‘जेल नोटबुक’ :  भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा
संकीर्ण - श्रद्धांजली
कल्पना पांडे
  • भगतसिंग आणि त्यांच्या ‘जेल नोटबुक’चं मुखपृष्ठ
  • Fri , 22 March 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली भगतसिंग Bhagat Singh जेल नोटबुक Jail Notebook

आज २३ मार्च. ‘शहीद दिन’. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आजच्या दिवशी तत्कालिन ब्रिटिश सरकारनं फाशी दिली. खरं तर २४ मार्च हा दिवस ठरला होता, पण भारतीय जनतेमध्ये या घटनेमुळे उठणाऱ्या संभाव्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन २३ मार्च १९३१ रोजीच त्यांनी फाशी दिली. म्हणून २३ मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

.............................................................................................................................................

भगतसिंग आणि त्यांच्या सुखदेव, राजगुरू या साथीदारांच्या शहीद दिनानिमित्त भगतसिंगाच्या ‘‘जेल नोटबुक’विषयी जाणून घेऊया.

‘जेल नोटबुक’ ही शाळेच्या वहीच्या आकाराची नोंदवही १२ सप्टेंबर १९२९ रोजी जेल अधिकाऱ्यांकडून भगतसिंगांना ‘भगतसिंगसाठी ४०४ पानं’ असं लिहून देण्यात आली. या वहीत भगतसिंगांनी १०८ लेखकांच्या ४३ पुस्तकांतून घेतलेली टिपणे आहेत. ज्यात कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स आणि लेनिन प्रामुख्याने आहेत. इतिहास, दर्शनशास्त्र आणि अर्थशास्त्रावर त्यांनी अनेक टिपणे लिहिली आहेत. ‘वसाहतवादाविरुद्ध संघर्ष’ या विषयाबरोबरच त्यांचं लक्ष समाजाच्या विकासाशी संलग्न सामान्य प्रश्नांकडे होतं. त्यांनी पाश्चिमात्य विचारवंतांचं लेखन वाचण्याकडे बरंच लक्ष दिलं. भगतसिंग राष्ट्रवादी संकीर्णतेच्या पलीकडे जाऊन जागतिक अनुभवांतून आधुनिकतेच्या पद्धतीनं प्रश्न सोडवण्याच्या बाजूचे होते. ही वैश्विक दृष्टी त्या काळच्या महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा मोजक्याच नेत्यांकडे होती.

१९६८ मध्ये भारतीय इतिहासकार जी. देवल यांनी भगतसिंगचे बंधू कुलबीरसिंग यांच्याकडे ‘जेल नोटबुक’ची मूळप्रत पाहिली होती. त्यावरून त्यांनी टिपा घेऊन ‘पीपल्स पाथ’ नावाच्या एका पत्रिकेत भगतसिंगांवर एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये जी. देवल यांनी भांडवलशाही, समाजवाद, राज्याची उत्पत्ती, मार्क्सवाद, साम्यवाद, धर्म, दर्शन, क्रांतींचा इतिहास आदी विषयांवर अनेक पुस्तकं वाचून भगतसिंगांनी टिपणं काढल्याचं लिहिलं होतं. जी. देवल यांनी ही वही प्रकाशित करावी असं मतही व्यक्त केलं होतं, परंतु तसं काही झालं नाही. १९७७ साली रशियन विद्वान एल. व्ही. मित्रोखोव यांना या डायरीची माहिती मिळाल्यावर त्यांनी कुलबीरसिंग यांच्याकडून माहिती घेऊन त्यावर एक लेख लिहिला. ज्याचा समावेश पुढे त्यांच्या ‘लेनिन अँड इंडिया’ (१९८१) या पुस्तकात एक प्रकरण करण्यात आला. १९९० साली मास्कोच्या प्रगती प्रकाशनानं हेच पुस्तक ‘लेनिन और भारत’ या नावानं हिंदीत प्रकाशित केलं.

दुसरीकडे गुरुकुल कांगडीचे तत्कालीन कुलगुरू जी.बी. कुमार हूजा १९८१ साली दिल्ली जवळच्या तुकलगाबाद येथील गुरुकुल इंद्रप्रस्थच्या दौऱ्यावर गेले. तेथील अधिष्ठाता शक्तीवेश यांनी गुरुकुलच्या तळघरात ठेवलेले ऐतिहासिक दस्तऐवज त्यांना दाखवले. त्यातील भगतसिंगांच्या ‘जेल नोटबुक’ची एक प्रतिलिपी जी.बी. कुमार हूजा यांनी काही दिवसांसाठी मागून घेतली. मात्र काही दिवसांनी शक्तीवेश यांची हत्या झाल्यानं ती प्रत त्यांना परत करता आली नाही. १९८९ मध्ये २३ मार्च ‘शहीद दिना’निमित्त काही लोकांनी हिंदुस्तानी मंचाच्या काही बैठका केल्या. त्या बैठकीसाठी जी.बी. कुमार हूजा गेले होते. तिथं त्यांनी भगतसिंगांच्या ‘जेल नोटबुक’ची माहिती दिली. प्रभावित होऊन ‘हिंदुस्तानी मंच’नं ती प्रकाशित करण्याचा निर्णय जाहीर केला. ‘इंडियन बुक क्रॉनिकल’ (जयपूर) या पत्रिकेचे संपादक भूपेंद्र हुजा यांना ही जबाबदारी देण्यात आली आणि हिंदुस्तानी मंचाचे सरचिटणीस सरदार ओबेरॉय, प्रा.आर.पी. भटनागर आणि डॉ आर.सी. भारतीय यांनी त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलं. परंतु आर्थिक अडचणीमुळे ते छापलं गेलं नाही, असं सांगितलं जातं.

याच दरम्यान डॉ. प्रकाश चतुर्वेदी यांनी मॉस्को अभिलेखागारातून एक टंकलिखित फोटोकॉपी करवून घेऊन डॉ आर.सी. भारतीय यांना दाखवली. मॉस्कोतली प्रत आणि गुरुकुल इंद्रप्रस्थच्या तळघरातली हस्तलिखित प्रतिलिपी शब्दशः सारखी आढळून आली. १९९१ साली भूपेंद्र हूजा यांनी ‘इंडियन बुक क्रॉनिकल’मध्ये या नोंदवहीचे अंश छापायला सुरुवात केली. त्यामुळे या मासिक पत्रिकेतून पहिल्यांदा शहीद भगतसिंग यांची ‘जेल नोटबुक’ वाचकांपर्यंत पोहोचली. याच्याच जोडीला प्रा. चमनलाल यांनी दिल्लीच्या नेहरू संग्राहालयात अशीच एक प्रतिलिपी पाहिल्याचे हुजा यांना कळवले. १९९४ साली पहिल्यांदा ही ‘जेल नोटबुक’ भूपेंद्र हूजा आणि जी.बी. हुजा यांनी लिहिलेल्या भूमिकेसह ‘इंडियन बुक क्रॉनिकल’कडून पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली. या दोघांना याची कल्पना नव्हती की, या पुस्तकाची मूळ प्रत भगतसिंगांचे भाऊ कुलबीरसिंग यांच्याकडे आहे. त्यांना जी. देवल यांचा लेख (१९६८) आणि मित्रोखिन यांच्या पुस्तकाची (१९८१) देखील माहिती नव्हती.      

तिसरीकडे भगतसिंगांची बहीण बिवी अमर कौर यांचे पुत्र डॉ. जगमोहनसिंग यांनीदेखील या ‘जेल नोटबुक’चा उल्ल्ख केला नाही. त्यांचे दुसरे भाऊ कुलतारसिंग यांच्या वीरेंद्र संधू या मुलीनं भगतसिंग यांच्यावर दोन पुस्तकं लिहिली. त्यात देखील या नोंदवहीचा उल्लेख नाही. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांना या वहीची माहिती नव्हती किंवा त्यात रस नव्हता अशी शक्यता दिसते. कुलबीरसिंग यांच्याकडे भगतसिंगांची नोंदवही असून ती त्यांनी इतिहासकारांना दाखवून, पुस्तकाच्या स्वरूपात किंवा वृत्तपत्रात प्रकशित करण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली नव्हती की, त्यांना ते स्वतः छापून आणणं शक्य झालं नसतं. भारतीय इतिहासकारांची अनास्था म्हणावी की, हा ऐतिहासिक दस्तऐवज रशियन लेखकानं सर्वप्रथम छापला. सत्तेवर सर्वाधिक काळ राहिलेल्या काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य इतिहासात भगतसिंगांच्या कार्यात्मक व विचाधारात्मक योगदानाबद्दल उत्सुकता नव्हती. त्यांचं वैचारिक मतभेद हे कारण असल्यानं त्यांनी भगतसिंगांवर कधी संशोधन करण्यात लक्ष घातलं नाही.

भगतसिंग शोध समिती स्थापन करून भगतसिंगांचा भाचा डॉ. जगमोहनसिंग आणि जेएनयूच्या भारतीय भाषा केंद्राचे प्रा. चमनलाल यांनी ‘भगतसिंग और उनके साथियों के दस्तावेज’ नावानं भगतसिंग व त्यांच्या सहकार्यांचं साहित्य शोधून पहिल्यांदा १९८६ साली प्रकाशित केलं. त्यातदेखील या ‘जेल नोटबुक’ची माहिती नव्हती. १९९१ साली प्रकाशित दुसऱ्या आवृत्तीत त्याचा उल्लेख करण्यात आला. सध्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती उपलब्ध असून त्यात बऱ्याच दुर्मीळ माहितीची भर टाकून ती वाचकांसमोर आणण्याचं अत्यंत मोलाचं काम या दोघांनी केलं आहे.

भगतसिंगांनी या वहीत घेतलेल्या नोंदी त्यांच्या दृष्टिकोन स्पष्ट करतात. स्वातंत्र्यासाठी ते बेचैन होते. म्हणून त्यांनी बायरन, व्हीटमॅन आणि वर्डसवर्थ यांचे स्वातंत्र्यविषयक विचार आपल्या वहीत उतरवले. त्यांनी इब्सेनचं नाटक, फ्योदोर दोस्तोवस्की यांची ‘अपराध आणि दंड’ ही प्रख्यात कादंबरी आणि ह्युगो यांची ‘पददलित’ कादंबरी वाचली. चार्ल्स डिकन्स, मॅक्सिम गोर्की, जे. एस. मिल, वेरा फिग्नर, शार्लोट पर्किन्स गिलमन, चार्ल्स मैके, जॉर्ज डी. हेरसन, ऑस्कर वाईल्ड, सिंक्लेयर यांच्या कथा-कादंबऱ्या वाचल्या. जुलै १९३० मध्ये त्यांनी लेनिन यांचं ‘दुसऱ्या इंटरनॅशनलचे पतन’, ‘डावा कम्युनिस्म : एक बालरोग’, क्रोपोत्कीन यांचं ‘परस्पर सहायता’, कार्ल मार्क्स यांचं ‘फ्रान्सचे गृहयुद्ध’ ही पुस्तकं बंदिवासात वाचून काढली. रशियन क्रांतिकारक वेरा फिग्नर व मोरोजोव यांच्या आयुष्यावर बेतलेल्या प्रसंगांची टिपणं काढली. त्यात उमर खय्याम यांच्या ओळीदेखील आहेत. ही पुस्तकं त्यांनी जयदेव गुप्ता, भाऊ कुलबीरसिंग आदींकडून आग्रहानं पत्र लिहून मागवून घेतली होती.

आपल्या वहीत २१व्या पानावर त्यांनी अमेरिकन समाजवादी युजीन वि. डेब्स यांचं वाक्य, ‘जो वर खालचा वर्ग आहे, मी त्यात आहे; जो वर गुन्हेगारी तत्त्व आहेत, मी त्यात आहे. जो कोणी बंदिगृहात आहे, मी स्वतंत्र नाही.’ लिहिलं आहे. त्यांनी रुसो, थॉमस जेफरसन, पॅट्रीक हेन्री यांच्या ‘स्वातंत्र्य संघर्ष व मानवाच्या जन्मसिद्ध अधिकार’ या पुस्तकावर टिपणं काढली आहेत. प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेनचं प्रसिद्ध वाक्य, ‘आम्हाला लोकांचा शिरच्छेद किती भयानक हे शिकवला गेला आहे. पण सर्व लोकांवर आयुष्यभरासाठी लादली गेलेली गरिबी आणि हुकूमशाहीचं मरण हे त्याहून भयानक असतं, हे शिकवलं गेलेलं नाही.’ नोंदवलं आहे.

भांडवलशाही समजून घेण्यासाठी भगतसिंगांनी केलेली बरीच आकडेमोड या वहीत आहे. ब्रिटनच्या विषमतेवर त्यांनी नोंद केली आहे – ‘ब्रिटनच्या लोकसंख्येचा एक नववा भाग अर्धा उत्पादन ताब्यात घेतो आणि झालेल्या उत्पादनाचा फक्त सातवा (१४ टक्के) भाग दोन तृतीयांश (६६.६७ टक्के) लोकांच्या वाट्याला येतो. अमेरिकेच्या १ टक्के श्रीमंतांकडे ६७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे व ७० टक्के लोकांकडे केवळ ४ टक्के मालमत्ता आहे.’ त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचं वाक्य उदधृत केलं आहे. ज्यात त्यांनी जपानी लोकांच्या पैशांसाठीच्या हव्यासाला ‘मानवसमाजासाठी भयानक धोका’ म्हटलं आहे. मॉरिस हिल्क्विस्ट यांच्या ‘मार्क्स ते लेनिन’मधून बुर्झ्वा भांडवलशाहीबद्दलचे संदर्भ आहेत.

भगतसिंग नास्तिक होते. त्यांनी ‘धर्म – स्थापित व्यवस्थेचे समर्थक : गुलामगिरी’ या शीर्षकाखाली नोंद केली आहे, ‘बायबलच्या जुन्या व नव्या धर्मग्रंथांमध्ये गुलामगिरीचे समर्थन करण्यात आले आहे. ईश्वराची सत्ता त्याची निंदा करत नाही.’ धर्माच्या उत्पत्तीची कारणं व त्याचे कांगावे समजून घेत असताना ते कार्ल मार्क्सकडे वळतात. ‘धर्मविषयक मार्क्सचे विचार’ या शीर्षकाखाली ते लिहितात – ‘मनुष्य धर्माची रचना करतो, धर्म मानवाची रचना करत नाही. मनुष्य होण्याचा अर्थ म्हणजे मानवी जग, राज्य, समाज. राज्य व समाज मिळून धर्माचा एक विकृत विश्व दृष्टिकोनाला जन्मी घालतात...’. शास्त्रीय समाजवादाच्या उभारणीसाठी त्यांचा कल सामाजिक सुधारणावादी दिसून येतो. कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यातली काही उदधृत त्यांच्या या वहीत आहेत. सर्वहारा गीत ‘इंटरनॅशनल’च्या ओळी त्यांनी या वहीत लिहिल्या आहेत. फ्रेडरिक एंगल्स यांची रचना ‘जर्मनीत क्रांती व प्रतिक्रांती’च्या उद्धधृतातून ते त्यांच्या साथीदारांच्या क्रांतीविषयक उथळ संकल्पनांचा प्रतिवाद करताना दिसतात.    

धर्म, जात आणि गायीच्या नावावर देशात जे मॉब लीन्चिंग म्हणजे गर्दीकडून करण्यात येत असलेल्या हत्यांचं सत्र सुरू झालं आहे, त्यासंदर्भात थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या पुस्तकातून भगतसिंगांनी घेतलेले संदर्भ आजही लागू आहेत. त्यांनी लिहिलं आहे - ‘ते हे त्याच सरकारांकडून शिकतात ज्यांच्या अंतर्गत ते जगत असतात. बदल्यात ते तीच शिक्षा देतात, ज्याची त्यांना सवय झालेली असते.... जनमानसासमोर प्रदर्शित क्रूर दृश्यांचा प्रभाव संवेदनशीलता खतम करणे किंवा प्रतिशोध भडकावण्याच्या स्वरूपात केले जाते. विवेकऐवजी दहशतीच्या माध्यमातून लोकांवर राज्य करण्याच्या याच निकृष्ट आणि खोट्या धारणांचा आधार घेऊन ते आपली प्रतिमा निर्मित करतात.’

‘प्राकृतिक आणि नागरिक अधिकार’ संदर्भात त्यांनी नोंद केली, ‘माणसाचे प्राकृतिक अधिकारच सर्व नागरिकांच्या अधिकारांचा आधार आहेत.’ जपानी बौद्ध भिक्षु कोको होशीचं वाक्य त्यांनी नोंदवलं आहे – ‘शासकासाठी हेच योग्य आहे की, कोणताही माणूस थंडी व भूकेने व्याकूळ राहू नये. जेव्हा माणसाकडे जगण्याचं साधारण साधनदेखील राहत नाही, तेव्हा तो नैतिक स्तर राखू शकत नाही.’ समाजवादाचं लक्ष्य  - क्रांती, विश्वक्रांतीचं लक्ष्य, सामाजिक एक्य आदी अनेक विषयांवर त्यांनी विविध लेखकांचे संदर्भ दिले आहेत.

भगतसिंगांच्या सहकाऱ्यांनी नमूद केलं आहे की, भगतसिंगांनी जेलमध्ये असताना चार पुस्तकं लिहिलीत. १. आत्मकथा, २. भारतात क्रांतिकारी आंदोलने, ३. समाजवादाचे आदर्श, ४. मृत्युच्या दारावर अशी आहेत. ती पुस्तकं जेलच्या बाहेर गेल्यावर इंग्रजांच्या कारवाईच्या भीतीनं नष्ट करण्यात आली.

भगतसिंग यांचा दृष्टिकोन भविष्यात स्वातंत्र्यानंतर जातीवाद, सांप्रदायिकता, असमानता मुक्त, न्यायपूर्ण समाजवादी भारताच्या निर्माणाचा होता. भगतसिंगांचं लिखाण, त्यांचे लेख याची दिशा दाखवतात. ‘जेल नोटबुक’ त्यांच्या गहन अध्ययनाचा पुरावा आहे.

.............................................................................................................................................

भगतसिंग यांच्या मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4687/Shaheed-Bhagatsingh-Samagra-Vandmay-

.............................................................................................................................................

लेखिका कल्पना पांडे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य आहेत.

kalpanasfi@gmail.com     

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................             

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......