशा अनेक वजाबाकीसह राहुल गांधी ‘टार्गेट मोदी’ धरून उभे आहेत!
याउलट ‘मेरा बुथ मजबुत’, ‘मैं भी चौकीदार’, प्रचंड पैसा, कार्यकर्ते, हाताशी माध्यमं, संघाची ताकद, देशी-विदेशी भाटांच्या आक्रमक झुंडी आणि गळाला लागतील ते मोठे मासे कुठूनही कसेही उचलून अंकगणित मजबुत करण्याच्या मागे लागलेला भाजप! चंद्र-सूर्यापेक्षा अधिक वेळ पृथ्वीवर फिरणारे मोदी म्हणजे तर ब्रह्मास्त्रच!!
तरीही राहुल गांधींनी मोदी आणि भाजपला दमवलंय. इतकं दमवलंय की, परवा तोल सुटून मोदी म्हणाले, ‘राहुल गांधी हिंदूबहुल (बहुसंख्याक) मतदारसंघ सोडून मुस्लीमबहुल मतदारसंघात पळालेत.’ एका पंतप्रधानाला आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला न शोभणारी अशी ही भाषा! याची निवडणूक आयोगानं दखल घ्यायला हवी. मात्र सध्याचा निवडणूक आयोग सरकारीबाबूसारखा ‘यात तपासण्यासारखं काही नाही’ (मिशनशक्ती घोषणा), ‘अहवाल मागवलाय’ (मोदीजी की सेना), ‘राष्ट्रपतींना कळवलंय’ (राज्यपाल कल्याणसिंह वक्तव्य) असली कारणं देत बसलाय! धार्मिक शेरेबाजीवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहा वर्षं मतदान हक्क काढून घेणारा निवडणूक आयोग आता इतिहासाच्या पानातच वाचायचा.
जो पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ‘तुम्ही वाक्याचा चुकीचा अर्थ लावला’ असं म्हणू शकतो आणि न्यायालयही दुरुस्ती याचिका दाखल करून घेतं, यातून सर्व लोकशाही स्तंभ सध्या कुणाच्या मंडपासाठी पाय रोवून उभे आहेत, हे लक्षात यावं!
सामदामदंडभेद ही सर्व सत्ताधीशांची आयुधं भाजप पुरेपूर वापरतंय. २०१४चा विकास आता मागे पडलाय. महिनाभरापूर्वीची देशक्तीही आता पुसट होतेय असं दिसताच आता थेट ९२च्या हिंदुत्वाच्या कार्डाला हात घातला गेलाय. पाकिस्तान आणि बाबरीच्या निमित्तानं ‘मुसलमान’ हा शत्रू उभा करून, गुजरात पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न दिसतो. नाहीतरी मध्यंतरी राज ठाकरे म्हणालेच होते की, हे लोक दंगली घडवतील. गुजरातमध्ये सुरुवातही झाली, पण ती बातमी दाबली गेली. आता योगी अखलाख प्रकरणावर चेतवणारं भाषण त्या प्रकरणातला जामिनावर बाहेर असलेला आरोपी पहिल्या रांगेत बसवून करतात आणि तोही जोरदार नारेबाजी करतो!
मोदी नाही तर कोण?, असा दिशाभूत करणारा प्रश्न पगारी माध्यमांनी देशभर फिरवला, तरी रणनीतीत काटेकोर असणाऱ्या भाजपला स्वत:ला आतून माहीत आहे की, लढाई तितकी सोपी राहिलेली नाही. सद्यस्थितीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली, गुजरात वगळता इतरत्र २०१४ची स्थिती नाही, या चार राज्यांतही ‘केक वॉक’ नाही.
भारताच्या नकाशावर आडवी रेघ मारली तर महाराष्ट्र, कर्नाटक वगळता भाजपचं अस्तित्व जवळपास नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये विधानसभेइतकं वातावरण राहिलं तरी अंकगणित बिघडू शकतं. बाकी प. बंगाल, ओदिशा इथं फारशी आशा नाही. त्यामुळे ९०च्या दशकात ज्या उत्तर प्रदेशातून अडवाणींनी दोनवरून १८२पर्यंत आकडा वाढवला, तिथूनच तीच ध्रुवीकरणाची नीती वापरून संख्या वाढवायचा भाजपचा प्रयत्न आहे.
मोदींनी पाकिस्तान, काश्मीरवरून एक मुसलमान उभा करायचा आणि उत्तर प्रदेशातून योगींनी गोरक्षा, मंदिर यावरून एक मुसलमान उभा करायचा; मग शेतमाल भाव, रोजगार, महिला, छोटे उद्योग, व्यापारी हे मुद्दे बाजूला पडतात. सैनिकी गणवेश घालून नौटंकी करणारा भोजपुरी तिवारी असो की, पाच वर्षांनी शेताची वाट चुकलेली स्वप्नसुंदरी असो; अपेक्षित प्रश्नसंच तयारी करून त्याच्या थेट प्रक्षेपणाचं नाटक असो की, दरबारी पत्राकाराला दिलेली तयार मुलाखत असो; या सर्वांचा एकसंघ, एकच एक असा २०१४ सारखा बांधीव प्रभाव दिसत नाही, हे किमान सत्य बोलणारा पक्का भाजपाईही सांगेल.
त्यामुळे झालंय असं की, काँग्रेसचं गळकं गलबत जसं हेलकावे घेतंय, तसेच या भक्कम जहाजालाही घ्यावे लागताहेत. हाताशी ठोस काही लागत नाही आणि विस्कळीत शत्रू आपापल्या जागी स्थिर होताना दिसतोय!
‘मोदी है तो मुमकीन है’ असं बेंबीच्या देठापासून ओरडलं तरी या ‘गुजरात पॅटर्न’ फापडाचा नमकीनपणा २०१४सारखा राहिलेला नाही. २०१४ला जे भव्य, शानदार, व्यासपीठांचं आकर्षण होतं, रंगीबेरंगी फेटे, पगड्या यांचं कुतूहल होतं, जॅकेट ब्रँड होईपर्यंतची लोकप्रियता आणि अनेक वर्षांनी भाजपच्या व्यासपीठावर अवतरलेला प्रभावी वक्ता (पण अटलजींचं संयत, मार्दव नसलेला व साहित्य-कला यांच्याशी दुरान्वये संबंध नसलेला) आणि १० वर्षांच्या युपीएच्या भ्रष्ट, निष्क्रिय आणि मूक सरकारविषयीचा उद्वेग, यामुळे तो चमत्कार घडला!
आता पहिलटकरणीची लक्षणं नाहीत की कौतुकं नाहीत. उलट पाच वर्षांच्या संसाराची भलीबुरी परिस्थिती समोर आहे. पाच वर्षं हा काळ तसा कमीच, पण कुणालाही तो तेवढाच मिळतो. त्या पाच वर्षांत तुम्ही जे काही कराल, त्यावर पुढची पाच वर्षं ठरतात. तुम्ही पाच वर्षं मागची ७० वर्षंच काढत बसलात, तर जनता म्हणणार ‘अरे पांड्या, दिलीत ना पाच वर्षं. त्याच्यात किती काय करतोय ते सांग. पाच वर्षाखेरीस किती काय केलंस ते सांग.’ १०० दिवसांत अनेकांना खडी फोडायला पाठवणारा चौकीदार आता विनवणी काय करतो? तर पाच वर्षांत मी त्यांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणलंय. आता आत घालायला आणखी पाच वर्षं द्या!
अपयशाची ही आडमार्गाची कबुलीच विरोधकांना बळ देतेय आणि पायाखालची वाळू सरकवतेय प्रधान चौकीदाराच्या!
‘आवेश’ आणि ‘गणवेश’ पांघरला म्हणजे ‘कर्तव्यप्रावीण्यता’ येते असं नाही, हेच खरं!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 04 April 2019
तो पप्पू देशद्रोह्यांना शिक्षा न करता मोकळं सोडणार आहे. त्याला दूर ठेवण्यासाठी चौकीदार हवाच! हिंदूंना दहशतवादी ठरवणारे जोवर या देशात आहेत तोवर मोदींना मरण नाही. -गामा पैलवान