म. गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली! (उत्तरार्ध)
सदर - गांधी @ १५०
किशोर बेडकीहाळ
  • म. गांधी
  • Wed , 03 April 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

धर्माचा अर्थ लावण्याची गांधींची जी मानसिक प्रक्रिया आहे, त्याच्यावर कोणाकोणाचे प्रभाव होते आणि त्याचा कसकसा परिणाम झाला, हे पाहण्यासारखं आहे. सगळ्यात पहिला प्रभाव पडला तो गांधींचे ज्येष्ठ मित्र राजचंद्र जैन यांचा. त्यांचा फार मोठा प्रभाव गांधींच्या धर्मचिंतनावर आहे. हे गृहस्थ जैन होते. त्यामुळे जैन तत्त्वदर्शन आणि जैन तत्त्वज्ञानाची बरीचशी माहिती गांधींनी त्यांच्याकडून घेतली. दुसरा प्रभाव आहे रामकृष्ण परमहंसांचा. तो साधनेच्या वैविध्याचा प्रभाव आहे. परमहंसांनी स्वतः साधना करत असताना अनेक धर्मातील सत्याचा अनुभव येतो का, सगळे धर्म ईश्वरप्रणित आहेत म्हणून अनेक धर्मांच्या पद्धतीनं उपासना आणि साधना करण्याचा प्रयोग आपल्या आयुष्यात केला, हे आपल्याला माहिती आहे. त्याचा संस्कार गांधींवर आहे. त्यातून सर्वधर्मीय प्रार्थना येते आणि गांधींच्या सर्व-धर्म-समभावाची जी संकल्पना आहे, त्याची मुळं परमहंसांच्या या साधनेमध्ये आहेत. विवेकानंदांचं ‘राजयोग’ नावाचं पुस्तक गांधींनी अत्यंत सखोलपणे वाचलेलं होतं. त्याचा परिणाम गांधींच्या धर्मकल्पनेवर झालेला आहे. टॉलस्टॉयचं ‘किंगडम ऑफ गॉड’ याचाही विलक्षण परिणाम गांधींच्या धर्मकल्पनेवर झालेला आहे. सगळ्यात मोठा परिणाम झाला तो ‘अन् टू द लास्ट’ या रस्किनच्या पुस्तकाचा. ते ‘सर्वोदय’ नावानं पुढे गांधींनी भाषांतरित केलं. या सगळ्यांच्या दृष्टीमधून सर्व मानवमात्राचं ऐक्य आणि चराचर सृष्टीचं ऐक्य, यांचं अद्वैत त्यांच्या नजरेत भरलेलं आहे. या आधारावर गांधींची धर्मकल्पना ही विकसित होताना आपल्याला दिसते.

गांधी ज्या वेळेला धर्मग्रंथांचा अर्थ लावण्याची भूमिका घेतात, तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींचा वेगळा अन्वयार्थ लावलेला आहे. ‘भगवदगीते’चं उदाहरण घ्या. ‘गीता’ हा भारतातील राजकारण्यांचा त्यावेळचा लोकप्रिय ग्रंथ होता (आणि आजच्या राजकारण्यांचा राजकारणासाठीचा लोकप्रिय ग्रंथ आहे!) गांधींनी स्वतःचा अर्थ लावण्यासाठी ‘गीतेचा अनासक्तीयोग’ नावाचं पुस्तक गुजराती भाषेत लिहिलं. त्याचं भाषांतर महादेवभाई देसाईंनी केलं, पण ते १९४६ साली प्रसिद्ध झालं. (ते प्रसिद्ध व्हायला उशीर झाला, कारण गांधींना त्यातली ओळ न ओळ वाचून दुरुस्त्या करायच्या होत्या, भाष्य करायचं होतं. प्रस्तावना लिहायची होती. हे सगळं करून ते ४६ साली प्रसिद्ध झालं, ‘गीता अकॉर्डिंग टू गांधी‘ या नावानं.) मी ग्रंथाच्या तपशीलात जाणार नाही. गीतेतील महाभारतातील युद्ध आणि त्याबद्दलचा गांधींचा अन्वयार्थ वेगळा आहे.

गांधींनी राम, कृष्ण, येशू यांची ऐतिहासिकता नाकारलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की, ऐतिहासिक राम आणि कृष्ण स्वीकारणं यात गडबडी पुष्कळ आहेत. रामानं असं का केलं, तसं का केलं, रामायणातील कथा प्रक्षिप्त आहे का, या सगळ्या चर्चा त्यातून सुरू होतात. त्यांना त्यात रस नाही. त्यांना ‘वाल्मिकी रामायणा’पेक्षा ‘तुलसी रामायण’ आवडायचं. महाभारतातील गीतेबद्दल ते असं म्हणतात की, आपल्याकडे समज असा आहे की, कृष्णानं अर्जुनाला क्षत्रिय धर्माची जाणीव करून दिली. क्षत्रियांवर असलेल्या विश्वकल्याणाच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ती जाणीव करून देऊन त्याला युद्धाला प्रवृत्त केलं. हे युद्ध धर्मयुद्ध होतं व धर्माचा विजय होण्यासाठी ते आवश्यक होतं. म्हणून समोर कोण आहे याचा विचार न करता अर्जुनाला त्यांनी युद्धाला प्रवृत्त केलं. हा गीतेचा अन्वयार्थ ऐतिहासिकदृष्ट्या जो आहे, तो गांधींना मान्य नाही. त्यांचा अन्वयार्थ कोणता? खरं तर राम आणि कृष्ण हे गांधींचं आवडत दैवत आहे. ऐतिहासिकता त्यांनी नाकारली तरी गांधींनी त्याला वेगळा अर्थ दिला आहे. रामाला आणि कृष्णालाही वेगळा अर्थ दिलेला आहे.

कृष्णाबद्दल लिहिताना ते असं म्हणाले की, तो अर्जुन त्यांना असं सांगतोय की सुष्ट आणि दुष्ट हे मानवी मनाच्या आत चाललेलं द्वंद्व आणि प्रेरणा आहे. हे द्वंद्व माणसाच्या मनामध्ये चिरंतन काळापासून चाललेलं आहे आणि याच्यातील सुष्ट प्रेरणांचा विजय व्हावा म्हणून दुष्ट प्रेरणांवर आपल्याला मात करता यायला पाहिजे. ही मात जर करता आली नाही तर युद्ध होईल आणि युद्धातून फक्त विनाश होतो. जो जिंकतो त्याला जिंकल्याचा अनुभव घेता येत नाही, जो हरतो त्याला दुःख करण्याची संधी नाही. कारण त्याचा विनाश झालेला आहे. म्हणजे जिंकल्याचा आनंद नाही, हरलेल्याला तर दुःख करण्याची संधी नाही, हा युद्धाचा परिणाम आहे. म्हणून युद्ध हे सगळ्यात वाईट आहे. युद्ध हा शांततेला पर्याय नाही, हे गांधींचं महाभारताबद्दलचं, भगवतगीतेबद्दलचं, कृष्ण-अर्जुन संवादाबद्दलचं म्हणणं आहे. गीतेचा संदेश युद्धाच्या भीषणतेची कल्पना देण्याचा आहे, असं गांधींना वाटतं.

मग या प्रेरणांचा संघर्ष का होतो? गांधींनी ‘अनासक्ती’ हा शब्द वापरला आहे. आसक्ती जोपर्यंत जात नाही आणि अनासक्त पद्धतीनं जोपर्यंत कर्म आपण करायला जात नाही, तोपर्यंत हिंसा अटळ आहे, स्पर्धा अटळ आहे, युद्ध अटळ आहे. हे तुम्हाला नको असेल तर आसक्तीचं मूळ मनातून काढून टाकायला शिका. म्हणून गांधी त्यांच्या धर्मकल्पनेत एकादशव्रताची भूमिका घेतात. एकादशव्रताचं पालन केलं तर आसक्ती जाईल आणि असं म्हणता म्हणता त्या अकरा व्रतांच्या माध्यमातून गांधी त्यावेळच्या आधुनिक समाजरचनेला, भांडवली समाजरचनेला वसाहतवादाच्या प्रेरणांनी युक्त असणाऱ्या समाजाला असणारा एक नवा सामाजिक पुनर्निर्मितीचा पर्याय आणि कार्यक्रम एकादशव्रतात जाहीर करतात. (‘हिंद स्वराज’ हा त्याचाच एक भाग आहे.) ही एकादशव्रतं शेवटी एका नव्या समाजाच्या रचनेला जन्म देणार आहे; ज्याच्यात संयम, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा याला महत्त्व असणार आहे. नव्या रचनेत आसक्ती नसेल आणि स्पर्धेऐवजी सहकार्य असेल.

याचं कारण गांधी माणसाच्या इतिहासाकडे सततचा संघर्षाचा इतिहास म्हणून पाहात नाहीत. मानवी इतिहास संमिश्र आहे. त्यात संघर्षही आहे आणि सहकार्यही आहे. गांधींचं एक प्रसिद्ध वचन आहे की, डोळ्याला डोळा काढण्याची भूमिका मानवजातीमध्ये पहिल्यापासून जर अमलात आली असती तर निम्म जग आंधळं दिसलं असतं. ज्याअर्थी निम्म जग आंधळं दिसत नाही त्याअर्थी डोळ्याला डोळा काढण्याची भूमिका जगानं मोठ्या प्रमाणावर स्वीकारलेली नाही. तोपर्यंत माणसाला शांततेची आशा आहे आणि ही आशा तुम्हाला वाढवायची असेल तर तुमची आसक्ती कमी करा, संयमानं जगा.

पुढे गांधी असं म्हणाले की बुद्धी, अनुभव आणि काळ यांच्या कसोटीवर जे टिकणार नाही, ते मी स्वीकारणार नाही. मग ते वेदवाङ्मय असू दे, धर्मशास्त्र असू दे. त्यांनी प्रयत्न करून पाहिला की, धर्मशास्त्र अस्पृश्यतेला किती अनुकूल-प्रतिकूल आहे. कारण गांधींसमोर आंबेडकरांसारखा एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी होता, ज्यांच्या चिंतनाचा मोठा परिणाम गांधींच्या कार्यक्रमांवर झालेला आहे. येरवडा करार झाला २४ सप्टेंबर १९३२ला आणि २३ डिसेंबर १९३२ला गांधींनी एक नवीन प्रयोग केला येरवडा तुरुंगात असताना. वाईला जी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी नंतर नेतृत्व केलेली जी संस्था होती, केवलानंद सरस्वतींची प्राज्ञ पाठशाळा, त्या केवलानंद सरस्वतींना गांधींनी निरोप पाठवला की, मला तुमच्याशी धर्मशास्त्राबद्दलची चर्चा करायची आहे. तुम्ही तुरुंगात भेटायला या. चर्चा काय करायची की धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेचं समर्थन आहे की नाही? केवलानंद गेले भेटायला. त्यांच्याबरोबर एक तरुण तेजस्वी धर्मशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांना घेऊन गेले. (येरवडा तुरुंगातील या चर्चेच्या वेळी स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ यांच्याशिवाय धर्मरहस्यकार के. एल. दफ्तरी, भगवानदास, पी. एच. पुरंदरे, आनंदशंकर ध्रुव व इंदिरा रमण शास्त्री हे विद्वान उपस्थित होते.) चर्चेला सुरुवात झाली. केवलानंद म्हणाले की, मी बोलणार नाही या चर्चेत माझा प्रतिनिधी हा लक्ष्मण बोलेल. मग धर्मशास्त्राची गहन चर्चा सुरू झाली आणि सगळ्यांचा एक निष्कर्ष आला की, धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेला संमती नाही. दप्तरींना थोडीशी शंका होती. त्या शंकेचं निरसन स्वतः केवलानंद सरस्वतींनी केलं आणि मग गांधींनी तुरुंगातून धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेला समर्थन नाही, असं या मान्यवरांच्या सहीचं एक पत्रक प्रसिद्ध केलं १५ डिसेंबर १९३२ला. धर्मशास्त्र जर संमती देत असेल अस्पृश्यता नाही, तर चांगली गोष्ट आहे. पण पुढे ते असं म्हणाले की, समजा नाही दिली तर मी त्यासाठी थांबणार नाही, मी पुढे निघालो आहे. १९४६ साली ते असं म्हणाले की, अस्पृश्यता टिकणार असेल तर हिंदूधर्म मेलेला बरा. यातून गांधी धर्मसंकल्पनेचा विकास करत असताना कुठल्या दिशेनं जायचं ती दिशा पक्की होताना दिसते.

गांधींच्या धर्मप्रवासाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की, ते साधना जी करताहेत ती सतत वरून खाली येणारी आहे. सूटाबुटातला बॅरिस्टर म्हणून गांधी आफ्रिकेत गेले. हळूहळू भारतीय राजकारणातील त्यांची ओळख एक पंचा नेसलेला, काठी हातात असलेला एक कृश म्हातारा अशी झाली. असंच उघडं अंग घेऊन ते इंग्लंडला गेले, थंडीवाऱ्यात राहिले, पण आपली भूमिका सोडली नाही. कारण गांधींना कोणाशी तादात्म्य पावायचं याचं सूचन त्यातून होतं.

गांधींनी एका नव्या व्रताची जोड भारतीय धर्मकल्पनांना दिली. ते त्यांना ख्रिश्चॅनिटीकडून मिळालेलं सेवाव्रत आहे. म्हणून एका बाजूला एकादशव्रत, दुसऱ्या बाजूला श्रमाची आराधना आणि तिसऱ्या बाजूला सेवा. व्रत-श्रम-सेवा ही गांधींच्या धर्मकल्पनेची वैशिष्ट्यं आहेत. ज्यामुळे हिंदू धर्म हा नेहमीच्या परिघापेक्षा आणखी मोठ्या ठिकाणी जाताना दिसतो.

नेहमीचा एक वाद आपल्याकडे जो होता, तो गांधींच्या काळातही होता. बुद्धी आणि श्रद्धा यांचं नातं काय? गांधी आजच्या अर्थानं बुद्धिवादी नाहीत. वैज्ञानिक अर्थानं नाही. म्हणजे काय तर बुद्धीला सगळं कळतं असं गांधींना वाटत नाही. फक्त पंचेद्रियांमार्फतच ज्ञान होतं, ही भूमिका गांधींना मान्य नव्हती. विशेष म्हणजे दि. के. बेडेकर या मार्क्सवादी विचारवंताच्या धर्मचिंतनातही ही भूमिका आहे. (हे अनेकांचं म्हणणं आजही आहे.)

श्रद्धेलाही महत्त्व आहे, याचा दृष्टान्त देताना गांधी म्हणाले की, मला जर उद्या तुम्ही असं म्हणालात की, १० लाख वार खादीचं कापड तुम्ही मला निर्माण करून द्या. तर त्या १० लाख वारांसाठी किती कापूस लागेल, पेळू किती लागतील, वेळ किती लागेल, कामगार किती लागतील, हे सगळं तुम्ही मला दिलंत तर मी तुम्हाला अचूक वेळ सांगू शकतो. तिथं बुद्धीचा वापर आहे. पण तुम्ही जर मला असं आव्हान दिलं की, कमीत कमी पाच सवर्ण माणसांच्या चित्तातील अस्पृश्यता घालवून दाखवा. तर त्याला ५-५० काय जास्तीही वर्षं लागू शकतील. कारण मला श्रद्धेनं त्यांच्या अंतःकरणात घुसलं पाहिजे. हे बुद्धी आणि श्रद्धेचं गणित गांधींनी स्वतःपुरतं या पद्धतीनं सोडवलेलं आहे. मी बुद्धी वापरेन आणि अंतःप्रज्ञाही वापरेन, या दोन्हींच्या मध्ये गांधींचा धर्मप्रवास आपल्याला होताना दिसतो.

या धर्मप्रवासातून अजून एक गोष्ट त्यांना साध्य करायची होती. ती म्हणजे वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था (या दोन्हीबद्दल गांधींनी खूप उलटसुलट विधानं १९१७ पासून २७ सालापर्यंत केली. २७ सालानंतर गांधींनी याच्याबद्दलचं बोलणं थांबवलं!) याबद्दल निःसंदिग्ध भूमिका घेतली आहे, पण आधीच्या काळाच्या भूमिकेमध्येसुद्धा ते एका शास्त्र्याशी वाद घालताना असं म्हणाले की, (त्यांच्या आश्रमातील लक्ष्मी नावाची अस्पृश्य मुलगी सतत त्यांच्याबरोबर असे.) ‘मी वर्णधर्म मानतो, पण माझा वर्णधर्म काही मला अस्पृश्यांपासून लांब ठेवत नाही. ते माझ्या घरांत राहतात. मी त्यांच्याबरोबर जेवतो. त्यांच्याबरोबर वावरतो.’

गुजरातमधल्या भूज नगरपालिकेनं त्यांना अस्पृश्योद्धाराच्या कामाबद्दल मानपत्र देताना कार्यक्रम केला. लोक बसलेले होते, व्यासपीठ होतं आणि भूज गावातले अस्पृश्य एका बाजूला कोपऱ्यात उभे होते. गांधी म्हणाले की, त्यांना पुढे बसवा. आयोजक म्हणाले की, नाही, आम्ही त्यांना पुढे नाही घेऊ शकत. मग गांधी म्हणाले की, ‘मी तिथं जाऊन मानपत्र स्वीकारेन. कोणत्याही परिस्थितीत अस्पृश्यता नाही मान्य करणार. तुम्ही मला अस्पृश्यतेच्या कार्यासाठी मानपत्र देत आहात, तेव्हा तर हे नाहीच होणार.’ म्हणून ते तिथं गेले, तिथं टेबल नेलं आणि तिथं त्यांनी मानपत्र स्वीकारलं.

हा जो सगळा वर्णव्यवस्था आणि श्रमाचा सांधा आहे, हा त्यांना तोडायचा होता आणि हा तोडायचा असल्यामुळे वर्णांतर करता येतं, कर्मानं वर्ण बदलता येतो, अशी भूमिका घेऊन आपल्या अनेक सहकाऱ्यांना त्यांनी वर्णविद्रोहाची शिकवण दिली. अप्पासाहेब पटवर्धनांनी आयुष्यभर भंग्याचं व्रत घेतलं, अनेक ब्राह्मणांनी नागपूरसारख्या शहरात मेलेल्या गुरांची कातडी सोडवण्याला प्रोत्साहन दिलं. जातीव्यवस्था नाकारली. उत्पादक जातींचं कौशल्य टिकवलं पाहिजे. त्याला नव्या ज्ञानाची, तंत्रज्ञानाची जोड द्यायला पाहिजे, अशीही गांधींची भूमिका होती. सेवा करणाऱ्या जातींची मक्तेदारीही त्यांना अमान्य होती.

सर्व-धर्म-समभावाकडे वळताना ती संकल्पना आज मला महत्त्वाची वाटते, कारण तिची आजची प्रस्तुतता या सगळ्याशी संबंधित आहे. सर्व-धर्म-समभाव ही संकल्पना भारतामध्ये हेटाळणी झालेली संकल्पना आहे. एका बाजूला धर्मनिरपेक्षवाद्यांनी तिची हेटाळणी केली, दुसऱ्या बाजूला नास्तिक्य बाळगणाऱ्यांनी हेटाळणी केली, तिसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी प्रवाहांनीही तिची हेटाळणी केली. प्रत्यक्षात या संकल्पनेत काय क्रांतिकारकता आहे, हे या तिन्ही प्रवाहांना उमगलेलं नाही. गांधी जेव्हा असं म्हणतात की, सर्व धर्म समान आहेत. याचा दुसरा अर्थ सर्व धर्म खोटे आहेत, असा एक अर्थ नरहर कुरुंदकर आणि सुरेश द्वादशीवार यांनी लावलेला आहे. त्यांचा अर्थ चुकीचा आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. सर्व धर्म समान आहेत, याच्यात फक्त एक महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की, सर्व धर्म समान असतील तर धर्मांतराची गरज नाही. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं याला अर्थ नाही, म्हणजे आवश्यकता नाही या अर्थानं. हाच एक मुद्दा यातून सिद्ध होतो. पण सर्व धर्म खोटे आहेत, हे सिद्ध होत नाही. कारण गांधी ज्यावेळेला धर्माचा अर्थ स्वतः लावण्याची भूमिका घेऊन धर्माचे संस्थात्मक सत्तासंबंध (इन्स्टिट्यूशनल पावर स्ट्रक्चर) नाकारतात, तेव्हा ते असं म्हणतात की, माझा धर्म किती चांगला आहे हे मला माहीत आहे, पण दुसऱ्या धर्मातील चांगलंही मला माझ्या धर्मांत आणायचं आहे. सर्व धर्म समान असल्यामुळे त्याही धर्मात काहीतरी चांगलं असणार आहे आणि ते मला गोळा करायचं आहे. हे करायला सर्व धर्म समान आहेत, हे म्हटल्याशिवाय जागा नाही. आणि या पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक धार्मिक माणसानं स्वतःच्या धर्माचा विचार केला पाहिजे व चिकित्साही. मुसलमानांनी या पद्धतीनं आपल्या धर्माची चिकित्सा करावी, ख्रिश्चनांनी करावी, शिखांनी करावी; जेवढे जेवढे धर्म, पंथ म्हणवतात त्यांनी स्वतःच्या धर्म-पंथांची या पद्धतीनं चिकित्सा करावी. ही जर सवय माणसाला लागली तर दुसऱ्या धर्मातील चांगलं शोधण्याच्या प्रेरणा ज्या वेळेला सर्व धर्मांमध्ये बळकट होतील, तेव्हा धर्माच्या आधारे होणारं विभाजन आणि संघर्ष यांचं मूळ संपुष्टात येईल, हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे.

गांधींच्या डोळ्यासमोर काय होतं? सर्व समाजसुधारकांचे आधीपासूनचे प्रयत्न अगदी लोकहितवादी, फुले, आगरकर, रानड्यांपासून ते विठ्ठल रामजी शिंदे इ. सर्व समाजसुधारकांपर्यंतचे. या सगळ्यांचा मुख्य हेतू होता की, इथं सुदृढ, शोषणरहित, समतेवर आधारलेला असा एक नागरी समाज निर्माण व्हायला हवा. हा समाज जर निर्माण व्हायचा असेल तर समाजामध्ये असणाऱ्या धर्मासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचं नीट नियमन व्हायला पाहिजे. गांधी असं म्हणतात की, सार्वजनिक जीवनात धर्म राहणारच आहे. गांधींची त्यात एक अंतर्निहित भूमिका आहे. गांधींना जेव्हा असं विचारलं की, तुम्ही राजकारणात का आलात? तेव्हा ते म्हणाले की, ‘मी जीवनाचा नम्र उपासक आहे. मी सत्याचा शोधक आहे. मी धर्मभावना मानतो आणि मला लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणाइतकं उत्तम क्षेत्र नाही. म्हणून मला राजकारणातून जो धर्म आता बाद झालेला आहे, तो धर्म पुन्हा राजकारणात प्रस्थापित करायचा आहे.’

इथं रूढ अर्थाचा धर्म नाही, ती धर्मभावना आहे. आजचं राजकारण मूल्यावर आधारलेलं झाल्याशिवाय या रूढ धर्माच्या आधारे निर्माण झालेले सगळे भेदाभेद संपणार नाहीत. म्हणून गांधी असं म्हणतात की, सार्वजनिक जीवनात धर्म जर अटळ असेल तर अटळ असणाऱ्या धर्मामध्ये संवाद हासुद्धा अटळ गोष्ट आहे. इथं स्पर्धा नको, संवाद हवा. तो संवाद प्रत्येकानं दुसऱ्या धर्माचा आदर केला तरच शक्य होईल. दुसऱ्याचा द्वेष करून किंवा दुसऱ्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करून असा संवाद होणार नाही. तेव्हा असा संवाद होण्यासाठी सर्व धर्मांकडे समान नजरेनं पाहण्याची भूमिका तुम्हाला घेता यायला पाहिजे. मुळातच मी जेव्हा चांगल्या प्रकारचा हिंदू होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला चांगल्या प्रकारचा मुसलमान होता यायला पाहिजे, चांगल्या प्रकारचा शीख, ख्रिश्चन होता यायला पाहिजे. आणि हे मला हिंदू राहून करता यायला पाहिजे. याचाच अर्थ सर्व धर्मातल्या चांगल्या मूल्यांचा संग्रह माझ्या धर्मामध्ये वा दुसऱ्या माणसाच्या धर्मामध्ये त्यानं त्या पातळीवर करायला हवा, व्हायला हवा. म्हणून सतत धर्माची चिकित्सा व्हायला हवी.

मी जे सुरुवातीला म्हटलं आहे की, ‘स्पिरिट ऑफ द रिलिजन’ आणि ‘टेक्स्ट ऑफ द रिलिजन’ यामध्ये गांधी सतत फरक करतात. ‘टेक्स्ट ऑफ द रिलिजन’ची चिकित्सा ही सतत धर्माची चिकित्सा आहे. ही काळानुसार परिष्करण करत जायची गोष्ट आहे. ती तशी केली नाही तर माणसांना धर्मभावना आंतरिक पातळीवर जाणवण्याऐवजी प्रतीकांच्या पातळीवर, बाह्य जगतामध्ये काय दिसते याच्यावर माणसं उभी राहतील आणि प्रतीकं ही नेहमीच संघर्षांना जन्म देतात. कारण प्रतीकं कोणत्या ना कोणत्या अस्मितेचं वाहन होतात. म्हणून सर्व धर्म समानत्व, ईश्वराचेच सर्व धर्म आहेत म्हणून ईश्वरानं त्यांना चांगला धर्म दिला, मला वाईट दिला असं म्हणू शकत नाही. म्हणून मला ते सगळं समजलं पाहिजे.

आणि म्हणून गांधींच्या व्रतांमध्ये वैविध्य आलेलं दिसतं. त्याच्यात सर्वधर्मीय प्रार्थना हा एक मोठा आविष्कार आहे. दिल्लीतील दंगलीच्या शेवटच्या टप्प्यात गांधींची हत्या होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी अनेक हिंदूंनी त्या प्रार्थनेत सहभागी झालेल्यांनी असा आक्षेप घेतला की, महात्माजी आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे, पण फक्त या सर्व धर्म प्रार्थनेमध्ये मुसलमानांच्या प्रार्थना म्हणू नका. गांधी म्हणाले, ‘ज्यांना हे म्हणायचं नसेल ते प्रार्थना न म्हणता जाऊ शकतात. मी हे म्हणणार नाही, कारण धीस इज माय आयडियल. मुसलमानांच्या प्रार्थना म्हणणं हाच केवळ आयडियलचा भाग नाही आहे. सर्व धर्माचे लोक एकत्र जमून जगाच्या कल्याणासाठी स्वतः प्रार्थना करतात आणि एकत्र बसून प्रार्थना करतात. या एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे पाहतो. ती प्रार्थना कोणत्या धर्माची आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यामुळे प्रार्थना मी हिंदू धर्माचीही म्हणणार, ख्रिश्चन धर्माचीही म्हणणार.’ (आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की, गांधींनी त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये इंग्लंडमधल्या वास्तव्यात, आफ्रिकेतील वास्तव्यात अनेक धर्मांचा कसून अभ्यास केलेला होता!)

प्रार्थना, व्रते, संन्यास, वैराग्य, वर्णधर्म आदींना गांधींनी नवे आयाम दिले. समाजविन्मुख, गुहाकेंद्री गूढ, धूसर सामान्यांना न कळणारं अध्यात्म गांधींनी समाजसन्मुख केलं. लोकांना कळेल व भावेल असा त्याचा अर्थ लावला. प्रत्यक्ष जीवनानुभव व आपली प्रतिभा, चिंतनशीलता यांनी गांधींनी सहज पेलतील असे कार्यक्रम लोकांना दिले. सवर्णांना विवेकाची टोचणी लावली व धर्म परिवर्तनाकुल केला.

गांधी आधुनिक पद्धतीनं, विचारवंतांच्या पद्धतीनं लेखन करणारे नसल्यामुळे आपल्याला ते बुरसटलेले, मागास, प्राचीन गोष्ट सांगणारे, वर्णव्यवस्थेची तरफदारी करणारे असे वाटतात. आपण त्यातला अन्वयार्थ कधी शोधत नाही. पण त्यांची सर्व-धर्म-समभावाची संकल्पना आजच्या काळात महत्त्वाची आहे. ज्या काळात जगभर धर्म हा विभाजनाचं साधन बनत आहे, ‘अस्मितेचं हत्यार’ बनतो आहे, जगाला संकटाच्या खाईकडे नेण्याचं साधन बनतोय. धर्म विभाजक आहे, तो जगाच्या ऐक्याकडे जाणारा नाही. धर्मच जर राहणार असेल तर मग तो कसा रहावा, ही प्रत्येक सामान्य माणसाची, नागरिकाची चिंतेची बाब असली पाहिजे. चिंतेचा विषय असला पाहिजे. कारण त्याच्यातूनच धर्म प्रगल्भ होण्याची शक्यता आहे. म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो की, कोणताही नवा पंथ न काढता, कोणताही नवा धर्म न सांगता, कुठल्याही नव्या संप्रदायाला जन्म न देता गांधींनी हिंदू धर्माच्या रणभूमीमध्ये राहून हक्काने हा माझा धर्म आहे, त्याच्यावर माझा अधिकार आहे आणि तो अधिकार मी सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे, माझा धर्म मी प्रगल्भ करणार आहे, या प्रगल्भतेकडे हिंदू धर्माची परिणती केली. आपल्यामागे लोक व शिस्तबद्ध अनुयायी उभे करण्यात त्यांना यश मिळालं, हा याचाच परिणाम मानावा लागेल.

भारताच्या इतिहासामध्ये दोन उदाहरणं दिसतात. एक गांधींचं, ज्यांनी हिंदू धर्मातील दोषांसकट त्याचा स्वीकार करून त्याचं नवं इंटरप्रिटेशन देत, एका प्रगल्भ धर्माची आणि त्याच्या आधारे एका चांगल्या नागरी समाजाची (सिव्हिल सोसायटीची) कल्पना केली. असा सुबुद्ध नागरिक सर्व धर्माचा आदर करणारा, इथल्या नागरी समाजाचा घटक असला पाहिजे.

दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचं उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल असणारा हिंदू धर्म आम्हाला, लोकशाहीच्या संरचनेला प्रतिकूल आहे, अशी आंबेडकरांची धारणा आहे. त्याच्यात विषमता ठायी ठायी भरलेली आहे, विषमता हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असं म्हणत आंबेडकर हिंदू धर्मातून बाहेर पडतात, बुद्ध धर्माकडे जातात. बुद्ध धर्मामध्येसुद्धा स्वतःचं स्वातंत्र्य वापरून गांधींसारखं, स्वतःचा अधिकार वापरून बुद्धाचं नवयान चालवतात आणि नवी संकल्पना मांडतात. २२ प्रतिज्ञा तयार करतात आणि धम्माला सामाजिक नीतीच्या स्वरूपात प्रकट करतात आणि नागरी समाजाचा पाया घालतात.

हे दोन विचारवंत दोन निरनिराळ्या बाजूंनी येतात, पण एकाच सिव्हिल सोसायटीच्या स्थापनेकडे येतात. दोन भिन्न सामाजिक स्थानांवरून स्वत:च्या धर्माकडे पाहणाऱ्या या दोन विचारवंतांनी धर्माचा अर्थ लावण्याचा अधिकार स्वत:कडे घेऊन विचार केला, हे साम्य विलक्षण आहे. दोघांचीही प्रवृत्ती धार्मिकतेकडे होते आणि दोघांनीही परंपरागत धार्मिकतेला नाकारून धर्मभावनेला नवं रूप दिलं. दोन वेगळ्या वाटांनीही येऊनही दोघं एकाच प्रकारच्या नागरी समाजाच्या मुद्द्यांपाशी आले. यासाठी उभयतांची उत्कट धर्मभावना आड आली नाही. नव्या युगाला साजेसं धर्माचं महत्त्व उभयतांनी अधोरेखित केलं.

आपलं दुर्दैव असं आहे की, या दोन्हीही विचारवंतांच्या अनुयायांनी त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करून त्यांचा दारुण पराभव केलेला आहे आणि आजच्या अवनतीला हातभार लावलेला आहे!

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

औरंगाबादमध्ये २२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रा. दिनकर बोरीकर स्मृतिव्याख्यानाप्रसंगी केलेल्या व्याख्यानाचं हे पुनर्लेखन आहे.

.............................................................................................................................................

लेखक किशोर बेडकीहाळ राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

kishor077@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 03 April 2019

अस्पृश्यतेस धर्मशास्त्रांची मान्यता नाही मग हिंदूधर्माच्या माथी का मारण्यात येते? असो. बाकी, गांधींची साधना शून्य होती. धर्मांचा अभ्यास करणे म्हणजे साधना नव्हे. गांधी कोणत्याही गुरुपरंपरेत सामील नाहीत. त्यांनी कुठलीही परंपरा सुरूही केलेली नाही. गांधींना अध्यात्मातलं काडीमात्र ज्ञान नव्हतं. नुसती पोकळ बडबड होती. गांधी बायकांसोबत बिछान्यात नग्न झोपायचे व त्यांच्यासमवेत अंघोळही करायचे. (हे गांधींनी त्यांच्या 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकांत स्वत:च लिहिलेले आहे.) ही असली थेरं करून कोणी महात्मा होत नसतो. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......