काँग्रेस पक्षाचे खासदार, एक सिद्धहस्त लेखक व विचारवंत शशी थरुर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर - नरेंद्र मोदी अँड हीज इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘मधुश्री पब्लिकेशन’ यांच्या वतीनं लवकरच प्रकाशित होत आहे. लेखक व मुक्त पत्रकार प्रतिक पुरी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
नरेंद्र मोदी ही विरोधाभासानं भरलेली व्यक्ती आहे. ते एक गोष्ट सांगतात आणि करतात भलतीच! ते अनेक उदार कल्पनांचा आदर करत असल्याचं सांगतात (जसं की ‘राज्यघटना’ हे त्यांच्यासाठी ‘पवित्र’ पुस्तक आहे आणि ‘सबका साथ, सबका विकास!’), पण त्याच वेळी ते भारतीय समाज जीवनातील बहुसंख्य अनुदार घटकांना उत्तेजन देतात, ज्यांवर ते राजकीय पाठिंब्यासाठी अवलंबून आहेत. आणखी एक विरोधाभास म्हणजे, पंतप्रधान मोदी ज्या कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेचा अभिमान बाळगतात; तेच आपल्या मौनाद्वारे, निरंकुश प्रशासनाच्या वाईट गोष्टींनाही क्षमा करताना दिसतात– जातीय दंगली, झुंडीचे बळी, गोरक्षकांचा हिंसाचार आणि अन्य अशाच गोष्टी. तिसरा विरोधाभास आढळतो, तो त्यांच्या देशाविषयीच्या चढत्या महत्त्वाकांक्षांविषयीच्या बोलण्यात. पण त्यांच्या प्रशासनाची कामगिरी प्रत्यक्षात सुमार दर्जाची आहे.
मग खरे नरेंद्र मोदी कसे आहेत? एक अभिजन, निःस्वार्थी नेता जो आपल्या देशवासियांच्या हितासाठी झटून काम करतो की, हुकूमशहा, उजव्या गटाचा कट्टरतावादी, ज्याला केवळ सत्तेत आणि बहुराष्ट्रीय भारताला हिंदूराष्ट्रांत परावर्तित करण्यात रस आहे? की या दोन्हींच्यामधले काहीतरी?
मोदी आणि त्यांचा आपल्या देशावर झालेला परिणाम याचा हा विलक्षण अभ्यास त्यांच्याविषयीच्या या आणि इतरही प्रश्नांची उत्तरं देतो. हे पुस्तक पाच विभागांत आणि पन्नास प्रकरणांत विभागलं आहे. पहिल्या विभागात मोदी यांचं जगणं आणि त्यांचा काळ यावर कटाक्ष टाकण्यात आला आहे. अन्य चार विभागांत मोदी यांचं सरकार कशा पद्धतीनं काम करतं याकडे लक्ष दिलं गेलं आहे आणि त्याचा भारतीय समाज, मुख्य सार्वजनिक संस्था, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि आपल्या मूलभूत मूल्यांवर झालेल्या दूरगामी व बहुतांशी नुकसानकारक प्रभावाविषयी चर्चा करण्यात आली आहे. अनेक वर्षांचं जवळचं निरीक्षण, मोदी यांच्यासोबत झालेल्या व्यक्तिगत भेटी, उल्लेखनीय विद्वत्ता, भारतीय राजकारणाची सखोल समज आणि सरकारी यंत्रणा कशी काम करते याची अंतस्थ दृष्टी, यांचा उपयोग करून शशी थरुर यांनी या विरोधाभासी व्यक्तिमत्त्वाचं हे लक्षवेधक व्यक्तिचित्रण रेखाटलं आहे. या पुस्तकातील हे एक प्रकरण मोदींविषयी अधिक समजून घेण्यास वाचकांना मार्गदर्शक ठरू शकेल.
.............................................................................................................................................
‘नियतीचा माणूस’ हा वाक्प्रचार सामान्यतः नेपोलियन बोनापार्ट याच्याशी निगडीत आहे. एका निर्धन कॉर्सिकन कुटुंबातून आलेला आणि आपल्या महानतेच्या प्रवासात अनेक पराभव पत्करूनही हार न मानता आपण जगावर राज्य करण्यासाठीच जन्माला आलोय, यावर अटळ विश्वास असलेल्या नेपोलियनचा दुर्दम्य आशावाद वर्णन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
तरुणवयातच आपल्या नशिबावर असलेला दृढविश्वास आणि सत्ता प्राप्तीसाठी एकाग्रपणे केलेला पाठलाग याबाबतीत नरेंद्र मोदी हे नक्कीच नेपोलियनसारखेच आहेत! फ्रान्सच्या त्या अद्वितीय नेत्याकडे असलेले गुण त्यांच्यातही आहेत. याचा पुरावा म्हणून त्यांचे अनेक प्रशंसक त्यांची दूरदृष्टीची भाषणं, त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांची स्वतःच्या व भारताच्या नियतीवर असलेली अढळ श्रद्धा याकडे लक्ष वेधत असतात. मात्र नेपोलियनमध्ये कितीही दोष असले तरीही तो आठवला जातो, तो त्याची विलक्षण दूरदृष्टी, धार्मिक सहिष्णुता, मालमत्ता हक्क, न्यायाबाबत समानता आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी. ज्यांतील अनेक कल्पना या आजच्या जगातही महत्त्वाच्या आहेत.
पण हेच सारं नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणता येत नाही. त्यांची भाषणं लक्षवेधक असतात, पण त्यांच्या कल्पनांच्या अंमलबजावणीत ते अक्षम ठरले आहेत. त्याच वेळी भारताच्या संपन्नतेला ग्रहण लावणाऱ्या शक्तींना थोपवण्यास किंवा रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नजरेसमोर धर्मांध, जातीय आणि विघटनवादी शक्ती थैमान घालत आहेत. त्यामुळे भारत अनेक दशकं मागे फेकला गेलाय. परिणामी एक महान मुत्सद्दी आणि सत्ताधारी म्हणून ओळखलं जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही गुणांवर त्यांचं सकारात्मकपणे मूल्यमापन करणं कठीण आहे.
या प्रकरणात भारताच्या विरोधाभासी प्रधानमंत्र्याच्या कर्तृत्वाविषयी या पुस्तकात आतापर्यंत जे परीक्षण केलं आहे, त्याचं तात्पर्य सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. (या पुस्तकातील एखादी कल्पना जर पुनरावृत्त झालेली असेल तर ती जाणीवपूर्वक असेल. कारण इथं मी नरेंद्र मोदी यांच्यात जे दोष आणि विसंगती आहेत, असा माझा विश्वास आहे त्यांचाच पुनरुच्चार मला करायचा आहे.)
मोदींचा भारतीयांच्या जगण्यावर आणि भारतीय समाजावर जो प्रभाव पडला, त्यापासून आपण सुरुवात करूया. आपल्या देशासाठी जे चांगलं आणि महत्त्वाचं आहे, त्यावर त्यांचा जो नुकसानकारक प्रभाव पडला आहे, त्याचं तात्पर्य सांगण्यासाठी एकच उदाहरण पुरेसं आहे. बहुसंख्य भारतीयांच्या नजरेत भाजपचे सर्वोत्तम पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये मोदींच्या अपयशावरून त्यांची खरडपट्टी काढली होती. तेव्हा त्यांनी राजधर्माचं पालन न केल्यावरून मोदी यांना खडे बोल सुनावले होते. महाभारतातील शांतीपर्वात राजधर्माविषयी माहिती सांगितलेली आहे. एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ, लेखक आणि महाभारतावरील विद्वान बद्रीनाथ चतुर्वेदी (१९२३-२०१०) यांनी लिहिलेला अखेरचा निबंध ‘महाभारतासोबत जगताना’, जो एप्रिल २०१० मध्ये ‘सेमिनार’ मासिकात प्रकाशित झाला. त्यांत राजधर्माची व्याख्या अशी करण्यात आली आहे की, ‘जनतेचं संरक्षण करणं हा राजाचा सर्वोच्च धर्म आहे. सर्व जीवंत प्राणीमात्रांविषयी दयाभाव ठेवून त्यांचं रक्षण करणं हाच खरा धर्म असतो. त्यामुळे ज्या राजामध्ये सहृदयतेनं रक्षण करण्याचा गुणधर्म असतो, ज्याला माहीत असतं की खरा धर्म काय आहे, त्यालाच राजधर्म म्हणतात.’
बद्रीनाथ मग सांगतात की, महाभारतानुसार सुप्रशासन म्हणजे जनतेचं भीतीपासून संरक्षण करणं. या महाकाव्याचा आधार घेत ते सांगतात की, राजानं काय करायला हवं आणि काय नाही- ‘राजानं त्याच्या प्रजेला त्याच्याविषयी जी भीती वाटते, तिच्यापासून तिचं रक्षण करावं. तिला इतरांपासून वाटणाऱ्या भीतीपासून रक्षावं. तिला एकमेकांपासून वाटणाऱ्या भीतीपासून रक्षावं. आणि ज्या अमानवी गोष्टींची तिला भीती वाटते, त्यापासूनही तिचं रक्षण करावं.’ तरीदेखील आज मोदी राजवटीनं त्याची निर्मिती केली आहे, ज्याविषयी मी एका स्तंभलेखकाचं उदधृत दिलं होतं, ते म्हणजे ‘भीतीचं पर्यावरण’. या प्रत्येक बाबतीत नरेंद्र मोदी - आणि ते ज्याचं नेतृत्व करतात ते त्यांचं सरकार- सपशेल अपयशी ठरले आहेत. ज्या भारतात आपण आज राहतोय, तो असा समाज आहे, जो विभागला गेलाय आणि भीतीग्रस्त आहे. अल्पसंख्याक, उदारमतवादी, महिला आणि दलित यांचा कोणतीही भीती न बाळगता छळ करण्यात येत आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली लुंगेसुंगे ठग आज सर्वांनाच दहशत घालत फिरत आहेत.
या अशा भारतावर नरेंद्र मोदी सत्ता गाजवत आहेत. त्या निधर्मी, बहुविध, स्वतंत्र आणि समान समाजावर नाही, ज्याची स्वप्नं आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिली होती आणि मागील साडेसहा दशकांत ज्यावर या स्वतंत्र राष्ट्राची उभारणी करण्यात आली होती.
‘नियतीचा माणूस’ म्हणून समजलं जाण्यासाठी आवश्यक असलेली ही पहिली परीक्षा पंतप्रधान मोदी अनुत्तीर्ण झाले आहेत. लाखो लोकांची नियती उदध्वस्त करून जो नेता स्वतःची नियती उभारतो, तो या नावानं संबोधला जाण्यासाठी पात्र नसतो.
आता त्यांच्या अराजकाच्या खेदजनक कार्यकाळाकडे वळूयात. ‘मोदीत्व आणि अराजक’ या विभागांत मी अनेक क्षेत्रांचा आढावा घेतला आहे, ज्यांत मोदी आणि त्यांच्या सरकारनं भारत चालवण्यात घोटाळाच केला आहे. ज्यामुळे देश वेगानं पुढे जाण्याऐवजी पुन्हा मागेच खेचला गेला. सर्वत्र वाढलेला जातीय हिंसाचार, झुंडशाहीचे बळी आणि ‘गौ-रक्षणाची’ विचित्र संकल्पना, मतभेदाचा आवाज दाबण्याचे प्रयत्न, जे स्वतंत्र विचार करून विरोधी मत प्रकट करू इच्छितात, त्यांच्यावर रोज होणारी चिखलफेक आणि केली जाणारी दमदाटी, कोणत्याही लोकशाहीचे आधारस्तंभ मानलं जाणारं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि माध्यमांचं स्वातंत्र्य यांचं हनन, देशातील अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांचं इतकं खच्चीकरण करणं की मोदींच्या नव्या भारतात त्यांचं स्वागत नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण होणं, झुंडीच्या धर्मांधतेचं हिंस्त्र तांडव, मग ते रस्त्यावर असो वा सोशल मीडियावर असो, ज्यांना आधिकारीक संरक्षण लाभलेलं आहे- कित्येक दशकं ज्यांची वाढ झाली आहे अशा संस्थांचं अस्तित्व धोक्यात आणणं, त्यांचं स्वातंत्र्य व स्वायत्तता यांचा पद्धतशीरपणे गळा घोटणं, एकमेकांवर वचक आणि समतोल राखणारी व्यवस्था संपवणं आणि राष्ट्रवादाच्या सरकार प्रायोजित व्याख्येचं गुणगान करणं व पर्यायी दृष्टिकोनाला ‘देशविरोधी’ व ‘हिंदुविरोधी’ ठरवणं आणि दोन्ही गोष्टी समानार्थी मानणं, समाजात ‘नवीन सामान्या’ची निर्मिती करून भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि कल्याणकारी गणतंत्राच्या मूलभूत तत्त्वांचा विध्वंस करणाऱ्या विजयी बहुसंख्याकवादाच्या नावाखाली द्वेषपूर्ण जातीयतेचं विष पसरवणं, या सर्व गोष्टींमुळे मोदींच्या नव्या भारतातीतल आपल्या नागरिकत्वाचा अर्थच निष्फळ ठरला आहे.
यापुढे जाताना आपण तिथं पोहोचतो, जिथं पंतप्रधान मोदींचं कर्तृत्व हे लज्जास्पद राहिलेलं आहे- अर्थव्यवस्था, ज्याविषयी ‘मोदी अर्थशास्त्राचं अपयश’ या चौथ्या विभागात सविस्तर वर्णन आलं आहे. या पुस्तकात ठळक अपयशांची जी यादी दिली आहे, त्यांत जीडीपी वृद्धीचा दर अग्रस्थानी आहे. ज्याविषयी आधी सांगितलंय की, तो जवळपास २ टक्क्यांनी घसरला कारण त्याला बसलेले दोन आत्मघाती ठोसे. पहिला निर्मूल्यांकनाचा आणि दुसरा जीएसटीच्या गचाळ अंमलबजावणीचा. निर्मूल्यांकनाच्या निर्णयानं मात्र गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला चांगलंच खिंडार पाडलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेल्या गुंतवणुकीत झपाट्यानं घसरण झाली. नुकतेच जीडीपी वृद्धीदराचे जे आकडे जाहीर झाले आहेत, त्यानुसार, संपुआच्या पहिल्या कार्यकाळात हा दर ८.८७ टक्के होता. दुसऱ्या कार्यकाळात तो ७.६५ टक्के होता. तुलनेनं रालोआच्या या चार वर्षांच्या काळात हाच दर ७.३५ टक्के होता. त्याहून वाईट म्हणजे मोदींच्या काळात पहिल्या पाच तिमाहींत जीडीपी दर घसरत राहिला आणि २०१७-१८ च्या पहिल्या तिमाहीत तो तळ गाठत ५.७ टक्क्यावर उतरला. वर्तमान आर्थिक वर्षात हा दर ७.३ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. तो संपुआच्या काळातील दरापेक्षा कमीच आहे.
निर्मूल्यांकन आणि जीएसटीचा दुहेरी तडाखा अर्थव्यवस्थेला बसला नसता, तर यात नक्कीच सुधारणा दिसली असती. जी काही वाढ दिसून आली, तीही सरकारच्या अवाजवी खर्चामुळेच दिसून आलीय (जी खासगी उपभोगाच्या अडीच पटीनं जास्त होती). उत्पादन घटलं, निर्यात कमी झाली (संपुआच्या २०१३-१४ या काळातील सर्वोच्च ३१२ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीपेक्षा खूप कमी), औद्योगिक उत्पादनवाढीचा वेगही मंदावला आणि शेतीत साचलेपण तयार झालंय (किंवा त्याहून वाईट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढच झाली आहे). वर्तमान खाते तूट ही या वर्षी जीडीपीच्या २.६ टक्के राहणार आहे, जी याआधी १.९ टक्के होती. बेकारी वाढत चाललीय, नव्या नोकऱ्या तयार केल्याचे अवास्तव दावे केले जात असले तरीही, ज्यांना त्या मिळायला हव्या होत्या, त्यांचा मात्र त्यावर विश्वास नाही. पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर जगभर कमी झाले, पण देशांत नाही, कारण मोदी सरकारनं त्यावर अधिक कर आकारणी केली होती. हे दर अजूनही वाढत आहेत आणि सामान्य माणसांची चिंताही. कारण त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले आहेत. आधी ‘कर दहशतवाद नष्ट केला जाईल’ अशी घोषणा करणाऱ्या मोदी सरकारनं एक नवी वर्गवारी काढून लोकांवर कर लादले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला.
आर्थिक दूरवस्थेच्या या काळातच भाजपनं भारतातील सर्वांत श्रीमंत राजकीय पक्ष म्हणून ओळख कमावली. उद्योगांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे आणि त्यांनी एक कायदा मंजूर करून राजकीय पक्षांना विदेशातूनही आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. त्यामुळे त्याला आता आपल्या विदेशी समर्थकांकडूनही पैसा गोळा करता येईल, जे आता भारतीय पासपोर्ट वापरत नाहीत. त्यांनी इलेक्टोरल बाँड्स बाजारात आणले आहेत, जे कोणालाही निनावी विकत घेता येऊ शकतात आणि राजकीय पक्षांना देणग्या देता येऊ शकतात. त्यामुळे राजकीय पक्षांना जास्तीचा निधी गोळा करता येईल आणि देगणीदारांना त्यांची ओळख गुप्त ठेवता येईल.
सरते शेवटी आपण पंतप्रधान मोदींच्या प्रतिमा उभारणीच्या आणखी एका खास उदाहरणाकडे येऊन पोहोचतो, ज्यांत ते वाकबगार आहेत. यावेळेस जागतिक पातळीवर. इथं आपण निश्चितपणे त्यांच्या बढाईखोरपणाच्या सरमिसळीच्या कामांकडे बघू शकतो. पंतप्रधान असा दावा करतात की, त्यांच्यामुळेच जगात भारताची मान उंचावली आहे. त्यांच्या येण्याआधी भारतीय पासपोर्टला जी किंमत नव्हती, ती आता मिळाली आहे आणि त्यांच्या पंतप्रधान होण्याआधी भारतीयांना विदेशांत स्वतःला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटत होती. त्यांनी प्रत्यक्षात जी कामगिरी केली आहे त्याच्याशी तुलना करता त्यांचे दावे अत्यंत चुकीचे ठरतात. वस्तुस्थिती काय आहे याचा आढावा मी ‘कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या’ या पाचव्या विभागात घेतला आहे.
हे खरंय की मोदी हे उत्क्रांती घडवण्यास समर्थ आहेत. मी जेव्हा मोदींना जाहीरपणे विचारणा केली की, त्यांच्या पहिल्या वर्षाच्या भरगच्च आंतरराष्ट्रीय दौऱ्यांत एकाही इस्लामिक देशाला भेट का दिली नाही? तेव्हा माझ्या डोक्यात त्यांनी दुबई पोर्टस वर्ल्डवरून मला दिलेली प्रतिक्रिया घुमत होती. हे सांगायलाच हवं की, त्यांनी नंतरच्या काळात याची पुरेशी भरपाई केली, विशेषतः सौदी अरेबिया आणि युएई या देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, जिथं त्यांनी अनेक यशस्वी भेटी दिल्या होत्या. (इतकंच नाही तर शेजारील अरब शेजाऱ्यांना न दुखावता, त्यांनी इस्त्रायललाही भेट दिली आणि भारतात प्रथमच एका इस्त्रायली पंतप्रधानांचं स्वागतही त्यांनीच केलं!) जर देशाच्या भल्यासाठी पंतप्रधान या नात्यानं, ते त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या पूर्वग्रहांवर मात करू शकतात, तर त्याचं स्वागतच करायला हवं.
पण असं करताना ते त्यांच्या आधीच्या प्रधानमंत्र्यांच्या पावलावर पाऊल टाकतच चालत आहेत, ज्यांनी यासाठी मेहनत घेत, त्यांना चालता येण्यासाठी एक मळलेली वाट तयार करून दिली.
जिथं त्यांनी विदेशी धोरणात सातत्य राखण्याच्या कालमान्य परंपरेचा आदर केला, तिथं मोदींनी भारताला झुकू दिलेलं नाही. पण जिथं त्यांनी पुढाकार घेत गोष्टी हातात घेतल्या, तिथं त्यांनी गोंधळच घातला आहे. नरेंद्र मोदींच्या भारताला सेशल्स (Republic of Seychelles)मध्ये माघार घ्यावी लागली, मालदीवनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, नेपाळमध्ये त्याची हेटाळणी झाली, श्रीलंकेनं त्याला दूरच ठेवलं, अमेरिकेत त्याची किंमत कमी झाली, चीनसमोर तडजोड करावी लागली आणि पाकिस्ताननं त्याला उचकवलं. या दरम्यान भारताच्या अमर्याद संपत्तीला, त्याच्या जागतिक आर्थिक व सांस्कृतिक शक्तीला हादरे बसू लागले, जेव्हा त्यांच्या समर्थकांनी देशांत असहिष्णुता, धर्मांधता आणि हिंसाचाराचं थैमान घातल्याच्या बातम्या जगभरांत प्रसिद्ध होऊ लागल्या.
यात भर घालण्यासाठी आली राफेल विमानांच्या सौद्याची बातमी. संपुआ सरकारनं फ्रान्सकडून १२६ राफेल विमानं विकत घेण्याचं ठरवलं होतं. ज्याची जुळवणी बेंगलोर येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड इथं होणार होती. पंतप्रधान मोदींनी ती संख्या कमी करत ३६ वर आणली, पण त्यासाठी तिप्पट किंमत मोजली. याच्या सोबतीलाच अनेक इतर प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत. विशेषतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून, ज्यांनी राफेल सौद्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणीही केली. पंतप्रधानांनी यावर बोलायला सरळ नकार दिला.
मला आशा आहे की, मी या पुस्तकात हे दाखवण्यात यशस्वी ठरलोय की, मोदी सरकार हे इतर काही नसून पोकळ आश्वासनं आणि जाहिरातबाजीचा एक देखावा आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे की, फार कमी गोष्टी या सरकारनं साध्य केल्या आहेत. मी हे दाखवलंय की तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांनी तिथं ज्या गोष्टी केल्याचा डांगोरा पिटवला जातो, त्यात तथ्य नसून प्रत्यक्षात गुजरातची परिस्थिती अनेक आघाड्यांवर अत्यंत वाईट आहे. त्या पद्धतीनं ते जेव्हा त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपवत आहेत, देशही अनेक आघाड्यांवर मागे गेला आहे.
एक घाबरलेला समाज, अविवेकी निर्णयांमुळे विस्कटलेली अर्थव्यवस्था, बेकारीची तीव्र समस्या, शेतकरी आत्महत्येचा भयावह आकडा, असुरक्षित सीमा, काश्मीरमधली अस्थिरता आणि स्वच्छ भारत, कौशल्य विकास आणि बेटी पढाव, बेटी बचाव अशा चांगल्या उपक्रमांतही आलेलं अपयश. थोडक्यात सांगायचं तर मोदींची राजवट भारतासाठी वाईटच ठरली आहे. आणि त्याची सुरुवात झाली आहे ती मोदी विरोधाभासातून. ज्याचं वर्णन मी या पुस्तकांत केलं आहे- आपल्या संकुचित, अनिष्टकारक, फुटीरतावादी राजकीय उगमापासून वेगळं होऊन मुत्सद्देगिरी आणि सुप्रशासन देण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. ज्याची खरं तर आज भारताला गरज होती आणि ते हे करू शकतील अशी अनेकांची आशा होती. मतदारसंघांच्या निर्दयी व्यवस्थापनानं निवडणूक जिंकून आणि आपल्या मुख्य मतदारसंघाच्या वाईट गुणांचाही पूर्ण फायदा करून घेतल्यानं कोणी महान नेता होऊ शकत नाही.
ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा डाव्या विचारांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना उथळ आरोपांखाली अटक करण्यात आली होती, तेव्हा लेखिका अरुंधती रॉय यांनी भाष्य केलं होतं की, ‘‘भाजप आणि पंतप्रधान मोदी अत्यंत वेगानं आपली लोकप्रियता हरवत चालले आहेत. त्याचा अर्थ असा की आपण आता भयावह कालखंडाकडे वाटचाल करतोय. ही लोकप्रियता ज्या कारणांमुळे हरवली आहे, त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तसंच विरोधकांची एकता भंग करण्यासाठीही कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येतील. निवडणुका होईपर्यंत एक राजकीय सर्कस आता सुरू राहिल- अटकसत्र, हत्या, झुंडबळी, बॉम्बहल्ले, खोट्या हल्ल्यांचा बनाव, दंगली, जातीय हिंसाचार. निवडणुकांच्या मोसमांत हिंसाचार वाढणारच हे आता आम्हाला माहीत झालं आहे. भेद पाडा आणि राज्य करा, हे होईलच. पण आता त्यात भर पडलीय- लक्ष विचलित करा आणि राज्य करा.’’ अटक करून खटले चालवणं हा लक्ष विचलित करण्याचा एक प्रकार आहे, पण त्याहीपेक्षा वाईट घडू शकतं. त्यामुळे त्याचा इशारा आधीच दिला तर कदाचित त्याला अटकावही होईल.
यात काहीच शंका नाही की, ज्या एका क्षेत्रात नरेंद्र मोदी यांना यश लाभलं आहे, ते म्हणजे स्व-प्रक्षेपणाच्या बाबतीत. अनेक लोक, ज्यांनी त्यांचं काम काळजीपूर्वक तपासलेलं नाही ते अजूनही त्यांना निश्चयी, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि निष्ठावान समजतात, ज्यामुळे ते त्यांच्या नजरेत महान नेते झाले आहेत.
देशाचे पंतप्रधान होण्यास सर्वांत पात्र म्हणून ते अनेक जनमत चाचण्यांमध्ये आघाड्यावर असतात. पण याचं श्रेय त्यांच्या जाहिरातबाजीला द्यायला हवं, त्यांच्या प्रक्षोभक भाषणांना द्यायला हवं, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचं कायम प्रक्षेपण करण्याच्या स्वभावाला द्यायला हवं, संपर्काच्या प्रत्येक साधनाच्या (मग ते रेडिओवरील दर महिन्याचं भाषण असो की ट्विटर हँडल असो) सातत्यपूर्ण आणि अचूक उपयोगाला द्यायला हवं, त्यांच्या अतिकाय प्रतिमेला कायम तकाकी देण्याच्या अथक प्रयत्नाला द्यायला हवं किंवा कुशल जाहिरातबाजी व आलंकारिक भाषणांमुळे जनमताचा कल कसाही झुकतो त्याला द्यायला हवं. पण हा आपल्या या विरोधाभासी पंतप्रधानांचा शेवटचा विरोधाभास आहे- की त्यांची ही महत्ता ज्या प्रतिमांवर आधारीत आहे, त्याच त्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या अनेक अपयशांमुळे खोट्या ठरवल्या जातात.
हे सर्व एकत्र केलं तर या माणसाचा असामान्य अहंकार तयार होतो. नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाही ते स्वतःला पक्षाच्या कार्यकारिणीपेक्षा वरचे समजत होते. कोणाला आपल्या कामाची माहिती देणं त्यांना गरजेचं वाटायचं नाही. आपण कोणाला उत्तरदायी आहोत असंही त्यांना वाटायचं नाही (विशेषतः २००४ मध्ये भाजप सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर) आणि ते सारे निर्णय स्वतःच घ्यायचे. अगदी आपली मातृसंघटना असलेल्या संघाचाही ते अशा वेळी विचार लक्षात घ्यायचे नाहीत. त्यामुळे शेवटास त्यांचा न्याय फक्त त्यांनाच धरून करायला हवा. कारण प्रत्येक यशासाठी ते स्वतःच जबाबदार असल्याचा त्यांचा दावा असतो. त्यामुळे त्यांच्या अपयशाची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर टाकायला पाहिजे.
१५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्य दिनी भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की ते, ‘उतावीळ आहेत कारण अनेक देश पुढे निघून गेले आहेत आणि भारताला पुढे जावं लागणारच आहे... मी अस्वस्थ आहे कारण मला माझ्या देशवासियांचं जगणं सुधारायचं आहे... मी चिंतेत आहे कारण भारताला चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या आघाडीवर आणायचं आहे... मी अधीर आहे कारण मला या देशाची साधनसंपत्ती आणि त्याच्या क्षमतांचा उपयोग करून घ्यायचा आहे...’ हे सारं बोलण्यापुरतं ठीकच आहे. पण भारतीय नागरिकांनाही आपल्या देशाच्या या पंतप्रधानाला काही गोष्टी विचारण्याची गरज आहे. त्या म्हणजेः उत्तम भाषणं देण्यापलीकडे जात तुम्ही प्रत्यक्षात या देशाच्या भल्यासाठी काही चांगलं आणि शाश्वत काम कधी करणार आहात? उतावीळ, अस्वस्थ, चिंताग्रस्त आणि अधिर असण्यासोबतच तुमच्या कृतींमधून तुम्ही हे कधी दाखवलं आहे की, तुम्हाला खरोखरच या देशातील प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाची खरोखरच काळजी आहे; केवळ निवडणूका जिंकून तुमचा फसवा कार्यक्रम देशाच्या माथ्यावर मारण्यातच तुम्हाला रस नाही?
अलीकडच्या काही महिन्यांत हे दिसून आलं आहे की, लोकांचा आता पंतप्रधान मोदींच्या शब्दांवर विश्वास उरलेला नाही. मोदी विरोधाभासाचे परिणाम आता घडू लागले आहेत. त्यांच्या सरकारची अपयशं उघड होत आहेत आणि अशी आशा करायला हरकत नाही की, २०१९ मध्ये मतदार त्यांना पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या जिवितांशी आणि भविष्याशी खेळण्याची संधी देणार नाहीत.
मोदी लाट ओसरत चालल्याचं एक लक्षण कदाचित हेही सांगता येईल की, त्यांचे जवळचे सहकारी त्यांच्यापासून आणि पक्षापासून दूर जात आहेत. २०१७ साली भाजपचे खासदार नाना पटाळे यांनी पक्षाचा व आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्याचं कारण देताना ते म्हणाले की, पंतप्रधान हे एकमार्गी संवादक आहेत आणि त्यांना इतर कोणाचं ऐकायचं नसतं, अगदी आपल्या पक्षातील लोकांचंही. राओलातील त्यांचे दोन मोठे सहकारी (लोकसभेतील जागांचा विचार करता) तेलुगू देसम आणि शिवसेना यांनी त्यांच्याविषयीची नाराजी उघडपणे आणि सातत्यानं जाहीर केली आहे. तेलुगू देसम पक्षानं तर आघाडीही सोडली आणि २०१८ मध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावही आणला होता.
१२ मार्च २०१७ रोजी ‘द पायोनियर’मध्ये लिहिताना राज्यसभेतील भाजपचे माजी खासदार आणि वृत्तपत्र संपादक चंदन मित्रा म्हणाले की, ‘जात-धर्म-भाषा-वर्ग वेगवेगळा असलेल्या असंख्य भारतीयांनी अशा एका माणसावर विश्वास टाकला, ज्याला ते भारताचा ‘नियतीचा माणूस’ समजतात, जो या देशाला शांती आणि संपन्नतेच्या सुवर्ण युगाकडे घेऊन जाईल.’ जुलै २०१८ मध्ये चंदन मित्रा यांनी भाजप सोडला आणि मोदींच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा विश्वास ममता दीदींमध्ये आहे. जर मोदींचे असंख्य माजी समर्थकच त्यांना आता भारताचा ‘नियतीचा माणूस’ समजत नसतील तर इतर कोणीही तसं समजायला नको.
.............................................................................................................................................
‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर - नरेंद्र मोदी अँड हीज इंडिया’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4797/The-Paradoxical-Prime-Minister
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment