अजूनकाही
छंद म्हणून जोपसलेला एखादा खेळ आयुष्याचं ध्येय होऊन जातो. मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते. प्रसंगी कित्येकदा मान-अपमानाचे कडू घोट पचवावे लागतात. एका टप्प्यानंतर जिद्दीनं ध्येय गाठलं जातं. या संपूर्ण प्रवासात प्रामाणिकपणा आणि मेहनत या दोन मूलभूत गोष्टीची साथ लागते. तरचं ध्येयप्राप्तीचं समाधान व्यक्त करता येतं, अन्यथा मिळालेली समृद्धी आयुष्यभर मनाला कोसत राहते. स्वप्न कुठलीही असो, त्यासाठी संघर्षाची तयारी असावी लागते, मात्र त्याचबरोबर संघर्षातून मिळालेला विजय त्याच्या वाटेवरचा असावा लागतो. त्या विजयात आणि पराभवातही नैतिकता असावी लागते. म्हणजे त्याचं आत्मिक सुख उपभोगता येतं. मग भलेही त्यास त्याच्या वाटेवर पराभव स्वीकारावा लागला तरी बेहत्तर.
दर्जेदार कथा आणि त्यासोबत एखाद्या विषयाच्या मुळाशी हात घालता येण्याचं कौशल्य दिग्दर्शकाच्या अंगी असेल तर सिनेमा बहरत जातो. उत्तम दिग्दर्शन आणि अप्रतिम अभिनय यांच्या समतोल मिश्रणातून तयार झालेलं रसायन म्हणजे ‘सूर सपाटा’ हा सिनेमा. या सिनेमाचं दिग्दर्शक आहेत मंगेश कंठाळे.
सिनेमाची कथा कबड्डी या खेळाभोवती फिरते. मातीतला खेळ म्हणून कबड्डीकडे पाहिलं जातं. पण बदलत्या काळानूसार खेळ संस्कृती हळूहळू नामशेष होत आहे. महाराष्ट्रात हा खेळ शालेय स्तरावर खेळला जात असला तरी त्याची ‘अस्सल मातीतला खेळ’ अशी ओळख पुसली जात आहे. खेळाचं स्वरूप बदलत आहे. अंगावर शहारे आणणारा खेळ मागे पडून मानवी विकृतपणा त्यात हस्तक्षेप करत आहे. दिग्दर्शकानं हेच हेरून अचूक पद्धतीनं त्याला कथेत गुंफलं. आणि त्याचा प्रेक्षणीय सिनेमा बनू शकतो, हे सिद्ध केलं. विषयाचं गांभीर्य लक्षात येऊ शकतं इतका सुरेख सिनेमा कंठाळे यांनी रंगतदार पद्धतीनं बनवला आहे.
मुळात एखाद्या खेळाला सिनेमाचा केंद्रबिंदू करून त्याच्या परिघावर फिरणारी कथा हा मराठी सिनेमात नवा प्रयोग आहे. अशा विषयांवर सिनेमा तयार करणं हे जिकिरीचं काम असतं. प्रेक्षकांची आवड आणि सिनेमाचं एकूण आर्थिक गणित यांचा मेळ घालून सिनेमा तयार केला जातो. शक्यतो ‘रिस्क’ घेतली जात नाही. मात्र ‘सूर सपाटा’ या सिनेमाच्या दिग्दर्शकानं हे आव्हान स्वीकारल्याचं दिसतं. म्हणूनच दिग्दर्शकानं घेतलेली मेहनत पडद्यावर प्रभावीपणे उमटून दिसते.
अभिनय आणि संवाद यांचा सुरेख मिलाफ सिनेमाच्या कथेबद्दलची उत्सुकता कमी होऊ देत नाही. कथा, अभिनय, दिग्दर्शन, संवाद, संगीत, तंत्रज्ञान या पाचही पातळीवर सिनेमा कौतुकास्पद ठरतो. सिनेमाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग सिनेमाला लयबद्ध ठेवतात. पूर्वार्धात सिनेमा कथेची एकूण जाणीव करून देतो. त्यासाठी विनोदी संवादाचा पुरेपूर उपयोग केला आहे. तर उत्तरार्धात सिनेमा गंभीर आणि भावनिक पातळीवर चांगलाच प्रभावी ठरतो.
सिनेमाची कथा गावातल्या शाळेपासून सुरू होते. उनाडक्या करत फिरणारी सात पोरं आणि त्यांना वैतागलेले शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय. मुलांनी अभ्यास करावा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हावं अशी दोन्ही पातळीवर अपेक्षा. या सात मुलांना अभ्यासात रस नाही, मात्र कबड्डी या खेळावर जिवापाड प्रेम. शाळेत गैरहजर राहून कबड्डी खेळणारी ही मुलं. एक दिवस राज्यस्तरीय कबड्डी खेळण्यासाठी शाळेचे विद्यार्थी पाठवा म्हणून शाळेत पत्र येतं. तिथून पुढे सिनेमाची रंगतदार कथा बहरत जाते. दोन पिढीतलं अंतर, आदर आणि निष्ठा यांची सिनेमात केलेली मांडणी सिनेमाला पुढे घेऊन जाते.
उपेंद्र लिमये, गोविंद नामदेव, प्रवीण तरडे, आनंद इंगळे यांनी उत्तम अभिनय केला आहे. उपेंद्र लिमये यांचा तगडा अभिनय आणि गोविंद नामदेव यांची मराठी सिनेसृष्टीतली झलक सिनेमाला उंची देते. संजय जाधव आणि भारत गणेशपुरे यांच्या छोच्या भूमिका प्रभावी ठरतात. चिन्मय संत, यश कुलकर्णी, जीवन कळरकर, हंसराज जगताप, चिन्मय पटवर्धन, रूपेश बाणे, सुयश शिरके आणि शरयु सोनवणे या उगवत्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाद्वारे सिनेमाला उंची प्राप्त करून दिली आहे. सिनेमा एका बाजूला प्रेक्षकांना विनोदाच्या जोरावर खिळून ठेवतो, तर दुसऱ्या बाजूला मैत्री, नाती, आदर, प्रामाणिकपणा, जिद्द यांचं आयुष्यातलं महत्त्व अधोरेखित करतो.
आयुष्यात आलेल्या सुख-दुःखाला कवटाळून बसायचं नसतं. अडचणीशी प्रामाणिकपणे संघर्ष करायचा. संकटापासून भिऊन मागे सरायचं नाही. आणि व्यक्तिगत पातळीवरची नैतिकता सोडायची नाही, या चतु:सुत्रीला खेळाच्या मैदानातून दिग्दर्शकानं सुरेखपणे गुंफलं आहे. कबड्डीच्या मैदानातून मारलेला ‘सूर’ आणि मनोरंजनाच्या तळाशी असलेली मनमोहकता प्रेक्षकांना खिळून ठेवते.
मराठी सिनेसृष्टीत असे सिनेमे तयार होणं, ही काळाची गरज आहे. खेळ हा मैदानापुरता सिमित नसतो तर तो खेळ खेळणाऱ्याच्या आयुष्याचा भाग बनलेला असतो. असाच खेळ दिग्दर्शक मंगेश कंठाळे यांनी सिनेमाद्वारे उत्कृष्ट पद्धतीनं खेळला आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment