आज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण...
.............................................................................................................................................
लिहायला सुरुवात मी वयाच्या १४-१५ व्या वर्षी केली असेल. ते गद्यलेखन. आणि ते पुढे चालू राहिलं. कविता तशी आवडत होतीच, पण लिहायला मी धजावत नव्हतो. त्या काळात पाचव्या इयत्तेत असताना रेव्हरंड टिळकांची ‘वनवासी फूल’ माझ्या वाचनात आली. तिच्या ओघानं मला मोहित केलं. तिच्यातला विषय मला तितका कळला नसेलही, पण बरंच काही उमगलंदेखील. मी त्या प्रवाहात रमलो. कुंजविहारी यांची गीतं, गाणी कानावर पडत होती. हळूहळू रविकिरण मंडळ, गोविंदाग्रज, बालकवी हेसुद्धा ओळखीचे होत गेले. अशात शाळेत असतानाच रवीन्द्रनाथ यांची ‘गीतांजली’, तीही हरिभाऊ आपटे यांनी अनुवादित केलेली, वाचायला मिळाली आणि काव्याचा फार मोठा खजिनाच सापडला. पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मी त्यात अत्यंत रमून गेलो.
त्यानंतरच्या शाळेतल्या ज्या आठवणी आहेत, त्या कवितेचं प्रेम वाढवणाऱ्या अशाच आहेत. संस्कृत शिकत गेलो, मराठी कविता वाचत होतो तसं तसं या... अगदी उदाहरण द्यायचं तर...विशेषत: नादयुक्त रचना वाचल्या, आणि असं वाटलं की हे आपल्याला लिहिता येईल का?... ‘जिथे नाचती मोर मोर मंजुळ रवे, वापीच्या तटी खेळती सुखावरे चाक्रंग हंसादिक... पुष्पांनी लवल्या तरुवरा, जिथे मिठी घालती, उद्याने दिसती न ती, वसती जी क्षिप्रा नदीच्या तटी...’ असं उज्जैनीच्या हरवलेल्या वैभवाचं वर्णन करणारी वासुदेवशास्त्री यांची कविता वाचली अन् वाटलं, ‘किती मजेदार आहे हे सर्व, पाठ करायला काय आनंद होतोय..!’ पण मी त्या काळी कविता लिहीत नव्हतो.
तशी कवितेची ओढ मला वडिलांकडून आलेली. ते लेखनही करत. त्यांच्या काही कविता मासिकांतून प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. शिवाय घरात ‘शिवलीलामृत’ रोज कानी पडायचं. अकरावा अध्याय माझी आई रोज स्नानानंतर म्हणायची. त्याच वयात मी घरात ‘पांडवप्रताप’ वाचून दाखवला होता. चार-दोन पानं रोज… असं जवळजवळ वर्षभर मी वाचत होतो. कविता म्हणजे काय असते, तिची मोहिनी काय असते, हा विचार मग मनात साठत गेला. अखेर मग ‘जोत्स्ना’, वाङ्मय-शोभा’सारख्या मासिकातून ललितगद्य, कथेसारखं काही लिहिलं. त्यात मी कविता कधी लिहिली नाही.
कॉलेजातून बीए होऊन बाहेर आलो. ते दिवस रविकिरण मंडळाचे होते. वाचत होतो ती कविता ‘रविकिरण’चीच होती... माधवराव गेले होते, यशवंत, गिरीश अजून तिथं होते, मात्र नवीनपणा जरा ओसरला होता. पण चाळीस-बेचाळीसच्या सुमारास आपणही तसं काही लिहू शकतो असं मला वाटायला लागलं होतं. तो काळ महायुद्धाचा होता. त्या सुमारास मी माझी पहिली कविता ‘अभिरुची’ला पाठवली. बडोद्याहून ते निघत असे. बाबुराव चित्रे त्याचे संपादक होते. त्यांना कवितेचा फार सोस होता, आनंद होता. कविता ते मागवून घेत. माझ्यासारख्या अपरिचितांनासुद्धा ‘कविता द्या’ अशी त्यांची कार्डं यायची. ‘पोचली’ म्हणूनसुद्धा कार्डं यायची. पुढे हे फारच दुर्मीळ झालं. संपादकाच्या अंगानं इतकं अगत्य असणं आता नाही. त्यातून मी कविता लिहीत गेलो, ते साधारण ४८-५० पर्यंत लिहिल्या असतील. त्यातील काही स्पंदनं आहेत, ती मी पुढे सांगतो आहे… कवितेतून....
त्यानंतर मी कविता लिहिल्या नाहीत. मनात वेगवेगळ्या सांसारिक चिंता आणि काही दैवी आपत्तीतून जेव्हा अनुभव येत गेले, त्रस्त होत गेलो, तेव्हा तर सगळंच लेखन थांबलेलं होतं. पण मनात घुसमट होतीच. विचारांचा सगळा काला झाला होता. त्यातून मग मी दीर्घ कविता लिहिली. साधारणपणे १९५५-५६ च्या सुमारास. पु.शि. रेगे त्यावेळी ‘छंद’ नावाचं मासिक चालवायचं. त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी मला आणि आज जे प्रसिद्ध समीक्षक रा.ग. जाधव आहेत, त्यांना रेग्यांनी पारितोषिकं दिली. ती कविता तशीच पडून राहिली बरेच दिवस. मात्र ती मनात होती, मी त्यावर संस्कार करत होतो. जवळजवळ १२-१४ वर्षं मी त्यावर काम करत होतो. तो विषयसुद्धा तसा खूप विस्तारलेला होता. काही गोष्टी घालाव्यात, काही कमी कराव्यात असा वाव होता त्यामध्ये. मी लिहीत गेलो. १९७२ मध्ये आजचे प्रसिद्ध कविवर्य ग्रेस, नागपूरचे ते, ‘युगवाणी’चे संपादक होते. ती कविता मी त्यांच्याकडे पाठवली आणि त्यांनी एका अंकात ती पूर्ण छापली. त्यानंतर कवितांचं माझं लेखन जवळजवळ थांबलं. आजवर वेगळं काही लिहीत आलो आहे, ते तुम्हाला माहिती आहेच. समीक्षा, कादंबरी, नाटक… कविता मात्र गेल्या १५-२० वर्षांत मी दहासुद्धा लिहिल्या नाहीत... पण मला त्याचं काही वाटत नाही. त्याचं एक कारण आहे. कविता इतर सर्व लेखनामध्ये उपयोगी होते. तिची काही बलस्थानं आहेत, ती आपोआप इतर निवेदनामध्येसुद्धा उपयोगी ठरतात, हे मला कळून चुकलं होतं. त्यामुळे मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे. आता माझ्याकडे कविता आहे, जी मी सादर करतो आहे, ती ४०-५० वर्षांपूर्वीची आहे. तरीसुद्धा गेल्या काही महिन्यांपूर्वी इथल्या काही तरुण मुलांनी - सोलापूरच्या - त्या निवडून-वेचून लोकांसमोर सादर केल्या. लोकांना त्या आवडल्या, हे मी पाहिलं. त्यावेळी जाणवलं की, आपली कविता अगदीच क्षीण झालेली नाही. त्यात ताजेपणा आहे. आजही ती भिडू शकते याचा आनंद झाला. त्यातल्या काही कविता सादर करतो.
कविता मी ज्या वेळी लिहायला लागलो, त्यावेळी मनात प्रथम विचार आला की, ‘काय बाबा, कशाचं गाणं गावं वाटतंय तुला? कविता का लिहावी वाटतेय? कोणते विषय मनात येतात?’ तेच विचार मी मांडायचा प्रयत्न केला.
कसले गाणे, कशाचे गाणे?
जुन्या सुरांनी, नव्या भराने
गासि कुणाचे गाणे?
कधि सुखाने, कधि दु:खाने
गासि कशाचे गाणे?
कसले गाणे?
तर त्यातील जी स्पंदनं आहेत ती पुढे सांगतो, ती अशी आहेत...
यौवनदेही प्रत्यांगातून ललकारत येई
सामर्थ्याचा, सौंदर्याचा कानोसा घेई
बद्ध जिण्याच्या विमोचनाची कांक्षा मनात गाजे
रूपवतीच्या प्रणयाची पाउल-चाहुल लागे...
लालस-स्नेहल-पिंगट-काळ्या नेत्रांची प्रतिबिंबे
निरखित असता डोंब भडकला त्याची ज्वाला
दिसे!
कवटाळुन बाहूंत सखीला चंद्रोदयसमयी
सांगत असता संकेताचे शब्द शाल्मलीखाली
कजाग, भैरव भवितव्याची नौबत कानी पडे..
तसेच पाउल पुढे टाकता, घुमले रानीवनी
समर-गीत झुंजार देशाचे…
त्याची खिन्न कहाणी .
अंधुक सायंतनी गाढ, तमलिप्त मध्यरात्री
वद्य चांदण्यातुनी उमलता लाल उष:काली
मनोनभावर सुंदर चित्रे, रहस्यमय ती
मयासुराच्या सृष्टीहून ही अद्भुत धरिती दीप्ती.
त्या चित्रांचे रूप, माझिया मनात वावरते,
त्या दीप्तीच्या नवलाईची गाणी मी गातसे…
ओटा अंगणी वाट कधीची पाचोळुन पडते
ओसरीवरी जिवलग, सस्मित चाहुल लोपून जाते
उंबरठ्यावर दिवंगताची वाट पहावी का?
वाट पाहुनी डोळे टिपणे वाया नाही का?
माझी बहीण त्याच्या आधी गेलेली, तिचा हा उल्लेख असावा.
राम मंदिरी टिपरी झडते
सनई उदास गाते
राईतुन मोराची व्याकुळ किंकाळी उठते .
धुके दाटते बाहेर , आतहि
दहिवर उतरे नयनी
विरह-कळेची, जनात किंवा मनात
गातो गाणी…
हे माझंच नव्हे तर, एकूणच कवितेमध्ये जे विषय येत राहतात, त्याच्याविषयीची नोंद मी करतोय. म्हणजे मी काही बोलत असेनच, पण कवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं.
वसुंधरेच्या देहामधुनी उठतो मादक गंध
नवोन्मेषधारिणी दिसे ती सकाम रोमांचित
वाऱ्यावरती कधि घाली उखाणे
फळा-फुलांचा वास,
कधि परदेशी कुणा पाखराचे झडलेले पीस.
निळ्या अंतराळातुन झरते मधुर स्वर-वाहिनी
क्षितीजामागे तेज फाकते शीतल चंदेरी
प्रकाशकिरणे चंचल, शामल जळात कंपित होता
पाउसवारा झाडांमधुनी सपसप दौडत जाता..
आतुर हृदयी अबोध संवेदन दरवळुनी उठते
निःशब्दाच्या सारंगीवर कविता झंकृत होते!
‘उत्तररात्र’ हा संग्रह १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला, त्याच्या आधी जवळजवळ कवितालेखन थांबत आलेलं होतं. त्यात बहुतेक प्रेम विषयक कविता आहेत. त्यातील काही कविता सादर करतो…
मार्गशीर्षातल्या पूर्वरात्री क्षीण जलवाहिनीच्या
तटाकी
चिंचेतळी आज होई सखे, भेट माझी-तुझी.
दूर डोंगर धुके, शांत धूसर निळे :
माणसांचे थवे रस्त्यांत, चौकांत घोंघावती
मृगशीर्ष डोईवरी, रोहिणी कृत्तिका
मंगळाचा चढे लाल तारा
वेळ अशी आहे, आणि आम्ही भेटलेले
आहोत...!
उरातला दाह, नेत्रांतली आस, ओठांतली प्यास
नि:शब्दविते
यौवनाचा ग्रंथ असमाप्त राही
जीवनाचा छंद हृदयात, कंठात..
अपुराच विव्हळे
यौवनाची तृषा आटून गेली
यौवनाची निशा इंद्राजालापरी
फाटून गेली...
अशा भग्न वेळी उद्विग्न भ्रांतीत
हिंदोळणाऱ्या चित्तास सखये तू जागवीले.
अनुरक्त वाणीत, आसक्त अश्रूंत
मज लाभली दीप्ती संजीवनी :
अनपेक्ष वर्षाव ओथंबला, उजळून गेला,
न्हाऊन गेला,
माझ्या दिलाचा शाही मिनार.
अखेर झाली… वेगळाल्या दिशा
गेलो दुभंगून
कमनीय चाहूल-छाया तुझी
राहीली माझ्यासवे.
मार्गशीर्षातल्या पूर्वरात्री,
चिंचेतळी, वाहिनीच्या तटी,
चंद्रप्रकाशात झाली सखे
भेट माझी-तुझी.
...अशाच आणखी एका भेटीचं वर्णन आहे. ती आलेली आहे, वाट चुकून… म्हणजे, असं मी म्हणतोय...
वाट चुकुन आडवाट कशाला झालीस मैतरणी?
वेळ सांजची माझ्या दारी, आज दिवे लागणी!
आभाळाला फुटले हासू
धरतीला रोमांच झोंबला
नवलस्पर्शे उंबरठ्याचा ताठा रोडावला.
संग मनीषा तुला दाविता
आज अशी जिवलगे
फटकळ मुलुखाचे कवाड
परि अळीमिळी बसले!
वाट चुकुनी अडवाट कशाला,
आलीस आज सखे,
जाईचा पांघरून शेला
उतरे गं चांदणे.
मंथर डोळ्यांमध्ये हासते
खुणावणी प्रीतिची
पिकल्या ओठी अंगत-पंगत की गं
मदन रतीची.
अंगभरी लावण्य लवथवे
जळात जणु मासळी…
इथे झाकशी, तिथे झाकशी ठसले डोळांभरी!
अशी कशी होईल साजणी
सुटका आज तुझी…?
नवस-सायासाचे रहस्य ऐकशील तरी कधी?
मुकेपणानं किती गं छळावं आणि झुरावं उगी…?
झरझर पांगे वसंतवारा
परतणार का कधी?
दिठीत पाहू अर्धी तृप्ती, अधीर आणिक कष्टी
मिठीत बोलू
विलग व्हायच्या अवघड गुजगोष्टी...
वाट चुकुन आडवाट कशाला झालीस मैतरणी ?
कातर नयनी काजळ नयनी
केलीस गं करणी...
...या भेटी पुढे कायम तुटायाच्याच. संपायच्या असतात. त्या भेटीच्या आठवणी खास त्या प्रेमाचा विषय होऊन बसतात इतकाच त्याचा अर्थ. तशी आणखी एक भेट. त्या भेटीनं आपल्या जीवाला काय दिलं? म्हणजे त्या क्षणांना तर दिलंच, परंतु नंतरच्या जीवनालाही काय पुरवलं, याचा कुठेतरी वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे...
त्या संथ कालव्याकाठी
तू मंत्र ‘मोहिनी’ म्हटला
त्याचाच चेतनाकंप
कळसूत्र जीवनी भरला!
त्या गर्द जांभळी खाली
तू पैज जिंकली होती
त्याचीच साक्ष विस्कटल्या
प्राणांस पणाला लावी!
चोराच्या मनिच्या चंद्रा
गायिलेस त्या हिमरात्री
त्याच्याच अनाद-लकेरी
काढण्या कर्वतुन विरती
एकान्त उतरणीवरती
प्राशिला डोह डोळ्यांचा
त्याचीच ओल ओठांना
ग्रीष्मात आजच्या उरली!
त्या संथ कालाव्याकाठी
मी यौवन जळते केले
त्या एक सत्त्व संतापे
आजचे हवन चालविले!
त्या संथ कालाव्याकाठी
एकांत उतरणीवरती
त्या गर्द जांभळीखाली
दुर्दैव पराजित झाले!
त्या भेटीनं दुर्दैव संपलं असं वाटलं…
वाटून असावध होता
अवकाळी आभाळाचे
झाकोळ अवचिता आले
मग होऊ नये ते झाले
अवकाळी आभाळाचे
झाकोळ अवचिता आले...
भेटी संपण्याचा क्षण येतो. निरोपाची वेळ येते तो निरोप. त्यामध्ये तिच्या पुढील आयुष्याची सुखाची सगळी मागणी आहे. आणखी एक कविता या प्रेमसंबंधानं वाचतो. आता राहिलं काहीच नाही. सर्व जिकडल्या तिकडे. वारा पांगून गेला आहे. तरी मनामध्ये त्या प्रीतीचा झुला कुठेतरी झुलत राहिला आहे. आणि कसे काय भाव येतात… आल्याशिवाय तर राहत नाहीत, असा काहीसा संकेत आहे...
माधुमासाचा दिन ओसरला मावळले ऊन
झुळुक अडखळे कुहूकुहूही थबके तरूवरून
राईमधल्या देवळातली घुमे चौघडा-सनई
नाचतसे उल्हास शरीरी आणि लालसा मनी
या अबोध सुंदर शामल संध्या समयी
संगती कुणाच्या असशील सखये...
पुढे वर्षा ऋतू आला....
आकाशातून धारा रिपरिप संतत कोसळती
मेघांमधली चपल नर्तिका प्रकाशनृत्य करी
पलाश, पिंपळ, निंब नि केळी चिंब :
स्वैर वारे कानी येतो घूं घूं स्वर हा
थरकत कुठूनी बरे?
या जलार्द्र, भयकर दिवेलागणी समयी
बिलगुनी कुणाला असशील माझ्या सखये..
वर्षा-काल संपलाय आणि शरद ऋतू आलेला आहे...
आश्विन : वर्षामेघ पांगले दिशादिशांतून
फिक्कट निळसर नभी दाटले चांद्रमासी तेज
अर्जुनवृक्षी अर्धीन्मीलित लाख कळ्यांचे देठ
कसले माझ्या मनी तरळते, एकलकोंडे गीत?
या नीरव , सौरभशाली निशीथसमयी
रंजनी कुणाच्या सुखावलीस तू सखये…
...मला पाठची एकच बहीण होती. दोन वर्षांचंदेखील पुरतं अंतर नव्हतं आमच्यात. मी १० वर्षांचा असेन, ती ८-९ वर्षाची असेल. त्यावेळी ती शाळेतून आलेली आहे आणि येताना ती टिळकांच्या कविता म्हणत आलेली आहे, ‘क्षणोक्षणी पडे, उठे परी बळे उडे, बापडे...!’
‘केव्हढे हे क्रौर्य!’ ही कविता मी नंतर वाचली, शिकवलीदेखील. ही बहीण ऐन तरुणपणी माझ्या जगातून गेली ती कायमची. त्या काळातील ज्या आठवणी मला आल्या, त्यात तो प्रसंग मला आठवतो आहे, लहानपणाचा. शाळेत कुठेतरी नाट्यप्रयोग करून आल्यावर ती संभाषणं म्हणून दाखवायची. ‘केव्हढे हे क्रौर्य’ वाचताना, शिकवताना नंतर माझ्या मनात आलं ते यामध्ये आलं आहे...
ती आठवते मज श्रावण सायंकाळ
वारा पाउस नाचून गेला उधळत रानोमाळ
मावळतीहून विव्हळत आला तांबूस पिवळाझोत
अंगणातल्या डाळिंबावर लाल कल्याणच्या तोर.
ती श्रावणातील हसरी सायंकाळ
शाळेतून आलीस घराला नाचत डोलत गात..
पुस्तक-पाटी फेकुनी तशीच गुंगत गेलीस आत
ठिबकत होते केस मुखावर हसू-आसुचा खेळ
ओठावरचे गाणे केवळ होय-नकोचा मेळ
नकळत कळली होती तुजला जीवनमरणाची झोंबी
टिळकांची पक्षीण गे गात होती तुझिया कंठी
आज कोठल्या कोठे आलो, उजाड पसरे माळ
अश्रूमलीन ही श्रावण सायंकाळ
खिदळत जातो श्रावणवारा, सरसर येते धार
निळ्या ब्रह्म-कमळावर झळके तांबूस पिवळी झाक
आज परी तू नाहीस, अवचित तुटुनी गेली तार
बालपणीच्या मनोरथापरी हरवुनी बसलो पार.
पाळण्यातले दिलेस झोके, दिलेस चिमणे घास
उरला माझ्या भवती केवळ आठवणींचा भास.
ती श्रावणातली उदास सायंकाळ...
सगळ्या सुख-दु:खातून जात होतो. वाट काढत असताना किंवा त्यात असताना आपल्याभोवती जे चाललेलं असतं, ते आपल्यावर आदळत असतंच. आपण त्याच्याशी कुठेतरी जोडून घेतलेलं असतं. त्या भोवतीच्या जीवनामध्ये आपल्यासारखे पुष्कळ दिसतात. यांच्या बरोबरच आपल्याला जगायचं, हा एकच मामला मग मनात राहतो. आणि मग मी त्यांच्याविषयीचं गाणं म्हणतो. सर्वांना उद्देशून आहे. ते सगळे माझ्या मनातले राजहंस आहेत असं मी समजतो. प्रेम, आस्था आहे असं सर्व त्यात आपोपाप गृहीत धरले जातात...
राजहंसांनो,
कडवट जिभेने गायिलेल्या बस् झाल्या हळव्या कथा
मुस्कटदाबीच्या..बद्किस्मतीच्या,
गाऊया एक मोकळे गाणे, स्वैर उल्हासाचे
पोटातल्या गोष्टींचे, स्वच्छ उघडे मनातले मागणे.
जातील त्याच्या लकेरी, निळ्या अस्मानातून
हिरव्या रानांवरून, धुरकटल्या नगरात ,
दारोदार, कोनाकोनी..
आणि नाचेल हृदयात, अननुभूतसे परीनृत्य.
आपापल्या निर्व्याज आसक्तीचा निर्मळ अभिलाषेचा
पुऱ्या आणि अपुऱ्या वान्छितांचा
जमवूया सुंदर वाद्यमेळ… त्या परीनृत्याभोवती.
थांबवू नाटकी हसे-रडे ,मस्तकातली झाडून किल्मिषे
उतरू संकोचाचे बटबटीत शिणगार.
फेडुन संदेहाची कळकट वस्त्रे, काळेबेरे फोडू चष्मे
बोट लावून अद्भुत अंजनाचे
माखून यक्षकर्दमाची उटी
आळवूया अभिजात रागरागिणी.
जिवंत रसरशीत हातापायांना
जातिवंत मेंदूला, दिवसाचे अंगभर काम हवे,
खपायला क्षेत्र आवडीचे, घाम शिंपावया .
खाते आतल्या आत जीवास… याविना..?
का चाचरता ,
जमवुनी सुंदर वाद्यमेळ, गावूया उंच स्वराने..
जीविताचे वेधक गाणे!
टळटळीत दुपारी, भरल्या सांजेला
भाजीभाकरीचे, दहीकाल्याचे,
सणावारी तूपसाखरेचे,
घास पोटभर हवे, घर मंडळीना.
उणेपणा खोल सलतो अमुच्या जीवा
असेच ना...?
म्हणूया तसे, गाऊया उंच स्वराने,
जीविताचे वेधक गाणे, भेदक गाणे..
पेटलेला पोत मन्मथाचा , जळतो आपुल्या मानसी
उत्तेजक स्नेहाभावी चुटपुटतो, चडफडतो..
होय ना..? म्हणूया तसे,
कशाचे शरमिंधे आम्ही?
सर्वत्र हीच अनवस्था, अनिवार लालसा
प्रियदर्शनाची, प्रिय-मीलनाची.
आंब्याखाली, निंबाखाली,
बकुळीखाली, बाभळीखाली,
मातीत काळ्या, गवतांत हिरव्या-पिवळ्या
निसटत्या पारदर्शक उन्हात, निळसर विरळ धुक्यात
वाळूच्या खिजवत्या शेजेवर,
पिकल्या मळ्याच्या सुगंधात,
निगनिगत्या शेकोटीभोवती,
विरागी संधिप्रकाशात,
नक्षत्रांच्या मंद वंचक तेजात, वा अनुरक्त चांदण्यात
जिवलग सखीसंगती, खोडसाळ सख्यासमवेत,
कराव्यात जिव्हारीच्या कानगोष्टी,
हो-नको च्या चुकार देव-घेवी,
संगमोत्सुक विविध क्रीडा :
हे..हेच अगदी तुमच्या मनातले
आणि अगदी तुमच्या...तिच्याही!
म्हणूया तसे,
निःसंग रचूया कविता, जमवून सुंदर वाद्यमेळ
गाऊया उंच स्वराने,
जीविताचे वेधक गाणे, भेदक गाणे, दाहक गाणे!
पडसादही ऐकता ज्याचे पडावा चिरा दांभिकाच्या
भेकडाच्या ओंगळ ओठावरचे तवंग फसवे
काढून निपटून जिभेच्या मुळाशी, खोल खालती
भरले जे जे पोटात साठले -
करूया त्याचे मधुर गाणे,
मोकळ्या गळ्यातून उन्मळणारे
त्यास हवे जित्या जिवाचे जातिवंत जगणे!
अनोळखी राजहंसानो,
अंतरात्मा तुमचा माझ्या ओळखीचा ऋणानुबंधी :
सुखदुःखाचे संवाद गातो तुम्हास नकळत तो
माझिया संवेदनेवरी...!
(आकाशवाणीच्या रेकॉर्डींगवरून हे शब्दांकन जयंत राळेरासकर यांनी केलं. रेकॉर्डिंगमधल्या खरखरीनं कवितांमधले काही शब्द लागत नव्हते, ते पुरुषोत्तम नगरकर यांनी संग्रहातल्या कविता शोधून त्यावरून तपासून दिले.)
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment