म. गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली! (पूर्वार्ध)
सदर - गांधी @ १५०
किशोर बेडकीहाळ
  • म. गांधी
  • Wed , 03 April 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

म. गांधींची धर्मकल्पना आणि त्यांची सर्वधर्मसमभावाची कल्पना हा विषय रुक्ष वाटण्याची शक्यता आहे. पण आजच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्याची मी मुद्दाम निवड केली आहे. कारण आज आजूबाजूचं सगळं जे धर्मविषयक वातावरण आहे, ज्या प्रकारची माणसांची धार्मिकता आहे, हे पाहता, माणसं या धार्मिकतेनं आंतरिकदृष्ट्या समाधानी आहेत का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात लोकजागृतीच्या नावाखाली धर्म घरातून रस्त्यावर आला, तेव्हापासून तो रस्त्यावरच आहे. आज त्या धर्माचा वावर सगळ्यात जास्त रस्त्यावर आणि घरातला वावर तुलनेनं कमी व औपचारिक झाला आहे. हा धर्म पुन्हा रस्त्यावरून घरात जाणं शक्य का होत नाही, यासाठी अनेकांनी अनेक मार्गांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात.

पं. नेहरूंना असं वाटत होतं की, देशाचं औद्योगिकीकरण आणि आर्थिक विकास वेगानं झाला तर कदाचित हे प्रस्थ थोडं कमी होईल आणि लोक मर्यादित अर्थानं, चांगल्या अर्थानं धर्मजीवन जगू शकतील. ते काही खरं ठरलेलं नाही हे आपल्याला माहीत आहे.

त्यामुळे हा धर्म प्रासंगिक रस्त्यावर असता आणि साजरा झाला असता तर थोडीशी गोष्ट वेगळी होती. त्याचं आजचं जे स्वरूप आहे आणि विशेषतः नव्वदोत्तर काळात जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये बाजारपेठेच्या प्रभावाखाली आलेलं जे स्वरूप आहे, ते जास्त चिंताजनक आहे. एका बाजूला तो उत्सवी बनत चाललेला आहे, त्याचे इव्हेन्टस् होतात, फेस्टिवल्स होतात. या अर्थानं धर्म कल्पनेतील गांभीर्य संपलेलं आहे. डीजेच्या आवाजात आणि प्रतीकांच्या भाऊगर्दीत तो हरवून गेला आहे.

दुसऱ्या बाजूनं धर्म ही एक मानवी जीवनातील आणि मानवी संस्कृतीतील विधायक शक्ती आहे, असं जे धर्माविषयी मानलं जात होतं, त्याच्या उलटा अनुभव जगभर येताना दिसतोय. हा अनुभव भारतातच येतो असं माझं म्हणणं नाही, इतर देशातही तो येत आहे. समाजाचं विभाजन, ध्रुवीकरण, त्याचबरोबर ध्रुवीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून काही ठिकाणी दंगे-धोपे, या सगळ्यांमधून धर्म हा माणसाच्या आंतरिक गरजेऐवजी कुठंतरी त्याला बाह्यतः व्यक्त होण्यासाठी लागणाऱ्या ‘अस्मितेचं हत्यार’ या स्वरूपात पाहिला जात आहे. त्यामुळे एका अर्थानं धर्माला अस्मितेच्या हत्याराचं स्वरूप प्राप्त होताना आज आपल्याला दिसतं. सगळे प्रचलित धर्म अस्तित्वात असूनही लोकांना आपल्या धर्मजीवनाचा आंतरिक आनंदही घेता येत नाही, याचं सगळं जे असमाधान आहे, ते दुसऱ्या बाजूनं अनेक नव्या संप्रदायांना जन्म देणारं आहे.

म्हणजे प्रस्थापित धर्म असताना अनेक नवनवे धार्मिक संप्रदाय निर्माण झालेले आपल्याला दिसतात. हे संप्रदाय लोकांच्या कुठल्या ना कुठल्या मानसिक गरजेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्या पूर्ण होतात की नाही हा भाग वेगळा, पण असं एक चित्र आपल्याला दिसतं. असे अनेक धर्मसंप्रदाय आपल्याला सांगता येतील. अनेक ठिकाणी धर्माचं संस्थीकरण व रचना धर्माचार्यांच्या हातामध्ये गेलेली आहे. तिथून धर्मकार्याचा अत्यंत विपरीत व विकृत अर्थसुद्धा आविष्कृत होताना आज आपण पाहत आहोत. एखादा धर्माचार्यच ज्या वेळी व्यासपीठावरून अमक्याचे हातपाय तुटले तरी चालतील अशा प्रकारची भाषा करतो, त्यावेळी कोणत्या प्रकारच्या धर्मभावनेकडे आपण चाललो आहोत, हेही आपल्याला पाहायला मिळतं.

एका अर्थानं या सगळ्या प्रचलित धर्मांचा आज चालू असणारा जो व्यवहार आहे, त्याचं जे रस्त्यावरचं अस्मिताजन्य अवतरणं आहे (मग ते नमाजाच्या स्वरूपात असेल, महाआरतीच्या स्वरूपात असेल, वा अन्य कोणत्या स्वरूपात असेल आणि त्यामध्ये पुन्हा पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये धर्मभावनेपेक्षा वाद्यांना महत्त्व जास्त आहे.) त्यानं अनेक भागांमध्ये दंगली किंवा गडबड झाल्याचं आपल्या लक्षात येतं.

माणसाला सनातन काळापासून ज्या प्रकारच्या अध्यात्माची ओढ आहे, ज्या प्रकारच्या पूर्णत्वाची ओढ आहे, त्या प्रकारच्या अध्यात्मापासून आजचे सर्व धर्म व प्रत्यक्षातला त्यांचा व्यवहार शेकडो-कोसो दूर आहे, असं आपल्याला दिसतं. म्हणून मग कोणत्याही सुजाण नागरिकाला, धर्मपालन करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आणि स्वतः धर्मपालन करत नसले तरीसुद्धा इतरांच्या बरोबर या समाजात राहत असताना कोणत्या प्रकारचं धर्मपालन व्हावं याची अपेक्षा करणाऱ्या सुजाण नागरिकांना यातून कोणता पर्याय पुढे आहे, याच्याविषयी आज पूर्ण गोंधळ झालेला आहे.

तत्त्वज्ञानाच्या पातळीवर, विचारप्रणालींच्या पातळीवर तीन-चार प्रकारचे उपाय गेल्या ६०-७० वर्षांमध्ये आपण योजण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जण असं म्हणाले की, धर्म हा व्यक्तीपुरता मर्यादित करा, धर्माचा सामाजिक जीवनाशी संबंध असता कामा नये. समाजजीवनात त्याचं फार आविष्करण होता कामा नये, धर्म ही व्यक्तीची आंतरिक गरज आहे आणि ती त्याच्यापुरतीच मर्यादित रहावी, अशा प्रकारचा एक प्रवाह जगाच्या इतिहासामध्ये विशेषतः प्रबोधन कालखंडानंतर गेली चार-पाचशे वर्षं आहे आणि त्याच्यावर आधारलेल्या राज्यसंस्थाही उभ्या असलेल्या दिसतात. या प्रवाहाला धर्म व्यक्तीपुरता मर्यादित करण्याला यश आलेलं नाही.

धर्म आणि राज्यसंस्थेचं नातं तोडण्याचाही प्रयोग अनेक देशांमध्ये झाला. आपण त्या प्रकारची राज्यघटना स्वीकारली, पण शेवटी जे राज्यकर्ते आपल्याला लाभले त्यांनी आपापल्या हितसंबंधानुसार धर्मनिरपेक्षतेचा किंवा धर्माचा अर्थ लावला. कोणाला शहाबानो प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी त्याचा उपयोग झाला, कोणाला शबरीमला प्रकरणासंदर्भात त्याचा उपयोग झाला. त्यामुळे इतक्या चांगल्या राज्यघटनेची कोणाच्या हातून अंमलबजावणी होणार त्याच्यावर धर्मनिरपेक्षता अवलंबून राहिली. लोकांमधल्या धर्मभावनांना विधायक अंगानं, सर्जनशील अंगानं वळण दिलं गेलं नाही. त्यामुळे आहे त्या धर्मभावनांचा फायदा घेण्याची प्रवृत्ती बळावली आणि म्हणून धर्मभावना ‘अस्मितेची हत्यार’ होऊन बसली!

धर्माला मर्यादित करण्याचा एक तिसरा प्रयोग जगामध्ये साम्यवादी राजवटीमध्ये झाला आहे. सोविएत रशियासारख्या देशामध्ये जवळपास ७० वर्षं एकपक्षीय हुकूमशाहीची राजवट असताना आणि धर्मसंस्था, धर्मप्रसार, धार्मिक साहित्य याच्यावर प्रचंड बंधनं असतानासुद्धा ज्यावेळी त्या हुकूमशाहीचं सावट दूर झालं, त्यावेळी सोविएत रशियाचं विघटन झालंच, एका राष्ट्राची एका रात्रीत पंधरा शकलं झाली, पण लक्षात असं आलं की धर्मभावना जिथल्या तिथंच होती. ती पुन्हा उफाळून आली. पुन्हा चर्चेस, मशिदी याच्याकडे लोकांचा ओढा वाढला. त्यामुळे धर्मभावनेचं उच्चाटण करणं, ही गोष्ट जगाच्या इतिहासात आजवर शक्य झालेली नाही, हेच अधोरेखित झालं.

आता असं जर असेल की, धर्म मर्यादित होत नाही, घरापुरताही राहत नाही, सार्वजनिक जीवनातून हद्दपार होत नाही आणि मानवी जीवनातून नाहीसाही होत नाही, तर कोणता पर्याय उरतो? तो पर्याय म्हणजे धर्मभावना, धर्मदृष्टी आणि धर्मकल्पना यांना अत्यंत प्रगल्भपणे नवे आयाम देण्याचा. हा प्रश्न जेव्हा गांधींसमोर उपस्थित झाला, तेव्हा ते आपल्या प्रतिभेनं, ताकदीनं व चिंतनानं त्याला भिडले. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट होतं, जेव्हा त्यांना प्रश्न पडे त्या वेळी त्याच्या उत्तरासाठी गांधींनी कधीही दुसऱ्याकडे पाहिलं नाही. प्रश्न मला पडला, मला जे करता येणार आहे आणि जे करावसं वाटतं, ते सरळपणे उठून जाहीरपणे करणं, या गांधींच्या वृत्तीमुळे धर्मभावनेसारख्या अत्यंत नाजूक असणाऱ्या गोष्टींना गांधींनी कशा पद्धतीनं एका प्रगल्भतेकडे नेण्याचा प्रयत्न केला, वळण दिलं हे पाहण्यासारखं आहे.

गांधींच्या धर्मकल्पनेचा जो प्रवास आहे, ती त्यांची जीवनाची साधना आहे. गांधी स्वतःकडे कायम साधक म्हणून, जीवनाचा उपासक म्हणून आणि सत्याचा शोधक म्हणून पाहतात. त्यामुळे माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला धर्म-भावनेतून निर्माण होणारं नैतिक जीवनाचं अधिष्ठान असलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका गांधींच्या सर्व व्यवहारामध्ये, सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

गांधींच्या धर्मकल्पनेकडे वळण्यापूर्वी गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची एक चौकट मला आपल्यापुढे ठेवायची आहे. माझ्या मतानुसार विसाव्या शतकात जगातला सर्वांत निर्भय, सर्वांत बलवान आणि सर्वांत धैर्यशाली माणूस म्हणून कुणाचा उल्लेख करायचा झाला तर तो गांधींचा करावा लागेल. अत्यंत कृश शरीरयष्टी, कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा आधार नाही, शास्त्राचा आधार आहे किंवा नाही माहीत नाही, कोणी पाठिंबा देईल किंवा नाही याची फिकीर नाही, स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला, नैतिकतेला पटेल तेच करणं, यासाठीचं विलक्षण धैर्य गांधींनी विसाव्या शतकात प्रकट केलेलं आपल्याला दिसतं.

दुसरं गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचं एक अत्यंत महत्त्वाचं, पण आपल्याला न पेलणारं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे त्यांचं अत्यंत कठोर असणारं मूल्याचरण. जी जी मूल्यं मी मानली, त्यांचं स्वतःच्या जीवनामध्ये अत्यंत कठोरपणे आचरण करेन, ही गांधींची प्रतिज्ञा होती. प्रत्यक्षातला त्यांचा व्यवहारही तसा होता. त्यामुळे त्यांना पत्नीला दुखवावं लागलं, बहिणीला दुखवावं लागलं. तरीही मूल्यांबाबत व्यक्तिगत जीवनात त्यांनी तडजोड केली नाही. पण सार्वजनिक जीवनात लोक जर माझ्या मागे यायचे असतील तर त्यांच्याकडून मी माझ्यासारख्याच तंतोतंत मूल्याचरणाची अपेक्षा करणार नाही. तसं ते करतील तर चांगलंच आहे, पण एक पाऊल जरी माझ्याबरोबर चालले तरी मला हवे आहेत, ही त्यांची भूमिका होती.

म्हणजे एका बाजूला व्यक्तिगत जीवनात मूल्यांचा कठोरपणा आणि सार्वजनिक जीवनात थोड्या तडजोडीची तयारी. आजच्या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या जगण्याकडे जर पाहिलं तर याच्या बरोबर उलट परिस्थिती आपल्या लक्षात येईल. व्यक्तिगत जीवनात पुष्कळ तडजोडी, मूल्यांपासून पुष्कळ बाजूला जाण्याची भूमिका, आपद्धर्म म्हणून बऱ्याच गोष्टी व समर्थन करण्याची भूमिका आणि सार्वजनिक जीवनात आत्यंतिक शुद्ध भूमिकेचा आग्रह, हे असं आजचं आपलं मानस आहे. बरोबर आजच्या मानसाच्या विरोधात गांधींचं मानस आहे.

तिसरं गांधींचं मला भावलेलं वैशिष्ट्य असं आहे की, ‘मी जे काही करणार आहे, ते जाहीरपणे सांगून आणि त्याचे परिणाम विनातक्रार भोगण्याची तयारी ठेवून करणार आहे. मी सत्याग्रह केला व माझ्यावर खटला झाला, तर मी जामीन देणार नाही. मी कायद्यानं होईल ती शिक्षा द्या, हाच आग्रह धरणार व शिक्षा भोगणार. (आजच्या सारखा अटकपूर्व जामीनाचा आग्रह करणार नाही.)’ याचा एक परिणाम लक्षात घेण्यासारखा आहे. टिळकांकडून गांधींकडे राजकारणाची जेव्हा सूत्रं गेली, तेव्हा नेमका बदल काय झाला? असा जर प्रश्न केला तर टिळकांच्या हातामध्ये राजकारणाची सूत्रं होती, तोपर्यंत टिळकांचं सगळं लक्ष सरकार काय करतं याकडे लागलेलं असायचं. आणि त्यावरून त्यांचं राजकारण, पत्रकारिता चालत असे. गांधींच्या हातात राजकारणाची सूत्रं गेल्यानंतर पहिला जो बदल भारताच्या राजकारणात झाला असेल तर सरकारचं लक्ष गांधी काय करतात इकडे वळलं आणि संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये गांधींची भूमिका काय, गांधी काय करताहेत, गांधींच्या मनात काय आहे, याकडे लागलं.

ब्रिटिश कागदपत्र खुली केली गेली. त्या कागदपत्रांमध्ये त्या काळातल्या काही पोलिस सुपरीटेन्डन्टचे रिपोर्टस् आहेत. त्यातल्या एका रिपोर्टमध्ये एका सुपीटेन्डन्टने असं लिहिलं होतं की, गांधींशी कसं डील करावं हेच आम्हाला कळत नाही. का? तर हे आमचे मित्र म्हणवतात पण आम्हाला सपोर्ट करत नाहीत आणि शत्रू म्हणावं तर शत्रूसारखे वागत नाहीत. त्यामुळे गांधी ब्रिटिशांचे शत्रू आहेत की मित्र आहेत, असा त्यांना प्रश्न पडला. कारण समाजाकडे शत्रूभावशून्य दृष्टीनं गांधींजी पहात होते. शत्रूभावाची भावना गांधींच्या मनामध्ये कोणाविषयीही नाही, अगदी त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्यालाही त्यांनी शेवटपर्यंत हे सांगितलं की, माझ्याजवळ येऊन आठ दिवस रहा, आपण बोलू. तुझं सगळं म्हणणं मी ऐकून घेतो, इथपर्यंत त्यांनी तयारी ठेवलेली होती संवादाची.

आधुनिक मूल्यांचा सन्मानही त्यांच्या विचारांमध्ये आपल्याला दिसतो. गांधींवर नेहमी दोन आक्षेप घेतले जातात. एक आक्षेप म्हणजे गांधी आधुनिक नव्हते. या आक्षेपात अर्थातच तथ्य नाही. कारण आधुनिक मूल्यांना गांधींनी कुठे विरोध केलेला नाही. व्यक्तीस्वातंत्र्य, आत्मसन्मान, बंधुभाव याला कुठेच विरोध केलेला नाही त्यांनी. पण त्यांची आधुनिकता व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, ती कदाचित आपल्याला प्राचीन, पारंपरिक वाटेल अशा प्रकारची आहे.

दुसरा आक्षेप जो गांधींबद्दल घेतला जातो, तो त्यांच्या भाषेचा आणि धर्माच्या भाषेचा वापर करण्याचा आहे. तिथं गांधींच्या बाजूनं सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की, या देशाचं जनमानस गांधींना नीट कळलेलं असल्यामुळे या देशाचं धार्मिक मानस कशा प्रकारे घडलेलं आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे, ती परिभाषा कोणत्या मर्यादेपर्यंत वापरायची आणि कुठे वापरायची नाही, याचं भान त्यांनी राखलेलं आढळेल. त्यामुळे त्यांचं आधुनिक असणं हे आधुनिक पद्धतीनं जरी आपल्याला सिद्ध करता आलं नाही तरीही त्यांच्या व्यवहारामधून ते आधुनिक मूल्यांचा करत असलेला पुरस्कार आपल्याला सिद्ध करता येतो.

तिसरी बाब म्हणजे गांधी आजच्या आधुनिक दृष्टीतून शास्त्रीय पद्धतीनं विचार करणारे, तळटीपा व संदर्भग्रंथांची यादी देऊन वैचारिक लेख लिहिणारे या प्रकारचे लेखक वा विचारवंत नाहीत. त्यांनी लिहिलं पुष्कळ, वाचलेलं त्याहीपेक्षा जास्त आहे, पण त्यांचं सगळं लेखन एका बाजूला स्वतःची अभिव्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जी पत्रकारिता केली (इंडियन ओपिनियन, हरिजन असेल, यंग इंडिया असेल, आफ्रिकेतील पत्रव्यवहार असेल), त्यातलं त्यांचं लेखन वाचलं तर हे लक्षात येतं की, असंख्य वाचक त्यांना पत्र लिहायचे आणि त्यांना ते उत्तरं द्यायचे. ते सगळं त्यांच्या वर्तमानपत्रात छापून येत असे. म्हणून त्यांनी त्याला ‘न्यूज लेटर्स’ऐवजी ‘व्ह्यूज लेटर्स’ असं स्वतःच म्हटलेलं होतं. तो जो संवाद त्यांचा व्हायचा त्यामधून त्यांचं सगळं लेखन, विचारप्रक्रिया आपल्याला समजावून घेता येते. गांधींच्या व्यक्तिमत्त्वाची ही चौकट मी यासाठी सांगितली की, पुढील विवेचनात जागोजागी तिचा संदर्भ आपल्याला दिसेल.

गांधी धर्माकडे कसं पाहतात असा एक साधा प्रश्न विचारात घेऊ. आपल्याला इतिहासात काय दिसतं? ज्या ज्या वेळी प्रचलित धर्म वा संप्रदाय वा रीतिरिवाज, लोकधर्म हे लोकांच्या अपेक्षांना, आकांक्षांना उतरत नाही, त्यांचा प्रगतीला काच होऊ लागतो; त्या त्या वेळी इतिहासामध्ये धर्माच्या संदर्भामध्ये बंडं झाली आहेत. उदा. येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर, आंबेडकर इ. त्याचबरोबर प्रचलित धर्मातील व्यवहार मान्य नाही म्हणून, नवीन विचार करायचा म्हणून, काही नवे संप्रदाय १९व्या शतकामध्ये निर्माण झालेले आहेत. उदा. सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्यसमाज. मला या धर्मश्रद्धा मान्य नाहीत, यांनी समाजजीवन पुढे जात नाही, असं वाटणाऱ्यांनी बंड करण्याचा एक पर्याय घेऊन नवीन धर्माची स्थापना केलेली दिसते. ते लोण अगदी आताच्या शिवधर्मापर्यंत आपल्याला दिसतं.

धर्माची स्थापना झाली हा वादाचा मुद्दा नाही. या धर्माची स्थापना झाल्यावर प्रत्यक्षात काय घडलं? तर हे सर्व नवे धर्म एकेका सामाजिक गटाच्या रूपानं आपापल्या चाकोरीमध्ये रुळले आणि कालांतरानं त्यांची एक धर्मनिष्ठा व अस्मिता तयार झाली. बुद्धधर्म, जैन, शीख, लिंगायत यांच्या नव्या चाकोऱ्या निर्माण झाल्या आणि बंडखोरीच्या पाठीमागे जे उद्दिष्ट होतं, व्यापक मानव्याकडे वा मानुषतेकडे जाण्याचं ते साध्य न होता प्रत्यक्षामध्ये या समुदायांचे आंतरसंबंध कधी सहकार्याचे तर कधी संघर्षाचे राहिले. त्यातून एकजिनसी समाज निर्माण झाला का? म्हणजे जगातल्या इतिहासामध्ये हा एक मोठा प्रयत्न होता की, नव्या धर्मांच्या स्थापनेमधून जगातल्या धर्मभावनांना एक नवीन वळण देण्याचा प्रयत्न होता.

इथंही पाहण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जे धर्म नव्यानं निर्माण झाले - उदा. बौद्ध, जैन, लिंगायत, शीख - त्यांचं धर्म म्हणून अस्तित्व आजही कायम आहे. कारण ते विशिष्ट सामाजिक गटांच्या पायावर उभे आहेत. पण जे नवे संप्रदाय झाले - उदा. प्रार्थना समाज, ब्राह्मोसमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज - ते आज इतिहासाचे भाग, खरं तर अवशेष झाले आहेत. धर्मकल्पनेच्या इतिहासातील नोंदी एवढंच त्यांचं स्वरूप उरलं आहे. (म्हणून संप्रदाय निर्माण होणं, नवीन धर्म निर्माण होणं, ही प्रक्रिया काही काळ चाललेली दिसते.)

गांधींचं वैशिष्ट्य असं की, यातला कुठलाही मार्ग त्यांनी अवलंबलेला नाही. त्यांनी ना नवीन धर्माची स्थापना केली, ना नवीन संप्रदाय निर्माण केला, ना नवीन धर्मपंथाला जन्म दिला. गांधींनी धर्मभावनेच्या दृष्टीनं काय केलं तर त्यांनी

१) जन्मानं लाभलेल्या धर्माचा मन:पूर्वक स्वीकार केला. जी धर्मभूमी मला प्राप्त झालेली आहे, त्या भूमीमध्ये घट्टपणे उभा राहीन.

२) मी स्वतःला हिंदू म्हणवतो आणि हिंदू म्हणून या धर्माचा आदर करतो. त्याच वेळेला हा धर्म ज्या गुणदोषांनी युक्त आहे, त्या गुणदोषांसकट मी त्या धर्माचा स्वीकार करतो.

३) हिंदू असल्यामुळे, हिंदूधर्मीय असल्यामुळे हिंदू धर्माचा अर्थ लावण्याचा मला मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार असल्यामुळे धर्माचा अर्थ माझा मी लावू शकतो.

४) माझा धर्म मला वैश्विक पातळीवर जाण्याला मुभाही देतो. म्हणून धर्माचा अर्थ लावताना कोणत्याही संस्थात्मक सत्तेचा आधार घेण्याची मला गरज नाही. (ही गोष्ट किती मूलगामी आहे हे आपल्या लक्षात येत नाही. जगभरच्या धर्मांमध्ये विशेषतः ज्यांना संस्थापक आहेत, अशा धर्मांमध्ये संस्थात्मक धर्माचं स्वरूप आपल्याला दिसतं. संस्थात्मक धर्म निर्माण झालेले आहेत. त्यांच्या संघटना आहेत. त्यांच्यात श्रेणीबद्धता आहे. सत्तासंबंधांची श्रेणी आहे आणि यानुसार ते धर्म चालतात. त्यामुळे तिथं असणारं व्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे, ते गुदमरण्यची शक्यता जास्त असते, हे आपल्याला चर्चेच्या रूपानं दिसतं, इस्लामच्या काही व्यवहारामध्ये दिसतं आणि जाति-संस्थेच्या रूपानं हिंदूधर्मामध्येही दिसतं. गांधी असं म्हणतात की, मला ही संस्थात्मकता मान्य नाही. (गांधींचे एक कट्टर अनुयायी जे.सी. कुमारप्पा ज्यांना ‘गांधीवादी अर्थशास्त्राचे जनक’ मानलं जातं, त्यांनी त्याचं मॉडेल निर्माण केलं. ते याच भूमिकेवर शेवटपर्यत होते. ते तर ‘जिझस’ असाच उल्लेख करायचे.)

५) गांधी असं म्हणाले, येशू हा जर ईश्वराचा पुत्र असेल तर मग आपण सारेच ईश्वराचे पुत्र आहोत. मीही ईश्वराचा पुत्र आहे आणि येशू जर ईश्वराचा पुत्र नसेल तर येशू आणि मी याच्यात काहीच फरक पडत नाही. म्हणजे या संस्थापकांना चिकटलेले जे दैवत्व आहे, तेही त्यांनी नाकारलेलं आहे. आणि म्हणून अस्पृश्यांना ‘हरिजन’ असा शब्द वापरायचा की नाही असा वादविवाद त्यांच्या वर्तमानपत्रात झाला, तेव्हा त्यांच्या दृष्टीनं तो चांगला शब्द होता. कारण आपण सगळे देवाचेच पुत्र आहोत, ही भूमिका घेऊन एकट्या येशूला अपवाद करायला गांधी तयार नाहीत.

६) धर्माचा अर्थ लावणं म्हणजे काय? सर्वच धर्म खरे आहेत म्हणजे एखाद्या स्पर्शामध्ये सर्वस्पर्श समानत्व जसं आहे, तसं सर्व धर्म समानत्वही आहे. सगळे धर्म खरे आहेत, ते ईश्वरी इच्छेतून निर्माण झालेले आहेत, त्यामुळे माझा धर्म ईश्वराने निर्माण केलेला आहे म्हणून चांगला असेल, इतरांचेही धर्म ईश्वराने निर्माण केलेले आहेत म्हणून तेही चांगले असणार. म्हणजे मग माझ्या धर्मात जे आहे ते तसंच्या तसं त्या धर्मात नसलं तरी दुसरं काहीतरी त्या धर्मामध्ये असणार आणि मग ते ईश्वराचंच असल्यामुळे त्या धर्मातील चांगली गोष्ट माझ्या धर्मात स्वीकारणं किंवा माझ्या धर्मातील चांगली गोष्ट त्या धर्मामध्ये स्वीकारली जाणं, हा व्यवहार करायची मोकळीक आपल्याला आपोआपच मिळते. म्हणजे मग नुसती चिकित्सा होत नाही तर रीतिरिवाज आणि संस्कारमूल्य यांच्या आदानप्रदानाची शक्यता खुल्या होतात, हे गांधींच्या कल्पनेचं आणखी एक वैशिष्ट्य दिसतं.

कोणत्याही धर्माला मानवी जीवनातील तीन मूलभूत गोष्टींचा उलगडा करून दाखवावा लागतो किंवा त्यांचा अनुबंध बांधून दाखवावा लागतो. एक, व्यक्तीची धारणा, दुसरा प्रश्न आहे धर्मशास्त्रामधला महत्त्वाच्या चर्चेचा. म्हणजे लोकसंग्रह आणि धर्मशास्त्रामधल्या मोक्षाची चर्चा करताना सगळ्या पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये आलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अंतःकरण शुद्धी वा चित्तशुद्धीचा प्रश्न.

आपल्याला असं दिसेल की, भारताच्या इतिहासामध्ये एका बाजूला चित्ताची शुद्धी सांगणारे धर्म सामाजिक संघर्ष नाकारतात. उदा. येशू असेल, बुद्ध असेल, महावीर असतील. दुसऱ्या बाजूला सामाजिक संघर्ष करणारे जे धर्म आहेत, ते चित्ताची शुद्धता नाकारत नाहीत, पण संघर्षामुळे चित्त थोडंसं अशुद्ध झालं तर ते सहन करायची त्यांची तयारी आहे. आणि म्हणून आपल्याकडे ‘भगवदगीते’चे अर्थ लावतानासुद्धा दोन प्रधान विभागण्या झालेल्या दिसतात. एका बाजूला संन्यास योग आहे, दुसऱ्या बाजूला टिळकांनी सांगितलेला कर्मयोग आहे. या चौकटीमध्ये गांधीपूर्व काळामध्ये गीतेची चर्चा होताना दिसते.

लोकमान्य टिळकांनी गीतेचा अन्वयार्थ लावताना शंकराचार्यांची ‘गीता संन्यासमार्गी’ हे म्हणणं नाकारलं. (गीता कशाचा संदेश देते तर संन्यासाकडे चला. कारण शंकराचार्यांची मूळ भूमिका जग मिथ्या असण्याची, मायावादाची आहे.) ‘गीतारहस्या’त टिळक असं म्हणाले की, संन्यासाची प्रेरणा ही खरी प्रेरणा नाही,. कर्मयोगाची प्रेरणा आहे. त्यामुळे लोकसंग्राहाची प्रेरणा गीतेमधून मिळते. स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगानं टिळकांनी गीतेचा हा एक अर्थ लावायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून चित्ताची शुद्धता साध्य झाली नाही. काही हीन राहीले, तर ते स्वीकारायची माझी तयारी आहे, इथपर्यंत टिळकांचा विचार पुढे आलेला दिसतो. ‘साधनानाम् अनेकता’ ही टिळकांची साध्य-साधना संदर्भातली भूमिका होतीच.

गांधींचं म्हणणं असं होतं की, सामाजिक संघर्षाचा मार्ग स्वीकारला म्हणून चित्ताची शुद्धता पूर्ण होणार नाही किंवा हीन राहील, ही सूट कशासाठी घ्यायची? टिळकांच्या पुढे पेच होता सामाजिक संघर्षाचा योग्य मार्ग कोणता? यामध्ये टिळकांची मनःस्थिती द्विधा दिसते. अवंतिकाबाई गोखल्यांनी गांधींचं पहिलं मराठी चरित्र लिहिलं आहे. त्याला टिळकांची प्रस्तावना आहे. त्यात गांधींची पुष्कळ स्तुती टिळकांनी केली आहे. ते म्हणतात, पुढच्या काळात हाच मार्ग (सत्याग्रहाचा) कदाचित जास्त प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. पण तरीही टिळकांच्या काळामध्ये त्यांना एका बाजूला ‘साधनाम् अनेकता सिद्धान्त’ मान्य होता. अनेक साधनांचा वापर संघर्षात करता येतो, पण साधनशुचितेच्या अंगानंच संघर्ष करावा की नाही, या पेचात टिळक दिसतात.

गांधींपुढे हा पेच आला, तेव्हा त्यांनी अशी भूमिका घेतली की, सामाजिक संघर्षही करता येतो आणि चित्ताची शुद्धीही साधता येते. चित्तशुद्धी अधिकाधिक साधत असताना सामाजिक संघर्ष शुद्ध साधनांनीही करता येतो. त्याचा एक नवा मार्ग गांधींनी हुडकला. तो म्हणजे अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग. मी करत असलेला संघर्ष जर सत्याग्रही मार्गानं होणार असेल तर त्यातून दोष निर्माणच होणार नाही. कारण सत्याग्रहाचं तत्त्वज्ञान द्वेषावर उभारलेलं नसल्यामुळे अहिंसात्मक परिवर्तनासाठी मी जर सत्याग्रहाचा वापर केला तर सामाजिक संघर्षामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या हृदयपरिवर्तनाची शक्यता राहिल्यामुळे चित्तशुद्धीला मदतच होईल. म्हणजे हे सगळं द्वैत गांधींनी मिटवलेलं आहे. गांधींच्या व्यक्तिमत्त्वात भारतीय राजकारणातील आणि समाजजीवनातील किती द्वैतं मिटली हे आपल्या लक्षात येत नाही.

१९व्या शतकामध्ये फुले विरुद्ध रानडे असा एक संघर्ष होता. आंतरविरोध म्हणून आपण त्याला. पुढे जहाल की मवाळ असा आंतरविरोध आला. त्याला काही अर्थ नव्हता. कारण टिळकांच्या तुरुंगवासानंतर मवाळ-जहाल यांच्यात काही फरकच दाखवता येत नव्हता (पण तरी आपण जहाल-मवाळ म्हणतो!). पुढे चालून आधी राजकीय की आधी सामाजिक असा आंतर-विरोध निर्माण झाला. पुढे चालून फक्त चित्तशुद्धी की, चित्तशुद्धी, लोकसंग्रह यासह संघर्ष, हे सगळे आंतरविरोध गांधींच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या धर्मकल्पनेत आणि त्यांच्या प्रत्यक्ष लढ्याच्या कार्यक्रमामध्ये मिटलेले दिसतात. सामाजिक की राजकीय हा प्रश्नच त्यांनी शिल्लक ठेवला नाही. त्यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेतच त्याचा समावेश केला. त्यामुळे धर्मदृष्टी राखून लोकसंग्रहही करता येतो, संघर्षही करता येतो आणि चित्ताची शुद्धीही करता येते, अशा प्रकारचा एक नवा आयाम गांधींनी हिंदूधर्मचिंतनाला दिला, असं मत त्या काळातील विख्यात विचारवंत आचार्य भागवतांनी व्यक्त केलेलं आहे. वैराग्य आणि संन्यास या संकल्पनांनाही गांधींनी नवा आशय दिला. दोन्हीही संकल्पना त्यांनी समाजाभिमुख मांडल्या. वैराग्याचं विश्वस्तवृत्तीत रूपांतर होऊ शकतं, तर संन्याशी क्रियाशील होऊन निरपेक्ष रीतीनं समाजसेवा करू शकतो, असाही अर्थ लावता येतो. धर्मविचाराला गांधींचं हे योगदान आहे.

गांधींच्या धर्माकडे पाहण्याच्या दृष्टिकानामध्ये अजून एक मेख आहे. धर्म नावाची गोष्ट माणसाच्या जन्मापासून त्याच्याबरोबर आहे. तसंच माणसाला पूर्णत्वाच्या ओढीचीही प्रेरणा आहे. या सगळ्या चराचर विश्वाशी मला एकरूप व्हायचं आहे. तो एका अंगानं मोक्ष आहे ही एक प्रेरणा आहे. दुसऱ्या बाजूला गांधी असं म्हणतात की, माणसाला पूर्णत्वाची ओढ आहे, पण प्रत्यक्षामध्ये मानवी जीवन मात्र अपूर्ण आहे. या द्वैताचा वापर गांधींनी त्यांच्या धर्मकल्पनेच्या स्पष्टीकरणात केला. धर्माच्या बाबतीत विचार करताना गांधी नेहमीच असं म्हणाले की, ‘आय बिलिव्ह इन द स्पिरीट ऑफ रिलिजन’. धर्माच्या प्रेरणेशी मी इमान राखण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्यक्षात मला काय कराव लागतं तर ‘आय हॅव टू रिलाय ऑन द टेक्स्ट्’, मला धर्मग्रंथांवर अवलंबून रहावं लागतं.

म्हणून गांधी असं म्हणाले धर्म ईश्वरी आहेत, पण धर्मग्रंथ मानवी आहेत. ईश्वराला जे वाटलं ते त्यांनी धर्मग्रंथात सांगितलं असलं तरी ते माणसानं लिहिलेलं आहे. या अर्थानं सर्व धर्मग्रंथांचं दैवीपण गांधींनी नाकारलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते माणसांनी लिहिलेलं असल्यामुळे अपूर्णच आहेत. त्यामुळे पूर्णतेच्या ओढीकडे जाण्यासाठी अपूर्ण धर्मग्रंथ आपल्याला उपयोगी नाहीत, ही स्पष्ट भूमिका घेतली. कालाप्रमाणे त्याचं परिष्करण सतत करावं लागणार, त्यातलं हीन काढावं लागणार आणि ते हीन काढून आपण पूर्ण सत्याकडे, चित्तशुद्धीकडे जाणं हा खरा मोक्षाचा मार्ग आहे आणि हा मोक्ष हा खरा पुरुषार्थ आहे, ही गांधींची भूमिका दिसते.

यामुळे धर्मग्रंथात केले जाणारे बदल, रूढीत होणारे बदल, कालसुसंगत करावयाचे बदल, यांना गांधींनी आपोआप एक अधिष्ठान मिळवून दिलं. म्हणून ‘टेक्स्ट् ऑफ द रिलिजन’ आणि ‘स्पिरिट ऑफ द रिलिजन’ ही जी फारकत गांधींनी केली, त्यामध्ये धर्माला नवा सामाजिक आयाम किंवा दृष्टी देण्याचं बीज आपल्याला दिसतं. आणि गांधींच्या सर्व धर्मसुधारणांचं बीज या प्रकारच्या विभागणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.

ईश्वराची कल्पना करतानासुद्धा गांधी आधी असं म्हणाले की, ईश्वर सत्य आहे. नंतर ते असं म्हणाले की, सत्य हाच ईश्वर आहे. आणि १९३३साली ते म्हणाले की, ईश्वर म्हणजे सामाजिक न्याय आहे. म्हणजे ईश्वराची कल्पना सक्रिय निर्मिकाच्या पातळीवर त्यांनी मांडलेली नाही. तो प्रत्येक वेळेला काहीतरी हस्तक्षेप करतो, अशा पातळीवर मांडलेलं नाही. जिचं साम्य कदाचित महात्मा फुलेंच्या निर्मिक संकल्पनेशी आपल्याला सांगता येईल. त्या निर्मिकाच्या प्रेरणेशी तुम्हाला इमान राखायचं तर तुम्ही स्वतःचं आंतरजीवन शुद्ध करा, सुधारा म्हणजेच सगळ्या मानवमात्रांच्या बरोबरचे तुमचे संबंध हे एका लयीमध्ये तुम्हाला आणता यायला पाहिजेत. म्हणून ते ईश्वर सगुण आहे की साकार आहे, निर्गुण आहे की निराकार आहे, या वादातही पडलेले नाहीत.

त्यांनी असं लिहिलं की, ज्यांना मूर्तिपूजा करायची, ती त्यांनी खुशाल करा. मला मूर्तिपूजा करायची नाही, माझ्यासाठी निराकार हीच कल्पना जास्त श्रेयस्कर आहे. त्याचा परिणाम काय झाला? गांधींच्या सबंध धर्मप्रवासात त्यांना एकही मंदिर बांधावं लागलं नाही, एकही मशिद बांधावी लागली नाही, एकही चर्च बांधावं लागलं नाही आणि एकही धर्मस्थळ पाडावंसुद्धा लागलं नाही.

नामजपापर्यंत अधिकार जर परंपरेनं दिलेला आहे, तो एका अंगानं धर्मसंस्थांचं लोकशाहीकरण करून पुढे नेला पाहिजे. कारण नामजप न वाचता येणाऱ्यालाही अधिष्ठान येत असेल तर तेही गांधींनी मान्य केलं आहे. त्यासाठी कुठलही स्वतंत्र देऊळ बांधलेलं नाही. वा तशी गरजही गांधींना पडली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगासाठी स्वतंत्र मंदिर बांधावं लागलं आणि पुढे कळतनकळत ते हरिजनांचं मंदिर म्हणून प्रसिद्ध पावलं. पुन्हा तिथं इतरांनी न जाणं हा मुद्दा तसाच शिल्लक राहिला. कारण सावरकरांची प्रेरणा कितीही चांगली असली तरी देवळांचा व्यवहार हा अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की, चर्चेस्, मशिदी, देवळं ही धर्माच्या व्यभिचाराची दृश्यं स्वरूपातील लक्षणं आहेत. तिथं जे व्यवहार चालतात, त्याला लोक धर्म मानतात. त्याच्यातून धर्माच्या प्रेरणेचा नायनाट होतो आणि उपऱ्या धर्माला प्रतिष्ठा मिळते. जी आपण आज पाहतो आहोत.

गांधींना अनुभव होता का या संदर्भात? तर होता. विश्वनाथाच्या देवळात एकदा ते गेले. त्यांनी कनवटीचा एक पैसा तिथं टाकला. गांधींकडे पाहून त्या पुजाऱ्यानं तो पैसा उचलला आणि बाहेर भिरकावून दिला. तिथंच त्यांना पहिली घृणा आली. नंतर तेथील अस्वच्छता, देवळात असणारी अस्पृश्यता हाही तिथल्या अनुभवाचा भाग होता. म्हणून ते म्हणाले की, या नादाला न लागतासुद्धा धर्माचं उन्नयन करता येतं, धर्माला प्रगल्भ करता येतं. आपली दृष्टी आपण कशा पद्धतीनं धर्माकडे बघतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणून गांधींनी एका अद्वैताचा स्वीकार केलेला होता. गांधी अद्वैती होते. ते असं म्हणाले, ‘अ‍ॅपिअरन्स आणि रिअॅलिटी यांच्यात मी द्वैत मानत नाही, मला ते एकच दिसतं. म्हणून मी जे करतो तेच मी बोलतो आणि मी जे बोलतो तेच मी करतो. त्याची किंमत मोजावी लागली तरी.’

अनेकदा त्यांच्यावर हल्ले झाले, बॉम्बहल्लेही झाले. हे सगळं १९३४-३५ सालापर्यंत अस्पृश्यतेच्या मुद्यावर गांधी जेव्हा काम करत होते तेवढ्यातून आलेले हल्ले होते. ‘मी जे बोलतो तेच करेन’ यासाठी गांधींना कशाकशाची किंमत मोजावी लागली बघा!

आफ्रिकेमध्ये कस्तुरबांनी पूर्वास्पृश्याचे भांडे धुवायला नकार दिल्याबरोबर गांधींनी त्यांना सांगितलं की, अस्पृश्यता पाळणाऱ्याला या घरात थारा नाही. ते भांडण मिटलं हा भाग निराळा. अहमदाबादच्या साबरमती आश्रमामध्ये तुलनेनं वयानं लहान असलेल्या एका तरुण मुलाला संडास साफ करण्याचं काम दिलेलं होतं. त्याला ते प्रकृतीदृष्ट्या झेपत नव्हतं. योगायोगानं त्याच वेळेला आश्रमामध्ये विनोबा भावे व त्यांचे बंधू बाळकोबा भावे त्याच आश्रमामध्ये काम करत होते. बाळकोबांनी त्या मुलाला पाहिलं. आणि मग बाळकोबा आणि विनोबांनी आपापसात करून असं ठरवलं की, आपण दोघं मिळून पायखाना साफ करण्याचं काम करू आणि त्या मुलाला स्वयंपाकाचं काम देऊ. ती तडजोड त्यांनी अमलात आणली.

त्याच आश्रमात गांधींची बहीण राहात होती. ती अत्यंत सनातनी वृत्तीची होती आणि ब्राह्मणांनी भंग्याचं काम करणं तिला मान्य नव्हतं. गांधी आश्रमात आल्यानंतर जेव्हा या घटनेची चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी बहिणीला सांगितलं की, तुला जर अस्पृश्यता मान्य असेल तर आश्रमात नाही राहता येणार. ती म्हणाली, मला अस्पृश्यता मान्य आहे, मी नाही राहणार. त्या रात्री गांधींनी तिला गाडीत बसवून दिलं. आपल्या कुटुंबात कुठल्याही कारणानं कुठेही हे घडलं नसतं आणि पुढेही घडणार नाही. किमान शंभर वर्षं.

गांधींच्या आश्रमातील आश्रमवासियांना नियम होते. त्यातील एक नियम असा होता की, ज्या देवळांमध्ये अस्पृश्यांना जाता येत नाही, त्या देवळांमध्ये माझ्या आश्रमातील माणूस जाणार नाही. गांधी स्वतः कधी गेलेच नाहीत. कारण तिथं देव नाही आहे, जो अस्पृश्यांना नाकारतो तो देवच नाही अशी त्यांची भूमिका होती.

ओरिसामध्ये गांधी एका बैठकीला गेले असताना त्यांच्या बरोबर कस्तुरबा होत्या. त्यांचे पुत्रवत असणारे सेक्रेटरी महादेवभाई देसाई त्यांच्याबरोबर होते. महादेवभाईंची बायकोही तिथं होती. हे तिघं गांधींना न सांगता जगन्नाथाच्या देवळात गेले आणि परत येताना महादेवभाईंच्या लक्षात आलं की, आपल्या हातून चूक झालेली आहे. आपण नियम मोडला आहे. ज्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नाही, त्या देवळात आपण गेलो. आता बापू काय भूमिका घेतील याची त्यांना कल्पना होती. गांधी त्यांना म्हणाले, ‘ही बातमी सांगण्यासाठी इथं आलास, त्याच्याऐवजी तिथं सत्याग्रह करून मेला असतास तर मला जास्त आनंद झाला असता.’ ही त्यांची अस्पृश्यांच्या प्रश्नावरची भूमिका होती.

पुढे गांधींनी १९४२च्या आसपास असं ठरवलं की, मी फक्त हरिजन-सवर्ण विवाहालाच उपस्थित राहीन. महादेवभाई गेल्यानंतर त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं. ज्याला पुत्रवत मानलं त्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळे तो नातू गांधींना पत्रिका द्यायला आला. पण गांधी म्हणाले, ‘तुझी पत्नी काही अस्पृश्य वर्गाची नाही.’ आणि ते गेले नाहीत लग्नाला. महादेवभाईंचा मुलगा म्हणून त्यांनी अपवाद केला नाही. (पुढे जेव्हा आंबेडकरांनी दुसरं लग्न केलं, तेव्हा गांधी हत्या झालेली होती. आंबेडकरांनी दुसरं लग्न केलं आणि तो आंतरवर्णीय विवाह होता. त्यांच्या नियोजित पत्नी ब्राह्मण समाजाच्या होत्या. लग्नाची पत्रिका द्यायला आंबेडकर सरदार पटेलांकडे गेले. सरदार आंबेडकरांना असं म्हणाले की, आज बापू असते तर त्यांनी या लग्नाला येऊन आशीर्वाद दिला असता. कारण हे लग्न बापूंच्या चौकटीत बसणारं आहे.) ही त्यांच्या निष्ठेची किंमत होती. ती त्यांनी मोजली. आणि त्याच्यात त्यांनी दुसऱ्या कोणाचाही अपवाद केला नाही.

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

औरंगाबादमध्ये २२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रा. दिनकर बोरीकर स्मृतिव्याख्यानाप्रसंगी केलेल्या व्याख्यानाचं हे पुनर्लेखन आहे.

.............................................................................................................................................

लेखक किशोर बेडकीहाळ राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

kishor077@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 03 April 2019

गांधी लै चांग्ला हो. फकस्त तेच्या चांगुलपनाचा हिंदूंना कायबी फायदा झाला नाय. उलट नुस्कानी मात्तर मोप झाली. काह्शापायी म्या म्हंतो त्येला डोईवर चढऊन ठीवायचा, आँ? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......