अजूनकाही
चलनातून पाचशे नि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत 'कॅशलेस' अर्थव्यवस्था हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेचा नागरिकांच्या अर्थव्यवहारावर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत; परंतु अशा प्रकारची व्यवस्था सामाजिक पातळीवर काही बदल घडवू शकेल का, हे पाहणेही आवश्यक ठरेल. हा मुद्दा उपस्थित करण्याला ऐतिहासिक आधार आहेत आणि इथे त्यातील एका पैलूचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे.
जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसित होऊ लागली, तसतशी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपलीकडे माणसाच्या गरजांची संख्या वाढू लागली. स्वतःच्या गरजेच्या सर्वच वस्तू स्वतः निर्माण करण्याऐवजी एकेका उत्पादनाची जबाबदारी एका व्यक्तीला वा समूहाला देऊन त्या वस्तूंची गरजेनुसार देवाणघेवाण करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. एकच व्यक्ती वा समूह एकाच प्रकारचे उत्पादन वारंवार घेत राहिल्याने उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आणि उत्पादनासाठी आवश्यक कालावधी कमी होत गेला. अशा तऱ्हेने सुरू झालेला वस्तु-विनिमय हाच सहजीवनाचा आधार बनला. प्राचीन काळापासून सुरू झालेली वस्तु-विनिमयाची ही पद्धत भारतात अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत चालू होती.
भारताचे ग्रामीण अर्थकारण संपूर्णपणे या वस्तु-विनिमय पद्धतीवर आधारित होते. गावातील दैनंदिन व्यवहारांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध वस्तू बनवण्याचे काम बलुतेदारी व्यवस्थेनुसार ठरलेले असे. या बलुतेदारांना दोन्ही हंगामांनंतर वर्षभराचे बलुते देऊन त्यांच्याकडून वर्षभराची सेवा घेतली जात असे. विशिष्ट वस्तूचे उत्पादन हा हळूहळू त्या-त्या गटांचा पारंपरिक, वंशपरंपरागत व्यवसाय बनला. यालाच आपण बलुतेदारी पद्धत म्हणतो. या बलुतेदारीला सामाजिक चौकटीत घट्ट बसवत जातिव्यवस्थेचा जन्म झाला. ग्रामीण अर्थकारण आणि प्रशासनाची सखोल माहिती देणाऱ्या त्रिं. ना. आत्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथात बलुतेदारी पद्धतीच्या कार्यान्वयनाविषयी खूप विस्ताराने वर्णन आले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जगातील सर्वच प्राचीन संस्कृतींमधील अर्थकारण हे मुळात शेतीवर आधारित असल्यामुळे वस्तु-विनिमयातील प्रमुख वस्तू म्हणजे शेतमाल आणि पाळीव जनावरे यांचा समावेश होत असे. निव्वळ देवाण-घेवाणीपलीकडील व्यवहारदेखील वस्तूंच्या स्वरूपात पुरे केले जात. अगदी दान किंवा दंड यांसारख्या एकतर्फी क्रियांची पूर्तीदेखील वस्तु-स्वरूपात केली जात असे. रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथांत द्रव्यदान आणि द्रव्यदंड यांचा येणारा उल्लेख मुळात वस्तु-स्वरूपातील दान आणि दंड या अर्थाचाच आहे. ‘अमुक व्यक्तीला १०० गाई देण्याचा दंड ठोठावण्यात आला’ किंवा ‘अमुक ब्राह्मणाला १०० गाई दान दिल्या’, अशा प्रकारचे उल्लेख पुराणातदेखील सापडतात.
पुढे विनिमय-व्यवहाराची व्याप्ती वाढल्यानंतरही व्यवहारात आवश्यक वस्तू खरेदी करताना दुकानदाराला धान्य देऊन या वस्तूंची खरेदी केली जात असे. आठवडी बाजाराच्या दिवशी ‘फडी’वर धान्य घालून थोडेफार पैसे घेतले जात असत आणि त्या पैशांमधून बाजारातील विविध वस्तूंची खरेदी केली जात असे. म्हणजे आठवडी बाजारात धान्य घेऊन गेलेली व्यक्ती वस्तू घेऊन परत येत असे.
विकासाच्या प्रक्रियेत समाजजीवन बदलले, तशा गरजा बदलल्या, वाढल्या आणि परिणामी, विनिमयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. या संख्यात्मक वाढीमुळे वस्तू-विनिमय-व्यवहार खूप अडचणीचा होऊन बसला. सर्वच वस्तूंना एकाच मापाने मोजता यावे, यासाठी चलनाचा शोध लागला. माणिक, मोती, शंख, शिंपले, कवडी यांचा वापर चलन म्हणून केला जाऊ लागला. पुढे या वस्तूंची उपलब्धता आणि टिकाऊपणा या दोन गोष्टींबाबत येणाऱ्या अडचणींमुळे पर्यायाचा शोध सुरू झाला आणि धातूंची नाणी तयार करण्यात आली. चलनाचा वापर सुरू झाल्यानंतरही वस्तु-विनिमयाची पद्धत अनेक कारणांनी सुरूच राहिली; चलन अत्यल्प प्रमाणात आणि समाजातील ठरावीक लोकांपुरतेच मर्यादित होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
प्राचीन भारतात मौर्य काळापासून सर्वसामान्य लोकांनी चलन मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात झाली. याच कालखंडात वर्णाश्रम व्यवस्थेवर आघात करून जन्मजात श्रेष्ठत्वाला विरोध करणारे जैन आणि बौद्ध यांसारखे धर्मसंप्रदाय समाजात स्थिरावले. पुढील कालखंडात, सातवाहन, गुप्त, कुशाण, शक आदी राजवटींच्या काळात व्यापार-उदीम वाढीस लागला आणि चलन-विनिमय-व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली; वस्तू-विनिमय कमी झाला. उत्पादने आणि सेवा यांचा मोबदला चलनाच्या स्वरूपात दिला जाऊ लागल्यामुळे जन्मदत्त रोजगाराखेरीज अन्य रोजगार स्वीकारणे शक्य होऊ लागले. यातून जन्मदत्त रोजगाराशी बांधून घातलेल्या जातिव्यवस्थेवर आघात होण्यास सुरुवात झाली.
चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य ही तिन्ही कामे वैश्य वर्णीयांची होती आणि बदललेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत संपत्ती मिळवण्याची हीच प्रमुख साधने होती. चलन-पद्धतीत झालेल्या क्रांतीमुळे आणि वाढलेल्या व्यापारामुळे प्राचीन भारतातील सर्व समाज वैश्य वर्णीयांची कामे करू लागला! याचा फायदा शूद्र समाजालादेखील झाला, कारण बदललेल्या अर्थकारणात मनुष्यबळाची प्रचंड मोठी आवश्यकता होती. व्यापारासाठी आवश्यक त्या उत्पादनाच्या वेगवान आणि मोठ्या प्रमाणातील निर्मितीसाठी कामगारांच्या श्रेणी निर्माण झाल्या असल्याचा संदर्भ ए. एस. अळतेकर यांनी त्यांच्या ‘स्टेट अँड गव्हर्नमेंट इन एन्शन्ट इंडिया’ या ग्रंथात नमूद केला आहे. असे असले, तरी व्यवस्थेच्या ठेकेदारांनी 'शूद्रांना धनसंचयाचा अधिकार नसल्याचा' नियम ताबडतोब घालून देऊन शूद्रांसाठी चलनाने उघडलेली दारे पुन्हा बंद करून टाकली.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
प्राचीन भारतीय इतिहासातील व्यापारी संस्कृतीचा हा उर्जित काळ सहाव्या-सातव्या शतकापर्यंतच राहिला. हर्षवर्धन हा शेवटचा मोठा सम्राट; त्यानंतर एकही मोठे आणि स्थैर्य असणारे साम्राज्य निर्माण झाले नाही. व्यापाराला राजाश्रय देणारी राजघराणी संपुष्टात आल्यामुळे व्यापार उद्ध्वस्त झाला. परिणामी, चलन-व्यवस्था अविश्वासार्ह ठरत पुन्हा वस्तु-विनिमयाला सुरुवात झाली. याचा परिणाम जातिव्यवस्था पुन्हा बळकट होण्यामध्ये झाल्याचे दिसून येते. या देशात सहाव्या आणि सातव्या शतकात काय घडले असेल, तर केवळ तत्त्वचिंतकांच्या चर्चा आणि वेदान्त, द्वैती, अद्वैती यांच्यातील मतमतांतराचे खंडन आणि मंडन! याच पार्श्वभूमीवर आदि शंकराचार्यांनी सनातन वैदिक वर्णाश्रमधर्माची पुनर्मांडणी केली. त्यातून पुन्हा श्रौतस्मार्त परंपरांतून वर्णव्यवस्था बळकट झाली.
ती नष्ट होण्याची सुरुवात काही प्रमाणात शिवाजी महाराजांच्या आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली! भारतीय चलन-व्यवस्थेचे एकीकरण करून ब्रिटिशांनी त्यात एकरूपता आणली आणि सेवेचा मोबदला रोख स्वरूपात दिला जाऊ लागला. पूर्वीच्या व्यवस्थेत धनसंचयाचा अधिकारच नाकारल्या गेलेल्या शूद्र समाजाला या चलनाच्या माध्यमातून धनसंचय करणे शक्य होऊ लागले. समाजातील उपेक्षित असणारा दलित समाज ब्रिटिशांच्या काळात मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या सैन्यात भारती झाला आणि त्यातून मिळणाऱ्या रोख रकमेच्या स्वरूपातील वेतनामुळे त्याचे सामाजिक परावलंबित्व संपुष्टात आले. यातून जातिव्यवस्थेला व्यवस्थेला पुन्हा एकवार हादरे बसू लागले. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी गावकी सोडण्याचा आग्रह धरण्याचे कारण 'ग्रामीण अर्थकारण हे पूर्णतः जातिव्यवस्थेवर आधारित असणे', हेच होते. बलुतेदारीची ही पद्धत देशात अगदी १९७२च्या दुष्काळापर्यंत अस्तित्वात होती. दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील दलित समाजाचे मोठ्या प्रमाणात शहरांकडे स्थलांतर झाले आणि नंतर ही व्यवस्था मोडकळीस येत गेली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
आज नव्याने उभ्या राहू पाहत असलेल्या कॅशलेस व्यवस्थेने पूर्वी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेच्या अशा अनुषंगांचा विचार अवश्य करायला हवा. त्या व्यवस्थेतून एक शोषणप्रधान सामाजिक चौकट तयार झाली होती. आजच्या व्यवस्थेने वेगळ्या स्वरूपात अशीच एखादी सामाजिक व्यवस्था निर्माण करू नये, याचे भान आपण साऱ्यांनी राखायला हवे आहे. अर्थात, पुन्हा ऐतिहासिक बलुतेदारी पद्धत येईल, असा याचा अर्थ नाही. कारण आज इंटरनेटच्या जमान्यात संकल्पना पातळीवर चलन अस्तित्वात राहून पूर्वी 'कागदोपत्री' म्हणत तसे व्यवहार होऊ शकतातच. जोवर व्यवस्था मजबूत असते, तोवर चलन धातूचे आहे, चामड्याचे आहे की व्हर्च्युअल आहे याला फार महत्त्व नसते. ती व्यवस्था त्या चलनाला जामीन असते; परंतु एकामागून एक तुघलकी निर्णय घेतल्याने जर व्यवस्थाच डळमळीत झाली, तर मात्र प्रगतीचे काटे उलट दिशेने फिरू शकतात. हे होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी.
.................................................................................................................................................................
डॉ. मंदार काळे - ramataram@gmail.com
अॅड.राज कुलकर्णी - rajkulkarniji@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Mon , 19 December 2016
A new approach.