मी नेहमीच ‘कॅल्क्युटेड रिस्क’ घेतली!
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • डावीकडे भक्ती चपळगावकर आणि एनडीटीव्हीचे तत्कालीन औरंगाबाद प्रतिनिधी इम्तियाज जलील औरंगाबादचे तत्कालीन पोलिस सहायुक्त सुधीर दाभाडे यांच्याबरोबर एका मोहरम मिरवणुकीप्रसंगी. उजवीकडे भक्ती चपळगावकर
  • Fri , 29 March 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism वृत्तवाहिन्या News Chanels भक्ती चपळगावकर ‌Bhakti Chapalgaonkar

मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही, पण नशिबावर आहे. मी खूप नशीबवान आहे, असा मला ठाम विश्वास आहे. याचा अर्थ मी प्रिव्हिलेज्ड आहे किंवा मला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला नाही असे नाही. पण मला आयुष्यात खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांनी मला खूप काही शिकवले, खूप आधार दिला. असा आधार मिळाल्यामुळे मी पुढे जाऊ शकले. माणसातल्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. अशा चांगल्या माणसांनी मला उमेदवारीच्या काळात खूप मदत केली.

टोनीच्या शाळेत गिरवलेल्या टीव्ही पत्रकारितेच्या धड्यांबद्दल मी यापूर्वी सांगितले आहेच. त्याच्या फार पूर्वी ‘मराठवाडा’ दैनिकात मला बातमी कशी लिहिली पाहिजे याचे धडे मिळाले. एकदा हे धडे गिरवल्यानंतर माध्यम बदलले, भाषा बदलली, पण इथे मिळालेले प्रशिक्षण नेहमीच उपयोगी पडले. मी वर्तमानपत्रात काम करायला सुरुवात केली, कारण बारावीच्या सुटीत काय करायचे, हा प्रश्न माझ्यासमोर होता. मी जेमतेम सतरा-अठरा वर्षांची होते, काम करायची हौस होती आणि या दैनिकात काम करायची संधी मिळाली! साधी लाकडी टेबलं, खुर्च्या आणि टेबलांवर ए-४ साईजमध्ये कापून ठेवलेले न्यूजप्रिंट असे दृश्य कार्यालयात दिसे. मी इथे बातमीदार म्हणून काम करत नव्हते. एजन्सीच्या बातम्यांचे भाषांतर करण्याचे काम माझ्याकडे होते. हे काम फार तांत्रिक होते. पण त्याचा बाज तांत्रिक न ठेवता लोकाभिमुख कसा करता येतो, त्यासाठी भाषा सुटसुटीत कशी असावी, वाक्ये छोटी कशी करावीत, एक मोठे वाक्य असेल तर ते तोडून त्याची अर्थपूर्ण छोटी वाक्ये कशी करावीत, हे सगळे मला इथे शिकायला मिळाले.

भाषांतर अगदी शब्दशः केले तर कशी गोची होते याचे काही किस्से दैनिकात प्रसिद्ध होते. एकदा एका बातमीत वाक्य होते, ‘The militant carried ten thousand rupees reward on his head.’ तर म्हणे एका उपसंपादकाने त्याचे भाषांतर केले- ‘त्या दहशतवाद्याने त्याच्या पगडीखाली दहा हजार रुपये ठेवले होते.’ अजून एक उदाहरण म्हणजे ‘Pak rangers fired on the Indian territory’. आपल्याकडे जसे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आहे, तसे तिथे रेंजर्स आहेत. ‘रेंजर’ या शब्दाचे शब्दशः भाषांतर वनरक्षक. मग एका उपसंपादकाने डिक्शनरी बघून बातमी लिहिली, ‘पाक वनरक्षकांनी भारतीय हद्दीत गोळीबार केला’. असे अनेक किस्से दैनिकात चघळले जात. यातले किती खरे होते आणि किती खोटे हे माहीत नाही. पण त्यांचे मर्म डोक्यात फिट बसले की, मग भाषांतर करताना चुका टाळण्याचा प्रयत्न होई.

