अजूनकाही
सिंगा वेस्ता पाडवी. मूळ गाव डनेल. वय-८० वर्षे. सरदार सरोवर प्रकल्पात महाराष्ट्राच्या विस्थापित होणाऱ्या ३३ गावांपैकी अक्कलकुवा तालुक्यातील डनेल गावचे विस्थापित.
सरदार सरोवर धरणात महाराष्ट्रातील ३३ गावे (जी १०० टक्के आदिवासी गावे आहेत), मध्य प्रदेशातील १९२ गावे व १ नगर आणि गुजरातमधील १९ गावे (जी १०० टक्के आदिवासी गावे आहेत) विस्थापित झाली आहेत. तसेच या धरणात महाराष्ट्राचे ६५०० हेक्टर जंगल बुडितात गेले. या धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाकरिता नर्मदा बचाओ आंदोलनाने केलेल्या सततच्या ३३ वर्षांच्या संघर्षामुळे ११ पुनर्वसन वसाहती बनल्या व तीन पुनर्वसन वसाहतींचे काम सुरू आहे.
याच महाराष्ट्रातील ३३ विस्थापित गावांपैकी अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव डनेल व त्या डनेल गावातील १ विस्थापित म्हणजे सिंगा वेस्ता पाडवी. तसे दिसायला साधेसुधे, टॉवेल अथवा शालीने कंबर बांधलेले व गळ्यातही शाल असलेले. भूसंपादन निवाड्यातील मूळ रेकॉर्डप्रमाणे सिंगा वेस्ता पाडवी वगैरे तीन (खरे म्हणजे तीन भाऊ घोषित व्हायला हवे होते असे) असे घोषित व्हायला हवे होते, परंतु त्यांच्या भावांवर अन्याय झाला आणि सिंगा वेस्ता पाडवी सुरुवातीला एकटेच घोषित झाले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांचे भाऊ वेगवेगळ्या संघर्षानंतर घोषित झाले.
सिंगा वेस्ता पाडवी १९८०-८५ पासून खातेदार या प्रकारात घोषित प्रकल्पबाधित. नर्मदा पाणी तंटा लवादाप्रमाणे दोन हेक्टर सिंचित व शेतीलायक जमीन व ६० X ९० चा घरप्लॉट, जमिनीची नुकसानभरपाई, कौले, ढापे, पुनर्वसन वसाहतीत सर्व नागरी सोयीसुविधा जमीन बुडितात जाण्याच्या एक वर्ष आधी मिळून त्यांचे पुनर्वसन व्हावयास हवे होते. सिंगा पाडवी यांची स्वतःची खात्याची जमीन धरणाची उंची ९० मीटर असताना १९९४ मध्ये बुडितात गेली व घरही सामानासह वाहून गेले. कायद्याप्रमाणे १९९३ ला जमिनीसह त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे होते, जे झाले नाही.
घर सर्व सामानासह वाहून गेल्यामुळे नर्मदा विकास विभागाने बनवलेल्या तात्पुरत्या व अमानवीय पत्र्याच्या शेडमध्ये सिंगा पाडवी व त्यांचे कुटुंब राहायला गेले. पण पत्र्याची ती शेडही एक वर्षाच्या आत उडून गेली. जमीन व घर वाहून गेल्यावर शासनाकडून तेल व तांदूळ याशिवाय काहीच मिळाले नाही. नुसत्या भातावर व जंगलातील भाजी, नदीतील मासे यावर १० दिवस सिंगा पाडवी यांनी स्वतःच्या पाच मुलांसकट कसेबसे काढले. शेजारच्या मध्य प्रदेशातील सरदार सरोवर विस्थापित क्षेत्राच्या निमाड या भागातील प्रकल्पबाधितांनी पुरेसे गहू, मका, डाळ, तांदूळ, मिरची व किराणा सामान देऊ केले, त्यावरच खऱ्या अर्थाने सिंगा वेस्ता पाडवी यांचा पुढचा उदरनिर्वाह झाला.
दोन ते तीन वर्षं पत्र्याच्या शेडमध्ये कसेबसे राहिल्यावर गावाच्या सहकार्याने व जंगलातून लाकडे आणून चुलत भावाच्या जमिनीवर डनेलमधील फिटापाडा येथे १९९८ला घर बांधले. घर व शेती बुडाल्यापासून गिंब्या कालशा पाडवी यांच्या शेतात बायको व मुलांसकट मजुरी करून संसाराचा गाडा हाकायला सिंगा पाडवी यांनी सुरुवात केली. त्यावेळची त्या सर्व कुटुंबाला मिळणारी मजुरी म्हणजे केवळ खाण्यापुरते धान्य एवढीच होती.
१९९९ ला आणखीन एक विचित्र घटना सिंगा पाडवी यांच्या आयुष्यात घडली. त्यांचा जावई सर्पदंशाने मयत झाला, म्हणून ‘सासूने जावयाला खाल्ले’ असा आरोप त्यांच्या बायकोवर ठेवून तुझ्या बायकोला गावात राहू देणार नाही व तुलाही राहू देणार नाही, अशी धमकी देत डाकीण काढले. त्यामुळे सिंगा पाडवी यांना त्यांचे घर पुन्हा नाईलाजाने हलवावे लागले. बायकोला दुसऱ्या गावी म्हणजे गमण येथे भावाकडे राहायला जावे लागले. जवळपास ७ ते ८ वर्षं सिंगा पाडवी व त्यांच्या बायकोला म्हणजेच गांगीबाईंना वेगवेगळे राहावे लागले.
जावयाची भरपाई म्हणून जंगलातून दोन बैल परस्पर जावयाच्या कुटुंबातील व्यक्तींनी चोरून नेले. समाजाने अशा पद्धतीने नवरा-बायकोला वेगळे करण्याची व भरपाई म्हणून शेतीत राबणाऱ्या बैलांना चोरण्याची ही पहिलीच घटना असावी. त्यानंतर बैलांच्या चोरीची तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला गेलेल्या सिंगा पाडवी यांच्यावर उलटेच आरोप सर्वांनी केले. नर्मदा आंदोलनाच्या मध्यस्थीनंतर गावातील प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन त्यांचे बैल परत मिळवले.
सिंगा पाडवी हेच गांगीबाई यांना भेटायला गमण येथे जात असत. गांगीबाई या काळात गमण येथील लोकांची गुरे चारून स्वतः चा जेमतेम उदरनिर्वाह करत असत.
गमण येथे गांगीबाईंनी स्वतःचे झोपडीवजा घर बांधले होते, तेही २००६ मध्ये सर्व बाजूंनी पाण्याने वेढले गेले. म्हणजेच टापू झाले. वाघ त्या घराजवळ सतत पाणी प्यायला येत असे. घर जंगलात असल्याकारणाने जीव मुठीत घेऊन गांगीबाई राहत होत्या.
सिंगा वेस्ता पाडवी यांचा सर्वांत मोठा मुलगा सियाराम सिंगा पाडवी (सिडया) याला चिमलखेडी या पहिल्या नर्मदा जीवनशाळेत पहिल्या बॅचमध्ये शिकायला पाठवले. सिंगा पाडवी यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच सियारामला नर्मदा जीवनशाळेत संघर्ष करत करत ‘डुबेंगे पर हटेंगे नहीं’ म्हणत, वेळप्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांना घोषणाबाजीनेच आपल्या हक्कांविषयी जाब विचारत, नर्मदा जीवनशाळेतून धुळे येथे राजेंद्र छात्रालयात व अक्कलकुवा येथे कॉलेजमध्ये १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करायला लावले.
दरम्यानच्या काळात प्रत्येक मोर्च्याला, धरणे आंदोलनाला नंदुरबार ते मुंबई, नागपूर, भोपाळ, इंदोर, दिल्लीपर्यंत संघर्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आंदोलनाचा झेंडा घेऊन सिंगा पाडवी न चुकता, न थकता, न थांबता लढतच राहिले. त्यात कधी पोलिसांचा मार खाल्ला, कधी जेलमध्ये गेले, कधी न जाहीर केलेले उपवासही केले, जे कधी टीव्हीने दाखवले नाहीत किंवा वर्तमानपत्राने छापलेही नाहीत, ज्याचा उल्लेख कोणत्या पुस्तकातही झाला नाही. कोणत्याही प्रसिद्धीची पर्वा न करता स्वतःच्या, गावाच्या व समाजाच्या हक्कासाठी सिंगा पाडवींसारखे अनेक जण आंदोलनाच्या लोकांच्या समूहात मनापासून कायमच संघर्षात उतरत राहिले आणि ‘न्याय चाहिए, अन्याय नहीं’सारख्या अनेक घोषणा प्रत्यक्ष जगत न्याय मागत राहिले.
अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर नर्मदा बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून २२ वर्षांनंतर नर्मदानगर येथे अस्तित्वात नसलेल्या प्रकल्पबाधिताला शासनाने दिलेली जमीन शासनाकडून रद्द करवून घेऊन तीच दोन हेक्टर जमीन सिंगा पाडवी यांनी ताब्यात घेतली. तसेच जमीन सिंचित नसल्यामुळे २.४५ लक्ष रुपये अनुदानही आंदोलनाच्या प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर पदरात पाडून घेतले. परंतु आजही सिंगा पाडवी यांचे घर मूळ गावातच म्हणजेच डनेलमध्ये आहे. शासनाने अजूनही त्यांना नर्मदानगर या पुनर्वसन वसाहतीत दोन वर्षांपूर्वीपासून घरप्लॉटची मागणी करूनही घरप्लॉटची जागा दिलेली नाही. त्यामुळे आजही सिंगा पाडवी हे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत.
सरदार सरोवर धरण पूर्ण झाले असले तरीही महाराष्ट्रात सिंगा पाडवींसारखी शेकडो, तर मध्य प्रदेशात हजारो कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनाचा लढा आजही नर्मदेच्या खोऱ्यात सुरूच आहे.
लेखिका लतिका राजपूत नर्मदा बचाओ आंदोलनाच्या कार्यकर्ता आहेत.
संकलन – चेतन साळवे. कार्यकर्ता, नर्मदा बचाओ आंदोलन
शब्दांकन – सियाराम पाडवी. कार्यकर्ता, नर्मदा बचाओ आंदोलन
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 27 March 2019
आपल्या वडिलांची कथा व व्यथा शब्दबद्ध करतांना सियाराम पाडवीची काय मन:स्थिती झाली असेल याचा अंदाज बांधतो आहे. कौतुक? अभिमान? खिन्नता? की अजून काही? असो. मोठी धरणं खरोखरंच हवीत का यावर देशपातळीवर विचारविनिमय व्हायला हवाय. पाणी जिरवणे हा ही एक तोडगा आहे. याचा म्हणावा तितका पाठपुरावा होत नाही. सरकारी पातळीवर तर सगळा आनंदीआनंदच आहे. पैसा जिरवण्यात जास्त रस असल्याने पाणी कोण जिरवणार, असा प्रश्नं आहे. -गामा पैलवान