अजूनकाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे नेहमीच चर्चेत राहणारं दिलखुलास व्यक्तिमत्त्व. आपल्या कार्यशैलीमुळे म्हणा की, वेळोवेळी करत असलेल्या वक्तव्यांमुळे म्हणा ते सदैव चर्चेत राहतात. त्यांची सूचक वक्तव्यं गोंधळून टाकणारी आणि निश्चितच विचार करायला लावणारी असतात. विशेषतः मागील पाच राज्यांतील विधानसभांच्या झालेल्या निवडणुका आणि राफेल करारावर विरोधकांकडून मोदींची होत असलेली कोंडी, या पार्श्वभूमीवर गडकरी पुन्हा एकदा जोरकसपणे चर्चेत आले आहेत. प्रत्येक वेळी त्यांना ‘मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’, असं वक्तव्य करावं लागलं आहे. वारंवार गडकरींना अशा प्रकारचं वक्तव्यं का करावं लागत आहे? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत एकदा गडकरींना पुन्हा एकदा ‘मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’, असं स्पष्टीकरण द्यावं लागलं.
सध्या सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच ‘२२० क्लब’ अस्तित्वात आल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला २२० जागा मिळाल्यास गडकरी पंतप्रधान होतील, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार ठरतील काय, असा प्रश्न आता काहींना पडू लागला आहे. मात्र गडकरींनी ही अफवा असल्याची आणि अशी कोणतीही शक्यता नसल्याचं सांगत, अशा प्रकारचा कुठलाही क्लब नसल्याचं स्पष्ट केलं.
निवडणूक घोषित झाल्यापासून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारतीय पक्षांतर्गत ‘२२० क्लब’ अस्तित्वात आलेला आहे. हा क्लब पक्षाला २२० जागांवर रोखेल, अशा पद्धतीनं काम करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर देशाचे पुढचे पंतप्रधान नितीन गडकरी असतील, अशी चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप बहुमतापासून दूर राहिल्यास एक सर्वमान्य चेहरा म्हणून गडकरींचं नाव पुढे येऊ शकतं, अशा प्रकारची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष पूर्ण बहुमतानं निवडून येईल, असं गडकरींनी म्हटलं आहे.
गडकरींनी ही शक्यता फेटाळून लावली असली तरी त्यांची याआधीची वक्तव्यंदेखील दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. गडकरी यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्यं पाहता रा. स्व. संघाकडून त्यांना लगाम बसणं आवश्यक होतं अथवा ते ज्यांना लक्ष्य करत आहेत, अशा मोदी-शहांनी त्यांना प्रत्युत्तर देणं अपेक्षित होतं. तसं काहीच झालेलं नाही.
गडकरी हे तसे असाधारण राजकारणी आहेत. त्याच्या जोडीला टापटीप राहणी, जीवनाचा आनंद समरसून घेण्याची वृत्ती, यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे पडतात. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमांत बोलण्याचा आनंदही ते मनमुराद लुटतात. कोणाचीही तमा न बाळगता त्यांचं बोलणं ‘मुक्त’ असतं.
गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. ते लाडके नेते असल्यामुळे संघदेखील त्यांच्या वक्तव्यावर कोणतीही टिपणी करत नाही. गडकरींनी महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघाची बांधणी छानच केलेली आहे. सतत हलकेफुलके विनोद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे पक्षनेते व कार्यकर्ते यांना एरवी सततच्या गंभीर वातावरणापासून त्यांनी नेहमीच दूर नेलं आहे.
गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नागपूरचे. त्यांना त्या भागातून चांगला जनाधार आहे. त्यांना असलेला राजकीय नेते व कार्यकर्त्यांचा पाठिंबाही तुल्यबळ असाच आहे. एकाच भागातून एकाच पक्षाच्या दोन नेत्यांना असं पाठबळ मिळणं हे तसं दुरापास्त असतं, पण या दोघांच्या बाबतीत तसं नाही. गडकरी यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी चर्चा महाराष्ट्रातून ऐकू येई. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या मनसुब्यांना पायबंद घालून ते उधळून लावले. निष्ठावंत मानले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना मोदींनी प्राधान्य दिलं. त्यामुळे फडणवीसांच्या माध्यमातून गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षांना पायबंद घालण्याचं काम मोदी चोखपणे पार पाडत आहेत. पण गडकरी यांनी सगळे बंध तोडून अनेकदा स्वत:चा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रात मंत्री झाल्यापासून गडकरी यांच्या कामाची नेहमीच चर्चा होत आली आहे. महामार्ग, रस्ते वाहतूक, जलसंपत्ती, नदीविकास व गंगा शुद्धीकरण ही खाती त्यांच्याकडे आहेत. मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अगदी यशस्वी राहिलेली आहे. गडकरी जिथं हाथ घालतात, तिथं यश मिळतं, असं त्यांच्या कार्यशैलीवरून दिसून येतं. महामार्ग बांधणीत त्यांचं काम चांगलं आहे. गंगा शुद्धीकरण, जलसंपत्ती विकास यात त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत आहे. पाटबंधारे प्रकल्पांतही कामं होत आहेत.
कार्यालयाबाहेर असताना जेव्हा गडकरी बोलतात, तेव्हा ते स्पष्टवक्ते आहेत, असं दिसतं. मार्च २०१८ मध्ये माध्यमांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादात त्यांनी असं सांगितलं होतं, “माध्यमांनी आम्हाला ‘अच्छे दिन’ या शब्दाच्या कोंडीत पकडलं आहे. पण माझ्या या विधानातून तुम्ही नको ते अर्थ लावू नका. ‘अच्छे दिन’ असं काही नसतं. ‘अच्छे दिन’ हा केवळ श्रद्धेचा व विश्वासाचा भाग आहे. जर तुम्ही म्हटलं तर आताही ‘अच्छे दिन’ आहेत, नाही म्हटलं तर नाहीत.” त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा आरक्षणाच्या आंदोलनांनी उचल खाल्ली होती, तेव्हा ते असं म्हणाले होते, “जरी आरक्षण दिलं तरी नोकऱ्या आहेत कुठे? तंत्रज्ञानानं बँकांतील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरती गोठवलेली आहे.” अनेकांनी त्या वेळी गडकरी यांच्यावर संशय घेतला की, त्यांचं लक्ष्य आरक्षण मागणारे आंदोलक नसून, रोजगारनिर्मिती करण्यात अपयशी ठरलेलं मोदी सरकार आहे.
गडकरी यांनी विचारपूर्वक केलेल्या वक्तव्यांमुळे वादाचं मोहोळ वेळोवेळी उठलेलं आहे. त्यांची विधानं कलाकुसर केलेली, ताशीव वाटतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत भाजपचा पराभव झाला, त्या वेळी ती संधी गडकरी यांनी सोडली नाही. त्यांनी काही हातचं राखून न ठेवता वक्तव्यं केली. ते म्हणाले होते, ‘‘यशाला अनेक बाप असतात, पण अपयश हे पोरकं असतं. जेव्हा यश मिळतं, तेव्हा त्याचं श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागते, पण जेव्हा अपयश येतं, तेव्हा ते स्वीकारण्यासाठी कुणी पुढे येत नाही. कुठल्याही नेत्याकडे यशाप्रमाणेच अपयश स्वीकारण्याची ‘वृत्ती’ असली पाहिजे. नेत्याची संघटना किंवा पक्षाशी एकनिष्ठता ही तो जेव्हा पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हाच दिसून येते.’’ अलीकडे म्हणजे प्रजासत्ताकदिनी गडकरी असे म्हणाले होते, ‘लोकांना स्वप्नं दाखवणारे राजकीय नेते आवडतात, पण जेव्हा ही स्वप्नं पूर्ण होत नाहीत, तेव्हा लोक त्यांची धुलाई करतात.’
गडकरी यांची ही सगळी वक्तव्यं मोदी यांना लक्ष्य करणारी आहेत, याविषयी शंका नाही. जर भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं नाही किंवा सरकार स्थापन करता आलं नाही तर गडकरी हे मोदींच्या नेतृत्वास पक्षपतळीवर आव्हान देतील, अशी व्यूहरचना यातून दिसून येते.
यापूर्वी गडकरी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दलही ओझरती वक्तव्यं केलेली आहेत. २४ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी यांनी असं म्हटलं होतं, “जर मी पक्षाध्यक्ष असेन, माझे खासदार व आमदार चांगले काम करत नसतील तर त्याला जबाबदार कोण, तर मीच.” याच कार्यक्रमात त्यांनी मोदी यांच्याबाबत सूचक वक्तव्य करताना म्हटलं होतं, “भारतीय व्यवस्थेत सहिष्णुता, विनम्रता ही मोठी जमेची बाजू असते. तुम्ही चांगले बोलता म्हणून निवडणूक जिंकू शकत नाही. तुम्ही विद्वान आहात म्हणून लोक तुम्हाला मतं देतील असं नाही.”
अशा प्रकारची गडकरींची वक्तव्यं बरंच काही सांगून जातात.
थोडक्यात मागील काही दिवसांपासून गडकरी यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे देशभरातील राजकारणात ती शक्यता पडताळून पाहिली जात आहे. गडकरींना वारंवार ‘मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही,’ असं वक्तव्य करावं लागत असल्यामुळे ते पंतप्रधानपदाचे दावेदार तर नाहीत ना?, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.
शेवटी हे राजकारण आहे. जनता सत्तेवर कोणालाही बसवू शकते आणि खालीही उतरवू शकते. सत्तेचा आलेख जसा उंच जातो, तसाच तो खालीदेखील येत असतो. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात सर्व शक्यता पडताळून बघता येतात, बघितल्या जातात.
.............................................................................................................................................
drsudhiragrawal239@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment