अजूनकाही
गांधीजी सेवाग्रामला आल्यावर त्यांच्यासाठी कुटी बांधण्याचे ठरले. तेव्हा त्यांनी कुटी शंभर रुपयांत बांधली जावी अशी अट घातली होती. तसेच त्यांची दुसरी अट होती की, बांधकामाला लागणारा माल शक्यतो सेवाग्राम वा पंचक्रोशीत मिळणारा असावा.
असाच आग्रह त्यांनी फैजपूरच्या काँग्रेसच्या वेळीही धरला. सजावट स्थानिक वस्तूतून केली जावी असे त्यांनी सांगितले. खामगावचे पंधे गुरुजी यांच्याकडे चित्र काढण्याची जबाबदारी होती. त्यांच्या मदतीला त्यांचे एक शिष्य दत्ता महा- जे आमचे मामा होते- हेही होते. दत्ता महा सांगत होते की, तेथे मिळणारी वेगवेगळ्या छटांची माती व रंगीत दगड कुटून रंग बनवण्यात आले व त्यांचा सौंदर्यपूर्ण वापर करण्यात आला.
सेवाग्रामची कुटी असो वा फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनातील सजावट, गांधींजींच्या अटीमुळे, कलाकाराच्या शोधबुद्धीला, कल्पकतेला वाव मिळाला. तसेच ग्रामस्वराज्य व ग्रामस्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले.
जे आजूबाजूला पिकते, मिळते, सहजपणे उपलब्ध होते त्याचा प्रथम वापर झाला पाहिजे, ही गांधींजींची दृष्टी होती. याबाबतीत केवळ स्थूल व बाह्य गोष्टींबाबतच त्यांचा आग्रह होता असे नाही, भाषेकडे पाहण्याचीही त्यांची दृष्टी अशीच होती.
शिल्पकार कांती पटेल - जे आमच्या शिल्पकार मामाचे, दत्ता महा यांचे शिष्य होते - काही दिवस सेवाग्राम आश्रमात गांधीजींचे शिल्प व चित्र काढायला राहिले. कांती पटेल एकदा मला सांगत होते की, गांधीजींशी बोलताना त्यांनी इंग्रजी शब्दांचा वापर केला. त्यावर गांधीजींनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. काही रुपयांचा दंडही केला.
गावात जे उपलब्ध आहे, त्याचा वापर न करता ती गोष्ट बाहेरून आणणे हा जसा ग्रामद्रोह आहे, तसेच आपल्या मातृभाषेत शब्द असताना इंग्रजी शब्दांचा वापर करणेही. ग्रामस्वावलंबनाच्या दिशेने गांधींजी कसा सूक्ष्म विचार करत होते, याची ही दोन उदाहरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर मी स्वतःचा व गावाचा विचार करतो. गेल्या ३५-३६ वर्षांत मी गावातील न्हाव्याशिवाय कोणाकडूनही, बाहेरच्या केशकर्तनालयातून केस कापून घेतले नाहीत. जर तसे केले नाही तर गावातला न्हावी बेकार होईल हा विचार! पण आता गावातील निम्मे तरुण शहरात जाऊन केस कापतात. त्यामुळे गावातील न्हाव्याचा धंदा बसत चालला आहे.
गांधींजीचे एक सहकारी, साहित्यिक, घटना समितीचे सदस्य, इंदौरचे तात्यासाहेब सरवटे यांनी ‘जीवनप्रवाह’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. ते अधिकारी होते. एका लोहाराने कर्ज थकवले म्हणून कठोरपणे त्यांनी ते वसूल केले. अखेर त्या लोहाराला गाव सोडावे लागले. बऱ्याच वर्षांनी सरवटे त्या गावात गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, गावात लोहार नसल्याने गावाचा पैसा तर बाहेर जातो आहेच, पण लोकांचा वेळही जातो आहे. सरकारी पैसा वसूल करण्याच्या हट्टाग्रहात ग्रामव्यवस्थेला सुरुंग लागला होता.
न्हाव्याच्या बाबतीत असलेला आग्रह मी गावातील बुरुडाच्या बाबतीत ठेवू शकलो नाही. गावातला बुरूड टोपल्या विणतो, पण टिकावू म्हणून मी प्लॅस्टिकच्या टोपल्या आणल्या! ही तत्त्वच्युती गांधींनी खपवून घेतली नसती!
अशीच अजून एक गोष्ट. आमचे गाव विनोबांच्या विचारानुसार ग्रामदान झाले आहे. ग्रामदान हा स्वामित्वविसर्जनाचा विचार आहे. गावाने आपल्या जमिनीची मालकी गावाकडे दिली आहे. ते केवळ आता वहिवाटदार आहे, मालक नाही. हे सारे त्यांनी आम्हा सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या विचार प्रचाराने केले. त्यामुळे मर्यादित अर्थाने का होईना आज ग्रामस्वराज्य तेथे आहे.
मला स्वतःला ग्रामदानाचा विचार त्यांना सांगण्याचे नैतिक धैर्य कधी झाले नाही. जर गावकऱ्यांनी मला विचारले की, विनोबांच्या विचारांप्रमाणे आम्ही आमच्या जमिनीचे हक्क गावाकडे दिले, तसे तुमच्या घराची मालकी ‘मुंबई सर्वोदय मंडळा’कडे विसर्जित केली का? तर माझी लंगोटी जागेवर राहणार नाही.
गांधींचे ग्रामस्वराज्य मी गावात आणू शकत नाही, कारण माझ्या उक्ती व कृतीतील अंतर हे आहे. गांधीजींच्या चराच्या संडासाबद्दल मी बोलतो. सोनखताचे गोडवे गातो आणि मी मात्र फ्लशचा (एक वेळा दोन बादल्या जाईल असा) संडास वापरतो.
गांधीजींचा आग्रह होता की, गावात निर्माण होतील अथवा पंचक्रोशीत तयार होतील त्याच वस्तूंचा वापर करावा. आता आमची वाटचाल पंचक्रोशीकडून पंचखंडाकडे चालली आहे. पंचखंडात तयार झालेल्या वस्तू आमच्या घरात दिसू लागल्या आहेत. जग जवळ आले आहे. (दुनिया मुठ्ठी में!) हा आमचा बचावात्मक पवित्रा आहे. पण हे सारे लंगडे समर्थन आहे. हव्यास व गरजा वाढवून आपण गाव व देशाबाहेरील वस्तू घरात आणतो आहोत. हे एक प्रकारे ‘तैनाती फौज’ बाळगणेच आहे.
तैनाती फौज बाळगल्यानेच देशात गुलामी आली होती, एवढे सत्य जरी आम्हाला कळले तरी पुढील अरिष्ट टळेल.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 27 March 2019
गावाच्या स्वयंपूर्णत्वाची गांधींची मतं मला पटतात. गावचं कौशल्य टिकलं व वाढलं पाहिजे. -गामा पैलवान