अजूनकाही
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप-सेना युतीपुढे तगडं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक छोट्या पक्षांना सोबत घेऊन ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ उभारत एल्गार पुकारला आहे. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी युतीच्या सरकारवर सडकून टीका करत भाजप-सेना युतीपुढं आव्हान उभं केलं आहे.
या महाआघाडीत खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी आघाडीचा समावेश आहे. राज्यातील ४८ जागांपैकी काँग्रेस पक्ष २४ जागा लढेल, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाला दोन जागा, हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला पालघरची जागा, तर अमरावतीची जागा राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यासाठी सोडली जाणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत संपन्न झाली. संयुक्त पुरोगामी महाआघाडीची अधिकृत घोषणाही या वेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, अजित पवार, छगन भुजबळ, राजेंद्र गवई, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार हितेंद्र ठाकूर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
“भाजप-शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना बाजूला करण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही संयुक्त पुरोगामी महाआघाडी स्थापन करत आहोत. देशातील हुकूमशाही सरकार उलथून लावण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एवढे पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला चांगला पाठिंबा मिळाला आणि या पुढेही मिळत राहील, अशी मला खात्री आहे. सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांच्या प्रेरणेनं आम्ही ही आघाडी स्थापन करत आहोत. आज धर्मांध विचारांच्या पक्षाची ताकद वाढली आहे. फसवणूक करणाऱ्या घोषणा, जुमलेबाजी करून हे सरकार सत्तेत आलं. मात्र पाच वर्षांत त्यांनी काहीच केलं नाही. आज संविधान धोक्यात आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठीच आम्ही एकत्र येत आहोत,” असं अशोक चव्हाण, जयंत पाटील यांनी सांगितलं.
देशाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देतात हा दुटप्पीपणा आहे. मोदींचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. या दुटप्पी लोकांना जनता धडा शिकवेल. भाजप सरकारनं शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही. आघाडीचं सरकार आलं, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम मिळावी असा आम्ही प्रयत्न करू. अनेक कामगार, शेतकरी, सामाजिक संघटनांनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभेत महाआघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून जातील याची खात्री आहे, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
विखेंची पत्रकार परिषदेला दांडी
संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारल्याचं दिसलं. मुलगा सुजय भाजपमध्ये गेल्यापासून विखेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर येणं टाळलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांत माझ्याबाबत अविश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात मीच त्यांच्यापासून दूर राहीन. नगरमध्ये मी माझ्या मुलाचा तसंच महाआघाडीचाही प्रचार करणार नाही, असं विखेंनी म्हटलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून विखेंनी नगरमध्ये तळ ठोकला असून, मुलाच्या प्रचारासाठी ते गुपचूप बैठका घेत असल्याचं समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाआघाडीत बिघाडी तर निर्माण होणार नाही ना, असा प्रश्न आतापासूनच पडायला लागला आहे. भाजप-सेना विरोधात सर्व समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र यावं म्हणून गेल्या जूनमध्ये कर्नाटक विधानसभा निकालानंतर प्रयत्न सुरू झाले होते. सहा महिने वाटाघाटीनंतर अखेरीस संयुक्त पुरोगामी महाआघाडी अस्तित्वात आली.
विशेष म्हणजे या महाआघाडीत राज्यातील काही राजकीय पक्ष सहभागी झालेले नाहीत. उदा. बसप, सप, वंचित बहुजन आघाडी, जद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती आघाडी. महाआघाडीचं आव्हान भाजप-शिवसेना युती पेलेलं काय, हे निवडणूक निकालानंतरच कळेल. सध्या तरी या युतीसमोर या महायुतीचं आव्हान राहणार हे मात्र निश्चितच!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment