अजूनकाही
पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सुरक्षादलांवरील सर्वांत मोठा हल्ला ठरला. ४५ भारतीय सैनिक मारले गेले. जखमींचा आकडा अद्याप हातात आलेला नाही. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारेही लागले. ते लागायलाच हवे. या हल्ल्यानंतर राजकीय स्तरातून सैनिक सुरक्षेचे समीक्षणदेखील झाले. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून यांवर फार मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले गेले. कँडल मार्च निघाला. या श्रद्धांजलीचे फोटोसेशनदेखील झाले खरे. म्हणजे श्रद्धांजलीच्या बॅनरवर स्वतःच्या फोटोची काहीच गरज नसताना तोही टाकला गेला. टाकणाऱ्यांना एवढेही भान राहिले नाही, हा फोटो फॅशनेबल आहे.
असो. मुळातच सोशल मीडिया, स्मार्ट फोन, व्हॉटसअॅप या दुनियेपासून दूर असल्यामुळे मी इतके दिवस माझ्या समाजात या हल्ल्याबाबत काय खदखदते याचा कानोसा घेतला. मला अपेक्षित होते, गुरुवारी हा हल्ला झाल्यानंतर शुक्रवारच्या नमाजात मस्जिदमधून जो खुदबा (धार्मिक उपदेश) होतो, तो नक्षलवादी समस्येवर आणि या घटनेवर व्हावा. मात्र तसे कमीच झाले. नेहमीचेच तेच प्रवचन ‘मरने के बाद क्या होगा? जन्नत के हकदार हम कैसे बनेंगे’ हेच ऐकायला मिळाले. मग दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक मोठ्या शहरातील चांदणी चौकातून निषेध मोर्चा, बॅनर मोर्चा, कँडल मोर्चा निघाले. काही ठिकाणी निषेध सभादेखील झाल्या.
यावेळी मला आशावादी चित्र बघायला मिळाले. हिंदू-मुस्लीम सामाजिक एकतेवर सामाजिक अभिसरण प्रकल्पात काम करताना, एरवी काही धार्मिक प्रसंगी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ज्यांना उद्देशून म्हटले जात होते, त्याच समाजातील लहान लहान मुलांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे लावले.
माझ्या या अल्पवयीन भारतीय नागरिकांना गर्दी जमा करता येते, मात्र विचार मांडता येत नाही. मग त्यांनी चांगले विचार मांडणाऱ्या गुरुजींना बोलावले, कार्यक्रमाकरिता पैसे नव्हते. कार्यक्रमाला स्टेज बनवण्याकरिता माझ्याच घरचा लाकडी तख्त (पलंग) नेला. मुले वयाने लहान होती. मात्र दहा-बारा लहान मुलांनी तो पलंग कार्यक्रमाकरिता उचलून नेला. घरच्याच फाटक्या सतरंज्या, चादरी बसायला टाकल्या. त्यांच्या प्रत्येक वृत्तीतून मला देशभक्ती दिसत होती. कँडल मार्च, मुर्दाबादचे नारे लावण्याची त्यांना गरजच पडली नाही. या चिमुकल्यांच्या कार्यक्रमाला गर्दीही भरपूर होती. जेवढे फाटक्या चादरीवर बसले होते, तेवढेच उभे होते. आणि तेवढेच गच्चीवरून ऐकत होते.
मागील ३५ वर्षांपासून आम्ही यांसारख्या चिमुकल्यांना मस्जिदीच्या बाहेर पडल्यानंतर एवढीच शिकवण दिली, ‘जेवढं आपण धर्मावर प्रेम करतो, तेवढंच देशावर करा. दुसरं म्हणजे आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत, नंतर मुसलमान आहोत. हे कायमचे लक्षात असू द्या.’ या विचार प्रवाहाचे सार्थक झाले, याचा मला आनंद झाला. अभिमानही वाटला. कार्यक्रमाच्या समाप्तीला सर्वांनीच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे लावले. आतापर्यंत हे नारे गैरमुस्लीमाच्या तोंडून निघत होते. ते बघतच राहले. कारण आता मुसलमानांना कळून चुकलेले आहे. खऱ्या अर्थाने देशभक्ती सिद्ध करायची वेळ आपल्यावर आहे. अन्यथा आपल्या पिढीचे काही खरे नाही.
माझा नातू दहा वर्षांचा आहे. त्याला सैनिक दलाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. हल्ल्यानंतर टीव्हीवरचे दृश्य बघून त्याला आम्ही म्हणालो, “सैनिक दलात गेले की, असे मरण येते.’ तरीही उत्साहात तो आम्हाला म्हणाला, ‘मला सैनिकच व्हायचे आहे. देशसेवाच करायची आहे.’ येणारा काळ त्याचे उत्तर देईल. कारण मानव प्राणी भूतकाळ विसरून वर्तमान जगत असतो. हा हल्लाच इतका भयंकर होता की, लिखाणाची, बोलण्याची ताकदच संपली. मला सावरायला तीन दिवस लागले. या तीन दिवसांत मी काही घटनांचे अवलोकन केले. मुल्ला-मौलाना यांच्याशी दहशतवादाचे विश्लेषण केले आणि जनसामान्यांशी संवाद केला.
यानंतर जे अनुभव आले ते असे, अजूनही २५ टक्के लोक दुःखद टाहो फोडत आहेत आणि २५ टक्के लोक सैनिकांच्या वेदनांचे भांडवल करून स्वतःची प्रसिद्धी, मोबाईल स्टेटस् आणि सैनिक कल्याण निधीच्या नावावर स्वतःच्या अर्थार्जनाची सोय करत आहेत. समाजात हे चालणारच. समाज म्हटला की, हौसेनवसे, गवसे, सगळेच आले.
सरतेशेवटी माझ्या डोळ्यासमोर येतो तो दहशतवादी हल्ला घडवून आणणारा आदिल, त्याला जन्म देणारी आई आणि समाजात शरमेने खाली मान घालून चालणारा त्याचा बाप. मुले वयात आली की, आई-वडिलांचे ऐकत नाहीत हा भाग. मुले घरात भरपूर पैसे आणत असतील तर ते कोठून येतात, हे न विचारणारे मायबाप, मुलगा वाईट वळणावर गेला म्हणून त्याचा पिच्छा सोडून देणारे मायबाप, डोक्यात मौलाना टोपी घालून पाचदा तो घाईने काश्मिरी मस्जिदीत जातो म्हणजे तो ‘अल्लाह के राहपर चलनेवाला नेक बंदा’ असे समजणारे मायबाप. खरंच या आई-वडिलांना हे माहिती नसेल, एके दिवशी आपला मुलगा असे देशविघातक कृत्य करेल?
जन्नतचे आमीष आणि घरात येणारे पैसे यामुळे हे वरील चिंतन कोणत्याच कुटुंबात होत नाही. अजूनही भारतात, मुस्लीम समाजात असे कितीतरी आदिल, ओसामा, कसाब असतील ज्यांना वयाच्या पंचविशीच्या आतच असे कृत्य करून जन्नतमध्ये पाठवले जाईल. मृत्यूला न भिणारे हे तरुण मरताना ‘या खुदा’ म्हणतात. खुदा खरेच यांना माफ करेल?
या दहशतवादी हल्ल्याच्या वेदनेबद्दल इतकेच म्हणावेसे वाटते.
आता बोलबाला वेदनांचा फार झाला.
भावनांचा केवढा व्यापार झाला.
आदिल, तू दिल्या वेदना इतक्या की,
मोजताना आकडाही पार झाला.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 28 March 2019
रझिया सुलताना, तुमच्या भावनेशी १००% सहमत आहे. इस्लाममध्ये जो आतंकवाद घुसला आहे त्याला आईच काबूत आणून नष्ट करू शकते. शीख आतंकवाद पंजाबी माताभगिनींनी संपवला. आतंक्यांना अपेक्षित असलेलं लोकांचं पाठबळ मिळालंच नाही. पंजाबी माताभगिनींनी जे बालकांवर संस्कार केले होते त्यांत निरपराध्यांना ठार मारण्याची शिकवण नव्हती. मुस्लिम (विशेषत: सुन्नी) मातांना नेमकं हेच करायचं आहे. ते तुम्ही कराल, असाच तुमचा निर्धार दिसतोय. यासोबत आजून एक गोष्ट आवर्जून करा. तुमच्या मुलांना समजावून सांगा की हरामाचा पैसा गिळून कोणीही जन्नतमध्ये जात नसतो. आज मुस्लिम बालकांच्या मनांत पद्धतशीरपणे तेढ वाढवण्यात येत आहे. त्याला सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा कारणीभूत आहे. तुम्ही माताभगिनी त्या पैशाला सर्वार्थाने पराभूत करू शकता. आपला नम्र, -गामा पैलवान