अजूनकाही
ऑगस्ट २००८च्या एका सकाळी आम्ही चैन्नईच्या श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये पोहोचलो होतो. जगभरातल्या डझनभर पत्रकारांसोबत मी गाव-गल्ली कव्हर करणारा पत्रकारही होतो. भारत आपल्या पहिल्या चंद्रयानाचं प्रक्षेपण करणार होता. तिथं जगभरातून आलेले आणि अनेक वर्षांपासून अवकाश प्रक्षेपण कव्हर करणारे पत्रकार होते. ते त्यांचं कार्यक्षेत्र होतं. ते भारताच्या कामगिरीकडे शंका आणि आश्चर्यानं पाहत होते. भारताकडून दोन-चारच अनुभवी पत्रकार होते. बाकीचे छायाचित्रं आणि व्हिडिओ काढत होते.
पावसाची रिमझिम काही काळासाठी थांबली आणि तेवढ्यात चंद्रयानानं आपल्या लक्ष्याच्या दिशेनं कूच केलं. तो क्षण पाहणं आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवणं ही गर्वाची गोष्ट होती. त्यानंतर आम्हाला एका छतावरून उतरवून एका मोठ्या सभागृहात आणलं गेलं. तिथं चंद्रयानाशी संबंधित वैज्ञानिकांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. त्यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)चे प्रमुख जी. माधवन होते. शेकडो कॅमेऱ्यांसमोर वैज्ञानिक देशाशी बोलत होते. त्यानंतर तेच वैज्ञानिक काही दिवस अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये जाऊन आपल्या यशस्वी कामगिरीची माहिती देत होते.
२००८ची कामगिरी मामूली नव्हती. तेव्हाही भारतात एक पंतप्रधान होते. त्यांचं नाव होतं मनमोहनसिंग. त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढचं सगळं वैज्ञानिकांवर सोपवून दिलं की, त्यांनी देशाशी संवाद करावा. शेकडो कॅमेऱ्यांसमोर इस्त्रोचं वैज्ञानिक होते. मनमोहनसिंग आणि त्यांच्या आधीच्या कुठल्याही पंतप्रधानानं इस्त्रोची कामगिरी आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली नाही. बुधवारी ‘मिशन शक्ती’ यशस्वी होताच, व्हॉटसअॅप विद्यापीठामध्ये क्षेपणास्त्रासोबत नरेंद्र मोदींची छायाचित्रं पोस्टरवर झळकली. एकमेकांना पाठवली जाऊ लागली.
एवढंच नाही तर २८ मार्चला जेव्हा भारतानं ए-सेट क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं, तेव्हाही कॅमेऱ्यासमोरून साऱ्या वैज्ञानिकांना गायब केलं गेलं. फक्त आणि फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर होते. या कामगिरीचं एकच छायाचित्र जनतेपर्यंत पोहोचलं आहे. राष्ट्राला उद्देशून बोलणाऱ्या नरेंद्र मोदींचं छायाचित्र. त्यांचे सहकारी याला ‘निर्णय घेणाऱ्या सरकारचं यश’ म्हणून सांगत आहेत. मात्र प्रक्षेपण आणि चाचणीच्या वेळी उत्सव साजरा करणाऱ्या वैज्ञानिकांची छायाचित्रं कुठे दिसली नाहीत.
एनडीटीव्हीच्या संग्रहात १९ एप्रिल २०१२च्या एका व्हिडिओचं फुटेज आहे. त्यावेळी भारतानं लो-ऑर्बिटमध्ये उपग्रहाचा वेध घेणाऱ्या अग्नि-५ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. व्हिडिओमध्ये त्यावेळचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)चे प्रमुख उत्सव साजरा करताना दिसतात. २८ मार्च २०१९ लाही DRDOच्या प्रमुखपदी डॉ. जी. सतीश रेड्डी आहेत, पण ते व्हिडिओमधून गायब होते. त्यांची टीम गायब होती. त्यांच्या जागी DRDOमधून निवृत्त झालेले आणि सध्या नीती आयोगाचे सदस्य असलेले विजय सारस्वत माध्यमांना ‘ग्यान’ देत होते. विद्यमान प्रमुख आणि इतर वैज्ञानिक देशासमोरून गायब होते. एक निवृत्त झालेला प्रमुख ‘ग्यान’ देत होता. कारण या निमित्तानं तो युपीए सरकारवर टीका करू शकेल की, त्यांनी ‘मिशन शक्ती’ला परवानगी दिली नाही. नंतर त्यांच्याच हवाल्यावरून अरुण जेटली भाजपच्या मुख्यालयात काँग्रेसवर हल्लाबोल करत होते. विद्यमान प्रमुख ही गोष्ट सांगू शकत नव्हते, कारण निवडणूक आचारसंहिता लागू आहे!
हेच विजय सारस्वत १० फेब्रुवारी २०१० रोजी म्हणत होते की, भारताकडे उपग्रहाचा अचूक वेध घेऊन ते पाडणारी यंत्रणा आहे, पण तो खऱ्या उपग्रहाला पाडून आपल्या क्षमतेचं प्रदर्शन करणार नाही. भारताला त्याची गरज वाटत नाही, कारण त्यामुळे अवकाशात कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामुळे अवकाशातील उपग्रहांचं नुकसान होतं. त्यावेळी DRDOचे तत्कालिन प्रमुख विजय सारस्वत यांनी जे सांगितलं, ते ऐकलं, मानलं गेलं. आज तेच सारस्वत नीती आयोगाचे सदस्य झाल्यावर युपीए सरकारवर टीका करत आहेत. तुम्ही त्यांची विधानं इंटरनेटवर सर्च करून पाहू शकता. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्याप्रमाणेच विजय सारस्वत यांनीही निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे.
उघड आहे, हे राजकारण आहे. इस्त्रो आणि DRDOचा वापर नरेंद्र मोदी आपल्या मतलबासाठी करत आहेत. त्यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण करणं हे मतदारांना प्रभावित करण्यापलीकडे दुसरं काही नाही. ते पुलवामानंतर असं काहीतरी शोधत होते, ज्यामुळे त्यांच्या पाच वर्षांतल्या अकार्यक्षमतेवरील चर्चा आणि प्रश्न गायब होतील. जे बातमीदार उज्ज्वला योजनेचं वार्तांकन नीट करत नव्हते, तेच बुधवारी अवकाश विज्ञानातील ‘एक्सपर्ट’ झाले! त्यांच्या वार्तांकनात विज्ञान कमी होतं, मोदींचं गुणगान आणि विरोधी पक्षांचा उपहास जास्त होता.
सप्टेंबर २०१४पासून इस्त्रो भाजप आणि नरेंद्र मोदींच्या राजकारणाचं केंद्र झालं आहे. जेव्हा मंगळयानाच्या वेळी पंतप्रधान स्वत: वैज्ञानिकांमध्ये उपस्थित होते. त्याच दिवशी हे निश्चित झालं की, भारताची वैज्ञानिक कामगिरी वैज्ञानिकांची असणार नाही, पंतप्रधान मोदींची असेल. चीननेही या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, पण त्यानं टीव्हीसमोर येऊन जगाला सांगितलं नाही. आणि हीच परंपरा आहे. अवकाश विज्ञानातील कामगिरी वैज्ञानिकांवर सोपवली जाते. पण आता हे सगळं मोदींसाठी प्रपोगंडाचा भाग झालेलं आहे.
निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाची चौकशी करत आहे. आयोगाचे कायदेशीर सल्लागार असलेले मेंदीरत्ता यांनी ‘द प्रिंट’ला सांगितलं की, आजवर त्यांनी कुठल्याही पंतप्रधानाला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर असं करताना पाहिलेलं नाही. पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अशा बऱ्याच शब्दांचा वापर केला आहे, ज्यांचा वापर ते त्यांच्या राजकीय सभांमध्ये करतात. हे प्रकरण निवडणूक आयोगाची परीक्षा पाहणारं आहे. मला शंका आहे की, निवडणूक आयोग यावर काही करू शकेल. तो सबबी शोधून काढेल. निवडणूक आयोग या संस्थेचा शेवट तर आपण पाहू लागलेलो नाही ना? शेवटाचं थेट प्रक्षेपण!
हे राष्ट्रा, उठ, आता तूच या संस्थांना संबोधित कर. खूप उशीर झालेला आहे. मृत्युशय्येवर पडलेल्या या संस्थांना आचके देताना पाहू नको.
(स्वैर अनुवाद - टीम अक्षरनामा. रवीश कुमार यांची मूळ हिंदी पोस्ट २८ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.)
...............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 28 March 2019
रवीशकुमार, मोदींनी वैज्ञानिकांना दूरदर्शनवर बोलावलं नाही, हे तुमचं खरं दुखणं नाहीये. तुम्हांस बोलावलं नाही, हे तुमचं खरं दुखणं आहे. मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी जगाचे डोळे टक्क उघडे आहेत. बाकी, मनमोहनसिंग सर्व वार्तांकन वैज्ञानिकांवर सोडून द्यायचे कारण की त्यांना बोलताच कुठे येत होतं? मोदी उत्कृष्ट वक्ते आहेत हे आम्हांस माहितीये. आपला नम्र, -गामा पैलवान