अजूनकाही
बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. २४ मार्च रोजी त्यांनी रितसर आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. अॅड. आंबेडकरांच्या या खेळीमुळे सोलापुरातील काँग्रेसचे पारंपरिक उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत भर पडणार म्हणून अॅड. आंबेडकरांनी निदान सोलापुरातून फॉर्म भरू नये, असे प्रयत्न काँग्रेसच्या वतीने चालू होते. पण त्याला यश आल्याचे दिसत नाही. तेव्हा काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची काय अडचण व्हायची असेल ती होईल, पण त्यांच्याहीपेक्षा जास्त अडचण डाव्यांची आणि त्यातल्या त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची होणार आहे असे दिसते.
कारण सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी नरसय्या आडम उर्फ आडम मास्तर आतापर्यंत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व आडम मास्तर यांच्यातच झाली होती. त्यात ते पराभूत झाले असले तरी ते दुसऱ्याच क्रमांकावर होते. २०१४ च्या निवडणुकीत मात्र ते सरळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. असे असले तरी त्यांचे त्या भागात बऱ्यापैकी काम आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत विचारमंचावर जाऊन तेथे त्यांनी त्यांच्या गृहप्रकल्पाच्या संदर्भात मोदी व फडणवीस यांची स्तुती केली होती. त्या कारणाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पक्षाच्या केंद्रीय समितीतून निलंबित केले आहे. असे असले तरी ते त्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी आहेत. तेव्हा त्यांनी व त्यांच्या पक्षाने अॅड. आंबेडकर यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे.
अन्यथा ‘अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा सेना-भाजप युतीला होईल. वंचित बहुजन आघाडी करताना त्यांनी आम्हाला विचारले नाही, एमआयएमशी आघाडी केली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आमचा उमेदवार असताना बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार उभा केला. तेथे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही,’ वगैरे कोणत्याही निमित्ताने विरोध केल्यास अथवा पाठिंबा न दिल्यास कम्युनिस्ट विरोधकांच्या हाती पुन्हा एकदा कोलित दिल्यासारखेच होईल. आणि केवळ ‘कोलिता’च्या धाकामुळे नव्हे तर बहुजन वंचित आघाडीकडे असलेला भटक्या विमुक्त, दलित, आदिवासी, अठरापगड जातीतील बहुजन समुदाय केवळ वर्गदृष्ट्या नव्हे तर जातदृष्ट्याही परंपरेने शोषित आहे, तर मुस्लिम समुदाय सद्यस्थितीत धार्मिकदृष्ट्या पीडित आहे. फारसे परिचित नसलेले, आर्थिक बाबतीत कमकुवत असलेले उमेदवार त्यांनी दिले आहेत. विरोधी आघाडीतील शिक्षणसम्राट, साखरसम्राट यांसारख्या निखळ शोषकांपैकी ते नाहीत. त्यांच्यात घराणेशाही निर्माण व्हायला आणखी काही पिढ्या जाव्या लागतील.
तेव्हा पुन्हा एकदा ‘कोलित’ यासाठी की, १९५२ सालच्या स्वतंत्र भारतातील पहिल्याच निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे होते. त्यांच्या विरोधात बराच काळ त्यांचेच स्वीय सहाय्यक राहिलेले नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेस पक्षाने उभे केले होते. ते केवळ दलित नव्हते तर दलितांतीलही ‘महार’ समाजाचे होते. डॉ. आंबेडकरांनी त्यावेळचे समाजवादी नेते साथी अशोक मेहता यांच्याशी आघाडी केली होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांच्या विरोधात जाहीर सभा घेऊन काजरोळकरांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत काजरोळकरांनी डॉ. आंबेडकरांचा १५,००० मतांनी पराभव केला.
त्यावेळी (एकच असलेल्या) कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. डांगे यांनी डॉ. आंबेडकरांना दुसऱ्या पसंतीची मते देऊ नका असे सांगून ती मते कुजवली व म्हणूनच डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला असा कम्युनिस्टविरोधी प्रचार तेव्हापासून सतत सुरू आहे. कॉ. डांगे यांनी मते कुजवून गंभीर चूक केली हे सत्य आहे. पण त्यापेक्षाही गंभीर चुक करणारा, सरळसरळ डॉ. आंबेडकरांच्या विरोधात त्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोडून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, त्यांचा जाहीर प्रचार केला, १९७० साली काँग्रेस सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला.
त्यानंतर १९५४ साली भंडारा येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसनेच बोरकर नावाच्या एका दलित (महार) उमेदवाराला उभे केले आणि त्याही वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला. या पराभवाशी कम्युनिस्टांचा काहीही संबंध नव्हता. असे असूनही काँग्रेस विरोधात, पंडित नेहरू विरोधात, दलितच असलेल्या बोरकर विरोधात, दलित व दलितेतरांतील तथाकथित विचारवंत तेवढ्याच तीव्रतेने बोलत वा लिहीत नाहीत. त्याची कारणे काय आहेत, तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तोही कधीतरी हातावेगळा करूच.
तूर्त सोलापूर येथे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना विरोध करून कम्युनिस्टांनी पुन्हा एकदा अशा विरोधकांच्या हाती कोलीत देऊ नये इतकेच.
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment