आता प्रवास उलटा सुरू झाला आहे!
पडघम - माध्यमनामा
भक्ती चपळगावकर
  • डावीकडून दुसऱ्या भक्ती चपळगावकर वर्ल्डवाईडच्या टेलिव्हिजन बातमीनिर्मितीच्या वर्गमित्रांसह. उजवीकडे प्रसिद्ध पत्रकार एन. राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप सोहळा
  • Fri , 22 March 2019
  • पडघम माध्यमनामा टीव्ही पत्रकारिता TV Journalism वृत्तवाहिन्या News Chanels

निर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही, समाजवास्तव दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता पत्रकारितेच्या नीतीमूल्यांना तिलांजली देत सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. मराठी-हिंदी टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट आजपासून. ‘मी टीव्ही पत्रकारिता सोडली त्याची गोष्ट’चा हा पहिला भाग. पुढचा भाग येत्या शुक्रवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

फार वर्षांपूर्वी, जवळपास वीसेक वर्षं झाली असतील, मी औरंगाबादेत उस्मानपुरा भागातल्या एका पेट्रोल पंपावर माझ्या लुनात पेट्रोल भरायला गेले होते. तिथे लाईन मोडून पेट्रोल भरणाऱ्या एका माणसाबरोबर माझे कडाक्याचे भांडण झाले, म्हणजे मी त्याच्यावर जोरात ओरडले आणि तो ऐकत होता. ओरडता ओरडता माझा आवाज किती किनरा आहे आणि तो चढल्यावर गंमतशीर येतोय, याची जाणीव मला झाली आणि मी हसायला लागले. काय बेक्कार आवाज आहे आपला, हा शोध मला अचानक लागला! स्वतःचा आवाज ऐकण्याची सवय किती महत्त्वाची असते आणि ऐकल्यानंतर तो नियंत्रित करणेही किती महत्त्वाचे असते, हे पुढे टेलिव्हिजन पत्रकारितेचे प्रशिक्षण घेताना माझ्या मनावर ठसले.

२००० साली चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझममध्ये बीबीसी वर्ल्डवाईड तर्फे टेलिव्हिजन बातमी निर्मितीचा एक डिप्लोमा मी केला. लंडनहून टोनी ओशॉनसी नावाच्या प्रशिक्षकाने आम्हाला टेलिव्हिजन बातमी निर्मितीविषयी प्रशिक्षण दिले. (पुढे टोनी आमचा सगळ्यांचा मित्र झाला.) एकदा आम्हाला सार्वजनिक ठिकाणी जाऊन कॅमेरासमोर उभे राहून पीस टू कॅमेरा किंवा बातमीसंबंधी बातमीदाराने केलेले निवेदन करायचे होते. कोणतीही असाईनमेंट झाली की, दिवसाअखेर ती सर्व वर्गासमोर (आम्ही इनमिन सहा-सात जण वर्गात होतो.) दाखवायची आणि सगळ्यांनी मिळून त्याच्यावर चर्चा करायची, अशी टोनीची शिकवण्याची पद्धत होती. माझा पीटूसी सगळ्यांसमोर वाजवण्यात आल्यानंतर त्यात माझा आवाज किती वरच्या पट्टीत गेला आहे, याची जाणीव मला झाली. गर्दीच्या ठिकाणी आपला आवाज आपल्याला ऐकू येत नाही म्हणून आपण ओरडून बोलतो, पण पडद्यावर आपल्याला जेव्हा प्रेक्षक बघतात, तेव्हा त्यांना किंचाळणारी व्यक्ती दिसते, असे टोनी म्हणाला.

मी जेमतेम वीस वर्षांची होते. टोनीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या मनावर ठसल्या. प्रेक्षकांपुढे बातमी सादर करताना बातमीदाराने किंवा अँकरने काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आपण जी बातमी सादर करतो, त्या बातमीवर प्रेक्षकांचा विश्वास बसला पाहिजे. प्रेक्षकांनी ती गंभीरपणे घेतली पाहिजे इत्यादी. त्यामुळे तुम्ही कसे दिसता आणि कसे वागता याकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर तू किंचाळत बातमी सांगायला लागली तर प्रेक्षक ही बाई किती किंचाळतीए, या विचारापलीकडे जाणार नाहीत. तू आवाजाचा योग्य वापर कर. गर्दीच्या ठिकाणी आवाज रेकॉर्ड करताना तुझा आवाज चढू देऊ नकोस. रेकॉर्डिंग झाल्यानंतर घटनास्थळावरच ते पुन्हा ऐक. त्यात तू कशी बोलत आहेस, हे तुझ्या लक्षात येईल. ते योग्य आहे याची खात्री झाली तरच पॅक अप कर, नाही तर पुन्हा कॅमेरासमोर उभी रहा. या सूचना टोनीने दिल्या. हे प्रशिक्षण घेण्यापूर्वीच मी एका प्रादेशिक वाहिनीत बातमीदार म्हणून काम करत होते. पण तिथे वार्ताहरांचे नाव देण्याची किंवा त्यांचा चेहरा दाखवण्याची पद्धत नव्हती. त्यापूर्वी पुणे विद्यापीठात पत्रकारितेत पोस्ट ग्रॅजुएशन केले होते. बातमी म्हणजे काय, ती कशी वार्तांकित करावी याचे ज्ञान मला होते. पण कॅमेरासमोर उभे राहताना किंवा बातमीचे चित्रीकरण करताना नेमके कसे काम करावे याचे पाढे मी टोनीच्या शाळेत गिरवले. इतकेच नाही तर कोणती बातमी टीव्ही बातमीदारीसाठी महत्त्वाची असते, दृश्य म्हणजे काय, बातमीत दृश्य कसे वापरले पाहिजे, दृश्य पत्रकारितेचे प्रशिक्षण देताना, हे धडे फार उपयोगाला आले.

सगळ्यात महत्त्वाची बाब जी माझ्या मनावर ठसली, ती म्हणजे टीव्हीवर पत्रकार म्हणून काम करत असताना किंवा बातमी देत असताना भावनेच्या आहारी जायचे नाही. कारण असे करताना आपण बहुतेक वेळा तटस्थ राहू शकत नाही. बातमीदार हा बातमी देतो, पण बातमीत सहभागी होत नाही. हे सहभागी न होणे तितकेसे पूर्णतः शक्य नसते, पण शक्य होईल तितके तटस्थ राहणे बातमीदाराकडून अपेक्षित असते. पुढे काम करत असताना, विशेषतः राष्ट्रीय न्यूज चॅनल्समध्ये काम करत असताना याच्या अगदी उलट धडे देण्यात आले.

टोनीची शाळा संपल्यानंतर मी औरंगाबादहून मुंबईला शिफ्ट व्हायचे ठरवले. मी ज्या वाहिनीत काम करत होते, त्यांनी मला मुंबईत सामावून घेतले. मुंबईत आल्यानंतर एक वेगळे जग दिसले. आतापर्यंत औरंगाबादला एका छोट्या ऑफिसमध्ये मी काम करत होते. मी आणि माझा कॅमेरामन अशी दोघांचीच टीम होती. ऑफिससाठी जागा शोधणे, त्यात फर्निचर करून घेणे. टेलिफोन लाईन बसवणे, ही सगळी कामं मीच केली होती. (कंजूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका वाहिनीत मी काम करत होते. ऑफिस सुरू करायला जो खर्च आला, तो खर्चही या लोकांनी मला दिला नाही. पण माझा उत्साह कमी झाला नाही.) बातमी कोणती करायची, कधी करायची याचे निर्णय मी घेई. तेवढी बातमी मुंबईला पाठवल्यानंतर आम्हांला आराम असे. थेट प्रक्षेपण वगैरे भानगडी नव्हत्या. काही काही बातम्या करताना मी धमाल केली. दहावीच्या परीक्षेत चाललेल्या कॉप्या आम्ही अगदी झाडावर चढून, भिंतीवर चढून चित्रित केल्या. ती बातमी तुफान गाजली. तो प्रश्न अगदी विधीमंडळात विचारला गेला. पण त्यापलीकडे फार काही काम करायची संधी मला मिळाली नाही.

पहिल्याच आठवड्यात ट्रेनमध्ये माझे पाकिट मारले गेले आणि मुंबईकर झाले. मुंबईच्या ऑफिसात एक विचित्र पद्धत होती. या वाहिनीत बातमीदार काय काम करतील, हे कार्यालयीन कर्मचारी सांगत. रोज होणाऱ्या कार्यक्रमाची यादी एका रजिस्टरमध्ये असे, एकेका रिपोर्टरने येऊन तिथे आपल्याला ज्या समारंभाला जायचे आहे, त्यावर स्वाक्षरी करायची अशी पद्धत होती. त्यामुळे या वाहिनीला ‘सरकारी चॅनेल’ असेही हिणवले जायचे. बातमीदारांचे उत्तम नेटवर्क आणि प्रादेशिक प्रश्नांवर पकड असूनही वाहिनीच्या मालकांच्या हुकूमशाही आणि संकुचित विचारसरणीमुळे इथल्या कामाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. इथला सगळा कारभार शिस्तीत आणि एकसुरी असायचा. वेळेवर या आणि वेळेवर घरी जा, असे काही जणांचे ब्रीदवाक्य होते. माझ्या वरिष्ठांनी मला हवे ते स्वातंत्र्य दिले इतकेच नाही, तर मला हवे होते म्हणून मंत्रालयात प्रवेश करून दिला. याच कार्यालयात दोन-तीन अत्यंत हुशार बातमीदार मला भेटले. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि बातमीदार म्हणून ते तल्लख होते. लवकरच वाहिनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून ते बाहेर पडले. इथून बाहेर पडून राष्ट्रीय वाहिनीत काम करण्याची संधी मी शोधत होते, ती मला मिळाली आणि मला एका राष्ट्रीय वाहिनीत नोकरी लागली.

नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेले, तेव्हा मुलाखत घ्यायला तिथले ब्युरो चीफ आणि एचआर हेड होते. एचआर हेडने मला विचारले, मिल्सच्या जागी मॉल उभे राहताहेत, तुला याबद्दल बातमी करायला सांगितली तर कशी करशील? मी कॉलेजमध्ये शिकता शिकता ‘मराठवाडा’ नावाच्या दैनिकात काम करत होते. समाजवादी विचारांच्या या दैनिकाचे संस्कार माझ्यावर झाले असल्याने मी बाणेदारपणे उत्तर दिले, ज्यांनी नोकरी गमावली, ज्यांचे आयुष्य देशोधडीला लागले, त्यांची बातमी करेन. त्यावर एचआर हेड म्हणाला, या एकमेव उत्तरापायी तुझी हातात आलेली नोकरी निसटू शकेल. आपण वाहिनी चालवतो ती आपल्याला जी मंडळी जाहिरात देतात, त्यांच्या जोरावर आणि ते लोक मॉल्समध्ये जातात, मॉल्स चालवतात. इथे नोकरी करायची असेल तर ही बाब मनावर ठसव. म्हणजे मी नोकरी मी जवळपास गमावली होती. पण माझ्या भावी ब्युरो चीफचे माझ्याबद्दलचे मत बरे असावे, त्यांनी मला सावरून घेतले आणि मला ती नोकरी मिळाली.  

आगामी काळात माध्यमांचे वारे कोणत्या दिशेने वाहणार आहे याची ही नांदी होती. बदलत्या समाजव्यवस्थेला मी जवळून पाहत होते. इतकेच नव्हे तर नव्या अर्थव्यवस्थेची फळे चाखत होते. त्यामुळे माझा दृष्टिकोन मी विस्तृत केला. स्टोरी आयडिया सादर करताना आपली बातमी बघणाऱ्या प्रेक्षकवर्गाला या बातमीत किती रस असेल आणि त्या वर्गावर या बातमीचा काय परिणाम होईल, याचा विचार करायला माझ्या वरिष्ठांनी मला शिकवले. माझे ब्युरो चीफ अत्यंत रागीट म्हणून प्रसिद्ध होते, नवे बातमीदार, कॅमेरामन त्यांच्या नावाने चळाचळा कापत. मला मात्र त्यांच्या कोपाचा फारसा सामना कधी करावा लागला नाही. उलट त्यांची मदतच झाली. सुरुवातीला माझ्या बातम्यांची कॉपी ते तपासून देत. समजावून सांगत. हिंदी भाषेत बातमी कशी लिहावी, हे मी त्यांच्याकडून शिकले.

हे दिवस खाजगी वाहिन्यांच्या उदयाचे होते. सरकारी माध्यमांपेक्षा काहीतरी अगदी वेगळे करण्याच्या प्रयत्नात या वाहिन्या होत्या. सरकारी माध्यमे सदैव मरगळलेली वाटत. पण ही नवी माध्यमे घटना घडल्या घडल्या ती लोकांपर्यंत पोचवत होती. खऱ्या अर्थाने हे दिवस मंतरलेले होते. रोज वर्तमानपत्र वाचण्यासाठी लोक सकाळची वाट पाहत होते. आता आम्ही घटना घडत असतानाच तुम्हाला दाखवू असा संदेश घेऊन खाजगी वाहिन्या कार्यरत झाल्या. (आता प्रवास उलटा सुरू झाला आहे. बातमी समजावून घेण्यासाठी लोक दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊ लागले आहेत.)  

.............................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhaktic3@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......