‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत. 
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
  • ‘तोत्तोचान’चं मराठी व इंग्रजी मुखपृष्ठ
  • Fri , 22 March 2019
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो तोत्तोचान Tottochan तेत्सुको कुरोयानागी Tetsuko Kuroyanagi

‘तोत्तोचान’ हे प्रचंड गाजलेलं आणि जगातील बहुतेक भाषेत अनुवादित झालेलं जपानी पुस्तक. तेत्सुको कुरोयानागी या जपानमधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार महिलेनं ते लिहिलं. म्हटलं तर ते तिच्या बालपणीचं अनुभवविश्व. या अनुभवविश्वाच्या माध्यमातूनच ती तोमोईची गोष्ट सांगते. तोत्तोचान ही तोमोई स्कुलची विद्यार्थिनी. ‘तोत्तोचान’ हे नॉन फिक्शन पात्र आहे. आणि तीच तोत्तोचान पुढे तेत्सुको कुरोयानांगी या नावानं ओळखली जाऊ लागली. ‘तोत्तोचान’ने सांगितलेल्या गोष्टींमुळे तोमोई मला आवडायला लागली.

सोसाकु कोबायाशी यांनी तोमोई ही शाळा १९३७ ला सुरू केली. कोबायाशी हे जपानी शिक्षणतज्ज्ञ होते. शिवाय तोमोईचे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. मुलांची वाढ ही स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतानता व्हावी यासाठी ते आग्रही असत. तोमोई ही प्रचंड आगळीवेगळी शाळा होती. कोबायाशी यांचा प्रयोगात्मक - सृजनात्मक शिक्षण पद्धतीवर भर होता. औपचारिक शिक्षणाबरोबरच ते अनौपचारिक शिक्षणावर भर देऊ लागले. मुळात, औपचारिक शिक्षण हे अनौपचारिक पद्धतीनं दिलं जाऊ लागलं. कोबायाशी यांनी उणीपुरी सात वर्षं ही शाळा चालवली. मात्र १९४५ च्या युद्धात तोमोई आगीत जळून गेली. इतकं कमी आयुष्य या शाळेला लाभलं. कोबायशी यांनी नव्यानं शाळेची उभारणी करण्यास सुरुवात केली. नंतरच्या काही वर्षांतच कोबायाशीच निधन झालं.

कोबायशी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी एका प्राथमिक शाळेत नोकरी केली. संगीताची आवड असल्यामुळे त्यांनी तिथंही आपली संगीत साधना चालू ठेवली. नंतर त्यांना जपानमधील सर्वोत्कृष्ट संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आता हेच संगीत विद्यालय ‘तोक्यो युनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्स अँड म्युझिक’ या नावानं ओळखलं जातं. संगीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका संगीत विद्यालय संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. कोबायाशी जिथं संगीत शिक्षकाची नोकरी करायचे, ते हारुजी नाकामुरांनी स्थापन केलेलं संगीत विद्यालय होतं. या संगीत विद्यालयाची शिक्षण खूप प्रचंड वेगळी होती. त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मुक्त असे. या शाळेतील या विद्यार्थी त्यांना जे आवडायचं तेच करायचे. प्राथमिक शिक्षणाचा टप्पा हा मुलांच्या आयुष्यात पायाभरणी करत असतो. त्यामुळे हा टप्पा फार महत्त्वाचा असतो, या हारुजी यांच्या प्राथमिक शिक्षणविषयक विचारामुळे कोबायाशी प्रभावित झालेत. तोमोईसाठी त्यांनी हीच शिक्षण पद्धती वापरली. 

तोत्तोचानने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत. सोसाकू कोबायाशी  यांनी अतिशय विचार करून तोमोईचे उपक्रम आखले होते. त्यांचा प्रत्येक प्रयत्न मुलांचं अनुभवविश्व समृद्ध करत असे. प्रत्येक गोष्टीतून मुलांना नवं काहीतरी मिळे. त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करे. ‘समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरच काहीतरी’ या गोष्टी तोत्तोचान सांगते की, कोबायाशी जेव्हा हा वाक्प्रचार वापरायचे, तेव्हा सुरुवातीला त्याचा अर्थ तिला उमगला नव्हता. मात्र नंतर मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे बघायचे, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, आहारात भाताशिवाय इतरही पदार्थ असावेत, यासाठी मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार तयार केला. समुद्रातील काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी आणि डोंगरावरचं म्हणजे भाज्या, मास, अंडी वगैरे.  कोबायाशी मुलांच्या चौरस आहाराला देखील महत्त्व द्यायचे. 

‘बत्तीस वेळा चावून खावा’ हे तोमोईमध्ये जेवताना म्हणायचं गाणं. ते असं- 

बत्तीस वेळा चावून खावा 

प्रत्येक घास जेवताना 

हसत मुखाने नेहमी खावा

प्रत्येक खाऊ खाताना 

भात असो वा मासे 

किंवा अंड्याची पोळी खाताना            

बत्तीस वेळा चावून खावा 

प्रत्येक घास जेवतांना 

तोत्तोचान सांगते, शाळा सोडल्यानंतरही कित्येक वर्षं आम्हाला वाटायचं की, जेवणाआधी म्हणायचं हे गाणं आहे. मात्र कोबायाशी कायम  सावकाश जेवण्यासाठी सांगत. एक घास बत्तीस वेळा मुलांनी चावावा, याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी स्वतः हे गाणं रचलं होतं.

‘सगळ्यात खराब कपडे’ या कथेत तोत्तोचान सांगते की, कपडे मळण्याच्या किंवा फाटण्याच्या भीतीनं मुलांनी मोकळेपणानं न खेळणं हे त्यांना लज्जास्पद वाटायचं. मुलांनी मुलांसारखं असावं आणि त्यांनी विनाकारण काळज्या करू नयेत, असं त्यांना वाटे. म्हणून ते पालकांना म्हणत, मुलांना शाळेत पाठवताना सगळ्यात खराब कपडे घालत जा. मुलांचं निरागस बालपण ओरबडून जाऊ नये, हा त्यांचा विचार खरंच खूप महत्त्वाचा आहे. मात्र आज आपल्याकडे शाळेत गणवेश नाही म्हणून मुलांना शिक्षा दिली जाते. याचा अर्थ असाही नाही की, गणवेश नसावा. मात्र नियम-शिस्त यांच्या कचाट्यात मुलांचं बालपण हिरावलं जाऊ नये इतकंच!

या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट ही तोमोईच्या मुख्याध्यापकांचा - कोबायाशी यांचा नवा प्रयोग होता. तो फसला नव्हता. कारण त्यामागे एक समृद्ध विचार होता. तोत्तोचान  सांगते, ‘तू खरोखर चांगली मुलगी आहेस’ या एका वाक्यानं तिच्या आयुष्याला नवा अर्थ आला. तोमोई स्कुलला येण्याआधी ती ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेतून तिला काढून टाकलं होतं. ‘मी जर तोमोईत गेले नसते तर मला शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी म्हणून शिक्का बसला असता’.  मात्र तोमोईच्या मुख्याध्यापकांच्या शब्दांनी तोत्तोचानचं आयुष्य बदललं. कोबायाशी यांनी तोत्तोचानला बळ दिलं, विश्वास दिला.  

तोमोईतील अभ्यास, शाळेतलं गाणं, पोहण्याचा तलाव, प्रगती पुस्तक, उन्हाळी सुट्ट्या, अपूर्व साहस, धीटपणाची परीक्षा, तोत्तोचान सांगितलेल्या या गोष्टी मला आवडल्या आणि तोमोईच्या मुख्याध्यापकांची शिक्षणाची त्यांची पद्धतीही आवडली. तोत्तोचान मला पुस्तकात भेटली. मी तोमोई स्कुलचा विद्यार्थी नाही, याची मला खंत आहे. तोमोईत शिकायला आणि तोत्तोचानशी मैत्री करायला मला नक्की आवडलं असतं!

प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. सृजनात्मक शिक्षण कसं असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तोमोई स्कुलचा तोमोई पॅटर्न! आपल्याकडे कार्यानुभव असा एक तास असतो. दुर्दैव हे की, आपले शिक्षक, विद्यार्थी हे सगळे तो तास ‘टिवल्याबावल्या’ करायचा तास म्हणून बघतो! असो.

मॉन्टेसरी ही अशीच एक शिक्षण पद्धती, म्हणजे मुलांच्या नैसर्गिक वाढीला महत्त्व देणारी शिक्षण पद्धती. मात्र या पद्धतीचं भारतीय स्वरूप प्रचंड वेगळं आहे. अभ्यास एके अभ्यास,  परीक्षा, ट्युशन असं काहीतरी आणि या गराड्यात पालक मुलांना झोकून देतात.  मात्र या गोष्टींचं मुलांना दडपण येत असेल याचा आपण जराही विचार करत नाही. परवा ‘तोत्तोचान’ या पुस्तकासंदर्भात प्राथमिक शिक्षिका असलेल्या विदर्भातील एका शिक्षिकेशी बोलत होतो. त्या सांगत होत्या- “खरंच किती चुकीची शिक्षण पद्धती आहे आपली! शिवाय आमच्या शाळेत तर शनिवारी श्लोकदेखील म्हणून घेण्यात येतात.”

भारतीय शिक्षण पद्धतीत परीक्षेला फार महत्त्व आहे. परीक्षेचं ओझं मुलांचं बालपण हिरावून घेतं. प्राथमिक शिक्षका जसं सांगत होत्या, तसंच शिक्षणाच्या भगवीकरणाचा मोठा प्रयत्न या पाचेक वर्षांत झाला आहे. भविष्यात माझ्या चिमुकल्याला मी कुठल्या शाळेत घालावं, हा प्रश्न मला सतावत आहे. आहे का एखादी माणुसकीची शाळा, जिथं कुठल्याही धार्मिक गोष्टी माझ्या मुलाच्या मनात रुजवल्या जाणार नाहीत, परीक्षा पद्धतीपेक्षा मुलांच्या चौकस बुद्धीला महत्त्व दिलं जाईल, विषयाच्या मुळात जाण्याची उत्सुकता निर्माण केली जाईल आणि त्याच्या नैसर्गिक वाढीला महत्त्व देईल? मी आत्तापासूनच माझ्या चिमुकल्यासाठी तोमोई शोधतोय!

.............................................................................................................................................

‘तोत्तोचान’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/3379/Tottochan

.............................................................................................................................................

कबीर उषा लक्ष्मण बोबडे

kabirbobade09@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 March 2019

काय हो कबीर उषा लक्ष्मण बोबडे, एव्हढं का हो तुमचं धर्माशी वाकडं? मेकॉलेछाप शिक्षणपद्धतीचा निषेध करण्यासाठी सुद्धा तुम्हाला धर्म मध्ये आणावासा वाटतो. यावरून धर्माचं सर्वव्यापकत्व अधोरेखित होत आहे. मग उगीच धर्माला नावं कशाला ठेवताय? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......