कागदाचे असंख्य ताव बघितले की, वेगळी स्फूर्ती येई. एजन्सीची मशिन्स कर्र कर्र आवाज करत असत. त्याचे भेंडोळे आमचे वरिष्ठ तपासत. त्यातले काही कागद माझ्याकडे देत. एक बातमी पूर्णपणे एकाच वेळी येत नसे. त्याचे एक-दोन-तीन-चार असे भाग असत आणि या पुढे अजून भाग येणार आहे, हे कसे कळावे, तर आलेल्या मजकुराच्या खाली ‘more’ असे लिहिलेले असायचे. माझे एक वरिष्ठ म्हणत, ‘थांबा, मोरे येत आहेत’!

इथे काम करणारी मंडळी अतिशय साधी होती. दैनिक स्थापनेचा उद्देश हा व्यवसाय नसल्यामुळे इथे काम करणाऱ्या मंडळींना फार तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असे. अनंतराव भालेराव यांच्या तेजस्वी लेखणीने या दैनिकाला अत्युच्च शिखरावर नेले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता आणि ध्येयनिष्ठ पत्रकारिता हे अनंतरावांचे वैशिष्ट्य. मी इथे काम करायला सुरुवात करण्यापूर्वी तीन-चार वर्षे आधी त्यांचे निधन झाले. दैनिकाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. पण मला त्याची फारशी कल्पना नसावी. वर्ष-दीड वर्ष काम केल्यावर मला साडेतीनशे रुपये पगार मिळू लागला. मी संपादकांना पगार वाढवा, अशी मागणी केल्यावर त्यांनी ‘तुला कशाला पैसे लागतात?’ असा सवाल केला.

माझ्या वडिलांच्या समाजाभिमुख स्वभावाचा फार मोठा प्रभाव माझ्यावर आहे. त्यांचे गुरू अनंतराव भालेराव, प्रा. भगवंतराव देशमुख, सौ. देशमुख, डॉ. सविता पानट, महावीर जोंधळे यांच्याबरोबर बाबा, न्या. नरेंद्र चपळगावकर. पत्रकाराने समाजाभिमुख असावे हे कुणी शिकवावे लागले नाही.

माझे बाबा आणि या दैनिकाचे फार जवळचे संबंध होते. त्यांच्याकडे मी एकदा तक्रार केली की, ‘मला ते पगारच देत नाहीत’, तर ते म्हणाले, ‘अगं या कार्यालयात वर्तमानपत्राचे मालक बसत नाहीत, तुझे पालक बसतात. तुला पगार कशाला हवा?’ बाबांच्या या बोलण्याने मी खट्टू व्हायचे, कारण मला स्वावलंबी व्हायचे होते. पगार मिळाला की त्याचा वापर मी माझ्या किरकोळ खर्चासाठी करायचे.

बारावीनंतर कधी वरखर्चासाठी घरी पैसे मागितले नव्हते. पण जास्त पगाराची मागणी हा माझा बालीश हट्ट होता. एक तर मला तिथे शिकायला मिळत होते. फक्त शिकायलाच नव्हे तर उत्तम कॉपी कशी लिहावी याचा पाठ तिथे मिळत होता. आज असे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे दुरापास्त आहे.

इथे मला प्रेमाने चांगला पाठ देणारी मंडळी होती. मला त्यातले किती जमले हा पुढचा प्रश्न आहे, पण तिथले शिक्षक उत्तम होते. तिथे काम करत असतानाही कधी आपण पत्रकार म्हणून काम करावे असा फारसा विचार नव्हता. मला इतिहास हा विषय फार आवडत असे. त्यात एम.ए. किंवा आर्किऑलॉजीमध्ये काही शिक्षण घ्यावे असा विचार होता. एकदा दुपारी माझे एक वरिष्ठ माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘काय गं, आता काय करायचा विचार आहे?’ माझी नुकतीच बी.ए. फायनलची परीक्षा झाली होती. पण काही ठोस ठरवले नव्हते. वरिष्ठ पुढे म्हणाले, ‘ही जाहिरात बघ. पुणे विद्यापीठात पत्रकारिता विषयात पोस्ट ग्रॅज्युएजशन करता येईल. त्याची प्रवेश परिक्षा आहे, निदान अर्ज कर.’ मी पडत्या फळाची आज्ञा मानून अर्ज केला. पदवीधरांसाठी पत्रकारितेत पदवी अभ्यासक्रम आणि पत्रकारितेत पदवी असलेल्यांसाठी किंवा दैनिकात काम केलेल्यांसाठी मास्टर्स डिग्री असा नियम होता. मी थेट मास्टर्ससाठी अर्ज केला. माझे वय वीस, पण वर्तमानपत्रात काम केल्याचा अनुभव होता. विद्यापीठाचा नाईलाज झाला आणि मला प्रवेश मिळाला. माझ्या प्रवेशानंतर विद्यापीठातले हे नियम बदलण्यात आले आणि त्यात वयाची अट घालण्यात आली.

अशीच गंमत मी नेट परीक्षा दिली तेव्हा आली, सुरुवातीला मला नेट परीक्षा देता येणार नाही, असे सांगण्यात आले. माझ्या एका मित्राने मला परीक्षा द्यायला परवानगी मिळावी म्हणून फार प्रयत्न केले, अनेक विभागांत जाऊन परवानगी मिळवली. त्यावेळी मी सुटीसाठी औरंगाबादला आले होते. त्यामुळे मला याची काहीच कल्पना नव्हती. मी फक्त फॉर्मवर सही केली होती. पण त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि माझा अर्ज विद्यापीठाने स्वीकारला. मी पहिल्याच झटक्यात नेट पात्र झाले. दुर्दैवाने मी आणि माझी एक ज्येष्ठ मैत्रीण दोघीच अख्ख्या वर्गातून नेट पात्र झालो.

घर सोडून पुण्याला राहायला येणे हा मोठा अनुभव होता. याआधी मी लहान गावात, जिथे माझ्या कुटुंबामुळे मला लोक ओळखत, अशा वातावरणात राहत होते. आता मी फक्त माझ्या जोरावर काहीतरी करत होते. आमच्या घरी अनेक नातेवाईक शिक्षणासाठी येऊन राहिले होते. त्यामुळे घराबाहेर शिक्षणासाठी मुलांना ठेवताना काही वेगळी व्यवस्था करायची असते, याची फारशी कल्पना घरी नव्हती. त्यात आईच्या एका मैत्रिणीने आम्ही तुझ्या मुलीला ठेवून घेऊ असे सांगितले. मी तिकडे राहायला गेले. साधारणपणे महिनाभरानंतर, एक दिवस माझे सगळे सामान घरातल्या गॅलरीत फेकून दिलेले दिसले. वर, ‘हा काही राजमहाल नाही. त्यामुळे तुझी व्यवस्था तू बघ’, असे सांगण्यात आले.

पहिल्यांदाच घराबाहेर पडलेली मी, या प्रसंगामुळे बावरून गेले. राहून राहून रडू येत होते, आईबाबांना फोन करून सांगितले. आमचे एक भले स्नेही मला त्यांच्या घरी घेऊन गेले. माझी व्यवस्था होईपर्यंत त्यांनी पंधराएक दिवस फार प्रेमाने मला सांभाळले. यानंतर माझी सगळी सोय माझ्या एका वरिष्ठ प्राध्यापकांनी (किरण ठाकूर सर) केली. त्यांच्या पत्नीने पेईंग गेस्ट म्हणून माझी व्यवस्था करवली. त्यांच्या घराचे दार माझ्यासाठी सताड उघडे होते. पुण्याच्या त्या काहीशा रुक्ष वातावरणात मला त्यांचा फार मोठा आधार वाटला. मला कम्प्युटरवर व्यवस्थित काम करता आले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. हे शिकण्यासाठी त्यांनी मला त्यांचा कम्प्युटर उपलब्ध करून दिला होता. इतकेच नाही तर ते ज्या पुस्तकांचे संपादन करत असत, त्याची प्रुफे तपासायला मला त्यांनी शिकवले.

एका घरातून हाकलून लावल्यानंतर मला जो जबरदस्त मानसिक धक्का बसला होता, त्यावर या कुटुंबाने केलेल्या मायेमुळे फुंकर मारली गेली. त्यांच्या घरी मला एक गोष्ट लक्षात आली, इथे शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व होते आणि शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत होत होते. हे कुटुंब माझे सर्वाथाने स्थानिक पालक होते. माझ्या टीव्ही माध्यमात प्रवेशालाही ठाकूर सरच कारणीभूत होते. ‘भविष्यकाळात टेलिव्हिजन माध्यमाला खूप महत्त्व येणार आहे. इथे एका टीव्ही चॅनलसाठी ट्रेनींची भरती होत आहे. तुझ्यावतीने मी अर्ज केला आहे. जा आणि मुलाखत दे’, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मुलाखतीला गेले आणि टीव्ही पत्रकारितेत माझा प्रवेश झाला.

माझ्या जडणघडणीत माझ्याबरोबरच असंख्य सुहृदांचा सहभाग आहे, हे मी सुरुवातीला म्हणाले हे त्याच कारणांमुळे. मला पत्रकारितेचे बाळकडू देणारे ‘मराठवाडा’ दैनिक आणि त्याचे कर्मचारी, मला ‘पत्रकारितेतच पुढे शीक’ असा सल्ला देणारे आणि प्रवेश परीक्षा द्यायला लावणारे वरिष्ठ, मला एका घरातून हाकलल्यानंतर घरी सन्मानाने नेणारे काका, त्यानंतर माझी संपूर्ण व्यवस्था करणारे ठाकूर कुटुंब, हे आणि असे अनेक जण माझ्या प्रगतीसाठी कारणीभूत आहेत.

बातमीदार म्हणून काम करण्यापूर्वी घालवलेल्या या काळात मी चांगलीच तावून-सुलाखून निघाले. घराच्या उबेत वावरल्यानंतर बाहेर टक्केटोणपे खूप खाल्ले. या अनेक अनुभवांचा उपयोग मला पुढे बातमीदार म्हणून काम करताना झाला. कुणावर लगेच विश्वास ठेवायचा नाही, पण एकदा माणसाची पारख झाली की, त्याची मदत नक्की होते, हे माझ्या लक्षात आले. आमचे एक शिक्षक म्हणाले होते, ‘प्रत्येक पत्रकाराला रिस्क घ्यावी लागते. प्रश्न असा आहे, की तुम्हाला ही रिस्क अंदाज घेऊन (कॅल्क्युलेटेड) घ्यायची आहे, की बेधडक घ्यायची आहे? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.’ पुढे बातमीदारी करताना दंगली असोत, बॉम्बस्फोट असोत किंवा एखाद्या जाहीर सभेचे कव्हरेज, मी नेहमीच ‘कॅल्क्युटेड रिस्क’ घेतली.

बेधडक स्वभाव पत्रकाराला उपयोगी पडतो किंवा पत्रकार बेधडक असलाच पाहिजे, असा एक समज आहे. पण वार्तांकन करताना आपल्या सभोवतालचा अंदाज असणे फार महत्त्वाचे आहे. एखादी बातमी करताना त्याचे समाजावर, आपल्या वाहिनीवर, आपल्या सहकाऱ्यांवर आणि स्वतःवर काय परिणाम होतील, याचा अंदाज असणे फार महत्त्वाचे आहे. मी जेव्हा ‘कॅल्क्युटेड रिस्क’ म्हणते, तेव्हा या गोष्टींचा विचार मी नेहमीच केला असं मला वाटतं.

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......