अण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस
पडघम - देशकारण
डॉ. दीपक पवार
  • अण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस
  • Wed , 20 March 2019
  • पडघम देशकारण अण्णा हजारे Anna Hazare जॉर्ज फर्नांडिस George Fernandes

जॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर (इथं ‘आदरणीय’ जॉर्ज फर्नांडिस यांच्या मृत्यूनंतर असं लिहिणं सहज शक्य होतं, पण कार्यकर्ता म्हणून मला जॉर्ज जवळचा वाटतो. त्यामुळे त्याच्या वयाचा विचार न करता त्याचा उल्लेख ‘अरे-तुरे’ असा केला आहे.) अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.

जॉर्जनं अनेक आंदोलनं केली. पोलिसांचा प्रचंड मार खाल्ला. काँग्रेस ही अजेय संघटना असण्याच्या काळात जॉर्जनं चक्का जाम करण्याचं धाडस दाखवलं. इंदिरा गांधींना राजकीयदृष्ट्या अंगावर घेतलं. आणीबाणीच्या काळात दीर्घकाळ भूमिगत राहण्यात यश मिळवलं. जनता पक्षाच्या अल्पजीवी प्रयोगात जॉर्जलाही सत्तेचा आणि फाटाफुटीचा अनुभव मिळाला. त्यानंतर आघाड्यांची सरकारं स्थिरस्थावर होण्याच्या काळात जॉर्जनं वाजपेयी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचा हात धरला. तो अखेरपर्यंत सोडला नाही. जॉर्जकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं समन्वयकपदही होतं.

समाजवादी आणि डाव्या चळवळीतल्या अनेकांना जॉर्जचं हे वैचारिक स्खलन अजिबात मानवलं नाही. वाट चुकलेला, ढोंगी, संधिसाधू, सत्तापिपासू अशी अनेक विशेषणं लोकांनी त्याला त्याच्या हयातीत लावलीच होती, त्याच्या मृत्यूनंतरही अनेकांना तो मोह आवरला नाही. जॉर्जनं जेवढी वर्षं चळवळीत खस्ता खाल्ल्या, तेवढंही ज्यांचं प्रत्यक्ष वय नाही अशांनीसुद्धा जॉर्जवर टीका करणाऱ्या पोस्ट टाकल्या, लेख लिहिले. थोडक्यात, जॉर्ज हा अनेकांच्या दृष्टीनं स्खलनशील आणि झोडपण्यायोग्य राजकारण्याचं योग्य उदाहरण आहे.

अण्णांचा प्रवास लोक आदरापासून उपहासापर्यंत झाला आहे. ग्रामविकासाचं राळेगण मॉडेल तयार करणारे अण्णा, त्यांचं सैन्यात असणं, अविवाहित असणं, गांधीवादाचा पुरस्कार करणं, या सगळ्यांमुळे त्यांच्याभोवती एक तेजोवलय तयार झालं. राजकारणाचा संघर्षाचा मार्ग नको असलेले, पण विधायक कामाबद्दल आग्रही असलेले असे लोक अण्णांच्या भक्तांमध्ये होते. अण्णांना कुणी ‘नव्या काळातला महात्मा गांधी’ म्हटलं, तर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ असं म्हटलं. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराची प्रकरणं खणून काढणं आणि भ्रष्ट मंत्र्यांना घरी जायला भाग पाडणं हे अण्णांनी हौसेनं केलं. युतीच्या काळातही केलं, काँग्रेसच्या काळातही केलं. त्यामुळे ‘व्यवस्थेचा विवेक जागा ठेवणारा माणूस’ अशी अण्णांची प्रतिमा निर्माण झाली.

जॉर्जचं जसं अनेक भाषांवर प्रभुत्व होतं, तसं अण्णाचं नाही. अण्णाचं मराठी काही उच्च दर्जाचं किंवा संवादी आहे असं नाही. हिंदी मराठी माणसाचं असतं तितकंच वाईट आहे, पण या सगळ्यांवर मात करणारा आणि याला कुरवाळण्यासाठी सदैव उपलब्ध असलेला अहंगंड मात्र अण्णांकडे आहे. २०११ च्या दिल्लीतल्या आंदोलनात काँग्रेसवाल्यांनी पदोपदी माती खाल्ली नसती आणि दिल्लीतल्या माध्यमांनी नावीन्य आणि टीआरपीच्या सोसापायी अण्णा आणि टीमला इतकं उचलून धरलं नसतं तर अण्णांना राष्ट्रव्यापी लोकप्रियताही मिळाली नसती!

अण्णा आणि केजरीवाल यांच्यातला फरक असा की, केजरीवाल यांना राजकारण करायचंच होतं. अण्णांना मात्र आपण कायस्वरूपी रिमोट कंट्रोल म्हणून यशस्वी होऊ असा भ्रम होता. काँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्यांनी आपल्या भाकऱ्या भाजायचं काम मात्र नीटपणे केलं, त्यामुळे २०११ ला कुचकामी वाटलेलं मनमोहनसिंग सरकार २०१४ ला टाकून देण्यासारखं वाटलं. सत्तापालट झाल्यावर मोदी आणि त्यांचे सहकारी लोकपाल आणतील आणि देश भ्रष्टाचारमुक्त करतील, असं अण्णांना खरंच वाटलं असेल, तर तो त्यांच्या राजकीय आकलनाच्या दारिद्र्याचा पुरावा म्हणता येईल.

तसं नसेल तर काँग्रेसवाल्यांप्रमाणे भाजपवाल्यांना घोळात घेता येईल, असं अण्णांना वाटत असेल. भाजपवाल्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा बाजार उठवला आहे, ते पाहता मोंदीशी शत्रुत्व घेणं हे काँग्रेसशी शत्रुत्व घेण्याएवढं सोपं नाही, हे अण्णांच्या लक्षात आलं असेल. गेल्या वर्षी अण्णांनी उपोषण केलं, त्या दिवसांत मी योगायोगानं दिल्लीत होतो. अण्णा ज्या रामलीला मैदानात उपोषणाला बसले होते, त्याला एका उद्धवस्त धर्मशाळेचं रूप होतं. समोर शे – पाचशे माणसं तीही सर्व विस्कळीत रूपातली. त्यामुळे या आंदोलनाला दारुण अपयश येणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नव्हती. कदाचित दिल्लीत सपाटून मार खाल्ला असल्यामुळे असेल, पण अण्णांनी आत्ताचं उपोषण राळेगणसिद्धी इथं केलं. त्याबद्दलही बरीच वातावरणनिर्मिती झाली.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपनं आपल्याला वापरलं, याचा साक्षात्कार अण्णांना उशिरा का होईना झाला आणि ते जाहीरपणे बोलून दाखवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. त्यामुळे काही भाबड्या लोकांना अण्णा यावेळी अजिबात बधणार नाहीत असं वाटलं. पण पाच तास उपाशी पोटी राहून मुख्यमंत्र्यांनी अण्णांशी चर्चा केली आणि अण्णांचं पूर्ण समाधान झालं. मुख्यमंत्र्यांनी अण्णांना फसवलं  की नाही हे कालौघात कळेलच, पण अण्णांनी मात्र त्यांच्या भक्तांना फसवलं, हे निर्विवाद सत्य आहे. अण्णा म्हणजे पोट्टीस श्रीरामलू किंवा जी. डी. अगरवाल नव्हेत. त्यामुळे ते सोयीसोयीनेच उपोषण करतील. त्याहीपेक्षा उपोषणासारखं अर्धनैतिक शस्त्र आता कुचकामी ठरतं आहे, हे महाराष्ट्राला आणि देशाला पटवून दिल्याबद्दल शहाण्या जनतेनं अण्णांचे आभारच मानायला पाहिजेत!

समाजमाध्यमं सर्वत्र पसरण्याआधी जॉर्ज अल्झायमरमध्ये गेला. त्यामुळे संसदेत ऐकलेली ‘कफनचोर’ हीच त्याच्या माहितीतली शेवटची शिवी असणार. त्याच्यासारख्या चळवळीतल्या प्रमुखावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हावेत आणि त्यावर काही उत्तर द्यायच्या आतच त्याच्या जागरूक राजकारणावर शेवटचा पडदा पडावा, हे म्हटलं तर जॉर्जवर अन्यायकारक आहे. जॉर्ज जर तब्येतीनं बरा असता आणि सक्रीय राजकारणात असता तर तो मोदींच्या बरोबर असता की विरोधात? यावर त्याच्या मृत्यूनंतरच्या लेखांची भाषा ठरली असती.

जॉर्जला ढोंगी म्हणून त्याचा उद्धार करणाऱ्यांनी जॉर्जला वाजपेयी आणि मोदी यांच्यातला फरकही कळला नसता असं गृहीत घरलं आहे. जॉर्जचा चळवळीतला अनुभव आणि त्यानंतरची त्याची सत्ताकारणातली धडपड आणि तगमग लक्षात घेता जॉर्जकडे किती पर्याय उपलब्ध होते? समाजवादी आणि डाव्यांच्या शतखंडीत पक्षांच्या पाठबळावर कधीतरी प्रबळ सत्ता येईल आणि ती पाच वर्षं टिकेल, या भरवशावर जॉर्जनं कायम विरोधातच राहायला हवं होतं का, हा प्रश्न समाजवादी आणि डाव्यांपैकी अजूनही ज्यांना अंतर्मुख होणं जमतं, त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे.

सर्वसाधारणपणे तिसरी - चौथी आघाडी नावाचा जो प्रकार आहे, त्यांनी बिगर काँग्रेस, बिगर भाजपवाल्यांच्या पालख्या तर खांद्यावर घेतल्या आहेत; पण यांच्यातल्या कितीजणांना देशव्यापी दृष्टी आहे आणि सरकार पाच वर्षं टिकवायचं असतं ही माफक समज आहे?  वाजपेयी चांगले की वाईट याच्या खोलात न जाताही असं म्हणता येईल की, त्यांनी आपला कालावधी पूर्ण करणारं पहिलं बिगर काँग्रेसचं सरकार दिलं आणि त्यात जॉर्जला संरक्षणपद दिलं. जॉर्जला लालू आणि मुलायम इतका जनाधार नसेल, पण त्याचं राजकीय भान आणि वैचारिक समज यांच्यापेक्षा कितीतरी उजवी होती. दुर्दैवानं समाजवादी आणि पुरोगामी मंडळींना जॉर्जचा हवा तसा वापर करून घेता आला नाही.

जॉर्जच्या मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा शिवाजी पार्क येथील सभेचं एक छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. या तिघांच्या अजरामर मैत्रींचं प्रतीक म्हणून या छायाचित्राकडे पाहिलं जातं. पण हे छायाचित्र दत्ता सामंतांच्या गिरणी कामगारांच्या संपाला विरोध करण्यासाठी घेतलेल्या सभेचं आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गिरणी कामगारांना वाऱ्यावर सोडलं ही काही बातमी नव्हे, पण कामगारांचा पुढारी असणारा जॉर्जही मुंबईतला गिरणी कामगार मरत असताना बघत राहिला, ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे जॉर्जला झोडपायचं तर या मुद्द्यावर झोडपायला हवं. एकदा का त्यानं भाजपप्रणित आघाडीचं सभासदत्व स्वीकारलं की, मग त्यानं गुजरातच्या दंगलीबद्दल अभिप्राय दिला नाही, याबद्दल फारसं आश्चर्य वाटत नाही.

जॉर्जचा प्रत्यक्ष मृत्यू होण्याआधी दहा वर्षं आधी तो आजारपणामुळे आणि शारिरीक हतबलतेमुळे समाजातून उठला होता. जया जेटली आणि लैला फर्नांडिस यांनी या परस्पर कटुतेनं भरलेल्या वर्चस्व संघर्षाच्या काळात जॉर्जला काय सांगितलं असेल आणि त्याला ते कितपत कळलं असेल कोणास ठाऊक? अशा अवस्थेत माणसांच्या आठवणीचं काय होतं आणि किंवा होत नाही, हे कळायला मार्ग नाही.

एकेकाळी आपल्या शब्दांवर मुंबई बंद करू शकणारा हा धाडसी माणूस इतक्या करुण पद्धतीनं मरावा, हे नुस्ता विचार करतानाही थकवून टाकणारं आहे. अण्णा आज सुदैवानं धडधाकट आहेत आणि त्यांच्या एकूण राजकारणाबद्दल माझ्या मनात कमालीचा तिटकारा असला तरी त्यांना दीर्घ आणि स्वस्थ आयुष्य लाभावं अशी माझी इच्छा आहे. मात्र अण्णांचा राजकीय अवतार संपला आहे, आता त्यांच्याकडे स्मरणरंजनापलीकडे काहीही उरलेलं नाही. आत्मचरित्र लिहिणं किंवा एखादा बरा चरित्रकार मिळवणं एवढी एकच गोष्ट ते या पुढच्या काळात करू शकतात.

जॉर्जच्या मृत्यूनंतर जॉर्जवर सिनेमा काढला जाईल असं शिवसेनेनं म्हटलं आहे. बाळासाहेबांच्या  सिनेमाचं संजय राऊत यांनी जे वांगं केलं आहे, ते पाहता शिवसेनेला जॉर्जबद्दल खरा आदर असेल तर त्यांनी जॉर्जवर सिनेमा काढता कामा नये. अण्णांवर चांगला चरित्रपट होऊ शकेल. कथानायकाच्या आयुष्याचा शेवट शोकांत असण्याची महराष्ट्रातल्या सिनेमामध्ये दीर्घ परंपरा आहे. अण्णांवरील सिनेमा यामध्ये भर घालणारा ठरू शकेल. 

.............................................................................................................................................

लेखक डॉ. दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

santhadeep@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......