अजूनकाही
जगातील सर्वाधिक बालवधूंचे प्रमाण भारतात आहे. देशातील अंदाजे २७ टक्के मुलींची लग्ने वयाच्या १८ वर्षाच्या आधीच केली जातात. त्यांना शिकण्याची संधी, आपल्या भविष्याची स्वप्ने आणि लग्न म्हणजे काय ते समजून घेण्याआधीच त्या लग्नबंधनात अडकतात. अत्यंत गरिबी, कायद्याची कमकुवत अंमलबजावणी आणि मुख्यत्वे कुटुंबांच्या पारंपरिक व सामाजिक कल्पना जपण्यासाठी, पूर्वापार चालत आलेल्या पितृसत्ताक समाजाच्या नियमांमुळे लहान कोवळ्या वयात मुलींचा विवाह केला जातो. सरकारी अहवालानुसार १५ वर्षांखालील मुलींचे विवाहाचे प्रमाण कमी झाले असले, तरी वय वर्ष १५ ते १८ वयातील मुलींच्या विवाहाचे प्रमाण वाढले आहे.
लहान वयातील विवाहातील धोके व आव्हाने या बाबतीत मोठा प्रसार करण्यासाठी युनिसेफ या संयुक्त राष्ट्राच्या विभागाने १० ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८ या कालात बालविवाह विरोधी मोहीम सुरू केली होती. याच मोहिमेचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कातकरी पाड्यांना भेट दिली. आजही या समाजात बालविवाह प्रचलित आहेत. सामाजिक कार्यकर्त्या व तरुणींबरोबरीच्या संवादातून बालविवाहाची एक प्रखर वास्तविकता प्रकट झाली.
१.
वाटिका, वय १५, मारहाण, पीडित परंतु न वाकलेली.
ती खोलीत शिरायच्या आधीच ती येत असल्याचे कळते. तिच्या पायातील पैंजणांचा मंजुळ आवाज ती आल्याचे कळवतो. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील डोंगरवाडी पाड्यातील वाटिकेच्या चेहऱ्यावर प्रेमळ स्मितहास्य दिसतं. तिने खास या भेटीसाठी गर्द गुलाबी कुडता घातला होता. तिच्याशी बोलायला सुरुवात करायची तयारी करताच ती अचानक शांत होते. जीवन विकास केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या केशर पाटील म्हणतात, ‘ती अतिशय लाजाळू आहे. तिला थोडा वेळ द्या.’ ते तिला रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील कोल्के येथील गुड शेफर्ड कॉन्व्हेंटमध्ये आपल्या सोबत घेऊन आले होते.
जीवन विकास केंद्र कोल्के येथे व्यावसायिक शिक्षण केंद्र चालवलं जातं. आदिवासी स्त्रियांना शिवण व विणकामाचे तिथे प्रशिक्षण दिले जाते. गुड शेफर्ड कॉन्व्हेंट रायगड व मुंबई जिल्ह्यात आरोग्य शिक्षण व वस्ती पातळीवरील कार्यक्रम चालवतात.
कातकरी हा जंगलातील मूळ आदिम समाज. एके काळी शिकार आणि वनांतून अन्न गोळा करणारा हा समाज आता अत्यंत हलाखीच्या गरिबीत राहतो. वेठबिगारी भारतात अनेक दशके आधी समाप्त केली असली तरी हे लोक त्यांच्या शेटचे वेठबिगार म्हणून काम करतात. जवळपास नामशेष होत आलेल्या या लोकांचे पूर्णपणे शोषण होत आहे. हवामानातील बदल व वेगात होणारे शहरीकरण यामुळे शिकार व अन्न गोळा करण्याची जीवनशैली टिकवून ठेवता येत नाही. या जमातीच्या अस्तित्वासमारे आव्हान निर्माण झाले आहे.
१५ वर्षांची वाटिका संकोचते व एका शब्दात उत्तरे देते, तिला बोलते करायला वेगळा पर्याय वापरावा लागतो. तिचे फोटो काढू शकतो का? तिचा चेहरा त्वरित खुलतो व ती आनंदाने फोटोसाठी उभी राहते, हळूहळू खुलते.
‘‘माझी पाळी ११ व्या वर्षी सुरू झाली आणि लवकरच माझे लग्न झाले’’ ती सांगते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे बघू लागते. केशर पाटील सांगतात, ‘‘तिचा नवरा दारू प्यायला लागला व अधूनमधून तिला मारहाण करू लागला. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने मृत अर्भकाला जन्म दिला.’
आजकाल वाटिका तिच्या माहेरी परत गेली आहे व संपूर्ण दिवस वीट-भट्टीवर काम करते. तिथे बालमजुरी चालते आणि कामाची परिस्थिती भयंकर आहे. तिचा नवरा भट्टीवर मधेअधे उगवतो आणि पैसे मागतो. ती गुपचूप पैसे देते. पाटील सांगतात, ‘‘तिने नकार दिला तर तो तिला मारझोड करेल.’’
ती हा अत्याचार सहन का करते? ‘‘नेहमीच नाही, कधी कधी मी पण त्याला मारते,’’ ती हसत सांगते. तिची आत्यंतिक मारहाण आणि शोषण झाले आहे, परंतु गुड शेफर्ड कॉन्व्हेंट तिच्या पाठीशी उभं आहे. तिचा नवरा आणि समाजाने तिच्यावर केलेली हिंसा दुःखदायक आहे.
२.
पनवेल तालुक्यातील शिर्से पाड्याची शैला म्हणते, ‘‘मला माझ्या नवऱ्याचा चेहराही बघायचा नव्हता, मला फक्त शिकायचं होतं, अभ्यास करायचा होता.’’ ती आठवीत असताना तिचा विवाह करण्यात आला. ‘‘पण मी असं सहजासहजी ऐकणार नव्हते. मला लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जायचे नव्हते. मी माझ्या माहेरीच राहिले.’’ ज्यामुळे जातीत एक वादळ उठले. ती सांगते, गावकीची बैठक बोलावण्यात आली व तिच्या कुटुंबाला स्पष्टपणे बजावण्यात आले की, ‘‘वधूला आपले माहेर सोडावे लागेल.’’ अर्थातच या आज्ञेने तिचा निश्चय लगेचच कमजोर पडला नाही. ती सांगते, ‘‘मला माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहायचा नव्हता, मला फक्त अभ्यास करायचा होता.’’ गावकीच्या आज्ञेचे लगेच पालन करण्यास नकार देऊन शैलाने परंपरेला मोठे आव्हान दिले. परंतु इतर कुटुंबांकडून येणारा दबाव तिच्या पालकांना झेलणे कठीण झाले. ‘‘तिचा वाईट प्रभाव पडेल, आमच्या मुलींनी लग्नानंतर सासरी जाण्यास नकार दिला तर?’’ शैलाच्या कुटुंबांवर दबाव आला व तिच्यापुढे अन्य पर्याय राहिला नाही.
१४ वर्षांच्या शैलाला जबरदस्तीने सर्वांच्या इच्छेपुढे झुकावे लागले असेल, परंतु तिने तिच्या मुलीला वाचवण्याचा निर्धार केला आहे. ती आपल्या मुलांना शिक्षण पूर्ण करू देईल. ‘सोरी मोठी हिनी, तिना लगीन करीन टाकू’ (मुलगी मोठी झाली, तिचे लगीन केले पाहिजे) हा समाजाचा नियम होता. ‘‘परंतु मी हे माझ्या मुलांसाठी स्वीकारणार नाही.’’ ती बदल आणण्याचा निश्चय करते.
२० वर्षांची शैला बालविवाहाच्या प्रथेचे दुष्परिणाम जाणते. ‘‘किशोरवयातील गर्भधारणा थांबल्याच पाहिजे,’’ ती ठासून सांगते. लहान मुलीचे लग्न होऊन ती गर्भवती होते, तेव्हा तिचे शरीरच मूल जन्माला घालण्यासाठी तयार झालेलं नसतं. तसेच पुढील जबाबदाऱ्या पेलायला ती समर्थ नसते. त्यामुळे अशिक्षितपणा, गरिबी आणि आजारपण पिढ्यानपिढ्या चालूच राहते. त्याचे परिणाम मुली व स्त्रिया भोगतात. ‘‘यातून एकच मार्ग आहे ते म्हणजे शिक्षण. आणि माझी मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करतील.’’ शैला हमी देते.
बालविवाह व आरोग्यावरील दुष्परिणामांचे समूळ उच्चाटन करायचा एक अतिशय परिणामकारक उपाय म्हणजे मुलींचं शिक्षण आणि वसतीगृहांची सोय. परंपरेच्या नावाखाली स्वप्नांचा व भविष्याचा बळी दिला जात असला तरी शैलासारख्या मुलींमुळे बदल आता फार दूर नाही असं वाटू लागतं.
३.
रायगड जिल्ह्यातील कोल्के पाड्यातील पूर्णिमा हिचा १८ व्या वर्षी विवाह झाला. त्याआधीच तिच्यावर विवाह करण्यास दबाव येत होता. परंतु तिला रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळेत पाठवण्यात आले. गावी परतायच्या आधी तिने १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावातील वरिष्ठांनी तिला खडसावले, ‘‘तू आता घोडनवरी झाली आहेस, तुझ्याशी कोण लग्न करेल?’’ परंतु पूर्णिमाला काहीही समस्या आली नाही. आता ती २५ वर्षांची असून आपल्या वैवाहिक आयुष्यात फार सुखी आहे. ती आता दोन मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा शाळेच्या वसतिगृहात राहतो. ती जीवन विकास केंद्रात शिवण व विणकामाचे प्रशिक्षण घेत आहे.
‘‘आमच्या पूर्वजांनी जर योग्य प्रथांचे पालन केले असते तर आम्हाला आज एवढे झगडावे लागले नसते.’’ पूर्णिमासारख्या स्त्रियांनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे, आयुष्य सुखाने जगायचा दुसरा मार्ग असू शकतो. तरीही त्या भागात होणारे बालविवाह हे वास्तव आहे. सांस्कृतिक चालीरीतींपेक्षा बालविवाह आर्थिक अपरिहार्यतेशी जोडलेले आहेत. असे विवाह मे महिन्यात होतात, जेव्हा सर्व कुटुंबे आपल्या घरातील भातशेतीच्या कामात असतात. वीटभट्टीच्या कामावर ऑक्टोबरमध्ये स्थलांतर करतात. शेतात काम करायला आणखी दोन हात मिळतात. पावसाळा संपला की बालवधू त्यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या पतीकडे जातात. वीटभट्टी मालकांनी ठेवलेले मध्यस्थ आदिवासींना अन्न व इतर गरजा पुऱ्या करण्यासाठी उचल देतात व त्यांना कामावर ठेवतात.
मात्र बदल अगदी उंबरठ्याशी आला आहे. मुख्यत्वेकरून पनवेल शहराजवळील कातकरी पाड्यांमध्ये हळूहळू होणारा हा कायापालट पूर्णिमासारख्या स्त्रिया घडवून आणत आहेत. दारिद्रय व परंपरा यांची अभद्र युती तोडणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आदिवासी जमाती बरोबर काम करणारे कार्यकर्ते मुलींच्या रक्षणासाठी इतर पर्यायांवर अवलंबून आहेत. खास करून स्त्रीवादी पारंपरिक ज्ञान आणि जुन्या उपचार पद्धती. ज्यामुळे बालकांचे व पालकांचे आरोग्य रक्षण होईल, अशा परंपरांचे पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न चालू आहे.
.............................................................................................................................................
भाषांतर - अरुणा मंडलीक
मूळ इंग्रजी लेख ‘चरखा’ या संकेतस्थळावर प्रकाशित झाला होता.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 27 March 2019
सावधान! गुडशेपर्ड पासनं सावधान. पनवेलात ख्रिस्ती लोकसंख्या चिमुकली असली तरी अनेक मोक्याच्या जागी मिळून १८ चर्च बांधली आहेत. आता कळतंय कशाला ते. बाटवाबाटवीचे धंदे करायला म्हणूनंच ना? वर सुधारणेचा मुलामा द्यायचा. नेमक्या हीच कीड नष्ट करण्यासाठी हिंदुराष्ट्र हवंय. -गामा पैलवान